किक ऑफ! (संजय घारपुरे)

संजय घारपुरे sanjaygharpure@gmail.com
रविवार, 10 जून 2018

येत्या गुरुवारपासून (ता. चौदा जून) सुरू होतोय एक थरार. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा. पुढचा महिनाभर सगळं जग अक्षरशः "फुटबॉल'मय होऊन जाईल. नेमार की मेस्सी; जर्मनी, स्पेन की ब्राझिल अशा कित्येक विषयांवर चर्चा झडतील. अनेक जण स्टेडियमवर, टीव्हीवर, मोबाईलवर क्षणाक्षणांच्या नोंदी करत राहतील. संपूर्ण जगातल्या फुटबॉलप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या स्पर्धेत यंदा काय होईल, तिची वैशिष्ट्यं काय, चाहते कशा प्रकारे तयारी करत आहेत, संघांचे डावपेच कशा प्रकारचे आहेत, कोण "स्टार' बनेल आदी गोष्टींचा वेध घेत आहेत
संजय घारपुरे आणि माजी फुटबॉलपटू हेन्‍री मेनेझिस.

येत्या गुरुवारपासून (ता. चौदा जून) सुरू होतोय एक थरार. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा. पुढचा महिनाभर सगळं जग अक्षरशः "फुटबॉल'मय होऊन जाईल. नेमार की मेस्सी; जर्मनी, स्पेन की ब्राझिल अशा कित्येक विषयांवर चर्चा झडतील. अनेक जण स्टेडियमवर, टीव्हीवर, मोबाईलवर क्षणाक्षणांच्या नोंदी करत राहतील. संपूर्ण जगातल्या फुटबॉलप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या स्पर्धेत यंदा काय होईल, तिची वैशिष्ट्यं काय, चाहते कशा प्रकारे तयारी करत आहेत, संघांचे डावपेच कशा प्रकारचे आहेत, कोण "स्टार' बनेल आदी गोष्टींचा वेध घेत आहेत
संजय घारपुरे आणि माजी फुटबॉलपटू हेन्‍री मेनेझिस.

"वर्ल्डकप फुटबॉल' हे दोनच शब्द. या शब्दांमध्ये तसं बघायला गेलं, तर काही आकर्षकता किंवा रंजकता नाही; मात्र पुढचा एक महिना सगळं जग या दोन शब्दांभोवती फिरणार आहे. नव्हे, फिरायला सुरवात झाली आहे. बत्तीस संघांची ही स्पर्धा सर्व जगाला वेड लावते. फुटबॉलचं वेड काही नवीन नाही; पण "वर्ल्डकप फुटबॉल' हे दोन शब्द काय करू शकतात, हे भारतानं काही महिन्यांपूर्वी अनुभवलं. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या सतरा वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या वेळी. तेव्हा फुटबॉलप्रेमींच्या गर्दीनं स्टेडियम्स अगदी भरभरून वाहिली होती. या स्पर्धेत भारत काहीही करणार नाही हे फुटबॉलप्रेमींना माहीत होतं; मात्र तरीही त्या स्पर्धेस विक्रमी प्रतिसाद लाभला. या प्रतिसादानं भारतात 2011 मध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा उपस्थितीचाही विक्रम मोडला. या स्पर्धेत कोणीही स्टार नव्हते. भूगोलाच्या पुस्तकातसुद्धा कधी वाचले नसतील अशी नावं असलेले देश होते; पण तरीही ही स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्याची संधी अनेकांनी सोडली नाही. फक्त एवढंच कशाला, भारतात सध्या सुरू असलेल्या इंटरकॉंटिनेंटल फुटबॉल स्पर्धेतही हे बघायला मिळालं. "भारताच्या आंतरराष्ट्रीय लढतीसाठी लोकांनी यावं. आम्हाला नावं ठेवायला का होईना, पण यावं' असं आवाहन भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनं केलं आणि सुरवातीला दोनेक हजारांची उपस्थिती एकदम दहा हजारांपर्यंत जायला लागली. फुटबॉलची जादू काय असते हे सांगायला एवढी दोन उदाहरणं पुरेशी आहेत. भारतासाठी वर्ल्डकप केवळ क्रिकेटचा असतो, असंच पूर्वी समजलं जायचं. मात्र, आता भारतातही परिस्थिती बदलली आहे. युरोपातल्या व्यावसायिक स्पर्धेतल्या संघांत कोण खेळाडू आहेत, त्यांच्यात काय घडामोडी होत आहेत, हे तरुण पिढीला तोंडपाठ असतं. या सगळ्या उत्फुल्ल वातावरणात आता दोनशेहून जास्त देशांचा सहभाग असलेल्या, "फुटबॉलज्वरा'ची परिसीमा गाठणारी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरू होत आहे.

