नाटकाचं नाटक (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalamkar009@gmail.com
रविवार, 7 एप्रिल 2019

पूर्वीच्या काळी गावात करमणुकीची साधनं नव्हती. वर्षातून एकदा "रामलीला' यायची. मी आजीबरोबर ती पाहायला जायचो. देवळाच्या आयताकृती पडवीत महिनाभर तिचे प्रयोग व्हायचे. त्याकाळी स्त्रिया नाटकात दिसत नसत. एखादा नाजूक पुरुषच सीतेचं काम वठवत असे आणि तो पुरुष असलेलाच परवडायचा. कारण, प्रत्येक प्रयोगाला रावण सीतेला पळवून न्यायचा. प्रयोग संपल्यावर म्हातारीकोतारी माणसं राम-सीता-लक्ष्मण यांच्या पाया पडायची. त्यांच्याभोवती "भाविकां'ची झुंबड उडायची...अशीच एकदा आजी सीतेच्या पाया पडताना मी तिच्या मागं उभा होतो. पलीकडं कोपऱ्यात मात्र रावण एकटाच उभा होता. त्याच्या अंगावरचे ते भरजरी कपडे पाहून मी हरखून गेलो.

पूर्वीच्या काळी गावात करमणुकीची साधनं नव्हती. वर्षातून एकदा "रामलीला' यायची. मी आजीबरोबर ती पाहायला जायचो. देवळाच्या आयताकृती पडवीत महिनाभर तिचे प्रयोग व्हायचे. त्याकाळी स्त्रिया नाटकात दिसत नसत. एखादा नाजूक पुरुषच सीतेचं काम वठवत असे आणि तो पुरुष असलेलाच परवडायचा. कारण, प्रत्येक प्रयोगाला रावण सीतेला पळवून न्यायचा. प्रयोग संपल्यावर म्हातारीकोतारी माणसं राम-सीता-लक्ष्मण यांच्या पाया पडायची. त्यांच्याभोवती "भाविकां'ची झुंबड उडायची...अशीच एकदा आजी सीतेच्या पाया पडताना मी तिच्या मागं उभा होतो. पलीकडं कोपऱ्यात मात्र रावण एकटाच उभा होता. त्याच्या अंगावरचे ते भरजरी कपडे पाहून मी हरखून गेलो. शिवाय, त्याचे पायही "भाविकां'विना मोकळे होते म्हणून मी पटकन त्याच्या पाया पडून घेतलं. तेवढ्यात आजी मागून ओरडली, तसा मला पोटाशी धरून रावण म्हणाला ः ""गप गं आज्जे! प्वार रावणाच्या पाया पडलं म्हंजी काय लगीच गल्लीतली एखादी सीता नाय पळवून न्यायाचं!''
विशेष म्हणजे, रात्री राम-लक्ष्मण-सीता झालेली ही पात्रं दिवसा गावभर पिठाची भिक्षा मागत फिरायची तेव्हा आम्हा लहान मुलांना अतोनात आश्‍चर्य वाटायचं.
***

