रीळ तुटलेला सिनेमा! (संजय कळमकर)

Sanjay Kalamkar writes his experience of watching movies in Touring Talkies
Sanjay Kalamkar writes his experience of watching movies in Touring Talkies

लहानपणी मला सिनेमाचं अतोनात आकर्षण होतं. त्यातच आमच्या गावात नामू जगदाळे नावाच्या तरुणानं ‘टूरिंग टाकी’ सुरू केली होती. त्यानं कुठल्याशा बॅंकेचं कर्ज काढून एक भलं मोठं प्रोजेक्‍टर-मशिन आणलं होतं. नाम्याचं हे टॉकीज्‌ संपूर्ण ‘एसी’ होतं! कारण, त्याला वरून छतच नव्हतं. मातीनं लिंपलेल्या पुरुषभर भिंती चारही बाजूंनी होत्या.

पडद्याच्या बाजूनं उतार देऊन त्यावर नदीतली बारीक वाळू आणून टाकलेली होती. थिएटर परिपूर्ण वाटावं यासाठी मागच्या बाजूला ‘बाल्कनी’ म्हणून नदीतले मोठाले गोटे आणून रांगेत ठेवलेले होते. पुढचं तिकीट एक रुपया. बाल्कनीवर बसायचं असेल तर दोन रुपये. पहिल्या काही मिनिटांतच बाल्कनीचा प्रेक्षक नदीतून आणलेल्या त्या मऊ गोट्यावरून घसरत खाली वाळूत यायचा.

पैसे जास्त गेले म्हणून पुनःपुन्हा वर बसायचा अन्‌ शेवटी गोट्याला टेकून थकलेल्या रुबाबात सिनेमा पाहताना दिसायचा. लहान पोरानं भोकाड वासावं तसा चेमटलेला भोंगा कोपऱ्यातल्या बांबूला बांधलेला होता. त्यातून सिनेमाची ‘ष्टोरी’ सोडून बाकी सारे आवाज यायचे. सिनेमा कौटुंबिक असला तरी फट्‌-फटाक्‌ असे गोळीबाराचे आवाज भोंग्यातून सर्रास येत असायचे.

दोन बांबूंच्या आधारानं ३५ एमएमचा मळकट पडदा समोर बांधलेला असायचा. वारा आला की तो हलायचा आणि आपोआप ‘स्पेशल इफेक्‍ट्‌स’ निर्माण व्हायचे. एका सिनेमात खलनायक नायिकेच्या पाठलागावर असतो. आता तिचं काय होणार म्हणून आम्ही पोरं घाबरून गेलो होतो. तेवढ्यात भन्नाट वारा सुटला आणि खलनायक पडद्याबाहेर फेकला गेला.

खालच्या गल्लीतला तुक्‍या म्हणाला ः ‘‘नदीच्या बाजूनं हीरो आला आणि व्हिलनला पडद्याबाहेर ओढून घेऊन गेला!’’ असे नैसर्गिक ‘स्पेशल इफेक्‍ट्‌स’ सतत निर्माण व्हायचे. सिनेमाचा रोज रात्री एकच खेळ व्हायचा. ‘नऊ ते बारा’ असा उल्लेख फक्त पोस्टरवर असायचा. लग्नतिथीप्रमाणे त्या मुहूर्ताला मात्र सिनेमा सुरू व्हायचा नाही. अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या जशा प्रवाशांनी पूर्ण भरल्याशिवाय निघत नाहीत तशी बऱ्यापैकी गर्दी झाल्याशिवाय नाम्या सिनेमा सुरू करत नसे. काही म्हातारे लोक सिनेमा सुरू होण्याची वाट पाहत तसेच वाळूवर झोपी जायचे ते थेट पहाटेचा गार वारा लागल्यावरच उठायचे. त्या संपूर्ण थिएटरात एकच कर्मचारी कामाला होता. स्वतः नाम्या! डोअर कीपरपासून प्रोजेक्‍टर चालवण्यापर्यंतची सारी कामं तोच करायचा.

सिनेमा बदलला की गावभर पोस्टर डकवण्याचं काम तेवढं गण्या पेंटरकडं असायचं. चार तुकडे क्रमानं चिकटवल्यावर मोठं पोस्टर तयार व्हायचं. गण्यानं ते सकाळी डकवलं तर सलग दिसायचं. सायंकाळी मात्र गण्या झिंगलेला असायचा. मग हाताला जो लागेल तो पोस्टरचा तुकडा तो आधी चिकटवायचा. कुठल्या तरी सिनेमाच्या पोस्टरमध्ये गावाकडच्या पेहेरावातला एक रुबाबदार पुरुष आणि त्याच्या शेजारी उभी नटी असे चार तुकडे चिकटवायचे होते. झिंगाट गण्यानं ते असे चिकटवले की वर मिश्‍या पिळणारा तो रुबाबदार पुरुष, तर कमरेच्या खाली नटीचे तुकतुकीत पाय आणि उंच टाचेचे सॅंडल्स! शेजारी वरच्या निम्म्या भागात गुलछबू नटी आणि तिच्या कमरेखाली धोतर व पायात जाड वहाणा! या चुकीमुळे ‘सिनेमा जास्तच विनोदी असावा,’ असं समजून उलट गर्दी वाढली. पोत्याचं शिवलेलं गोणपाट गेटवर लटकलेलं दिसायचं. त्यावर बाहेरून IN तर आतून EXIT अशी अक्षरं रंगवलेली होती.

