ऐका सांगावा हवामान बदलाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐका सांगावा हवामान बदलाचा

भारतात २०२२ मध्ये सर्वाधिक दिवस तीव्र स्वरूपाच्या हवामान बदलाच्या घटनांचा प्रत्यय आला. साधारणपणे जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९० टक्के भारतात या तीव्र हवामान बदलाच्या घटनांची नोंद झाली.

ऐका सांगावा हवामान बदलाचा

- प्रा. संदीप पेटारे sandypetare@gmail.com

भारतात २०२२ मध्ये सर्वाधिक दिवस तीव्र स्वरूपाच्या हवामान बदलाच्या घटनांचा प्रत्यय आला. साधारणपणे जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९० टक्के भारतात या तीव्र हवामान बदलाच्या घटनांची नोंद झाली. देशात बऱ्याच ठिकाणी कित्येक दिवस विक्रमी तापमान हाेते. बहुतेक प्रदेश मुसळधार पावसाने जलमय होऊन जीवित व पशुधनाची अपरिमित हानी झाली. भविष्यासाठी हा हवामान बदलाचा सांगावा आपल्याला सावध करणारा आहे.

सर्व भारतीय राज्ये पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. त्यापैकी उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, काश्मीर हा प्रदेश फारच असुरक्षित होत चाललाय. हवामान बदलाची तीव्रता आणि वारंवारितेचा सामना सध्या सर्व जगच करतंय. एरवी शतकातून एखाद् दुसऱ्या तीव्र स्वरूपाच्या आपत्तीला सामोरं जाणाऱ्या जगाला त्याच स्वरूपाच्या घटनेचा प्रत्यय शतकातून दोनतीन वेळेस येतोय. २०२२च्या काही दिवसांत काही ठिकाणी एकाच दिवशी तीनही ऋतूंची अनुभूती घेता आली. आज विशाल लोकसंख्येच्या आणि समृद्ध जीवसृष्टीच्या भारतासमोर त्या अनुषंगाने आव्हानेही विशालच. त्याच दृष्टिकोनातून २०२२ हे वर्ष आश्चर्यकारक हवामानाचे ठरले आहे.

भारतीय हवामान विभाग आपल्या क्लायमेट ऑफ इंडिया या वार्षिक अहवालात हवामान बदलाच्या घटनांना परिभाषित करतो, ज्यात प्रामुख्याने गडगडाटी वादळ, चक्रीवादळ, बर्फवृष्टी, जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस, भूस्खलन, पूर, शीतलहरी, उष्णतेच्या लाटा, धूळ आणि वाळूची वादळे, गारपीट इत्यादींचा समावेश होतो.

विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस, ढग आणि जमीन यांच्यात किंवा ढगांमध्ये असमतोल झाल्यामुळे होणारा स्त्राव आहे. वादळाच्या तीव्र दबावामुळे अनियमित आकाराचे बर्फाचे गोळे जोरदार पावसासह पडतात.

भारतात वर्ष २०२२ मध्ये सर्वाधिक दिवस तीव्र स्वरूपाच्या हवामान बदलाच्या घटनांचा प्रत्यय आला. साधारणपणे जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९० टक्के भारतात या तीव्र हवामान बदलाच्या घटना फारच सामान्य होत्या. देशात बऱ्याच ठिकाणी कित्येक दिवस विक्रमी तापमानाची नोंद झाली. बहुतेक प्रदेश मुसळधार पावसाने जलमय होऊन जीवित व पशुधनाची अपरिमित हानी झाली. यासाठी हवामानात झालेला बदल प्रामुख्याने जबाबदार आहे; परंतु भविष्यातही या तापत्या जगाला अशा घटनांना तोंड द्यावे लागेल हे निश्चित आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील डिझास्टर रिस्क रिडक्शन कार्यालयाच्या २०२० च्या अहवालानुसार मागील २० वर्षांपासून हवामान बदलांच्या घटनांमध्ये फार तीव्रतेने वाढ होत आहे, परंतु देशात २०२२ मध्ये जी पर्यावरणीय उलथापालथ अनुभवली ती फारच विचित्र होती.