पात्रता फेरीपासूनच जोश
अर्थात हा टप्पा खरं तर आधीपासूनच सुरू झाला आहे. 12 मार्च 2015 या दिवशी पात्रता फेरी सुरू झाली. तब्बल 210 देशांनी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतल्या अंतिम 31 संघांत स्थान मिळवण्याचं स्वप्न बाळगलं होतं. पात्रतेसाठीचा टप्पा सुरू झाला, त्यावेळी या स्पर्धेत खेळण्याची खात्री केवळ रशियास होती, अन्य देशांना- मग तो जगज्जेता जर्मनी असो, किंवा "फुटबॉलज्वर' चढलेला ब्राझील असो सर्वांना- कुठं तरी अपात्रततेची धास्ती सतावत होती. ही पात्रता फेरीही हुकल्याचं झिंबाब्वे, इंडोनेशियास सहन करावं लागलं, तर म्यानमारसारख्या देशाला पुढं चाल मिळाली. या टप्प्यात विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी खेळलेल्या इटली, नेदरलॅंडस्‌लाही बाद व्हावं लागलं. जगातला सर्वाधिक ताकदवान देश असलेल्या अमेरिकेवरही ही वेळ आली. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेले चीन आणि भारत हे देशही या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापासून खूप दूर असताना अवघी सव्वातीन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेला आईसलॅंडसारखा देश मात्र विश्वकरंडकासाठी पात्र ठरला आहे.

प्रसिद्धी अन्‌ टोकाची टीका
विश्वकरंडक फुटबॉलइतकी लोकप्रियता खरं तर अन्य कोणत्याही क्रीडा स्पर्धेस लाभत नाही. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतल्या यशाची चर्चा त्या देशापुरतीच प्रामुख्यानं मर्यादित राहते; पण "वर्ल्डकप' वेगळा आहे. "कोटा डे आयव्हरी' हा देश जगाच्या नकाशावर कोठे आहे हे सांगता येणार नाही; पण तरीही त्यांची लढत बघितली जाते. गिनी, निगेर, न्यू कॅलेंडोनिया या देशांची नावंही किती जणांनी ऐकली असतील हा प्रश्न आहे; पण त्यांच्या लढती भारतात झाल्या, तेव्हा स्टेडियम्स किमान ऐंशी टक्के भरली होती, हे आवर्जून सांगायला हवं. ही परिस्थिती भारतासारख्या "क्रिकेटकेंद्री' देशात असेल, तर "वर्ल्डकप फुटबॉल' खेळणाऱ्या देशात काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी. ब्राझिलसारख्या देशात फुटबॉल म्हणजेच सर्व काही असतं. तिथले शॉपिंग कॉम्प्लेक्‍स आणि बॅंकाच्या वेळा विश्वकरंडक स्पर्धेतल्या ब्राझिलच्या लढतीनुसार बदलतात. या स्पर्धेदरम्यान ब्राझिलमध्ये एक महिना अक्षरशः अघोषित सुटीच असते. तिथल्या लोकांना फुटबॉलच्या जगज्जेतेपदाव्यतिरिक्त काहीही नको असतं. ते हुकलं, की थेट तो मुद्दा राजकीय बनतो. पराभवाची चौकशी करण्यासाठी राजकीय नेत्यात चढाओढ सुरू होते.

