अक्कल ते टक्कल (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

आरसा माझ्याकडं पाहून हसला तेव्हाच मला कसली तरी अभद्र शंका आली. मी बारकाईनं स्वतःचीच प्रतिमा न्याहाळली. डोक्‍याचा पुढचा भाग स्टीलच्या ताटलीसारखा चमकू लागला होता. माझ्या डोक्‍यानं एका गोंडस टकलाला जन्म दिला होता. प्रसूती अगदीच हळुवार आणि नकळत झालेली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होते. आता हे "बाळ' मला आयुष्यभर सांभाळावं लागणार होतं. "केसानं गळा कापला' हे मी ऐकून होतो. माझ्या केसानं मात्र माझंच डोकं कापायला सुरवात केली होती. आता मी कुणा टकलू माणसाला हसू शकणार नव्हतो. उलट तेच लोक, मी त्यांच्या संघटनेचा आजीव सभासद झालो म्हणून, मला हसणार होते. हे हसणं थांबवायचं असेल तर तातडीनं काहीतरी करावं लागणार होतं. म्हणून मी माझ्या अनेक टक्कलबंधूंचे सल्ले घ्यायचं ठरवलं. तेव्हा मला दिसलं की टकलातही वेगवेगळ्या "केस' आहेत. काहींचं टक्कल फक्त माथ्यावर स्थिरावलेलं होतं. आजूबाजूला जणू त्या टकलाचं संरक्षण करण्यासाठी दाट केसांची पलटण गोलाकार उभी होती. एकंदर मुख्य इमारत ढासळलेली होती आणि कंपाउंड तेवढं शिल्लक होतं. समोरचे केस शाबूत असल्यानं या लोकांना गाडीचा मधला भाग वाया गेला तरी बॉनेट आणि डिकी शाबूत असल्याचं समाधान वाटत होतं. आपल्याला टॉप व्ह्यूनं कुणी बघू नये अशी या लोकांची इच्छा होती. काहींच्या डोक्‍याचा कपाळापासून निघालेला विमानतळासारखा तुळतुळीत पट्टा थेट मानेला जाऊन भिडला होता. आजूबाजूचे कानाकडचे केस मात्र शाबूत होते. दाट वृक्षराईतून एखादा कालवा वाहत जावा असं त्यांचं डोकं दिसत होतं. आपल्याला फक्त साईड व्ह्यूनं पाहिलं जावं अशी या लोकांची इच्छा होती. सर्वात जास्त दिसणारा प्रकार समोरून डोकं गुळगुळीत झालेल्या केशपीडितांचा होता. प्रथमदर्शनी जो भाग सगळ्यांना दिसतो तोच उघडाबोडका झालेला, त्यामुळे त्यांची भलतीच कुचंबणा होत होती. त्यांच्या मानेवर मात्र अजूनही राजा-महाराजांप्रमाणे केस रुळत होते. केसामुळे मान अगदी ताठ मानेनं जगत होती. आपल्याला फ्रंट व्ह्यूनं न पाहता फक्त बॅक व्ह्यूनं पाहावं अशी या लोकांची इच्छा होती; पण बहुतेक पंचेंद्रियं पुढंच असल्यानं, फक्त मानेवरचे केस पाहण्यासाठी त्यांच्या पाठीशी कुणी उभं राहण्याची केसभरही शक्‍यता नव्हती. अगदी तुरळक लोकांच्या डोक्‍याची अवस्था खवल्या मांजराच्या शरीरासारखी झालेली दिसत होती. बॉम्बस्फोट होऊन अधल्यामधल्या इमारती कोसळलेल्या काबूल शहराप्रमाणे त्यांचं डोकं दिसत होतं! एकाच्या डोक्‍याचा पुढचा भाग नापीक जमिनीसारखा पडीक झाला होता. त्यात अध्येमध्ये तग धरून राहिलेला एखादा तुरळक केस कर्फ्यूच्या काळात रस्त्यावरून फिरणाऱ्या पोलिसासारखा दिसत होता. मध्येच उंच उभी असलेली शेंडी तिकिटासाठी अडून बसलेल्या उमेदवारासारखी ताठ, तर डोक्‍याचा मागचा भाग पायरीपायरीनं केलेल्या भातशेतीसारखा दिसत होता. काहींच्या केसांनी मात्र मोबदल्याची अपेक्षा न ठेवता डोक्‍यापासून पूर्णपणे घटस्फोट घेतलेला होता. लपवाछपवीचा प्रश्नच मिटल्यानं अशी मंडळी पूर्ण केस असलेल्या माणसाप्रमाणे प्रसन्न चेहऱ्यानं फिरत होती. आयुष्यात जे काही बरं-वाईट आहे ते परिपूर्ण असावं म्हणजे माणूस आनंदानं राहतो हेच जणू त्यांना सांगायचं