मी थोर झालो त्याची गोष्ट! (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

थोर झालेली माणसे आत्मचरित्र लिहितात असे आम्ही ऐकून होतो; परंतु थोर होण्याची प्रक्रिया फारच किचकट असल्याने, आत्मचरित्रे लिहूनच अनेक माणसे थोर होतात असे आम्हाला समजले. आपणही हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही, असे आम्हास वाटून गेले. आम्ही एका प्रकाशकाशी याबाबतीत चर्चा केली.

'आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आत्मचरित्र लिहावे?'' असा प्रश्न आम्ही त्यांना केला. त्या वेळी ते म्हणाले ः 'तुमच्याकडे आत्मचरित्र छापण्याइतपत पैसे असतील तो टप्पा महत्त्वाचा. आम्ही ते लगेच छापून देऊ. यापलीकडे काही अट नाही.''
आम्ही विचारले ः 'ते इतरांपेक्षा उत्तम होण्यासाठी काय केले पाहिजे?''
ते म्हणाले ः 'सोपे आहे. तुम्ही जेवढे जास्त पैसे द्याल, तेवढे आम्ही ते उत्तम करू.''
-मी विचारले ः 'तुम्ही सारीच आत्मचरित्रे पैसे घेऊन छापता का?''
ते म्हणाले ः 'नाही. समाजासाठी, देशासाठी, एकंदर माणसांसाठी जगलेल्या माणसांची आत्मचरित्रे आम्ही आमच्या पैशाने छापतो. वर त्यांना मानधनही देतो. तुमचे नाव आम्ही आजच ऐकले आहे. हौस म्हणून तुम्ही आत्मचरित्र छापणार असाल तर, आमचीही पैशाची हौस झाली पाहिजे ना!''

- मी म्हणालो ः 'आता आत्मचरित्रात नेमके काय काय असावे तेवढे सांगा...''
ते म्हणाले ः 'आजकालची काही आत्मचरित्रे वाचून काढा म्हणजे तुम्हाला कळेल. तुमचे बालपण गरिबीत व अत्यंत हाल-अपेष्टांमध्ये गेलेले असावे. अनेकदा तुम्ही उपाशी झोपलेले असले पाहिजे. तुम्हाला जास्त बहीण-भाऊ असावेत, म्हणजे हाडाची काडे करून तुम्ही त्यांना मोठे केल्याचे दाखवता येते. तुमचे शिक्षण गरीब मराठी शाळेत झालेले असल्यास छानच. शाळेत जायला तुम्हाला एकच विजार व शर्ट असावा. हेच कपडे रात्री धुऊन पुन्हा सकाळी शाळेत जाताना घातलेले दाखवलेत तर फारच चांगले. वाचकांच्या डोळ्यात हमखास पाणी येणार. शाळेत जाताना रस्त्यात नेहमी पूर असलेली नदी आडवी आलेली दाखवावी, म्हणजे तुम्ही कपडे काढून ते दप्तरासह डोक्‍यावर घ्यायचे आणि फुसांडता प्रवाह ओलांडून कसे शाळेत जायचे हे दाखवता येईल. अशा प्रचंड काबाडकष्टांतून शिक्षण घेतलेल्या आत्मचरित्राच्या नायकाविषयी वाचकांना अपार सहानुभूती वाटते. या नायकाला नेहमी चांगले गुरुजी भेटलेले असावेत. ते नायकाच्या परीक्षेची फी भरतात. नायक मोठा झाल्यावर अचानक एक दिवस एक वृद्ध त्यांना भेटायला येतात. ते केबिनमध्ये आल्याबरोबर नायक खुर्चीवरून ताडकन उठतो. कारण, तेच त्याला संकटसमयी मदत केलेले गुरुजी असतात. मग नायक गुरुजींच्या हाताला धरून स्वतःच्या खुर्चीवर त्यांना हळुवारपणे बसवतो आणि म्हणतोः "गुरुजी, तुम्ही होतात म्हणून तर ही मानाची, अधिकाराची खुर्ची मला मिळाली.'

