देश सुंदर पण...

इस्तंबूल शहराला खूप पुरातन इतिहास आहे. त्यातला बराचसा (त्यात इस्लामिक जास्त आणि बायझेंटाईन व ख्रिश्चन थोडा कमी) चांगला जपला असल्याने जगभरातून पर्यटक प्रचंड संख्येनं येतात.
istanbul country
istanbul countrysakal
Summary

इस्तंबूल शहराला खूप पुरातन इतिहास आहे. त्यातला बराचसा (त्यात इस्लामिक जास्त आणि बायझेंटाईन व ख्रिश्चन थोडा कमी) चांगला जपला असल्याने जगभरातून पर्यटक प्रचंड संख्येनं येतात.

- संजय दाबके saptrang@esakal.com

इस्तंबूल शहराला खूप पुरातन इतिहास आहे. त्यातला बराचसा (त्यात इस्लामिक जास्त आणि बायझेंटाईन व ख्रिश्चन थोडा कमी) चांगला जपला असल्याने जगभरातून पर्यटक प्रचंड संख्येनं येतात. त्यांच्यासाठी सोयी पुरेशा आणि चांगल्या आहेत. तुर्की लोक सुरुवातीला थोडे उद्धट वाटतात. याला कारण म्हणजे, आपण गोरा रंग बघितला की सहसा शिस्त, सौजन्य गृहीत धरतो; पण मध्य युरोपपासून साधारण आपल्या भारतीय लोकांसारखेच हेही लोक वागतात.

तरीही बहुतांश लोक पटकन पुढे होऊन मदत करणारे आहेत. इथं इंग्लिशची तशी अवस्था चांगली नाही, त्यामुळे इथली मेट्रोचं तिकीट देणारी मशिन वापरायला समजेपर्यंत अवघड वाटतात, पत्ते सापडत नाहीत; पण साधारणपणे, कोणालाही विचारलं तर घाईत असतील तरीसुद्धा जमेल तितकी मदत करायचा प्रयत्न करतात. पण, पर्यटनाशी संबंधित जे उद्योग आहेत, त्यातले लोक हे बहुतांश भामटे आहेत. पर्यटकांना शक्य तितकं लुटायचा प्रयत्न इथं उघडपणे चालतो.

एकदा इस्तंबूल कन्व्हेन्शन सेंटरमधून संध्याकाळी परत येत होतो. मेट्रोपर्यंत चालत असताना मागून एक गाडी बाजूला येऊन थांबली. काच खाली करून ड्रायव्हरने विचारलं, ‘इंडियन?’ म्हणलं, ‘हो.’ ‘इंदू?’ (म्हणजे हिंदू) म्हणलं ‘हो.’ त्याने कुठलं तरी आयडी कार्ड दाखवलं आणि म्हणाला ‘‘इस्तंबूल एअरपोर्टच्या ड्यूटी फ्रीचा मॅनेजर आहे. प्रवाशांचं विसरलेलं सामान आम्ही काही लकी लोकांना देत असतो. ही पिशवी घे. तुला देतो मी फ्री!’’ हातातून त्याने एक ड्यूटी फ्रीची बॅग खिडकीतून बाहेर काढली. मी फोन काढला आणि म्हणलं, ‘‘ मी तुझा फोटो काढतो.’’ तत्काळ खिडकीची काच बंद करून शिव्या देत निघून गेला.

इस्तंबूलमध्ये प्रवाशांची अनेक पद्धतीने फसवणूक करतात. मी जर ती बॅग त्याच्या हातातून घेतली असती, तर पुढे त्याने काय नाटक केलं असतं देव जाणे ! पार चोरीपासून काहीही आरडाओरडा केला असता. इथं जे गर्दीचे भाग आहेत, जिथं मी राहतोय, तो सुलतान अहमद किंवा टाक्सीम किंवा इस्तीकलाल रस्ता या भागात तर अशा लोकांचा सुळसुळाट आहे.

चालत असताना अचानक सेंटच्या बाटल्या तुमच्या हातात कोंबतात आणि जर तुम्ही हातात घेतली, तर वाट्टेल ते भाव सांगून प्रचंड त्रास देतात. याचा अर्थ इस्तंबूल सुरक्षित नाही असा नाही; पण आपल्याला काळजी घ्यायला लागते, हे निश्चित. याआधी असे प्रकार काही प्रमाणात मी प्राग आणि मॉस्कोमध्ये पहिले आहेत. पण इस्तंबूल म्हणजे यातलं बाप शहर आहे. एकंदर जगात फुकट काही नसतं हे समजलं, की फारसा त्रास होणार नाही.

