
एक हजार रुपये भरून अनेकांना शिबिरात सहभागी होण्यासाठी आम्हाला विनंती करून कंटाळा येतो. असे वाटते कुणाला देशासाठी घडायचे नाहीच.
नियतीच्या ‘जखमांचं’ ठिगळ !
त्या दिवशी रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही कोल्हापूरच्या शिवजयंतीमध्ये सहभागी झालो होतो. डोळ्याचे पारणे फेडणारे मिरवणुकीचे ते दृश्य होते. जिकडे पाहावे तिकडे मोठ मोठे देखावे. तरुणाईचा इतका जोश, उत्साह मी पहिल्यांदाच पाहिला होता. ज्यांच्या डोक्यात, मनात छत्रपती शिवाजी महाराज होते, ते आदराने त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणूकीत नेहमीचा जल्लोष होता. हौसै गवसेही कमी नव्हते. तसे ते असल्याने मिरवणूकीत जे रंग पहायाल मिळतात तेही मइळत होते. रात्री उशिरापर्यंत मी या नाचण्यात दंग असणाऱ्या तरुणांविषयी विचार करत होतो. आमच्या ‘यिन’च्या वतीने राज्यभर सध्या ‘चला घडू देशासाठी’ ही शिबिरे सुरूआहेत. या शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनाआम्हीजोरकसपणे आवाहन करतो.
एक हजार रुपये भरून अनेकांना शिबिरात सहभागी होण्यासाठी आम्हाला विनंती करून कंटाळा येतो. असे वाटते कुणाला देशासाठी घडायचे नाहीच. त्या दिवशी माझा सहकारी अवधूत गायकवाड यांच्याशी चर्चा करताना कधी डोळा लागला कळाले नाही. सकाळी उठलो. मालोजीराजे यांची भेटीसाठी वेळ घेतली होती. ठरल्याप्रमाणे. आम्ही महाराजांच्या राजवाड्यात जाताच, राजे नेमके कुठेतरी बाहेर गेलेत, असा निरोप मिळाला. मी त्यांच्याशी संपर्क साधला, ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात गेले होते. तुम्ही थांबा, आम्हीयेतो, असा त्यांचा निरोप आला होता. राजवाड्याचे वैभव, तिथले सगळे वेगळेपण डोळ्याच्या कप्प्यात अगदी साठवून ठेवावे असे आहे.
आम्ही महाराजांचा राजवाडा पाहिला. आमच्यासारखे अनेकजण तो राजवाडा, परिसर पाहण्यासाठी तिथे गर्दी करत होते. श्याम माडेवार, आकाश पांढरे, अनिकेत मोरे हे माझे सहकारी माझ्यासोबत होते. आम्ही राजेची वाट पाहत होतो. मला तहान लागली. पाणी कुठे मिळेल या उद्देशाने माझी नजर भिरभिरत होती. थोड्या अंतरावर पाहिले तर एक व्यक्ती पाणी विकत होती. त्या तरुणाच्या दिशेने मी निघालो. माझे सगळेच सहकारी ‘एसी’ची हवा खात गाडीत बसले होते. ऊन जरा जास्तच होते. तेवढ्या उन्हातही तो राजवाडा पाहण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी कमी नव्हतीच.
माणसे येताना-जाताना त्या पाणीवाल्याकडे हमखास जात होती. मी त्या व्यक्तीला म्हणालो, एक पाण्याची बाटली द्या.मी पाण्याची बाटली घेतली, तोंडाला लावली. पाणी पिऊन झाल्यावर मी त्या पाणी विकणाऱ्याला म्हणालो, किती पैसे झाले तुमचे ? त्याने मला किंमत सांगितली. ती व्यक्ती सर्वांना पाणी देण्यामध्ये व्यस्त होती. त्या व्यक्तीने आपल्या स्कूटरला दोन्ही बाजूने पाण्याने भरलेल्या दोन पिशव्या त्याने लटकवल्या, एक पिशवी हातात होती. असे वाटत होते पाण्याचा अवघा सागर त्या व्यक्तीच्या स्कूटरवर आहे.
ते माझ्या नजरेला नजर देत नव्हते. मी त्यांना काही रक्कम दिली अजून एक बाटली मागितली. मी त्यांना म्हणालो तुमच्याकडे पाण्याची बाटली एवढी महाग, हे बरोबर नाही, असे मी बोलल्यावर त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. मला तर त्यांच्याशी बोलायचे होते. त्यांची नजर माझ्या नजरेला मिळत नव्हती. चेहऱ्यावर तेज होते, पण नजरेमध्ये अनेक प्रश्न होते, असे का कुणास ठावुक मला वाटत होते. आता त्यांच्याजवळ फारशी माणसे नव्हती. मी गरज नसतानाही पुन्हा अजून एक बाटली द्या, असे म्हणालो. परत मी हळू आवाजात बोलणे सुरू केले. तुम्ही किती दिवसांपासून पाणी विकता ? राहता कुठे ? काय शिक्षण झाले? घरी कोण असते? असे एक एक करत आमच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्या वेळाने त्यांनी मला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.