गावातली काही स्थानिक कलाकार मंडळी नाटक बसवायची. त्याचा सराव देवळातच व्हायचा."पाटील खुनी, सरपंच बेइमानी' हे नाटक तर प्रत्येक गावात बसवलं जायचं. कारण, पाटील आणि सरपंच हे त्या काळी गावचे हीरो असायचे आणि गावात झालेल्या साऱ्याच कुलंगड्यांमध्ये त्यांचा हात असल्याचा समज-गैरसमज ग्रामीण भागात दृढ झालेला होता. नंतर आख्खं गावच बेइमानी वगैरे करायला लागलं तसं हे नाटक बंद झालं. तेव्हाच्या प्रत्येक नाटकात एक तरी डाकू असायचाच. तो स्टेजवर येताना ग्यानबा परीट तोंडानं "टक्‌डक्‌.. टक्‌डक्‌' असा घोड्यांच्या टापाचा आवाज काढायचा. नंतर हातात भलीमोठी फरशी कुऱ्हाड घेऊन डाकूची एंट्री व्हायची. पुठ्ठा कापून त्याला कुऱ्हाडीचा आकार देऊन त्यावर चमकीचा कागद डकवून तयार केलेली असायची ही कुऱ्हाड. त्यामुळे ती प्रेक्षकांना लखलखीत चमकताना दिसायची. पूर्वी "डालडा'च्या डब्याचाही पत्रा कापून कुऱ्हाडी तयार केल्या जायच्या. मात्र, एका नाटकात पाराजीनं पोलिसाला भीती दाखवण्यासाठी पत्र्याची कुऱ्हाड दांडपट्टा फिरवल्यासारखी फिरवली. त्या घाईत पोलिसाचं काम करणाऱ्या सावजीच्या नाकाचा शेंडा कापला गेला. रक्त गळू लागलं. भावाचं कौतुक पाहायला आलेला सावजीचा पैलवान भाऊ
स्टेजच्या जवळच बसलेला होता. हा प्रकार पाहून तो संतापून स्टेजवर गेला. त्यानं डाकूला उचलून हवेत फिरवलं आणि चीतपट करून मनसोक्त बदडलं. तेव्हापासून पत्र्याऐवजी पुठ्ठ्याची कुऱ्हाड वापरणं सुरू झालं. नाटकात सावकाराचं एक पात्र हमखास असायचं. हा सावकार ऊर्फ मुनीमजी नाकात बोलायचा. हे काम जन्मजात गेंगाणा असलेल्या रावजीकडं असायचं. मुनीमजीच्या करमणुकीसाठी त्याच्यासमोर एखादी नर्तिका नाचताना दाखवली जायची. असा नाचता येणारा देखणा पुरुष सापडणं मात्र अवघड असायचं! त्यात बाईचं काम करायचं म्हणजे सगळ्याच मिश्‍या साफ कराव्या लागायच्या. बाप गेल्यावरच अशा सगळ्या मिश्‍या काढून टाकण्याचा रिवाज त्या वेळी रूढ असल्यानं कुणी स्त्रीपात्रासाठी मिश्‍या काढल्या तर त्याच्या बापाला आपोआपच मेल्यासारखं वाटायचं! म्हणून, ज्याला नाचता येतं अशा कुणालाही बाईचं हे काम नाइलाजास्तव दिलं जायचं. भरलेल्या अंगाच्या कोंडीरामला लग्नाच्या वरातीत नाचण्याचा चांगला अनुभव होता. एका नाटकात त्यानं नर्तिका म्हणून मुनीमजीपुढं नाचण्याचं कबूल केलं. नाचताना मुनीमजी नर्तिकेला उचलून घेतो असं दृश्‍य होतं; परंतु मुनीमजी झालेला गेंगाणा रावजी अगदीच काटकुळा होता. नर्तिका झालेल्या कोंडीरामचं वजन काही त्याला झेपलं नाही. शेवटी, नर्तिकेनंच मुनीमजीला उचलून घेतलं आणि ती (म्हणजे तो!) बेफामपणे नाचू लागली. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेली रावजीची बायको, "त्याला भोंड (चक्कर) येती; खाली ठेव कोंड्या मेल्या' असं म्हणत मोठमोठ्यानं ओरडू लागली. प्रेक्षक तिला चिडवण्यासाठी "नाच कोंड्या, नाच कोंड्या' म्हणत गिल्ला करू लागले. नंतर रावजी पुन्हा कधीच स्टेजवर दिसला नाही.
***

