Junabai Tiger
Junabai TigerSakal

‘जुनाबाई’चा संघर्ष

सततच्या भीतीपोटी वाघिणींना आपल्या वावरण्यावर अनेक मर्यादा येतात, याचीच जाणीव ‘जुनाबाई’ या वाघिणीचा जीवनसंघर्ष करून देते.

- संजय करकरे

सततच्या भीतीपोटी वाघिणींना आपल्या वावरण्यावर अनेक मर्यादा येतात, याचीच जाणीव ‘जुनाबाई’ या वाघिणीचा जीवनसंघर्ष करून देते. या साऱ्या परिस्थितीतही या वाघिणीने आपली एक छाप पर्यटकांवर टाकली आहे. आज या वाघिणीचे अनेक चाहते असून, त्यांच्या संग्रही तिची उत्तमोत्तम छायाचित्रे आहेत. आता काल-परवा या परिसरातील एक घटना समोर आली.

जुनाबाई वाघिणीच्या दोन पिल्लांपैकी एक पिल्लू जंगलात मृत अवस्थेत सापडले. दुसऱ्या एका नर वाघाने त्याला मारले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. नर वाघांपासून स्वतःच्या पिल्लांना वाचवण्यासाठी वारंवार झगडणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या वाघिणीची ही गोष्ट...

काही वाघांचा जन्म प्रसिद्ध वाघाच्या पोटी झालेला नसतो; मात्र ते स्वतःच्या कर्तृत्वाने असे काही नाव कमवतात, की त्यांची चर्चा दीर्घकाळ चालत राहते. त्यांचे नावही वन्यप्रेमींच्या तोंडी राहते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात वावरणाऱ्या एका वाघिणीबद्दल असेच काहीसे घडले आहे. कोलारा तसेच मदनापूर बफर क्षेत्रात वावरणाऱ्या ‘जुनाबाई’ नावाच्या वाघिणीबद्दल मी हे सारे बोलत आहे.

कोअर क्षेत्रापासून बाजूला असलेल्या बफर क्षेत्रात या वाघिणीचा मुख्य वावर असला तरीही पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यात, लक्ष वळवण्यात ती कमालीची यशस्वी झाली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ती स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीला वाचवण्याची धडपड सातत्याने करत असल्याचे बघितले जात आहे.

चिमूर तालुक्यातील मदनापूर गावापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर जंगलात जुनाबाई नावाचे एक मंदिर आहे. पूर्वापार असलेले हे मंदिर स्थानिक गावकऱ्यांच्या श्रद्धास्थानी आहे. आख्यायिका अशी आहे, की जुनाबाई, चिंदाबाई आणि सोनाबाई या बहिणी जंगलात हरवल्या होत्या. त्या सापडल्या नाहीत. त्यांच्याच नावाला धरून मग भरजंगलातच मूर्ती उभारल्या गेल्या. पुढे जुनाबाईचे मंदिर बांधले गेले.

त्या मंदिराजवळच एक विहीरही आहे, जी नंतरच्या काळात जाळीने बंद केली. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात हा सर्व भाग २०१२-१३ मध्ये आल्याने गावकऱ्यांच्या फिरण्यावर येथे मर्यादा आल्या. परिसरातील अनेक गावकरी तत्पूर्वी जुनाबाईच्या मंदिरात सायकल अथवा बैलगाडीने येत असत. मदनापूर शाळेतील विद्यार्थीही येथे डबा पार्टीसाठी येत.

त्यांच्या विरंगुळ्याचे हे एक ठिकाण होते. याच परिसरात जन्म झालेल्या वाघिणीला ‘जुनाबाई’ हे नाव मिळाले. साधारणतः २०१३ च्या सुमारास या वाघिणीचा जन्म झाला असे सांगितले जाते; मात्र तिच्या जन्मदात्यांची माहिती उपलब्ध नाही.