एकीकडे त्यांचा पाणी विकण्याचा सारा व्यवहार सुरू आणि दुसरीकडे त्यांचे माझ्याशी बोलणे सुरू होते. त्यांच्याशिवाय मी त्यांना बाकी प्रश्नही विचारत होतो. इथे काय वेगळेपण आहे.? या विषयांपासून ते त्या व्यक्तीच्या कौटुंबिक विषयापर्यंत मी त्यांच्याशी बोलत होतो.
बाजूला असलेल्या दाट सावलीच्या झाडाखाली आम्ही दोघे जाऊन थांबलो. उन्हामुळे पाणी गरम होऊ नये म्हणून त्यांनी आपली लुनाही सावलीत लावली. एकीकडे आम्ही चर्चेमध्ये गुंग झालो होतो. आणि दुसरीकडे राजे कधी येतील, त्यांच्याशी कधी भेटायचे, पुढे कसे निघायचे, असे प्रश्न माझ्या मनात घोळत होते, पण जेव्हा त्या व्यक्तीने त्यांचे शिक्षण सांगितले, घरच्या सगळ्या परिस्थितीविषयी बोलायला लागले, तेव्हा मात्र मी पूर्णपणे त्यांच्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष देत होतो. एखाद्याचा प्रवास किती खडतरअसू शकतो, याचे ती व्यक्ती उत्तम उदाहरण होती.
मी ज्यांच्याविषयी बोलत होतो, त्यांचे नाव विजय हातवने होते. कोल्हापूर शहरातल्या आंबेडकर वस्तीमध्ये राहणाऱ्या विजय यांचे शिक्षण एम.ए. इंग्लिश, आणि त्यानंतर ते सेट परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. रोज मजुरी करून त्यांनी आपल्या वयाची पंचवीस वर्षे शिक्षणामध्ये घातली.पुढे त्यांनी छत्रपती शाहूमहाराज यांच्यावर संशोधन सुरू केले. पुढचे शिकणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यांनी काही स्वप्नं उराशी बाळगली होती. संशोधन करत करत त्यांनी दोन वर्षे नोकरीचा शोध घेतला, पण नोकरी काही मिळेना. आई-वडिलांच्या इच्छेसाठी त्यांना लग्न करावे लागले. लग्न केल्यावर एक वर्षभर त्यांनी नोकरीचा शोध घेतला, पण नोकरी काही मिळेना. एवढे शिक्षण घेऊन छोटी नोकरी करायची कशी, आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवायचा कसा, हे प्रश्न विजय यांच्यासमोर होते. त्यांचे तीन मोठे भाऊ, रोज मजुरी करून स्वतःचे कुटुंब चालवत होते.
विजय यांच्या आई-वडिलांच्या लकवा लागलेल्या हाता-पायाला काम केल्याशिवाय काही पर्याय नव्हता. अठराविश्व दारिद्र्य विजय यांच्या घरामध्ये होते. एकदा पुण्याला जाऊन त्यांनी मित्राच्या मदतीने एका कंपनीमध्ये काम सुरू केले. काही वर्षे गेल्यानंतर कंपनीने विजय यांना चांगला पगार दिला. विजय यांना दोन मुली झाल्या. त्यांची बायको चार घरी धुणीभांडी करून संसाराला हातभार लावू लागली. विजय थरकाप उडवणारी त्यांची कहाणी मला सांगत होते. आम्ही खूप वेगळ्या विषयावर बोलत होतो. साहित्यामध्ये अभ्यासू असणाऱ्या विजय यांनी आपलं मेरिट कधी हुकू दिले नाही. विजय मला सांगत होते, माझ्या कंपनीत सोबत काम करणारा व्यक्ती दहावी नापास होता. त्याला तेवढाच पगार होता, मी उच्चशिक्षित असूनही मला तेवढाच पगार होता. मी का शिकलो, वयाची पंचवीस-तीस वर्षे शिक्षणात का घालवली, असा प्रश्न मला तेव्हाच पडला होता.
नियती विजय यांची परीक्षा घेण्याची थांबवत नव्हती. कोरोनाच्या काळामध्ये त्यांची बायको मरण पावली. काळजीने विजय यांचे आई-वडील आजारी पडले आणि अंथरुणावरच आहेत. याच कोरोनाच्या काळाने विजय यांच्या आयुष्यात आणखीन दोन मोठे धक्के दिले. विजयचे दोन मोठे भाऊ कोरोनामध्ये मरण पावले. दारिद्र्य चिकटलेल्या विजय यांच्या आयुष्याची एकीकडे जगण्यासाठीची झुंज सुरू होती, तर दुसरीकडे पत्नी, भावाच्या जखमांचे एक ठिगळआयुष्यामध्ये कायमस्वरूपी जोडले गेले होते.
