लंडनमधलं ‘कॅफे डायना’

लंडनमध्ये हाईड पार्क रस्त्यावर लँकेस्टर गेटच्या समोरच्या बाजूला एक अगदी छोटंसं कॅफे आहे; ‘कॅफे डायना’.
Cafe Diana in London
Cafe Diana in Londonsakal

- संजय दाबके

लंडन हे शहर प्रवासासाठी आता नवीन राहिलेलं नाही. अनेक जण सहज लंडनला जाऊन येतात. मी पहिल्यांदा १९९१-९२ मध्ये लंडनला बीबीसीमध्ये शिकायला गेलो आणि नंतर नशिबाने मला अतिशय प्रिय अशा या शहरात कामानिमित्त अनेकवेळा प्रवास करावा लागलाय.

या सगळ्या प्रवासांमध्ये लंडनमधील गल्ली-बोळ पाठ झाले आणि प्रवासी सहसा ज्या जागी जात नाहीत, तिथंही मी पोहोचलो. ही अशीच काही निरीक्षणं आहेत, मला आवडलेल्या जागांची!

लंडनमध्ये हाईड पार्क रस्त्यावर लँकेस्टर गेटच्या समोरच्या बाजूला एक अगदी छोटंसं कॅफे आहे; ‘कॅफे डायना’. आत सगळ्या भिंतींवर प्रिन्सेस डायनाचे फोटो आहेत. ती इथं कधीतरी यायची म्हणे. आता राजघराण्यातली स्त्री अशा वाहत्या रस्त्यावरच्या टपरीवजा जागेत कशाला येईल? ब्रिटिश राजघराण्याचे प्रोटोकॉल किती कडक असतात ते सांगायला नको!

काहीही असो.. पण ही बया यायची इथं! कारण बहुधा या कॅफेचा इजिप्शिअन मालक असावा. तिचा अपघात ज्या प्रियकराबरोबर झाला तो हॅरडचा मालक, दोदी फायेदपण इजिप्शिअन होता. त्याच्या मित्रमंडळींपैकी कोणाचं तरी असू शकतं हे कॅफे!

या कॅफेचा मालक आणि त्याची मित्रमंडळी बऱ्याचदा एखाद्या टेबलवर गप्पा मारत बसलेली असतात. आतमध्ये सगळ्या भिंतींवर डायनाचे फोटो लावलेत. काही पुरावा म्हणून इथं आल्याचेही आहेत.

मी गेली कित्येक वर्षं, दिवसभराचं काम संपलं आणि जर जमलं तर फिरत फिरत इथं येऊन एका कोपऱ्यात बसतो. इथं थंडी असतेच. एक गरम चहा आणि एखादा लहानसा केक घेऊन बसावं आणि हाईड पार्क, बेजवॉटर भागातली वाहती रहदारी बघत बसावं, असं हे एक कोपऱ्यातलं माझं आवडतं ठिकाण आहे!

लंडनच्या एका फेरीत शेवटच्या दिवशी क्लर्केनवेल भागात गेलो होतो. तीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा लंडनला आलो होतो, तेव्हा बीबीसीचं सर्व्हिस डिपार्टमेंट इथंच जवळ होतं. माझी इंटर्नशिप तिथंच नॉर्थबर्ग स्ट्रीटवर होती. त्या वेळी बीबीसीमध्ये सतत ट्रेनिंग वर्कशॉप्स असायची. ज्या दिवशी वर्कशॉप असेल, त्या दिवशी दुपारच्या जेवणाचा खर्च बीबीसीच्या ट्रेनिंग डिपार्टमेंटतर्फे व्हायचा.

आमच्या ऑफिसशेजारीच ‘क्लब पार’ नावाचा सँडविच बार होता, तिथं जेवायचं आणि बिल बीबीसीला सबमिट करायचं. एके दिवशी दुपारी जेवायला सगळे क्लब पारमध्ये पोचलो. मला मेनूकार्डवर कोकाकोला सोडला तर काहीही ओळखीचं दिसत नव्हतं. तेवढ्यात मालक पीटर टेबलपाशी आला. अतिशय हसतमुख. माझं बावरलेलं ध्यान बघून त्यानेच मला तुला ‘जॅकेट पोटॅटो’ देतो, असं सांगितलं.

आता जॅकेट पोटॅटो कसा खातात ते माहिती नसल्याने मी सालांसकट चापत होतो. बाकीचे सहकारी खुदूखुदू हसत होते. पीटरने त्यांना येऊन झापलं. ‘अरे तो नवीन आलाय, हसताय काय?’ असं म्हणून बटाटा कोरून कसा खायचा, ते मला सांगितलं. तेव्हापासून जी मैत्री झाली, ती अजून टिकून आहे.