२०२२ च्या प्रत्येकच दिवशी उष्णता व थंडीच्या लाटा, चक्रीवादळ, विजांचा कडकडाट, अतिवृष्टी, पूर, तथा भूस्खलनासारख्या हवामान बदलाच्या घटनांचा अनुभव आला. त्यापैकी या बदलाची तीव्रता प्रामुख्याने जानेवारी ते सप्टेबरच्या अधिक प्रखर होती. या आपत्तीमुळे तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. १.८ दशलक्ष हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पीक प्रभावित झाले. ४ लाख १६ हजार ६६७ पेक्षा अधिक घरे नष्ट झाली. जवळपास ७० हजार पशुधन मारले गेले. हे नमूद केलेले आकडे ढोबळ आहेत; परंतु अचूक आणि तात्काळ निरीक्षणाने हे आकडे अधिक विस्तृत होऊ शकतात. मध्य प्रदेशात साधारणतः हवामान बदलाच्या घटनांत विविधता आणि वारंवारिता अधिक होती, ज्यामुळे ३०१ लोक दगावले, तर सर्वाधिक म्हणजे ३५९ बळी हिमाचल प्रदेशात गेले. आसाममध्ये सर्वाधिक घरांची पडझड झाली व पशुधनही दगावले.

१९०१ पासून सातव्यांदा २०२२ मध्ये भारतात तीव्र थंडीची नोंद झाली; तर मार्च महिना मागील १२१ वर्षांतील सर्वांत उष्ण तथा कोरडा महिना म्हणून गणला गेला. अशाच तीव्र स्वरूपाच्या कोरडेपणाची नोंद ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही करण्यात आली. पूर्व आणि ईशान्य भारतातही मागील १२१ वर्षांत पहिल्यांदाच जुलै महिना सर्वांत कोरडा आणि उष्ण गणला गेला. पाठोपाठ ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही विक्रमी कोरडेपणा नोंदवला गेला. या सर्व घटना हवामान बदलाचे स्पष्ट संकेत देणाऱ्या आहेत. या घटना नवीन नाहीत; परंतु या घटनांची वारंवारिता फारच चिंताजनक आहे. यातील एखादी घटना जवळपास १०० वर्षांनंतर अनुभवली जात होती. ती घटना आता पाच-दहा वर्षांच्या किंवा त्याहीपेक्षा कमी अंतराने अधिक तीव्रतेने अनुभवायला मिळत आहेत. ज्यामुळे मानवांसह एकूणच सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले, तसेच या सर्व आपत्तींचा सामना करण्याची क्षमताही आपण गमावत चाललो आहोत.

जून २०२० मध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘भारतीय हवामान बदलाचे मूल्यांकन’ या शीर्षकाच्या अहवालात भारताचे पहिले हवामान मूल्यांकन प्रसिद्ध केले. ज्यात अनेक कटू आणि आश्चर्यकारक निष्कर्षांवर प्रकाश टाकण्यात आला, जी नवयुगाची नांदी ठरू शकते. अहवालानुसार १९०१ ते २०१८ च्या दरम्यान भारतातील पृष्ठभागावरील हवेच्या तापमानात ०.७ डिग्री सेल्सियसने वाढ झाली आहे. २१ व्या शतकाच्या अखेरीस भारतातील सरासरी तापमानात २.४ ते ४.४ डिग्री सेल्सियस वाढ अपेक्षित आहे, ज्याने सर्व जीवसृष्टी धोक्यात येईल. अलीकडच्या दशकात म्हणजे १९५१ ते २०१५ च्या दरम्यान हिंदी महासागराच्या तापमानातदेखील १ डिग्री सेल्सियसने वाढ झाल्याचे लक्षात आले आहे.

मागील शतकात २००० च्या दशकात दक्षिण आशियातील बहुतांश भागात तापमानवाढ झाली; तर मागील तीन दशकांत देशात अनुक्रमे ०.१५, ०.१५, ०.१३ डिग्री सेल्सियसने वाढ होऊन ३० वर्षांत सरासरी पृष्ठभागावरील तापमानात ०.६ डिग्री सेल्सियसने वाढ झाल्याचे स्पष्ट करून भारतीय हवामान विभागाचे आकडेही वाढत्या तापमानाची पुष्टी करतात.

आयपीसीसीच्या पाचव्या मूल्यांकन अहवालात आशिया खंडातील पावसाच्या एकूण परिस्थितीबद्दल ठोस निष्कर्ष काढण्याइतपत नोंदी नाहीत; परंतु भारतात १९५० पासून जून ते सप्टेंबरदरम्यान प्रामुख्याने मध्य भारतात अतिवृष्टी तथा अति कमी पावसाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. भारतातील मान्सूनपूर्व पाऊस हा पश्चिमी विक्षोभ हवामान प्रणालींद्वारे चालतो, जो भूमध्य प्रदेशापासून दक्षिण आशियापर्यंत पसरतो. १९५१ ते २०१५ या कालावधीत निरीक्षण केलेल्या पश्चिमी विक्षोभ हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाची अनिश्चितता वाढते.

