‘ग्लॅमर’ महाराष्ट्रकेसरीचं....!

‘महाराष्ट्रकेसरी’चं कुस्तीमैदान दरवर्षी जोशात असतं. पैलवानांच्या काटाजोड लढतींचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो.
Prithviraj Patil
Prithviraj PatilSakal
Summary

‘महाराष्ट्रकेसरी’चं कुस्तीमैदान दरवर्षी जोशात असतं. पैलवानांच्या काटाजोड लढतींचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो.

‘महाराष्ट्रकेसरी’चं कुस्तीमैदान दरवर्षी जोशात असतं. पैलवानांच्या काटाजोड लढतींचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. स्पर्धेत मानाची चांदीची गदा देण्याची परंपरा असली तरी विजेत्या पैलवानाच्या पुढच्या कारकीर्दीचं काय असा प्रश्न उभा राहतो. मानाचा किताब पटकावल्यानंतर पैलवानानं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ते थेट ऑलिंपिक स्पर्धेत चमकावं, अशी कुस्तीशौकिनांची अपेक्षा असणं चुकीचं नाही. तसं ते घडतं का याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

महाराष्ट्रकेसरीची पहिली गदा दिनकर दह्यारी यांनी मिळवली. गणपतराव खेडकर, चंबा मुत्नाळ, दादू चौगले, लक्ष्मण वडार व चंद्रहार पाटील यांनी डबल, तर विजय चौधरी व नरसिंह यादव यांनी तीन वेळा गदा पटकावून इतिहास घडवला. केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातून आठ महाराष्ट्रकेसरी घडले. त्यांनी कुस्तीक्षेत्राच्या प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतलं. अनेक पैलवानांना घडवण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले. मैदान कोणतंही असो, तिथं त्यांचा मान-सन्मान केला जातो. त्यांना शासनाकडून मासिक सहा हजार रुपये मानधन दिलं जातं. यातील काही पैलवान आता हयात नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना मात्र हे मानधन आधारवड ठरतं. अर्थात्, राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे १९६१ ते २०२१ पर्यंत झालेल्या महाराष्ट्रकेसरी पैलवानांना या मानधनाचा लाभ मिळतो. त्यांच्याकडे पाहूनच युवा पैलवान महाराष्ट्रकेसरी होण्याचं स्वप्न बाळगत आहेत. विशेष म्हणजे, राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांनी कुस्तीक्षेत्राला दिलेल्या प्रोत्साहनामुळे गावागावातील तालमीत पैलवान घडत आहेत. कोल्हापूरच्या लाल मातीतील आखाडे पैलवानांचे आकर्षणबिंदू असले तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुस्ती सुरू आहे. कुस्ती जनमानसात मानाचं स्थान कायम आहे.

महाराष्ट्र केसरीच्या मैदानात लढलेल्या पैलवानांवर नजर टाकल्यास काही गोष्टी लक्षात येतात. हरिश्चंद्र बिराजदार १९६९ मध्ये महाराष्ट्रकेसरी होऊन १९७० ला राष्ट्रकुल स्पर्धेत चमकले होते. दीनानाथसिंह यांनी १९६६ ला महाराष्ट्रकेसरीची गदा मिळवून ते १९७३ ला तेहरानमधील (इराण) जागतिक कुस्ती स्पर्धेत उतरले होते. दादू चौगुलेही महाराष्ट्रकेसरी झाल्यावर जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी न्यूझीलंडला गेले होते. रघुनाथ पवार यांनी १९७४ ला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून महाराष्ट्रकेसरी मैदानात शड्डू ठोकला होता.

अप्पालाल शेख १९९२ ला महाराष्ट्रकेसरी झाले. तत्पूर्वी, दोन वर्षं अगोदर राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी पदक मिळवलं होतं. वयाच्या पंचविशीच्या आत पैलवानांनी महाराष्ट्रकेसरी होऊन जागतिक स्पर्धेत नशीब अजमावण्याचे प्रयत्न केले होते. त्यांचं ध्येय केवळ महाराष्ट्रकेसरी नव्हतं. या स्पर्धेला राज्यस्तराचा दर्जा असतो, ही खूणगाठ त्यांच्या मनाशी पक्की होती.