गुरुजी कृतकृत्य होतात. कारण, चांगल्या लाईनला लागलेला एवढा एकच विद्यार्थी त्यांना रिटायर झाल्यापासून भेटलेला असतो. गुरू-शिष्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. या प्रसंगात एखाद्या भोळ्या-भाबड्या वाचकाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहण्याची शक्‍यता असते. एकंदर नायकाचे जीवन अत्यंत संघर्षात, संकटात गेलेले दाखवले तरच त्या आत्मचरित्राला खुमारी येते.''
-मी म्हणालो ः 'असे आमच्याबाबतीत काहीच घडलेले नाही, मग आम्ही आत्मचरित्र लिहायचेच नाही का?''
यावर प्रकाशक हसत म्हणालेः 'मराठीत निवडकच आत्मचरित्रे अस्सल आहेत. बऱ्याचजणांनी न भोगलेली दु:खे देखणी केलेली आहेत. पुसट वेदना गडद करून दाखवलेल्या आहेत. आपल्याकडे एखादा मनुष्य भविष्यकाळात थोर झाला की बालपणापासूनच तो किती थोर होता याचे दाखले दिले जातात. त्यांनी लहानपणीच खाऊचे पैसे कसे गरीब माणसाला नेऊन दिले...शाळेत आलेल्या पाहुण्यांसमोर कसे बाणेदारपणे भाषण केले...हा मुलगा लहानपणीच आपल्या वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्ने कशी पाहायचा...एकदा तो झोपला असताना आई त्याला कुशीत घेऊन रडत कशी म्हणाली होती ः "तू पुढे खूप मोठा होशील, बाळा...' इत्यादी, इत्यादी...
आता हा झोपलेला, जग झोपलेले, आई हयात नाही तरी हा प्रसंग लोक आत्मचरित्रात कसा लिहितात, याचा विचार आपण करायचा नाही. वाचक काय ते पाहून घेतील.
काही अपवाद सोडले तर बाकीच्या कितीतरी आत्मचरित्रांत असेच सगळे असते. फक्त तो मनुष्य सद्यस्थितीत मोठा असल्याने त्यावर कुणी संशय घेत नाही एवढेच. नाहीतर सारी लहान मुले लहान मुलांसारखीच मस्त जगत असतात.''
प्रकाशकांचे हे शेवटचे वाक्‍य ऐकून आम्ही विचारले ः 'आम्ही आयुष्यभर मस्तच जगलो. तेच आत्मचरित्रात खुमासदारपणे लिहिले तर कसे होईल?''
यावर ते म्हणाले ः 'ते वाचकांना आवडेल; पण समीक्षकांना कदाचित उथळ वाटण्याची शक्‍यता! त्यात दुःखद असे काही नसेल तर काय उपयोग? पुरस्कार मिळण्याचीही शक्‍यता फारच कमी. ''

आत्मचरित्राच्या नायकाने लहानपणी मित्रांच्या नादी लागून एखाद्याच्या बागेतील फळे चोरली, तर त्याला चोर म्हणतील. मात्र, चुकून हाच मुलगा पुढे थोर झाला तर लोक म्हणतील ः "त्यांना बालपणापासून पर्यावरणाची आवड होती!'
एकंदर माणूस थोर झाला की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक बऱ्या-वाईट घटनेला आपली माणसं थोर करून टाकतात. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. आत्मचरित्र लिहा. थोर व्हा. तुमचे सारे पूर्वायुष्य आपण थोर करून टाकू या! आणि नाहीच तुम्हाला जमले तर माझ्या ओळखीचे काही विद्वान आहेत, ते कुणाला, कसल्याही विषयावर काहीही लिहून देतात. मी त्यांची तुमच्याशी गाठ घालून देतो. तुम्हाला तुमचे बालपण त्यांना सांगण्याचीही गरज नाही. तेच तुमच्या बालपणीच्या थोर थोर गोष्टी लिहून टाकतील. असो. तुम्ही लिहा. मी छापतो. तुम्ही, मी आणि एक प्रूफ रीडर असे तीन वाचक तुमच्या आत्मचरित्राला मिळतील. आजकाल एवढे वाचकही खूप झाले.''

तर मित्रांनो, तुम्ही कधी माझ्या घरी आलात तर चहा होईपर्यंत दिवाणावर निवांत बसा. तुम्हालाही थोर असल्याचा फील येईल. कारण, तो दिवाण दिवाण नसून माझ्या आत्मचरित्राची थप्पी आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com