लोकशाहीचे मुकादम (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

लोक म्हणतात की दुष्काळ आहे...पण मला तर आश्‍चर्यच वाटतं. कसला दुष्काळ नि काय! गेल्या दीड महिन्यात आम्हाला काही तो जाणवला नाही. माझं तर मत आहे की दुष्काळ बाहेर नाही तर माणसाच्या मनात असतो. इथं आम्ही सकाळी उठलो की एकत्र यायचो. समोर जीप तयार असायची. भरपेट न्याहारी करायची. पाणी प्यायचं ते बाटलीबंदच. तेही थंड. पैसा कुठं आमचा होता! साहेब काही कमी पडू देत नव्हते. एकदम चांगला माणूस. माझं तर मत आहे की अशीच माणसं निवडून यायला पाहिजेत. विरोधक त्यांना काहीही बोलतात. बोलणारच. विरोधक कधी परस्परांविषयी चांगलं बोलतात होय? साहेबच काय, उभे राहिलेले तुरळक उमेदवार सोडले तर बाकी सारे गडगंज होते. लोक म्हणायचे की एवढी संपत्ती यांच्याकडं आली कुठून? हा प्रश्न आपल्या देशात उपस्थित करणं म्हणजे विनोदच आहे. काही नोकरी-धंदा न करता काहीजणांच्या संपत्तीचा आलेख वाढत जातो. त्याचा विचार कसंबसं पोट भरणाऱ्यांनी करायचा नसतो. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. यातच या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. कुठं तरी खड्डा पडल्याशिवाय दुसरीकडं उंचवटे निर्माण होत नाहीत, हा निसर्गाचा नियमच आहे. असो. गरिबांच्या सेवेसाठी आपल्याला निवडून यायचंय असं साहेबांचं प्रामाणिक मत. मला विचारलं तेव्हा मी माझं क्वालिफिकेशन सांगितलं.

ते म्हणाले ः "एकदा निवडून येऊ दे. तुझ्यासारख्या हजारो पोरांची बेकारी दूर करतो.' मग काय, आम्ही प्रचारात जान झोकून दिली. दिवसभर गावोगाव फिरायचो. साहेब निवडून येणं का महत्त्वाचं आहे ते लोकांना पटवून द्यायचो. साहेबांनी गावागावातली अशी अनेक तरुण पोरं प्रचाराला जुंपली होती. सारी युवाशक्ती साहेबांच्या मागं उभी राहिली. आमची बेकारी काही दिवस तरी दूर झाली हे महत्त्वाचं. खरंच, बेकारी वाईटच असते. घरात जेवताना मान वर करायची सोय नाही. बाबा आईला म्हणतात ः"त्याला भरपूर जेऊ घालत जा.' म्हणजे यात प्रेमापेक्षा खिजवण्याचा प्रकारच जास्त होता. जास्त शिक्षणामुळे शारीरिक कष्टांची सवय राहिली नाही. बाबांबरोबर शेतात जाऊन त्यांना मदत करावी असं रोज मनात येतं; पण शरीर कष्टाला नकार देतं. चार-पाच ठिकाणी मुलाखती दिल्या तर अतोनात पैसे मागितले. इतके पैसे जवळ असते तर एखादा धंदाच नसता का केला? पण नोकरीसाठी पैसे घेणाऱ्यांचा धंदा मात्र जोमात आहे. त्यामुळे हा प्रचार वगैरे परवडला. साहेबांच्या ताब्यात बऱ्याच संस्था आहेत. "कुठंतरी घेऊ' म्हणाले. त्यासाठी तरी जीव लावून त्यांचा प्रचार केला पाहिजे. म्हणून हा सारा आटापिटा. खरं म्हणजे साहेब ज्या पक्षाकडून उभे आहेत त्याची तत्त्वं मला मान्य नाहीत; पण नारायण म्हणाला ः ""आपला पक्ष म्हणजे आपलं पोट. आधी त्याचं बघा. ही तत्त्वबित्व पोटातूनच जन्म घेतात. माणसं तत्त्वं गाजरासारखी मोडून खातात आणि मोठी होतात. तुम्ही घ्या तत्त्वाचे फास गळ्याला लावून.''

