esakal | ऑलिंपिकपात्रतेतील डाव-प्रतिडाव
sakal

बोलून बातमी शोधा

Yogeshwar Dutt

ऑलिंपिकपात्रतेतील डाव-प्रतिडाव

sakal_logo
By
संजय घारपुरे saptrang@esakal.com

सीमा बिस्ला हिने जागतिक ऑलिंपिकपात्रता कुस्तीस्पर्धेत जिंकलेल्या सुवर्णपदकाचं कौतुक सुरू असताना ग्रीको-रोमन प्रकारात भारताचा एकही कुस्तीगीर ऑलिंपिक स्पर्धेस पात्र ठरला नाही याचं दुःख काहीसं विसरलं गेलं. ग्रीको-रोमनमध्ये पात्रता मिळाली नसली तरी भारताचे आठ कुस्तीगीर टोकिओतील ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत खेळतील. भारतीय कुस्तीगीरांचा हा सहभाग विक्रमीच असणार आहे. रिओ ऑलिंपिकसाठीही आठ कुस्तीगीर पात्र ठरले होते; पण नरसिंह यादवला परवानगी नाकारली गेल्यामुळे प्रत्यक्षात सातच खेळले. किमान यंदा तरी ऑलिंपिकपात्रता कुस्तीस्पर्धेवरून वाद झाला नाही हे महत्त्वाचं.

२०१२ च्या स्पर्धेत सुशीलकुमारप्रमाणेच पदक जिंकलेल्या योगेश्वर दत्तच्या निवडीवरूनही वाद झाला होता. ‘दंगल’ चित्रपटासाठी आमिर खानला ज्यांनी कुस्तीचे धडे दिले होते ते कृपाशंकर बिश्नोई २००४ च्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेच्या वेळी झालेल्या वादंगाकडे लक्ष वेधतात.

ते म्हणतात : ‘‘या स्पर्धेच्या वेळी लागोपाठ दोन ऑलिंपिकपात्रता स्पर्धा होत्या. पहिल्या सिल्वासिया स्पर्धेसाठी योगेश्वरची निवड झाली होती, तर दुसऱ्या बल्गेरियातील स्पर्धेसाठी माझी. ‘तुमच्यातील कुणीही जरी पात्रता मिळवली तरी तुमच्यात चाचणीलढत होईल,’ असं भारतीय कुस्ती महासंघानं सांगितलं होतं. पहिल्या स्पर्धेत योगेश्वर अपयशी ठरला. दुसऱ्या स्पर्धेच्या वेळी मी वजनचाचणीसाठी रांगेत उभा होता. त्या वेळी मार्गदर्शक आले आणि त्यांनी मला रांगेतून बाजूला केलं आणि तिथं योगेश्वरला उभं केलं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष एम. एस. मलिक यांनी या स्पर्धेतही योगेश्वरला खेळवण्याची सूचना केली असल्याचं तेव्हा सांगण्यात आलं. त्या स्पर्धेतून योगेश्वरनं पात्रता मिळवली. मायदेशात आलो तर सत्पाल यांनी योगेश्वरला खेळवण्यासाठी आंदोलन केल्याचं कानावर आलं. मी आपला चाचणीलढतीची प्रतीक्षा करत होतो. ‘होईल...होईल,’ असं सांगितलं जात होतं. योगेश्वरची प्रवेशिका पाठवल्याचं जाहीर झाल्यावर मी न्यायालयात गेलो तर ‘आता याचा उपयोग नाही,’ असं मला सांगण्यात आलं. अशी अनेक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांच्या वेळी ही चाचणी सोईनुसार टाळली जाते.’’

काका पवार यांच्या आठवणी

१९९२ पासून ऑलिंपिककुस्तीची पात्रतास्पर्धा सुरू झाल्यापासून या विषयीचे वाद चर्चेत आहेत. ऑलिंपिकपात्रता चाचणीची चर्चा सुरू झाल्यावर काका पवार यांच्या दुखऱ्या आठवणी जाग्या होतात.

ते म्हणतात : ‘‘१९९६ च्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेसाठी भारताचा एकही कुस्तीगीर पात्र ठरला नव्हता. त्या वेळी आत्तासारख्या ऑलिंपिक पात्रतास्पर्धा होत नसत. केवळ जागतिक आणि आशियाई स्पर्धांतूनच पात्रता ठरत असे. ‘मनिला आशियाई स्पर्धे’त मी चौथा आलो होतो, त्यामुळे मला वाईल्ड कार्ड मिळालं; पण मला ऑलिंपिकला पाठवण्याऐवजी त्यांनी पप्पू यादवबरोबर माझी पात्रतालढत खेळवण्याचं ठरवलं. खरं तर त्यात मी जिंकलो होतो; पण त्यांनी पप्पू जिंकल्याचं जाहीर केलं आणि माझी संधी हुकली. उत्तरेतील राज्यांना, तेथील कुस्तीगीरांना महासंघ झुकतं माप देतो. त्या वेळीही तेच घडले होतं.’’

एकंदरीत ऑलिंपिक कुस्तीस्पर्धेत खेळण्यासाठीचे डाव-प्रतिडाव मॅटवरच नव्हे, तर मॅटबाहेरही भारतात जास्त रंगतात.

ऑलिंपिकमधील महाराष्ट्राचे कुस्तीगीर

 • १०२० अँटवर्प - दिनकरराव शिंदे

 • १९४८ लंडन - खाशाबा जाधव तसेच सर्जेराव सूर्यवंशी

 • १९५२ हेलसिंकी - खाशाबा जाधव, श्रीरंग जाधव, के.डी. माणगांवे,

 • १९५६ मेलबर्न - बबन डावरे

 • १९६४ टोकियो - गणपतराव आंदळकर, मारुती माने, बंडा पाटील

 • १९७२ म्युनिच - हरिश्चंद्र बिराजदार, मारुती आडकर.

 • २०१२ लंडन - नरसिंग यादव

 • खाशाबा जाधव हे १९४८ च्या स्पर्धेत चौथे तर १९५२ च्या स्पर्धेत ब्राँझ

 • के डी माणगांवे हे १९५२ च्या स्पर्धेत चौथे

 • (कुस्ती अभ्यासक तसेच मार्गदर्शक उत्तमराव पाटील यांनी दिलेल्या माहीतीनुसार)

 • रिओ ऑलिंपिकप्रमाणेच टोकियोसही आठ कुस्तीगीर पात्र, पण टोकियोत सर्वाधिक सहभाग असणार

 • पहिली महिला कुस्तीगीर लंडन ऑलिंपिकसाठी पात्र

 • २०१६ च्या स्पर्धेस तीन महिला कुस्तीगीर पात्र, तर टोकियोसाठी चौघींची पात्रता

 • ग्रीको रोमन प्रकारात भारताचा पहिला सहभाग १९९२ च्या बार्सिलोना ऑलिंपिक स्पर्धेत

 • भारतीय कुस्तीगीर पहिल्यांदा १९२० च्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी.

 • १९२० च्या स्पर्धेनंतर सहभाग थेट १९४८ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये सहभाग आणि त्यानंतरच्या स्पर्धेत पहिले पदक.

(सर्व आकडेवारी जागतिक कुस्ती महासंघावरील संकेतस्थळानुसार)

loading image