सर्वसाधारण हॉटेलातल्या जेवायच्या किमती महागच आहेत (दुबईच्या दुप्पट). शॉपिंगसाठी मी आलेलो नसल्याने त्याचा अनुभव घेतला नाही; पण महाग असणार याचा अंदाज आला. परवा काम संपल्यावर अमीर नावाच्या मित्राने गेबझे नावाच्या गावी त्याची सिम्युलेटरची फॅक्टरी बघायला नेलं. येताना बसने इस्तंबूलच्या आशियायी बाजूकडून क्रूझने खाडी क्रॉस करून युरोपमध्ये आलो. क्रूझवर बरेच पर्यटक होते. थोड्यावेळाने एक गृहस्थ हातात ट्रे घेऊन चहा, सँडविचेस, फ्रूट्स आग्रहाने वाटायला लागले. बऱ्याच लोकांची समजूत अशी झाली की, हे क्रूझच्या तिकिटात आहे. तो अक्षरशः प्रत्येकाच्या हातात कोंबतच होता! थोड्यावेळाने त्याने अव्वाच्या सव्वा किमतीने सगळ्यांकडून पैसे वसूल केले (एक लेजचं पाकीट साधारण ३०० रुपयांना). मला पूर्ण संशय आल्याने मी त्यातून वाचलो.

तीच गोष्ट टॅक्सी बुक करण्याची. मला हॉटेलातून एअरपोर्टला जायला बस पकडायची होती. त्या स्टेशनपर्यंत उबेरवर साधारण दोनशे रुपये दाखवत होते; पण काही केल्या उबेर ड्रायव्हरला कनेक्ट करण्याइतपत पुढे जाईना. वेळ चालला होता. इलाज नव्हता म्हणून हॉटेलवाल्याला टॅक्सी बोलवायला सांगितलं तर तिप्पट किंमत सांगितली. द्यायला लागले. पण शहराची माहिती झाली की ट्राम, मेट्रो आणि बस या तिन्हीतून प्रवास अतिशय चांगला आणि माफक दरात करता येतो. पण सर्व प्रेक्षणीय मॉन्यूमेंट्सची तिकिटंही अतिशय महागडी आहेत. थोडक्यात, तुर्कस्तानला जायचं असेल तर सावधपणे जा. फसवणुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून काळजी घ्या. अशी काळजी घेतली तर बाकी शहर आणि देश दोन्ही सुंदर आणि सुरक्षित आहे.

सकाळी कॉन्फरन्सला नेहमी भेटणारे मित्र भेटले. एक मित्र इथलाच आहे. दुपारी जेवायला गेल्यावर खाण्याच्या गोष्टी निघाल्या. तो भारतात एक-दोन वेळा येऊन गेला आहे. म्हणाला, ‘‘उद्या तुला टर्किश ब्रेकफास्ट करायला नेतो. तुम्हा लोकांना काय खायचं माहितीच नाही. तुम्ही नुसतं तेल पिता लेको ! ’’ हा भारतात दिल्लीला गेला होता आणि नंतर कोल्हापूरमार्गे गोव्याला गेला होता. हे ते कोल्हापूरला थांबल्याचे परिणाम. कोणीतरी आग्रहाने मिसळ खायला घातली होती त्याला.

इथं जेवताना पहिल्यांदा मोठा ग्लास भरून घट्ट ताक (आयरन) प्यायची पद्धत आहे. ते ताक मात्र जबरदस्त होतं. बाकी रेस्टॉरंटमध्ये बहुधा भरपूर पदार्थ काचेच्या कपाटात मांडून ठेवलेले असतात. आपल्याला पाहिजे ते ट्रेमध्ये घ्यायचं. सात टेकड्यांवर वसलेलं असल्यामुळे रस्त्यांवर सगळीकडेच प्रचंड चढ-उतार आहेत. कधी कोणी इथं येणार असेल, तर आपलं हॉटेल कुठं आहे ते नीट विचारून घ्या, नाहीतर रोज जाता-येता पर्वती चढावी लागेल (माझं तसंच झालंय!). इथलं आर्किटेक्चर मुस्लिम असलं तरी त्यावर युरोपियन प्रभाव आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम आहे. बाकी चांगल्या-वाइटाची सरमिसळ आहे.

( लेखक ‘अद्‍भुत थीम पार्क ’ आणि म्युझियम्स उभारणीच्या कामातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी जगभर प्रवास केलाय.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com