"वर्ल्डकप'मध्ये एखादी चूक झाली, तर त्यामुळं त्यापूर्वीच्या सर्व अतुलनीय कामगिरीवर पाणी फिरतं, हे जुआन सेबॅस्टियन वेरॉननं 2002 मध्ये अनुभवलं. अनेकांच्या मते "प्रतिमॅराडोना' असलेला वेरॉनला अर्जेंटिनाच्या प्राथमिक फेरीतल्या पराभवासाठी जबाबदार धरण्यात आलं आणि त्याला जीणं नकोसं झालं. चार वर्षांनी ब्राझिल उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाल्यानंतर रोनाल्डोची कंबर कशी वाढली आहे, यांसारख्या किरकोळ गोष्टींवर रकानेच्या रकाने पाडले गेले. स्पेनविरुद्ध पेनल्टी किकवर ऑस्कर कार्डोझा गोल करू शकला नाही, मग त्याला जे काही सहन करावं लागलं, ते फक्त तोच सांगू शकेल. दक्षिण आफ्रिकेतल्या 2010 च्या स्पर्धेत फेलिप मेलो याला बाहेर काढलं गेलं आणि त्यानंतर नेदरलॅंड्‌सनं दोन गोल केले. त्यानंतर मेलोनं ब्राझिलकडून खेळण्याचं स्वप्नही बाळगलेलं नाही. आंद्रेस एस्कोबारच्या स्वयंगोलमुळे कोलंबियाचा संघ अमेरिकेविरुद्ध पराजित झाला आणि काही दिवसांत त्याला सहा गोळ्या झाडून ठार करण्यात आलं, इथपर्यंत मजल गेली.

सात सामन्यांचं गणित
विश्वकरंडक स्पर्धेत खरं तर जास्तीत जास्त सात सामने चार वर्षांतल्या कष्टाचा, मेहनतीचा निर्णय ठरवतात. बरं, या सातपैकी चार लढती "सडन डेथ'च असतात. "जिंकू किंवा मरू' हीच परिस्थिती असते. दर चार वर्षांनी जून- जुलैमध्ये जो संघ सर्वोत्तम खेळतो, तोच विजेता ठरतो, हे खरं तर साधंसोपं गणित आता खूपच महागडं आणि अवघड व्हायला लागलं आहे. एखाद्या खेळाडूचं संपूर्ण कारकिर्द तेवढ्यावरून ठरते. लिओनेल मेस्सी हा पाच वेळा जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरला. गतस्पर्धेतही सर्वोत्तम ठरला; पण त्यानं "वर्ल्डकप' कुठं जिंकून दिला? मेस्सीनं कितीही काहीही केलं, तरी तो दिएगो मॅराडोनापेक्षा सरस ठरणार नाही. त्यानं "वर्ल्डकप' जिंकलेला नाही, ही बाब त्याच्या कारकिर्दीला उणावते. हेच ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालमध्ये अनुभवतो.

चार वर्षांपूर्वी ब्राझिलला जर्मनीविरुद्ध लाजिरवाणी हार पत्करावी लागली; पण ही नाचक्की केवळ फुटबॉल किंवा क्रीडा जगतापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण ब्राझिलची नाचक्की झाली. ब्राझिलमध्ये जणू "देशव्यापी दुखवटा' पाळण्यात आला. प्रत्येकाला आपलं सर्व काही संपलं, असं वाटू लागलं. आज चार वर्षांनी ब्राझिलमध्ये "ज्या टीव्हीवर पराभव बघितला, त्याच टीव्हीवर पुन्हा वर्ल्डकप कसा बघायचा,' अशी विचारणा होते. हे फक्त ब्राझिलमध्ये नाही, तर सगळीकडंच घडतं. देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय संबंधांवरसुद्धा फुटबॉल परिणाम करतो. रशियाबरोबरचे संबंध ताणलेले असूनही इंग्लंड तिथल्या स्पर्धेवर बहिष्काराची भाषा करत नाही किंवा इंग्लिश चाहते रशियात न जाण्याचा विचारसुद्धा करत नाहीत, ही फुटबॉलची ताकद आहे.