आता विजय यांनी त्यांच्या जवळच्या बाटल्यांची पिशवी स्कूटरला लावली. ती कुणालाही दिसणार नाही अशी झाकून ठेवली. आम्हाला बोलता यावे म्हणून त्यांनी तसे केले होते. भाऊ आणि पत्नीच्या मृत्यूनंतर घरातले सगळे आटपून विजय आपल्या दोन्ही मुलींना घेऊन पुण्याकडे होते. परत त्याच नोकरीवर जाऊन ते काम सुरू करणार होते. ते आता घरातून बाहेर पडणार तेव्हढ्यात आई विजय यांच्यापुढे पदर पसरत म्हणाली, आम्हाला अंथरुणावर असे टाकून जाऊ नको. तू गेल्यावर आम्ही लगेच प्राण सोडू, तू इथेच राहा, अशी विनंती केल्यावर विजय कोल्हापूरमध्येच थांबले. विजय म्हणाले, सहानुभूतीपोटी मित्राने, नातेवाईकांनी काही दिवस मदत केली. पुढे हा सगळा जबाबदारीचा गाडा मलाच चालवायचा होता. माझ्या दोन भावांपैकी एक भाऊ नेहमी राजवाड्यात येणाऱ्या पर्यटकांना पाण्याच्या बाटल्या विकून चार पैसे मिळवायचा. माझ्या त्याच भावांचे पाणी विकण्याचे काम आता मी सुरूकेले. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता.
मी विचार करत होतो, विजयच्या आयुष्याभोवती जखमांची किती ठिगळं लागलेली आहेत. बापरे...! बेकारी, महागाई कितीतरी यक्षप्रश्न छळायला लागले. सगळीकडं चर्चा राजकरणाची कोण कुठल्या पक्षात जाणार याची. बेकारी, दारिद्र्य, प्रचंड समस्यावर बोल याला कोणाला वेळ नाही. यावर एखादा कॉलम लिहावा, असे खरेच कुणाला वाटत नसेल का?
विजय मला जे जे सांगत होता, त्या सगळ्या विषयांभोवती माझे मन अगदी गुरफटून गेले होते. प्रचंड बुद्धिमान, उच्चशिक्षित असणाऱ्या युवकाला आज परिस्थिती पुढे हतबल होऊन सारी सामाजिक, अभ्यासू शस्त्र खाली टाकावी लागतात.
आपल्या अवती भोवती असणाऱ्या एका विजय यांची ही कहाणी नाही, तरअसे हजारो विजय गुणवत्ता असून जगण्याच्या संर्घषात भरडले जात असतील. कोल्हापूरातच राजर्षी शाहू महाराजांनी कित्येक दुर्लक्षित रत्नांना जगासमोर आणल्याचा इतिहास आहे. अशा विजयना त्याच रत्नपारखी नजेरेची गरज असते. ती परिस्थितीनं घेरलेल्या विजयच्या वाट्याला येईल का प्रश्न अस्वस्थ करत होता कारण भवतालचं वातावरण असंली काही वेदना असते हेच जणू विसरुन गेलं होतं. असा काही विचार करतच परतीचा रस्ता धरला त्यापूर्वी राजवाड्या समोरची माती डोक्याला लावली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, म्हणत मी त्या परिसरातून जायला निघालो. जाता जाता विजय यांच्याकडे गेलो. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणालो, हा माझा नंबर घ्या. तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा. मी नेहमी तुमच्यासोबत आहे. विजय यांनी होकाराची मान हलवली पण बिचाऱ्या विजयकडे तर साधा फोनही नव्हता.
त्यांनी पाण्याची पिशवी पुन्हा वर काढली. एकीकडे ते लोकांना पाण्याची बाटली विकत होते आणि दुसरीकडे ते माझ्याकडे टक लावून पाहत होते. मी गाडीत बसलो. गाडीची काच खाली घेतली. हात वर केला आणि जायला निघालो.
असे वाटत होते, एवढा मोठा प्रश्न बाजूला ठेवून मी माझ्या सुखकर रस्त्याने तसाच निघालो. तसा पर्यायही काही नव्हता. माझ्यासारख्या अनेक डोळस माणसांना पर्याय असूनही परिस्थितीपुढे मार्ग काढता येत नाही. जशी परिस्थिती विजय यांची, तशी माझी. परिस्थितीला चार हात करण्याची ताकद काबाडकष्ट करणाऱ्या त्या प्रत्येक विजयसारख्यांना मिळावी, एवढीच प्रार्थना या निमित्ताने आहे.
Web Title: Sandip Kale Writes Water Bottle
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..