

Museum book by Sanjay Dabke
esakal
संग्रहालये मानवाच्या जीवनप्रवासातील भीती, शौर्य, हास्य, कारुण्य, संगीत, कला, निसर्ग यासह त्याची संस्कृतीदेखील जपतात व ती येणाऱ्या पिढ्यांसमोर मांडतात. त्यामुळे ते आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देतात असा संदेश देणारे संजय दाबके यांनी लिहिलेले ‘म्युझिअम’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीस आले आहे. दाबके यांनी त्यांच्या जगप्रवासात पाहिलेल्या काही भव्य, तर काही अगदी एका खोलीत मांडलेल्या संग्रहालयांचा आढावा यात घेतला आहे. संग्रहालय म्हणजे ‘कालकुपी’ असते, असे ते म्हणतात.
ज्येष्ठ मूर्तिशास्र अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे. ‘विविध विषयांवर आधारलेली संग्रहालये ही मानवी मनाचा, पराक्रमाचा, कलात्मकतेचा आणि प्रबोधनाचा आरसा असतात. वाचकांना हा आरसा न्याहाळण्याची संधी दिल्याबद्दल दाबके यांचे आभार मानावे लागतील आणि प्रस्तुत पुस्तक हे म्युझिअमचा पहिला भाग आहे असे मी मानतो आणि दुसऱ्या भागाची वाट बघतो आहे,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.