टक्का कमी झाला

सन २००० नंतरचा विचार करता विनोद चौगुले, राहुल काळभोर, मुन्नालाल शेख, दत्तात्रय गायकवाड, चंद्रहास निमगिरे, सईद चाऊस, अमोल बुचडे, चंद्रहार पाटील, विकी बनकर, समाधान घोडके, नरसिंह यादव, विजय चौधरी, अभिजित कटके, बाला रफीक, हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्रकेसरी झाले. नरसिंह यादव मूळचा बनारस असून तो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. त्यानं २०११, २०१२ व २०१३ ला महाराष्ट्रकेसरी हॅटट्रिक साधली होती. त्याची ऑलिंपिकसाठी निवड झाली असली तरी तो उत्तेजक द्रव्यचाचणीत दोषी आढळल्यानं त्याच्यावर चार वर्षं बंदी घालण्यात आली. विजयनंसुद्धा विजयाची हॅटट्रिक साधली. या पैलवानांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्याचा टक्का कमी राहिला.

बक्षिसासाठी हात आखडता

महाराष्ट्र किताब पटकावलेल्या पैलवानाची केवळ चांदीची गदा देऊन पाठ थोपटली जाते. आयोजक कधी रोख रक्कम देतात, तर कधी हात आखडता घेतात. महाराष्ट्रकेसरी होणाऱ्या पैलवानावर राज्य कुस्तीगीर परिषद लक्ष केंद्रित करत नसल्याचा आरोप नवा नाही. अलीकडे वयाची पंचविशी गाठल्यानंतर पैलवान महाराष्ट्रकेसरीचा किताब पटकावताना दिसतात. त्यांना माती व मॅट अशा दोन्ही प्रकारांत स्वतःला सिद्ध करावं लागतं. याउलट, पन्नास वर्षांपूर्वी पैलवान वयाच्या बत्तीस ते पस्तीसपर्यंत पैलवानकी करत होता, असं जाणकार सांगतात. मातीतील लढत निकालीच काढली जात होती. हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध मास्टर चंदगीराम यांची बेळगावात तीन तास, तर हिंदकेसरी दीनानाथ विरुद्ध चंबा मुत्नाळ यांची मुंबईतील परळ इथं १९७५ ला तीन तास लढत झाली होती. हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध विष्णू सावर्डेकर १९६५ ला खासबागेत अडीच तास एकमेकांना भिडले होते.

ग्लॅमर आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत जाऊ द्या

महाराष्ट्रकेसरीची लढत सहा मिनिटांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे एखादा पैलवान वयाच्या अडतीसपर्यंत कुस्ती करू शकतो, असा निष्कर्ष अभ्यासक काढतात. या स्थितीत पैलवानांना आर्थिक संरक्षण देण्याची भूमिका शासनाची कमी पडते. हरियानामध्ये पैलवानाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळाल्यानंतर नोकरीची शाश्वती मिळते. साहजिक त्याचं टार्गेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचं असतं. यंदा महाराष्ट्रकेसरी झालेल्या पृथ्वीराज पाटील याचा विचार करता महाराष्ट्रकेसरी झाल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला. त्याकरिता त्याला तोंड उघडावं लागलं. तत्पूर्वी, त्यानं रशियामध्ये झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कांस्य, ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्याच वेळी त्याच्यावर बक्षिसांची खैरात व्हायला हवी होती. महाराष्ट्रकेसरीला असलेल्या ग्लॅमरमुळे राज्यातला पैलवान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे वळायला तयार नाही. शासनानं महाराष्ट्रकेसरी विजेत्या पैलवानाच्या नोकरीची सोय केल्यास त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणं शक्य होईल. अन्यथा, एका गदेवर समाधान म्हणून कुस्तीला रामराम ठोकावा लागेल. याकरिता महाराष्ट्रकेसरीला जसं ग्लॅमर आहे, तसं ग्लॅमर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उरणाऱ्या पैलवानाला मिळवून देण्यासाठी राज्य कुस्तीगीर परिषद व शासनाला ठोस निर्णय घ्यावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com