सामूहिक आनंदाची लज्जत
आपल्या देशाचा सामना असेल, तर तो घरी टीव्हीवर पाहून चाहत्यांना अजिबात मजा येत नाही. त्यांना तो सामूहिकरित्याच बघायचा असतो. त्यासाठी संबंधित देशातल्या प्रमुख शहरांत, शहराची ओळख असलेल्या ठिकाणी मोठे स्क्रीन लावले जातात. जणू काही आपण लाखो, कोट्यावधी किलोमीटर दूर असलेल्या स्टेडियमवरच आहोत, असं वातावरण तयार होतं. संघाच्या प्रत्येक विजयानंतर मद्याचा पूर वाहतो. चाहते बेभान होत शहरभर फिरत विजय साजरा करतात. पराजित झाल्यास हेच चाहते हिंसक होतात, तोडफोड करतात. यास काही देश अपवाद असतील; पण फुटबॉल जगतावर हुकुमत राखलेल्या युरोप आणि दक्षिण अमेरिकन देशांबरोबर आफ्रिकेतही आता हेच चित्र दिसतं. "बावीस खेळाडूंनी एकाच वेळी चेंडूवर वर्चस्वासाठी काय भांडायचं, त्यासाठी आम्ही जास्त चेंडू देऊ,' अशांसारख्या विनोदांना हवेत विरू देणारी ही स्पर्धा. फक्त स्पर्धेस पात्र ठरलेले देशच नव्हे, तर या स्पर्धेच्या पात्रतेपासून कितीतरी दूर राहिलेल्या देशांतसुद्धा रात्रीचा दिवस होतो. सामन्याच्या वेळी वीज गेल्यास वीज कंपन्यांच्या कार्यालयावर हल्ला होतो. दोन देशांच्या चाहत्यात भांडणं होतात. मारामाऱ्यांपर्यंत परिस्थिती जाते. दंगलीही होतात. इतकी ही चाहत्यांना बेभान करून टाकणारी स्पर्धा. फुटबॉल हा खेळ राहिलेला नाही. तो आता बिझनेस झाला आहे. तो जीवनाचा भाग झाला आहे. हा खेळ देशाला एकत्र आणतो. त्याच्यातला अंतर्गत संघर्ष थांबवतो. राष्ट्रीय प्रश्नाचा विसर पाडतो. ब्राझिलच्या पराभवानंतर मैदानात रडत असलेल्या लहान मुलाचं छायाचित्र किती व्हायरल झालं होतं- आठवतंय?

सर्व प्रकारचा मसाला
या स्पर्धेत काय नसतं? एखाद्या सुपरहिट चित्रपटाचा सगळा मसाला असलेली ही स्पर्धा. अवघ्या काही सेकंदात कोणी हिरो होतो, तर कोणी झिरो. एकाच वेळी राग, दुःख, भीती अशा सर्व भावनांचं प्रकटीकरण इथं होत असतं. त्याच्या जोडीला सतत वाढणारं टेन्शन असतं. सामन्यातल्या प्रत्येक सेकंदागणिक हे सर्व वाढत जातं. आपल्या संघाचा फायदा करणारी प्रत्येक गोष्ट मोलाची ठरते. आपल्याला नैतिकदृष्ट्या चुकीचं वाटेल; मात्र मोहम्मद सालाह याला जखमी केलेल्या स्पेनच्या सर्जिओ रामोसचं इजिप्तच्या गटातल्या संघांना कौतुक वाटत असेल. आपलं राष्ट्रीयत्व दाखवण्याची दुसरी चांगली संधी कोणताही अन्य खेळ इतक्‍या मोठ्या प्रमाणावर देत नाही, हेही तितकंच खरं.

फुटबॉलची लोकप्रियता त्याच्या साधेपणात आहे. एक चेंडू एकाच वेळी बावीस जणांना "खेळवतो.' ते मैदान काय आहे, हे महत्त्वाचं नसतं, धड गोलपोस्ट नसला तरी चालतं. चेंडू त्या जाळ्यात गेला की गोल एवढा साधा सोपा हा खेळ. ऑफसाइडसारखा एक गुंतागुंतीचा नियम आहे; पण तो खेळाचा आनंद चाहत्यांपासून हिरावून घेत नाही. क्रिकेटसारख्या खेळात बाद होण्याचे क्‍लिष्ट नियम असतात, खेळाडू खरंच धावचित आहे की नाही वगैरे वाद असतात; पण फुटबॉलमध्ये खेळताना गोल हा गोलच असतो. त्याबाबत कोणी शंका घेत नाही.