या वाघिणीला मी सर्वप्रथम २०१९ मध्ये जुनाबाईच्या पाणवठ्यावर बघितले होते. हा पाणवठा कृत्रिम असून तेथे सोलर पंपाच्या साह्याने पाणी भरले जाते. एका बशीच्या आकाराचा हा पाणवठा असून, उन्हाळ्यात दिवस उतरणीला जात असताना ही वाघीण आपल्या साधारण पाच महिन्यांच्या तीन पिल्लांसह पाण्यावर आली. येताना ती अत्यंत सावध होती. आमच्या दोन गाड्यांचा अंदाज घेत ती शांतपणे पाण्यावर आली.

काही काळ पाण्याजवळ थांबून तिने आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. यानंतर तिने मागच्या बाजूला वळून बारीक आवाज केला असावा, कारण काही क्षणातच मागच्या बाजूला असलेल्या झाडीतून तीन लहान पिल्ले वेगाने बाहेर पडून तिच्याजवळ आली. आईला अंग घासून पाण्यात उतरून ती पिल्ले पाणी पिऊ लागली.

उन्हामुळे त्रस्त झालेली आणि पाण्याने व्याकुळ झालेली ती पिल्ले मग काही काळ आईच्या दक्ष नजरेखाली पाण्यात खेळत राहिली. हे सर्व सुरू असताना ही वाघीण मात्र सातत्याने जवळपासच्या जंगलाकडे बघून काही धोका नाही, ना याचा मागोवा घेत होती.

मदनापूर या पर्यटन गेटवर प्रकाश मसराम गेल्या सहा वर्षांपासून गाईडचे काम करत आहे. ताडोबाच्या मदनापूर बफरचे हे प्रवेशद्वार २०१७-१८ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून तो या वाघिणीला खूप बारकाईने बघत आहे. तो सांगतो, ‘गेट सुरू झाल्यापासून आम्ही या वाघिणीला बघत आहोत. आतापर्यंत आम्ही तिची पाच बाळंतपणे बघितली आहेत; मात्र दोन वेळा तिची पिल्ले दुसऱ्या नर वाघाकडून मारली गेली.

या परिसरात असलेल्या कनकाझरी या पाणवठ्याजवळ एक नर वाघ होता. तो अतिशय आक्रमक आणि पर्यटकांचे दर्शन झाल्याबरोबर त्यांच्याकडे अत्यंत रागीट नजरेने बघायचा. तोंड विस्फारायचा. त्यामुळे या वाघाचे ‘रावण’ ऊर्फ ‘कनकाझरी’ असे नामकरण करण्यात आले होते. या वाघापासून सुरुवातीला ‘जुनाबाई’ला तीन, नंतर चार आणि तिसऱ्या वेळी तीन पिल्ले झाली.

तिसऱ्या बाळंतपणात झालेल्या तीनही पिल्लांना मात्र या परिसरात आलेल्या दुसऱ्या एका वाघाने मारले. ताडोबातील कोअर क्षेत्रातून हद्दपार झालेला मटकासुर नावाचा वाघ या बफर क्षेत्रात आल्यावर येथे त्याने ‘जुनाबाई’ची तीनही पिल्ले मारली. यानंतर ‘जुनाबाई’ला ‘मटकासुर’पासून चार पिल्ले झाली; मात्र या पिल्लांना तेथे नव्याने आलेल्या ‘ताला’ नावाच्या नर वाघाने मारले.

या सर्व प्रकारामुळे ‘जुनाबाई’ वाघिणीने एक वेगळाच फंडा अवलंबलेला पर्यटकांच्या लक्षात आला. ही वाघीण जन्म झाल्यानंतर आपल्या पिल्लांना घेऊन दाट आणि अत्यंत सुरक्षित भागात राहू लागल्याने बराच काळ ती दिसत नसे. कधी कधी ही वाघीण आपल्या पिल्लांना घेऊन गावाच्या जवळपासही आसऱ्याला येत असल्याचे मदनापूर येथील ग्रामस्थांना बघायला मिळाले आहे.