होतं. काहींचं तुळतुळीत डोकं तर एवढं आकर्षक दिसत होतं की पाहणाऱ्याला वाटावं, यावर ममतेनं हात फिरवावा! शेवटी वाईट न मानता आहे ते आकर्षक पद्धतीनं मांडणं एवढंच माणसाच्या हाती असतं. माझी अवस्था मात्र अर्धवटरावासारखी झाली होती. आजूबाजूला केसांचं रान माजलेलं होतं; पण दर्शनी भागातली सुपीक जमीन तेवढी नापीक झालेली होती. निसर्ग हा माणसाची ऐट, मिजास कशी उतरवतो पाहा ना! कधीकाळी हेच केस मी सिनेमातल्या हीरोसारखे थाटात उडवत असे. कुणी मुलगी दिसली तर ते कपाळावर कसे येतील याची मी आवर्जून काळजी घ्यायचो. नंतर मान उडवत मी तो केशसंभार एका हातानं बाजूला करायचो. माझ्या या आकर्षक केसांमुळे माझ्या गारगोटी डोळ्यांकडंही कुणाचं लक्ष नसायचं. आता केस गेल्यामुळं मात्र माझे डोळे उघडे पडले आहेत आणि उघडलेही आहेत! माणसानं फार मिजास मारू नये, तो कधी ना कधी उघडा पडतो, हेच जणू मला माझ्या डोक्‍यावर चंद्रकोरीप्रमाणे उगवलेल्या टकलानं दाखवून दिलं होतं. त्यावर मी उपाय शोधू लागलो तेव्हा मात्र माझ्या आश्‍चर्याला पारावार उरला नाही. एखाद्याच्या डोक्‍यावर जेवढे दाट केस नसतील एवढे उपाय केसांप्रमाणे जागजागी उगवलेले होते. मित्राबरोबर एका डॉक्‍टरांकडं गेलो तेव्हा चिमटीत पकडून गवत उपटावं तसे डॉक्‍टरांनी माझे काही केस उपटून पाहिले. जमिनीचा पाहावा तसा माझ्या डोक्‍याचा पोत पाहिला. नंतर कशी मशागत करावी म्हणजे केसांचं पीक उगवेल याचं त्यांनी मार्गदर्शन केलं. "तुमचेच शिल्लक केस उपटून त्यांचं टकलावर गव्हाप्रमाणे आरोपण करू या' असा सल्ला दुसऱ्या डॉक्‍टरांनी दिला. काहींनी डोक्‍याला लावायला औषध दिलं. "पूर्ण टक्कल करा आणि हा मलम चोळत राहा' असं काहींनी सांगितलं. एकंदर, या उपायात आपल्या डोक्‍यावरच्या आहेत त्या केसांचीही फरफट सुरू झाल्यानं मला फारच वाईट वाटलं. बरं वाटावं म्हणून एकजण म्हणाला, कपाळ मोठं दिसल्यावर "हा बुद्धिमान असावा' असा समोरच्याचा नाहकच गैरसमज होतो. टक्कल आणि अक्कल यांचा काही संबंध नसतो; पण टक्कल पडतं त्याला जास्त अक्कल असते असा प्रवाद टकलू लोकांनीच पसरवलेला आहे, हे मला टक्कल पडल्यावर समजलं आणि माझा चेहरा नकळत जास्त अक्कल असल्यासारखा दिसू लागला. तर एक समीक्षकमित्र मला म्हणाला ः "टक्कल डोक्‍यावर पडतं, अक्कल डोक्‍यात असते. फक्त आतल्या अकलेला टक्कल पडू देऊ नकोस म्हणजे झालं.' अर्थात तो समीक्षक असल्यानं काय बोलला ते अजूनही माझ्या टकलात शिरलेलं नाही! काहींनी मात्र मला न मागता सल्ले दिले ः
"जास्त कडक उन्हात फिरू नकोस, डोक्‍याचा सोलर प्लॅंट होईल...कुठल्याही लग्नात पुढं बसत जाऊ नकोस, कारण नेमकं टक्कल बघून अक्षता फेकून मारल्या जातात...लोकांना काय फक्त टार्गेट हवं असतं...नवीन जन्माला घातलेल्या बाळांना जावळ हवं असतं म्हणून देव आपल्या डोक्‍यावरचे केस घेऊन जातो...' एक ना दोन...! पण हे प्रश्न क्षणात मिटतील अशी घटना घडली. मी एका व्याख्यानाला गेलो. व्याख्याते टकले होते; पण सारे त्यांच्या प्रभावी भाषणाचीच स्तुती करत होते. त्यांना टक्कल आहे हे कुणाच्या खिजगणतीतही नव्हतं. शेवटी कर्तृत्व महत्त्वाचं. टकलाची चिंता असणं हे अक्कल सामान्य असण्याचं लक्षण आहे, एवढी अक्कल मात्र या प्रसंगातून मिळाली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com