शहरात शिकून आलेली काही पोरं नाटकाचं दिग्दर्शन कल्पकतेनं करायची. कधी कधी ही कल्पकता चांगलीच अंगाशीही यायची म्हणा! मनोहरनं रामायणावरच्या नाटकात काहीतरी ट्रिक्‍स करण्याचं ठरवलं. "आजपर्यंत स्टेजवर जे घडलं नाही असं काहीतरी आपण करू या,' असं त्यानं सुचवलं. त्याची ती ट्रिक अशी होती ः लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडल्यानंतर औषधी वनस्पती घेऊन यायला राम हनुमानाला सांगतो, या प्रसंगात हनुमानाला उडत चाललेलं दाखवायचं...त्यासाठी स्टेजच्या छताला एक गोल कप्पी बसवायची...तीतून मोठं दोरखंड ओवून त्याचं एक टोक हनुमानाच्या कमरेला, तर दुसरं स्टेजमागं एका गोल कप्पीला बांधायचं... हनुमान निघाला की एकानं मागून कप्पी फिरवायची...दोर कप्पीला गुंडाळला जाईल...हनुमान उडतोय असं त्याच्या कमरेला बांधलेल्या दोरखंडामुळं वाटेल. त्याला छतापर्यंत भिडवायचं...तिथं पुठ्ठ्याचा एक डोंगर आधीच तयार करून ठेवायचा...नंतर दोरखंड हळूहळू सोडू लागायचं, म्हणजे मग हनुमान डोंगर घेऊन पुन्हा खाली येऊ शकेल...' ही ट्रिक ऐकून जाणकारांनी त्याला सूचना केली ः "एखाद्या पात्राचं चुकूनही विडंबन झालं तर लोक सहन करत नाहीत. चांगली व्यवस्थित तालीम करून नाटक करा.' हे सगळं लक्षात घेऊन देवळात भरपूर सराव करण्याचं ठरलं. ही वेगळीच करामत ऐकून मात्र हनुमान व्हायला कुणीच तयार होईना. शेवटी गण्या पैलवान कसाबसा तयार झाला. देवळाच्या पडवीला लाकडी खांड होतं. सरावासाठी त्या खांडाला एक गोल कप्पी ठोकण्यात आली. तीतून दोरखंडाचं एक टोक मागच्या कप्पीला, तर दुसरं टोक गण्याच्या कमरेला बांधण्यात आलं. दोघा-तिघांनी दोरखंड ओढलं तसा गण्याच्या कमरेला झटका बसला आणि तो तरंगत वर निघाला. त्याला छताला नेऊन टेकवल्यावर लक्ष्मणाची भूमिका करणारा नारायण खाली जमिनीवर बेशुद्ध पडला. रामाचं काम करणारा शंकर म्हणाला ः "हनुमान जाऊन बराच अवधी झाला आहे. तो आता येईलच.' त्याच्या या संवादानंतर उत्साही दिग्दर्शकानं, म्हणजे मनोहरनं एकट्यानंच मागच्या कप्पीचा दोर सोडला...आणि घात झाला. तोळामासा प्रकृती असलेल्या मनोहरला गण्याच्या वजनाचा अंदाजच नव्हता. मनोहर दोराच्या टोकाला लटकून बेडकासारखा हात-पाय हलवत छताकडं निघाला, तर दुसरीकडं गण्या सुसाट वेगानं जमिनीकडं निघाला! एक डोळा उघडा ठेवून जमिनीवर सावधपणे बेशुद्ध पडलेला लक्ष्मण हे पाहून अधिकच सावध झाला. आता गण्या आपल्या अंगावर कोसळणार, याचा अंदाज आल्यानं तो ओरडतच देवळाबाहेर पळाला. गण्या रपकन्‌ जमिनीवर आपटला. मनोहर छताच्या खांडाला धडकून त्याच्या अंगावर येऊन कोसळला. पुढं काय होणार आहे, याचा एव्हाना अंदाज आलेली इतर नटमंडळी पळून गेली. गण्याचं तोंड फुटलं आणि खऱ्या हनुमानासारखं लाल दिसू लागलं. नंतर त्यानं गदा उचलून दिग्दर्शकाच्या डोक्‍यात घातली. नंतर बरेच दिवस चेमटलेल्या गदेचे, गण्याच्या दवाखान्याचे आणि त्याच्या खुराकाचे पैसे कुणी द्यायचे, याचंच "नाटक' गावभर सुरू होतं!

Web Title: sanjay kalamkar write drama article in saptarang