एकंदर नारायण बरोबर बोलला. भविष्यात अंधार असणाऱ्या आपल्यासारख्यांनी तत्त्वं पाळणं म्हणजे, तोळामासा प्रकृतीच्या माणसानं कडक उपास धरण्यासारखं आहे. आणि खरं सांगतो, गेल्या कित्येक दिवसांत खाल्लं नाही असं सुग्रास अन्न आम्हाला प्रचारादरम्यान खायला मिळालं. संध्याकाळ झाली की शीणभाग काढायला रोज नवं हॉटेल. पहिल्या दिवशी साऱ्यांनी बाटल्या रिचवल्या. नारायण म्हणाला ः ""घेऊन बघ. बेकारी विसरशील.''
मी म्हणालो ः ""हे अजून बेकार होण्याचे धंदे आहेत. उलट, तुम्हीच "फुकटची आहे' म्हणून सवय लावून घेऊ नका.''
यावर बाकी सारे हसायचे. शिऱ्या म्हणाला ः ""आम्ही वर्तमानात जगतो. आजचं काय ते पाहायचं. कल किस ने देखा है?''
अशांची मला काळजी वाटायची. फुकटची मिळते म्हणून नवीन चार-पाचजण दारू पिऊ लागले होते. जेवण संपल्यानंतर अनेकजण बाटल्या, सिगारेटची पाकिटं गुपचूप घरी घेऊन जायचे. लोकशाहीच्या या उत्सवात किती तरुण नव्यानं व्यसनी होत असतील या विचारानं मी धास्तावून जायचो. भीती वाटायची. आपणही या मोहाला बळी पडू नये...आधीच घरच्यांचं आयतं खायचं, त्यात काही व्यसन लागलं तर? कष्टकरी आई-वडिलांचा चेहरा लगेच डोळ्यांपुढं यायचा...
***

साहेबांसाठी वरच्या एका बड्या नेत्याची सभा होती. आम्ही गावागावात फिरून लोकांना सभेला येण्याची विनंती केली. बहुतेक साऱ्यांनी येण्यासाठी गाड्या मागितल्या. काहीजण म्हणाले ः""यायचं म्हणजे दिवस जाणार. आमची 300 रुपये मजुरी बुडते. बायकोची 250 रुपये. नेण्या-आणण्याची, जेवणाची सोय करून वर 500 रुपये द्या. पाच-पंचवीसजण घेऊन येतो.''
"भाषणाला टाळ्या वाजवायचे आणखी 50 रुपये घेऊ' असं ते म्हणाले नाहीत हे नशीब! तर अशा पद्धतीनं ती पाच-पंचवीस माणसं प्रत्येकाच्या सभेला जात राहिली. लोकशाहीचा खरा उत्सव तर त्यांनी साजरा केला.
"लोक प्रेमानं का येत नाहीत?' असं विचारलं तेव्हा नारायण म्हणाला ः ""लोकांना वाटतं, ही माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी निवडून जातात. ही कधी आपल्या कामाला येणार नाहीत. पाच वर्षांत आपल्याला भेटणार नाहीत. जे काही पदरात पडून घ्यायचं आहे ते आत्ताच घ्या.''
एकंदर पुढाऱ्यांविषयी लोकांचं हे झालेलं मत लोकशाहीसाठी आणि त्यापेक्षाही लोकांसाठी जास्त धोकादायक आहे. अशा साऱ्या धोकादायक उत्सवात एकदाचं मतदान झालं. आम्ही मतदानाच्या दिवशी साहेबांच्या डोळ्यात भरेल असं नेटानं काम केलं. एव्हाना, रोज सकाळीच उठून बाहेर पडणं ते थेट रात्री उशिरा घरी जाणं यावरून आई-बाबा माझ्याशी बोलायचे बंद झाले होते.
***

बाबांबरोबर शेतात काम करतो आहे. आताशा दुष्काळ वाटू लागला आहे. ऊन्ह शरीराला आणि जाणिवा मनाला भाजून काढताहेत. कारणही तसंच आहे. साहेब निवडून आले. आम्ही जल्लोष केला. आमच्या गावात साहेबांचा जंगी सत्कार झाला. मी साहेबांकडं पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अनोळखी भाव होता. नंतर नारायणाला घेऊन त्यांच्या बंगल्यावर गेलो. कशीबशी भेट झाली. मी कामाची आठवण करून दिली. नारायण म्हणाला ः ""हा खूप पळाला तुमच्यासाठी.''
साहेब म्हणाले ः""सारेच पळाले, म्हणून तर निवडून आलो. जागा निघाल्यावर पाहू या. मला दिल्लीची फ्लाईट पकडायचीये.''

नंतर बरेच दिवस असाच खेळ सुरू राहिला. मध्यंतरी आमच्या गावात असलेल्या साहेबांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नव्या गाड्या घेतल्या. काहींनी व्यवसाय सुरू केले. काही ठार व्यसनी होऊन व्यसन भागवण्यासाठी पैसे मागत फिरू लागले. मी एक दिवस उठलो आणि बाबांबरोबर शेतात कामाला आलो. लोकशाहीचा उत्सव तुम्हाला लखलाभ होवो! आई-वडिलांनी बळ दिलेला खांदा आता कुणाचा झेंडा घ्यायला वापरू द्यायचा नाही, हे पक्कं ठरवून टाकलं. मी शेतात घाम गाळतो. तहान लागल्यावर शेजारी वाहणाऱ्या ओढ्यातल्या निर्मळ धारेत वाकून पाणी पितो. साहेबांच्या त्या बाटलीबंद पाण्यापेक्षा ही चव किती तरी गोड लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com