अर्धविराम की पूर्णविराम?

दहशतवादी हल्ले, युद्ध, बॉम्बस्फोट, नैसर्गिक आपत्ती यामुळे क्रिकेटमालिका अर्ध्यात थांबल्या आहेत. कोरोनामुळे आता आयपीएलही थांबवणं भाग पडलं आहे.
VIVO IPL
VIVO IPLSakal

दहशतवादी हल्ले, युद्ध, बॉम्बस्फोट, नैसर्गिक आपत्ती यामुळे क्रिकेटमालिका अर्ध्यात थांबल्या आहेत. कोरोनामुळे आता आयपीएलही थांबवणं भाग पडलं आहे. काही अपवाद सोडले तर, क्रीडास्पर्धांमुळे वातावरण सकारात्मक होत असतं, असाच विचार आता अनेकदा केला जातो. ‘क्रिकेट डिप्लोमसी’ किंवा ‘टेबल टेनिस डिप्लोमसी’मागं हाच विचार असतो.

कोरोनाची महामारी असो किंवा दहशतवादी हल्ले असोत की नैसर्गिक आपत्ती असो...या सगळ्याचा फटका ज्या क्षेत्रांना सर्वाधिक बसला त्यात खेळ, खेळाडू तर आहेतच; पण त्याहीपेक्षा क्रीडाउद्योगाला बसणाऱ्या फटक्याची तीव्रता जास्त आहे. त्यातून सावरण्यासाठी होणारा खर्च किंवा त्यासाठी होणारी गुंतवणूक खूपच असते. युरोपातील फुटबॉल लीगमध्येही कोरोनाबाधित आढळत आहेत; पण त्या लीगमध्ये संघ जास्त आहेत, त्यामुळे एखाद्-दुसरी लढत लांबणीवर टाकून प्रश्न सोडवता येतो. आयपीएलची स्पर्धा आठ संघांपुरतीच मर्यादित आहे, त्याचबरोबर संघाच्या मालकीच्या सुविधा प्रामुख्यानं नाहीत, त्याचे परिणाम होत राहतात. इंग्लंडमधील प्रीमिअर लीगमधील कोरोनाचाचणीचं कंत्राट दिलेल्या कंपनीला देशवासीयांच्याही तेवढ्याच चाचण्या मोफत करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे लीगला पाठिंबा लाभला होता हेही विचारात घ्यायला हवं. असो.

एकदंरीत काय तर, सध्या आयपीएलला ‘स्वल्पविराम’ म्हणा वा ‘अर्धविराम’ म्हणा, मिळाला आहे. मात्र, तो ‘पूर्णविरामा’त रूपांतरित होणार नाही हीच आयपीएल चाहत्यांची अपेक्षा असेल.

आणि कोरोना महामारीमुळे

पाकिस्तान सुपर लीग : गेल्या वर्षी लीगमधील ॲलेक्स हेल्स बाधित आढळल्यानं स्थगित करण्यात आली.

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकादौरा : तीन ट्वेंटी-२० सुरळीत झाल्या; पण एकदिवसीय मालिकेच्या वेळी प्रश्न निर्माण झाले.

भारत-आफ्रिका मालिका : दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय तीन सामन्यांसाठी (मार्च २०२०) भारतात आला. पावसामुळे लढत रद्द झाली आणि त्यानंतर मालिकाही.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मालिका : न्यूझीलंड संघ ऑस्ट्रेलियात आला पण तिथली परिस्थिती पाहून त्यांनी मायदेशी जाण्याचं ठरवलं.

मध्येच पूर्णविराम मिळालेल्या मालिका

सन १९३९ - वेस्ट इंडीजचा इंग्लंडदौरा : मालिकेतील तीन कसोटींनंतर इंग्लंडची १-० आघाडी. दुसऱ्या महायुद्धाचे ढग गडद झाल्यानं विंडीजचा संघ समुद्रमार्गे मायदेशी.

१९६८-६९ - इंग्लंडचा पाकिस्तानदौरा : पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील संघर्ष तीव्र होत होता. कराचीतील तिसऱ्या कसोटीदरम्यान हिंसेचं लोण इंग्लंड संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलनजीक, तसंच स्टेडियमनजीक पोहोचलं. अखेर, इंग्लंड संघाला माघारी पाठवण्याचा निर्णय.

१९८६-८७ - न्यूझीलंडचा श्रीलंकादौरा : ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’चे हल्ले होत असतानाच्या काळातच तीन कसोटींची मालिका सुरू झाली. न्यूझीलंडच्या संघ असलेल्या हॉटेलजवळील बॉम्बस्फोटात शंभर जण ठार झाले. न्यूझीलंड संघ तातडीनं मायदेशी परतला.

१९८४ - भारताचा पाकिस्तानदौरा : क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यास ही मालिका साथ देईल अशी अपेक्षा होती. दौऱ्यात पाच कसोटी आणि एकदिवसीय तीन सामन्यांचा समावेश होता. पहिल्या दोन कसोटी अनिर्णित राहिल्या. भारतानं पहिली एकदिवसीय लढत गमावली होती. दुसऱ्या एकदिवसीय लढतीच्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. भारतीय संघाचा दौरा तातडीनं रद्द करण्यात आला.

२००४-०५ - श्रीलंकेचा न्यूझीलंडदौरा : डिसेंबर-फेब्रुवारीतील या दौऱ्यात एकदिवसीय पाच लढती आणि दोन कसोटींचा समावेश होता. बॉक्सिंग डेला पहिली एकदिवसीय लढत झाली; पण त्यानंतरच्या लढती दक्षिण आशियाला सुनामीचा तडाखा बसल्यामुळे रद्द झाल्या. ही मालिका २००६ च्या सुरुवातीला पूर्ण करण्यात आली.

२००६ - दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकादौरा : दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटी आणि एकदिवसीय लढती खेळण्यासाठी आला होता. कसोटीमालिका संपल्यावर लगेचच कोलंबोत बॉम्बस्फोट झाला. दक्षिण आफ्रिकेनं दौरा रद्द केला. एकदिवसीय स्पर्धाही रद्द करावी लागली.

२००९ - श्रीलंकेचा पाकिस्तानदौरा : दोन वर्षांनी पाहुणा संघ पाकिस्तानमध्ये आला होता. एकदिवसीय मालिका आणि पहिली कसोटी सुरळीत पार पडली. लाहोरच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळी श्रीलंकेच्या संघाच्या बसवर हल्ला करण्यात आला. त्यात श्रीलंकेचे पाच खेळाडू जखमी झाले. दौरा रद्द झाला नसता तरच नवल.

२०१४ - वेस्ट इंडीजचा भारतदौरा : दौरा सुरू झाला त्या वेळीच वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ आणि खेळाडू यांच्यात मानधनावरून वाद सुरू होता, त्यामुळे दौराच रद्द होण्याची शक्यता होती. विंडीजचा संघ खेळत होता; पण त्यांची नाराजी कायम होती. अखेर, चौथ्या एकदिवसीय लढतीनंतर संघ मायदेशी परतला.

२०१९ - बांगलादेशचा न्यूझीलंडदौरा : तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीपूर्वी ख्राईस्टचर्च येथील मशिदीत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्या हल्ल्यातून बांगलादेशचे खेळाडू थोडक्यात बचावले. हल्ला झालेल्या ठिकाणापासून स्टेडियम खूपच जवळ होतं. त्यामुळे ही कसोटी रद्द होणं स्वाभाविकच होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com