आम्ही चिंतेत, ते मजेत (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalamkar009@gmail.com
रविवार, 23 जून 2019

मी इतरांसारखाच एक चिंतातूर पालक आहे. पूर्वी नापास होणाऱ्या मुलांविषयी चिंता वाटायची, सध्या "पास झालेल्या मुलांचं पुढं काय करायचं' याची चिंता पालकांना लागून राहिलेली असते. आमच्या ठोंब्याला दहावीला कमी मार्क्‍स पडल्यापासून मी बारावीसाठी घरातलं वातावरण अगदी शिस्तीचं करून टाकलं होतं. टीव्ही उचलला आणि पोत्यात घालून माळ्यावर ठेवून दिला! खरं म्हणजे, पोराच्या हातात मोबाईल देणारच नव्हतो; पण आमच्या हिला फार पुळका. एकंदर, त्याला पडलेल्या मार्कांवरून त्यानं मोबाईलला पुरेपूर न्याय दिल्याचं स्पष्ट झालं. शिवाय, गेल्या वर्षी 20 मार्क्‍स "तोंडी'ला होते तेही बंद झाले.

मी इतरांसारखाच एक चिंतातूर पालक आहे. पूर्वी नापास होणाऱ्या मुलांविषयी चिंता वाटायची, सध्या "पास झालेल्या मुलांचं पुढं काय करायचं' याची चिंता पालकांना लागून राहिलेली असते. आमच्या ठोंब्याला दहावीला कमी मार्क्‍स पडल्यापासून मी बारावीसाठी घरातलं वातावरण अगदी शिस्तीचं करून टाकलं होतं. टीव्ही उचलला आणि पोत्यात घालून माळ्यावर ठेवून दिला! खरं म्हणजे, पोराच्या हातात मोबाईल देणारच नव्हतो; पण आमच्या हिला फार पुळका. एकंदर, त्याला पडलेल्या मार्कांवरून त्यानं मोबाईलला पुरेपूर न्याय दिल्याचं स्पष्ट झालं. शिवाय, गेल्या वर्षी 20 मार्क्‍स "तोंडी'ला होते तेही बंद झाले. आपल्याकडं धोरणात धरसोड होते हे काही योग्य नाही. शेतकऱ्यांना मदतीचं आणि पोरांना मार्कांचं अनुदान देण्याच्या धोरणात सातत्य पाहिजे! असो.
मी आमच्या ठोंब्याला विचारलं ः 'आता पुढं काय करण्याचा विचार आहे?''
तो म्हणाला ः 'तुम्ही म्हणाल तसं.''

तो असं म्हणाला यात त्याची काही चूक नाही. दहावी-बारावी म्हणजे काही पुढचं भविष्य कळण्याचं वय नसतं. पोरं आपली पालकांना बरं वाटेल असं काहीही ठोकून देतात. ते काही खरं नसतं. पालक दिशा देतात आणि पोरं तिकडं निघतात. याला कुठल्या दिशेला पाठवावं बरं, याचा मी विचार करू लागलो. सध्या सारेच दवाखाने कसे भरून वाहत असतात. शिवाय, आजकाल सर्वच रुग्णांच्या पांढऱ्या पेशी हमखास कमी होतात, म्हणून मुलाला डॉक्‍टरच केलं पाहिजे असं मला वाटलं. मात्र, मार्क्‍स कमी असल्यानं डोनेशन द्यावं लागणार. चौकशी केली तेव्हा "अमुक लाखांची बॅग घेऊन जा, बॅगेसहित पोरगं ठेवून घेतात ते थेट डॉक्‍टर करूनच बाहेर सोडतात' अशी माहिती मिळाली. रक्कम ऐकून माझ्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी कमी होण्याची वेळ आली.
मुलाला डॉक्‍टर करण्याच्या इच्छेवर डोनेशनच्या आकड्यानं असं पाणी फिरवलं.
नंतर विचार केला की याला इंजिनिअर करायला काय हरकत आहे? मी त्याला तसं सुचवलं तेव्हा त्यानं मला व्हॉट्‌सऍपवर आलेला एक विनोद वाचून दाखवला ः एका मुलानं इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवर जाऊन तिथल्या रखवालदाराला विचारलं ः "या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे. कसं आहे इथलं वातावरण?' रखवालदार म्हणाला ः " चांगलं आहे. मी याच कॉलेजचा विद्यार्थी आहे.'

