सुवर्ण-ट्रॅकवरील राही

दिल्लीतील विश्वकरंडक स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमात राही सरनौबतनं हे मत व्यक्त केलं होतं.
Rahi Sarnobat
Rahi SarnobatSakal

‘लंडन ऑलिंपिक क्रीडास्पर्धेला पात्र ठरले तेव्हा त्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यानं मी खूश होते. मात्र, आपण समजतो त्यापेक्षाही खूप काही करू शकतो याची, तसंच स्वतःच्या क्षमतांचीही जाणीव त्याच वेळी झाली. ऑलिंपिक पदक हे काही माझ्या आवाक्याबाहेरचं नाही. ते जिंकणं माझ्याच हातात आहे. या वेळी आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो...’

दिल्लीतील विश्वकरंडक स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमात राही सरनौबतनं हे मत व्यक्त केलं होतं. नंतर, केवळ हे मत व्यक्त करूनच न थांबता, आपण हे करू शकतो असा सार्थ विश्वासही तिनं क्रोएशियातील विश्वकरंडक स्पर्धेतून दिला आहे. क्रोएशिया स्पर्धेतील यश राहीला जास्त समाधान देणारं असेल. दिल्लीतील स्पर्धेत तिला प्राथमिक फेरीत ५८२ च गुण मिळवता आले होते, तर या वेळी तिनं ५९१ गुणांचा वेध घेतला. विश्वकरंडकातील यापूर्वीच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा पाच गुण जास्त.

राहीच्या कामगिरीवर नजर टाकली तर तिच्यासाठी अंतिम फेरीपेक्षा पात्रताफेरी जास्त अवघड आहे. तिनं ३० विश्वकरंडक स्पर्धांपैकी आठ स्पर्धांत अंतिम फेरी गाठली आणि त्यात सहा स्पर्धांत पदक जिंकलं; पण २२ स्पर्धांत पात्रतेत ती पराजित झाली होती. दिल्लीतील स्कोअर कदाचित ऑलिंपिकच्या अंतिम फेरीपासून दूर ठेवू शकेल असंच दिसत होतं. या पार्श्वभूमीवर क्रोएशियातील यश जास्त लक्षणीय ठरतं.

दिल्ली विश्वकरंडक स्पर्धेच्या सुमारास तिला चालणं अवघड जात होतं. स्पर्धेपूर्वी काही दिवस तिनं चप्पल घालून सराव केला होता. याची आठवण करून दिल्यावर ती म्हणते, ‘सहा वर्षांपूर्वी कोपर दुखावले होते. त्या वेळी शस्त्रक्रिया, त्यानंतरची पुनर्वसनप्रक्रिया या सगळ्यामुळे जवळपास दोन वर्षं नेमबाजीपासून दूर होते.’

‘त्या तुलनेत हे काहीच नाही का,’ असं ती विचारते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ती टोकिओतील सुवर्णपदकासाठी किती कसून तयारी करत आहे हेच स्पष्ट होतं. या दुखापतीच्या वेळी निवृत्तीचे विचार तिच्या मनात येत होते; पण त्या वेळी ऑलिंपिकमधील सुवर्णपदकाच्या लक्ष्यानं तिला प्रेरित केलं.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याचा मान तिनं मिळवला, त्या वेळी तिनं ऑलिंपिकसाठीची सर्व तयारी केली होती. यापूर्वीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेल्या बक्षिसातून तिनं वैयक्तिक मार्गदर्शकांची नियुक्ती केली. त्यासाठी केलेला खर्च मोठा आहे. त्यातून तिची जिद्द, झोकून देण्याची वृत्ती दिसून येते. ऑलिंपिक क्रीडास्पर्धा एक वर्ष लांबणीवर पडल्यामुळे तिला स्पर्धेपूर्वीच जर्मनीच्या प्रशिक्षकांसोबतचा करार संपवणं भाग पडले. ती आता समरेश जंग यांचा सल्ला घेत आहे.

पुस्तकांशी मैत्री करणाऱ्या, त्यातही नेमबाजी आणि क्रीडामानसशास्त्र या विषयांवरील पुस्तकं वाचणाऱ्या राहीनं स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी वाचन वाढवलं. त्याचा तिला लाभच होत आहे. दिल्ली विश्वकरंडकानंतर तिला कोरोनाची बाधा झाली होती. त्या वेळी ऑक्सिजन कधीही ९५ पेक्षा कमी आला नाही; पण अशक्तपणा खूप आला होता. त्यातून सावरण्यात दोन आठवडे गेले. मात्र, नियमितपणे व्यायाम करून तिनं स्वतःला ट्रॅकवर आणलं. आता तर ऑलिंपिकसाठी आपली वाटचाल सुवर्ण-ट्रॅकवर असल्याचं तिनं क्रोएशियातील स्पर्धेतून दाखवून दिलं आहे.

राहीची कामगिरी

विश्वकरंडक स्पर्धा सुवर्ण

  • चँगवॉन २०१३ : प्राथमिक फेरीत ५८५, उपांत्य फेरीत १५, अंतिम फेरीत ८

  • म्युनिच २०१९ : प्राथमिक फेरीत ५८६, अंतिम फेरीत ३७

  • नवी दिल्ली २०२१ : प्राथमिक फेरीत ८४४, उपांत्य फेरीत ४१९, अंतिम फेरीत १७

  • ऑसिजेक २०२१ : प्राथमिक फेरीत ५९१ आणि अंतिम फेरीत ३९

जागतिक महासंघाच्या नोंदणीनुसार ३० विश्वकरंडक स्पर्धांत सहभाग, त्यात आठ वेळा अंतिम फेरी. चार सुवर्णपदकांसह एक रौप्य (२०२१ च्या नवी दिल्ली स्पर्धेत), तसंच एक ब्राँझ (२०११ च्या फोर्ट बेनिंग स्पर्धेत) *म्युनिच ऑलिंपिकमधील सुवर्णपदकासह टोकिओ ऑलिंपिकची पात्रता मिळवली.

लक्षणीय यश

  • २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ब्राँझ.

  • २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये सहभाग (‘पिस्तूल’ प्रकारात पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला).

  • २०१० च्या म्युनिच जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत.

  • २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण. पिस्तूल नेमबाजीत ही कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला नेमबाज.

  • २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझ.

  • २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, तर २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, तसंच रौप्य.

  • २००८ च्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत सुवर्णपदक.

  • राहीचे वडील जीवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ पासून विविध आंतरराष्ट्रीय, तसंच राष्ट्रीय स्पर्धांत मिळून शंभरपेक्षा जास्त पदकं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com