प्रवेशद्वारावर पत्र्याची एक मोडकी खुर्ची ठेवलेली असायची. हातात मळकट पिशवी घेऊन नाम्या या तिकीटबारीवर बसायचा. तिकीट म्हणजे हातावर गोल शिक्का. बाल्कनीचे दोन रुपये म्हणून दोन्ही तळहातांवर दोन शिक्के! पोटापुरते पैसे जमले आहेत की नाही, याचा अंदाज नाम्या पिशवी हलवून घ्यायचा आणि जमले असतील तर मग सिनेमा सुरू करायचा. मध्येच वीज गेली तर ती थेट दुसऱ्या दिवशी येई.

मग नाम्या गेटवर उभा राहून ओरडून सांगायचा ः ‘याच तिकिटावर उद्या हाच खेळ दाखवला जाईल. तिकीट जपून ठेवा.’ दुसऱ्या दिवशी ते हातावरचं ‘शिक्कातिकीट’ पुसू नये म्हणू प्रेक्षकांची त्रेधा उडून जायची. जो एक हात मागं बांधून दुसऱ्या हातानं सारी कामं करताना दिसायचा तो रात्रीच्या शोला गेलेला ‘पीडित’ प्रेक्षक समजायचा! खरी तारांबळ बाल्कनीवाल्यांची उडायची. ते मेंदी लावलेल्या नवरा-नवरीप्रमाणे दोन्ही हात अलगद धरून फिरताना दिसायचे. नाम्या स्वतःच ते भलं मोठं मशिन ऑपरेट करायचा. त्यासाठी मधोमध एक मातीची खोली होती. फोकससाठी तिला पडद्याच्या बाजूला बारीक चौकोनी खिडकी होती. धोतर फाटल्यावर येतो तसा टर्र आवाज मशिन सुरू झाल्यावर यायचा.

मशिनच्या वरच्या छिद्रातून लांबोळक्‍या कार्बन कांड्या आत टाकल्या की पडद्यावरचं चित्र स्पष्ट दिसायचं. कांडी संपत आल्यावर चित्र पुसट होत जायचं. त्या कांड्या महाग असल्यानं नाम्या त्या जपून वापरायचा. चित्र अगदीच दिसत नाहीसं झाल्यावर प्रेक्षक एका सुरात ओरडत ः ‘नाम्या...कांडी टाक टाक, नाम्या...कांडी टाक टाक.’  मग नाम्या त्या फोकसच्या खिडकीतून डोकं बाहेर काढत ओरडायचा ः ‘बघायजोगं आल्यावं टाकितो ना कांडी! कामून म्हतारी मेल्यावानी बोंबालता रे?’ संपूर्ण सिनेमा चार रिळांमध्ये असायचा. रिळांना प्रेक्षक ‘थाळ्या’ म्हणत असत. १, २, ३, ४ असे नंबर वर झाकणावर लिहिलेले असायचे. या थाळ्या नाम्या पायाजवळ ठेवत असे. त्या क्रमानं ठेवलेल्या असतच असं नाही. खाली वाकून हाताला लागेल ती थाळी नाम्या टाकून द्यायचा. त्यानं एकदा शेवटची थाळी पहिल्यांदा टाकली. त्यात हीरो मेला. आता पुढं काय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला, तर पुढच्या थाळीत हीरो गाणं म्हणत बागेत फिरताना दिसला! एकदा तर नाम्यानं सगळ्याच थाळ्या उलट्यापालट्या जोडल्या होत्या. मागची थाळी जोडल्यानं त्यात हीरोची आई मेली. नंतरच्या थाळीत तिनं एका मुलाला (हीरोला) जन्म दिला. नटीचा बाप आधी मेला, नंतरच्या थाळीत तो हीरो मागं पिस्तूल घेऊन धावताना दिसला. प्रेक्षकांची संख्या कमी असली की नाम्या दोनच थाळ्या दाखवायचा आणि स्वतःच तयार केलेली ‘समाप्त’ अशी पाटी मध्येच जोडून द्यायचा. 

दिवस बदलले. कुटुंबातल्या सदस्यांची जागा टीव्हीनं घेतली. हळूहळू नाम्याची ‘टाकी’ ओस पडू लागली...आणि अचानक एके दिवशी गावात बॅंकेचं पथक आलं. ‘हप्ते थकले’ म्हणून त्यांनी नाम्याचं प्रोजेक्‍टर-मशिन जप्त करून नेलं. नाम्याच्या स्वप्नांचं रीळ तुटलं ते कायमचंच! आज ‘मल्टिप्लेक्‍स’मध्ये सिनेमा पाहताना नाम्याची ‘टूरिंग टाकी’ आठवते आणि मशिन जप्त झाल्यानंतरच्या काळातला गावात सैरभैर फिरणारा नाम्याही आठवतो...त्याच्या आयुष्याप्रमाणेच फाटून वाऱ्यावर उडणाऱ्या पोस्टरकडं विमनस्कपणे पाहत उभा असलेला! 
मी नकळत डोळ्यांच्या कडा पुसतो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com