‘दुनियादारी’नं वेड लावलं ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Duniyadari

ग्रंथप्रभाव
वाचन ही गोष्टच अशी आहे की जी माणसाचं आयुष्य समृद्ध करते. वाचनामुळं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. आपले विचार प्रगल्भ होण्यामागे वाचन या क्रियेचा खूप मोठा वाटा असतो. माझ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याचं मूळ हे आमच्या घरातच होतं. माझी आई शिक्षिका होती.

‘दुनियादारी’नं वेड लावलं !

वाचन ही गोष्टच अशी आहे की जी माणसाचं आयुष्य समृद्ध करते. वाचनामुळं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. आपले विचार प्रगल्भ होण्यामागे वाचन या क्रियेचा खूप मोठा वाटा असतो. माझ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याचं मूळ हे आमच्या घरातच होतं. माझी आई शिक्षिका होती. त्यामुळं शिक्षिकेच्या मुलानं वाचन केलंच पाहिजे हे ओघाओघानं आलंच. आमच्या घरी पुस्तकाचा छोटासा संग्रह होता. त्यात ऐतिहासिक कादंबऱ्या, पु. ल. देशपांडे यांची पुस्तकं, मंगेश पाडगांवकर, वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज आदी कवींच्या कविता असे साहित्याचे वेगवेगळे प्रकार होते. तेव्हापासूनच मला वाचनाची आवड लागली. लहानपणी माझे आई वडील मला वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आणून देत. मग थोडं मोठं झाल्यावर ही सगळी पुस्तकं वाचून काढली. त्या काळात मला वाचन करायला आणखी जास्त मजा येऊ लागली, शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी, पु. ल. देशपांडे यांची सगळी पुस्तकं, सिड्ने शेल्डन, सुहास शिरवळकर यांची अनेक पुस्तकं मी शाळा - कॉलेजमध्ये असताना वाचून काढली. हे सगळे माझे आवडते लेखक आहेत.

सिड्ने शेल्डन यांची कल्पनाशक्ती मला खूप भावते. त्यांच्या पुस्तकात आपल्याला एका वेगळ्या जगात नेण्याची ताकद आहे जी मला त्यांची पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचायला प्रवृत्त करते. पुढं इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यावर त्या अभ्यासात माझं अवांतर वाचन थोडंसं मागे पडलं. पण त्यावेळी कॉलेजमध्ये असताना मला वेड लावलं ते सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीनं. ती कादंबरी मी आत्तापर्यंत असंख्य वेळा वाचली आहे. काही वर्षांनी मी त्यावर चित्रपटही बनवला. हा चित्रपट बनवत असताना मी त्या कादंबरीचा अभ्यास केलाच परंतु सुहास शिरवळकर यांची वेशीपलीकडे, नॉट गिल्टी, टेरीफिक, दास्तान, सॉरी सर, हॅलो हॅलो अशी अनेक पुस्तकं वाचून काढली. दुनियादारी या चित्रपटाला आज इतकी वर्ष झाली आहेत तरी आजही मी ती कादंबरी वाचतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पु. ल देशपांडे यांची पुस्तकं मी आजही पुन्हा पुन्हा वाचतो. त्यांची ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असा मी’, ‘पूर्वरंग’, अपूर्वाई, गाठोडं, व्यक्ती आणि वल्ली आणि त्यांची अशी अनेक पुस्तकं वाचणं मी आजही तितकंच एन्जॉय करतो. 
एखादं पुस्तक आपण वाचण्यासाठी हातात घेतलं की त्याच्या स्पर्शानेच आपलं त्या पुस्तकाशी एक नातं तयार होतं. आता जसजसं‌ तंत्रज्ञान प्रगत होत चाललंय तसतशी वाचन करण्यासाठी उपलब्ध असलेली साधनं बदलत चालली आहेत. आत्ताच्या काळात ज्ञान मिळविण्याची साधनं खूप बदलली आहेत. आता आपल्याला एका क्लिकवर पुस्तकं आपल्या मोबाईलवर उपलब्ध होतात, पुस्तकांच्या ऑडिओ क्लिप्स आपण ऐकू शकतो. पूर्वी आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याचे काम फक्त पुस्तकं करत होती पण आता वेब सिरीज आणि चित्रपट देखील आपल्याला तो अनुभव देतात.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

मला असं वाटतं आपण ज्ञान संपादन करायला वाचन करत असतो. त्यामुळं एखाद्या पुस्तकाची प्रिंट केलेली कॉपी असो नाहीतर इलेक्ट्रॉनिक कॉपी; वाचनाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकासच होणार आहे आणि आपण हा बदल आनंदानं स्वीकारला पाहिजे. परंतु माध्यमं कितीही बदलली तरी लेखी शब्दांची जी ताकद असते तेवढी बाकी कशात नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे शेवटी पुस्तक ते पुस्तक, आणि त्याच्याबद्दल कायमच माझ्या मनात  प्रेम असेल.

(शब्दांकन : राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil

Web Title: Sanjay Jadhav Writes About Duniyadari Book Reading

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top