पिल्ले मोठी झाल्यावरच ती या पिल्लांना घेऊन पर्यटकांना दिसायची, असे गाईड प्रकाशचे म्हणणे आहे. पाचव्या वेळी ‘जुनाबाई’ला तीन पिल्ले झाली. त्यातील सध्या दोन जिवंत आहेत. पिल्ले साधारणतः १३ ते १४ महिन्यांची आहेत. सध्या या परिसरात दागोबा नावाचा एक नर वाघ आपल्या ताकदीने वर्चस्व निर्माण करून येथे वावरत आहे. या वाघाचा व ‘ताला’ नराचा जोरदार झगडा झाला.

या हाणामारीत ‘दागोबा’ने वर्चस्व मिळवून आपले साम्राज्य निर्माण केले आहे. हा नर वाघ सध्या या पिल्लांच्या सोबत तसेच जुनाबाई या वाघिणीसोबत या परिसरात एकत्र दिसत आहे. दागोबा नावाच्या देवस्थानाजवळ सर्वप्रथम हा वाघ दिसल्याने त्याला हे नामकरण मिळाले आहे.

जुनाबाई वाघीण मदनापूर, बेलारा या परिसरातील शेताजवळ सहजतेने बघायला मिळत असे. २०२१ मध्ये मी या वाघिणीची दोन पिल्ले मदनापूर गावाजवळच्या तलावाजवळ बघितली. त्या वेळी ही वाघीण आपल्या पिल्लांना गावाजवळ ठेवून एकटी १०४ नंबरच्या पाणवठ्याजवळ बघितली होती. गावाजवळ तिचा वावर असला, तरी फार कमी प्रमाणात ती पाळीव गुरांच्या मागे जात असल्याचेही निरीक्षण आहे. स्थानिक लोक शेतात काम करत असतानाही अनेक वेळा त्यांनी या वाघिणीला बघितले आहे.

मदनापूर येथील गाईडनी ‘ताला’ व ‘जुनाबाई’ वाघिणीची झटापटही बघितली आहे. त्या वेळेस ‘मटकासुर’पासून झालेली पिल्ले वाचवण्यासाठी तिने थेट या मोठ्या नर वाघाशी चार हात केले होते. त्या वेळेस तिला जखमाही झाल्याचे अनेक पर्यटकांनी बघितले. त्या वेळेस आपल्या पिल्लांना या नर वाघापासून दूर करण्यात यश मिळाले; मात्र नंतर ही पिल्ले ‘ताला’ने मारली.

सततच्या भीतीपोटी अथवा अधिक दक्ष होऊन वाघिणींना आपल्या वावरण्यावर अनेक मर्यादा येऊ शकतात, हे या वाघिणीकडे बघितल्यानंतर लक्षात येते; मात्र या साऱ्या गोंधळात या वाघिणीने आपली एक छाप पर्यटकांवर टाकली आहे. आज या वाघिणीचे अनेक चाहते असून त्यांच्या संग्रही तिची उत्तमोत्तम छायाचित्रे आहेत. नर वाघांपासून स्वतःच्या पिल्लांना वाचवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व सतत संघर्ष करणाऱ्या या वाघिणीला सलामच करायला हवा!

ताजा कलम

गुरुवारी, अर्थात १४ डिसेंबरला या परिसरातील एक घटना समोर आली. जुनाबाई वाघिणीच्या दोन पिल्लांपैकी एक पिल्लू जंगलात मृत अवस्थेत सापडले. दुसऱ्या एका नर वाघाने त्याला मारले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. अलीकडे जन्माला आलेल्या तीन पैकी दोन पिल्ले मृत झाली असून, आता एक पिल्लू जे साधारण १२ ते १४ महिन्यांचे असावे तिच्यासोबत आहे. जुनाबाईच्या नशिबी असे कमालीचे जगणे आहे, हेच यातून स्पष्ट होते.

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

sanjay.karkare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com