वाढते शहरीकरण, घटत्या वृक्षाच्छादनाने विशिष्ट ठिकाणी मुसळधार पावसाच्या वारंवारितेत लक्षणीयरीत्या वाढ (सुमारे ५० टक्क्यांनी) झाल्याचे आयपीसीसीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मध्यम स्वरूपाच्या पावसात कमालीची घट दिसून येते, ज्यामुळे पूर आणि दुष्काळासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे मान्सूनचा पाऊस भविष्यात अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम फार मोठ्या भागावर होईल. यामुळे भारतात अतिवृष्टीच्या घटना वारंवार घडतील, तसेच भारतात मान्सून लवकर येण्याची शक्यता बळावेल आणि मान्सून माघारी फिरण्याच्या तारखाही लांबण्याची शक्यता आहे. परिणामी मान्सूनचा हंगामही लांबेल.

हवामान बदलाचे परिणाम दिसत असतानाच २०१० पासून काही शास्त्रज्ञांनी मागील दहा वर्षांतील तीव्र स्वरूपाच्या सात हवामान बदलाच्या घटनांचा अभ्यास केला. त्यापैकी तीन घटनांत उष्णतेच्या लाटांचा प्रभाव होता; तर दोन घटनांत अतिवृष्टीसह पुराच्या घटनांचा समावेश होता. अशाच स्वरूपाच्या घटनांना भविष्यात आपल्याला वारंवार तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली.

वाढते तापमान आणि अनियमित पावसामुळे भारताला सकल राष्ट्रीय उत्पादनात २.८ टक्के नुकसान होऊ शकते. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार हवामान बदलाच्या परिणामांमुळे भारतातील निम्म्या लोकसंख्येचे जीवनमान खालावण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या मुख्य घटना म्हणजे सरासरी तापमानात होणारी वाढ, सरासरी पर्जन्यमान घटणे आणि कोरड्या उष्ण दिवसांची संख्या वाढणे. या तीनही घटना परस्परावलंबी असल्याने हवामान बदलाचा एकूण परिणाम फार तीव्र असण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या अंदाजनुसार तापमानाच्या तीव्र धक्क्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न अनुक्रमे ४.३ आणि ४.१ टक्क्यांनी कमी होते; तर अतिवृष्टीच्या धक्क्यामुळे सरासरी उत्पन्न १३.७ आणि ५.५ टक्के कमी होते.

जागतिक स्तरावर हवामान बदलाचे परिणाम शमवण्याची कृती काहीही असो, भारताला आपल्या अफाट लोकसंख्येला, समृद्ध परिसंस्थेला हवामान बदलाच्या परिणामांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी फार व्यापक प्रयत्नांची गरज आहे; परंतु या प्रयत्नांची फलश्रुती २०४० पर्यंत दिसण्याची शक्यताही नाही. असे असले तरी या बदलाचे गांभीर्यच न समजून घेणे म्हणजे विनाशाकडे वाटचालच म्हणावी लागेल.

अतिवृष्टी, पूर, भूस्खलन

एखाद्या ठिकाणी जेव्हा २४ तासांत ६४.५ ते ११५.५ मिमी पाऊस पडतो, तेव्हा मुसळधार पाऊस म्हणून गणला जातो. अतिवृष्टीच्या बाबतीत ११५.६ ते २०४.४ मिमी पर्यंत पडतो. तीव्र अतिवृष्टीच्या बाबतीत पाऊस २०४.५ मिमी किंवा त्याहून अधिक पडतो.

उष्णतेच्या लहरी

उष्णतेच्या लाटेची स्थिती सामान्य हवामान मूल्याच्या संदर्भात विशिष्ट ठिकाणी कमाल तापमानात ४.५ ते ६.४ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढ दर्शवते. ६.४ डिग्री सेल्सियसपेक्षा कमाल तापमानात वाढ झाल्यास तीव्र स्वरूपाच्या उष्णतेच्या लहरींचा प्रत्यय येतो.

शीतलहर

जेव्हा कमाल तापमान सरासरीपेक्षा ४.५ ते ६ .४ डिग्री सेल्सियसपर्यंत घसरते, तेव्हा शीतलहरीची परिस्थिती उद्भवते. जेव्हा ६.४ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक प्रमाणात खालावते, तेव्हा तीव्र स्वरूपाची शीतलहर येते.

हीमवर्षाव

हीमवर्षाव हा एक जलशात्रीय धोका आहे, ज्याने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळित होते, तसेच वाहतूक, पिकांवरही विपरित परिणाम होतो.

ढगफुटी

जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह एका तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडतो, तेव्हा ढगफुटीची परिस्थिती उद्भवते.

चक्रीवादळ

हे वातावरणातील तीव्र भोवरे किंवा वावटळी असतात, ज्याच्या भोवती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने खूप जोरदार वारे वाहतात.

(लेखक वन्यजीव व पर्यावरण अभ्यासक असून वर्धा येथील इंद्रप्रस्थ न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील जैवतंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत.)

टॅग्स :saptarang