मुलानं सांगितलेल्या विनोदावर तोच मजेनं हसला आणि मी इतर मार्ग शोधू लागलो. वकील केलं तर बरं पडेल असं वाटलं; पण ठोंब्याचा स्वभाव मिळमिळीत आहे. वकिलाला आपली बाजू कशी आक्रमकपणे मांडता आली पाहिजे. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे शिक्षकी पेशात जाणं. आरामाची नोकरी आहे असं मला वाटलं. तेव्हा त्या क्षेत्रातले एक हितचिंतक म्हणाले ः'अवांतर कामांसाठी या पेशाचा सर्वात जास्त उपयोग करून घेतला जातो. शिवाय जागोजागी उगवलेल्या डीएड कॉलेजेसमुळे डीएड मुलांची प्रचंड फौज तयार झाली आहे. या राष्ट्रात शिक्षकांना सन्मान दिला जातो असं नुसतं दाखवलं जातं, प्रत्यक्षात तो मिळत नाही. माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर संस्थाचालक चांगले मिळाले तर नशीब. नाहीतर काय काय सहन करावं लागतं ते त्या शिक्षकांनाच माहीत. तसं अकरावी-बारावीसाठी ज्युनिअर शिक्षक झालं तरी चांगलं. मुलं तांत्रिक बाब म्हणून अकरावीला प्रवेश घेतात आणि खासगी क्‍लास लावतात. मुलाला क्‍लास लावण्यात पालकांना प्रतिष्ठा वाटते. त्यामुळे "ज्युनिअर'वरचा भार कमी होतो. त्यापेक्षा मुलाला "सीनिअर'ला प्राध्यापक करता आलं तर पाहा. मोठे विद्यार्थी सुज्ञ असतात. दोघांची युती झाली तर सर आणि विद्यार्थी असे दोघंही सुखी राहतात.''

आमचं हे बोलणं ऐकणारा ठोंब्या म्हणाला ः - 'मी सरबीर काही होणार नाही. वरून कुणीतरी पाठवलेलं पोरांच्या गळी उतरवणं आपल्याच्यानं जमणार नाही.''
ठोंब्याचा बाणेदारपणा पाहून मी स्तिमित होत म्हणालो ः'त्यापेक्षा याला पदवीधर करू या. पुढं यूपीएससी, एमपीएससी करील.''
हितचिंतक कपाळावर हात मारून घेत म्हणाले ः 'इतक्‍या कमी मार्कांच्या पोराला स्पर्धा परीक्षेला कसं काय पाठवणार? तुम्हाला खरं सांगू का...मुलांमध्ये बुद्धिमत्ता आणि अभ्यासाची चिकाटी, क्षमता असेल तरच त्याला स्पर्धा परीक्षेला पाठवावं. क्‍लाससाठी पैसे आहेत, इच्छा आहे, अधिकारी झाल्यावर पुढं भरपूर सरकारी सोई-सवलती आहेत असं समजून स्पर्धा परीक्षेच्या नादी लागणं चूक आहे. मुलगा स्पर्धा परीक्षा देतोय म्हणून अनेक पालक आणि विद्यार्थी स्वतःचं समाधान करून घेतात. यात मुलांचा उमेदीचा काळ वाया जातो. या परीक्षा देतानाच इतर काही व्यावसायिक पदवीही मिळवली पाहिजे.''

आमच्या गप्पा ऐकणारा ठोंब्या उठला. त्याच्या हातात कसलासा
गुंडाळी-फलक होता. माझ्यासमोर येत तो म्हणाला ः'एक हजार रुपये द्या. जरा बाहेर निघालोय.''
वैतागलेल्या मी त्याच्या हातातला गुंडाळी-फलक हिसकावून घेत उघडला. त्यावर कसलंसं अबोध चित्र रेखाटलेलं होतं. मी ओरडलो ः 'मला तुझ्या भविष्याची चिंता लागली आहे आणि तुला असले धंदे सुचताहेत? रुपयाही मिळणार नाही.''
तेवढ्यात मुलाच्या हातात पाचशेच्या दोन नोटा देत हितचिंतक म्हणाले ः 'रंगच आणायचेत ना? जा घेऊन ये.''
ठोंब्या हसत बाहेर पडला. हितचिंतक म्हणाले ः 'मुलांना जे येतं त्याच कलेला आपणही प्रोत्साहन द्यावं. आपल्याजवळ आहे ते आपल्याला दिसत नाही. आपण नको त्याच्या मागं पळतो आणि दुःखी होतो. निसर्गानं प्रत्येकाला जगण्यासाठी काही ना काही कौशल्य दिलेलं असतं. ते ओळखण्याचं कौशल्य ज्या पालकांमध्ये आहे त्यांच्या वाट्याला कधीच चिंता येत नाही!''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay kalamkar write halakafulaka article in saptarang