कुठलीही ऑर्डर दिली की ‘सर्टनली सर’, हे टिपिकल ब्रिटिश उत्तर पहिल्यांदा त्याच्याकडून ऐकायला मिळालं. ब्रिटिश भोजनाशी त्यानेच माझी चांगली ओळख करून दिली. त्याच्या छोट्याशा हॉटेलात तुडुंब गर्दी असायची. एकतर उत्कृष्ट पदार्थ आणि त्याच्याकडचा फुल इंग्लिश ब्रेकफास्ट म्हणजे कमाल होती.

‘इंग्लिश जेवण बेचव असतं’, असं म्हणणाऱ्यांना काही कळत नाही. पीटरकडच्या एग्ज आणि बेकनचा वास कोणालाही कमालीची भूक लावायला पुरेसा आहे. गेली कित्येक वर्षं कधी जमलंच तर पीटरकडे जेवायला जातो. पीटर आता सत्तरी पार करून गेलाय, थकलाय; पण अजूनही तो सकाळी साडेचारला उठून स्मिथफिल्डकडून बाजार आणि बर्मोन्डसीकडून ब्रेड घेऊन दुकानात पोहोचतो.

सातला त्याच्याकडे ब्रेकफास्टची रांग सुरू होते. (स्मिथफिल्ड आणि बर्मोन्डसी म्हणजे लंडनचे चितळे आहेत असं समजा!) आता धंदा मंदावलाय. तो एकटाच बसलेला असतो. मुलींची केव्हाच लग्नं होऊन त्या सासरी गेल्यात. क्लब पारचा आता कॅफे पार झाला आहे. भेटलो की जुन्या आठवणींच्या गप्पांत पीटर रंगून जातो.

त्याला बोलायला खूप आवडतं. प्रत्येक ट्रिपमध्ये मी म्हणत असतो की, पीटरचं हॉटेल चालू असू दे ! जुन्या जागा सुरू आहेत असं दिसलं की बरं वाटतं. आत्ताही म्हणाला, ‘‘जितके दिवस होईल तितके दिवस चालवणार, नंतरचं माहिती नाही!’’

लंडनमधील माझं असंच एक आवडतं ठिकाण म्हणजे, अलेक्झांड्रा पॅलेस. एकदा इथं कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. १९३६ मध्ये जगातील पहिलं टेलिव्हिजन प्रक्षेपण बीबीसीने इथूनच सुरू केलं. आज त्या ठिकाणी बीबीसीचं संग्रहालय करायचा विचार होतो आहे. १९५० च्या आसपास बीबीसी इथून बाहेर पडली;

पण तेव्हाचं स्टुडिओ, ट्रान्समिशन टॉवर, जुनी यंत्रसामग्री अजून बरीचशी तिथंच आहे. इतर वेळी या भागात जाता येत नाही, कारण काम सुरू आहे. पण त्या दिवशी नेमका ओपन डे होता म्हणून आत जाऊन आलो. आत जाताना पहिलं नमन केलं ते जॉन लॉगी बेअर्ड या महामानवाला.

१४ जूनला त्याची पुण्यतिथी. त्याच्यामुळे आज आपण टीव्ही बघतोय. १९३६ मध्ये त्याचीच यंत्रणा वापरून बीबीसीने पहिलं प्रक्षेपण केलं. त्याच फेरीत मग सोहोमध्ये चक्कर टाकली. तिथं २२, फर्थ स्ट्रीट या घरात १९२६ मध्ये पहिल्यांदा बेअर्डने एका खोलीतून दुसऱ्या खोलीत चित्र प्रक्षेपित केलं होतं.

पहिल्यांदा त्याने कॅमेऱ्यासमोर बाहुला ठेवला होता. त्याचं चित्र पलीकडल्या खोलीत बघून अत्यानंदाने त्याने खालच्या हॉटेलात काम करणाऱ्या २० वर्षांच्या विल्यम एडवर्ड टेंटन याला जबरदस्तीने आणून कॅमेऱ्यासमोर बसवलं आणि अशा रीतीने टेंटन हा जगातला ‘पहिला’ टीव्ही कलाकार झाला.

त्या जागी जाऊन भक्तिभावाने दर्शन घेऊन आलो! आमच्यासाठी हीच मंदिरं! नंतरच्या फेरीत अलेक्झांड्रा पॅलेसमध्ये गेलो, तेव्हा टीव्ही संग्रहालयाचं काम सुरू झालं होतं. ते तयार होताना बघणं, हा विलक्षण अनुभव होता. इंग्लंडमधील काही इतर शहरांविषयी पुढच्या भागात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com