"वर्ल्डकप' चार वर्षांत एकदा येतो; पण तो अब्जावधी डॉलरचे करार देणाऱ्या क्‍लब फुटबॉलचे दरवाजे उघडतो. आपल्या संघाला जिंकून देतानाच खेळाडू या युरो क्‍लबमधल्या प्रमुखांना जिंकण्याचा प्रयत्न करतात. आफ्रिकन देश तर याची पूर्वतयारी दोन वर्षापासून करतात. त्यांचा उत्साह सर्वाधिक असतो, तो लीगचे दरवाजे उघडण्यासाठी. फुटबॉलमध्ये "स्टार' जन्माला येतात. प्रत्येकाच्या आशेला धुमारे फुटतात. एका चेंडूमागे बावीस खेळाडू धावत असतात ते एक गोल साधण्यासाठी; पण त्या चेंडूचा प्रवास सुरू असलेल्या गवतापेक्षा किती तरी अब्ज लोकांच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. उगाच नाही "वर्ल्डकप'चं अर्थकारण अब्जावधी डॉलरचे आकडे सहज पार करतं. या "तापाची साथ' सगळ्यात वेगात पसरते आणि ती रोखण्याची प्रतिबंधक लस तयार करण्याची कोणाचीही इच्छा नाही, हेच या स्पर्धेचे यश आहे.

विश्वकरंडकाचं "अर्थकारण'
- विजेता संघ ः 3 कोटी 80 लाख
- उपविजेता ः 2 कोटी 80 लाख
- तिसरा क्रमांक ः 2 कोटी 40 लाख
- चौथा क्रमांक ः 2 कोटी 20 लाख
- पाच ते आठ क्रमांक (प्रत्येक संघास) ः 1 कोटी 60 लाख
- नऊ ते सोळा क्रमांक (प्रत्येक संघास) ः 1 कोटी 20 लाख
- सतरा ते बत्तीस (प्रत्येक संघास) ः 80 लाख
- एकंदर बक्षिसांची रक्कम ः 40 कोटी
- प्रत्येक संघास स्पर्धा तयारीसाठी मिळणारी रक्कम ः दीड कोटी
- वर्ल्डकप स्पर्धेसाठी खेळाडू देणाऱ्या क्‍लबसाठी रक्कम ः 20 कोटी 90 लाख
- स्पर्धेत एखादा खेळाडू जखमी झाल्यास संबंधित क्‍लबच्या नुकसानभरपाईसाठी राखीव रक्कम ः 13 कोटी 40 लाख
(सर्व आकडे डॉलरमध्ये)

पात्रता स्पर्धेचं शिवधनुष्य
- सहा महासंघांतल्या 209 संघात स्पर्धा
- केवळ रशियाच यजमान असल्यामुळं पात्र
- तब्बल 868 लढती. त्यात 2554 गोल
- सामन्यामागील गोलची सरासरी ः 2.83
- पात्रतेत युरोपला सर्वाधिक 13 जागा. आफ्रिकेसाठी 5, तर आशिया आणि दक्षिण अमेरिकेसाठी प्रत्येकी 4.5. उत्तर- मध्य अमेरिका आणि कॅरेबियनसाठी 3.5, तर ओशियानासाठी 0.5.
- उत्तर- मध्य अमेरिका आणि कॅरेबियन गटात पात्रतेच्या पाच फेऱ्या, तर आशियात चार. आफ्रिका आणि ओशियाना गटात प्रत्येकी तीन. युरोप आणि दक्षिण अमेरिकेत प्रत्येकी दोन.

झाबिवाका म्हणजे काय?
- झाबिवाका हे रशियातील स्पर्धेचं अधिकृत बोधचिन्ह.
- झाबिवाका याचा अर्थ अर्थातच गोल करू शकणारा (the one who scores).
- झाबिवाकावर स्पर्धा प्रसाराबरोबरच लढतीच्यावेळी चाहत्यांचे मनोरंजनही करण्याची जबाबदारी.
- बोधचिन्हाच्या निवडीसाठी मतदान, त्यात दहा लाखाहून अधिक चाहत्यांचा सहभाग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay gharpure write football world cup article in saptarang