बिनधास्त सूर्या

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महत्त्वपूर्ण ताडोबा रेंजमध्ये ‘मटकासुर’ नावाच्या वाघाचे पर्व सुरू असतानाच २०१७ मध्ये ‘माया’ वाघिणीच्या पोटी ‘सूर्या’चा जन्म झाला.
Maya Surya Tiger
Maya Surya Tigersakal

- संजय करकरे

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महत्त्वपूर्ण ताडोबा रेंजमध्ये ‘मटकासुर’ नावाच्या वाघाचे पर्व सुरू असतानाच २०१७ मध्ये ‘माया’ वाघिणीच्या पोटी ‘सूर्या’चा जन्म झाला. हे ‘सूर्या’ नामकरण जगप्रसिद्ध वाईल्ड लाईफ फिल्ममेकर नल्ला मुत्थू यांनी केले. ‘माया’वर फिल्म बनवत असताना एकदा ‘छोटा मटका’ हा वाघ ‘माया’च्या मागे लागण्याचा प्रयत्न करीत होता.

‘माया’ त्याला दाद देत नव्हती. यावेळी तिचा नर बछडा वयाने मोठ्या असणाऱ्या वाघाला दूर करण्यासाठी उभा ठाकला. ‘छोटा मटका’ दूर जाईपर्यंत तो त्याच्यामागे गवतातून चालत गेला. हे सर्व धाडसी कृत्य बघून मुत्थू यांना या वाघासाठी ‘सूर्यम्’ नाव सुचले. पुढे त्याचे ‘सूर्या’ नामकरण झाले, त्याची ही गोष्ट...

वाघ हा जंगल परिसंस्थेतील सर्वोच्च भक्षक म्हणून ओळखला जातो. म्हणजेच वाघ आहे तर जंगल आहे अथवा जंगल असल्यामुळेच तेथे वाघ आहे. जंगलाजवळ राहणारे ग्रामस्थही कबूल करतात की जंगलात वाघ असल्यामुळेच जंगलाचे संरक्षण होत आहे. जंगलातील वाघ जर संपला तर संपूर्ण जंगल नाहीसे होण्यास वेळ लागणार नाही, याचीही त्यांना पुरेपूर कल्पना आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे आज आपल्या कथेचा जो नायक आहे त्याबद्दल हे सारे बोलत आहे. या वाघाने तरुण वयातच जो धडाडीपणा दाखवला होता, त्या अनुभवाच्याच जोरावर त्याने एका अभयारण्यातील जंगलात आपली ताकद, आपला अनुभव दाखवत वर्चस्व निर्माण केले आहे. हे सर्व त्याला त्याच्या जनुकातून (जीन्स) प्राप्त झाले आणि हे जीन्स दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही वाघाचे नसून ताडोबात काही वर्षे आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या ‘मटकासुर’ वाघाचे आहे. ‘माया’ वाघीण आणि ‘मटकासुर’ वाघ यांच्या पोटी जन्मलेल्या या वाघाचे नाव आहे ‘सूर्या’.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महत्त्वपूर्ण ताडोबा रेंजमध्ये ‘मटकासुर’ नावाच्या वाघाचे पर्व सुरू असतानाच ‘सूर्या’चा जन्म झाला. साधारण २०१७ मध्ये अत्यंत देखण्या आणि सुप्रसिद्ध अशा ‘माया’ वाघिणीच्या पोटी या वाघाचा जन्म झाला. ‘माया’चे हे तिसरे बाळंतपण होते. यावेळी तिने दोन पिल्लांना जन्म दिला होता.

या सर्व परिसरात नर वाघांचा वावर अधिक असल्याने ‘माया’ वाघिणीचे हे दोन बछडे पूर्ण वाढतील का याची शंका होती, पण ‘माया’ वाघिणीने ‘मटकासुर’च्या सहकार्याने या दोन्ही पिल्लांचा अतिशय योग्य रीतीने सांभाळ केला आणि त्यांना मोठे केले. हा काळ ताडोबातील अत्यंत समृद्ध असा काळ ठरला.

‘माया’, ‘मटकासुर’ व त्यांचे दोन बछडे यांना वारंवार पर्यटकांनी बघितले. याच काळात ‘माया’ वाघिणीवर जगप्रसिद्ध वाईल्ड लाईफ फिल्ममेकर नल्ला मुत्थू यांनी फिल्म बनवायला सुरुवात केली होती. त्यांना या सर्व कुटुंबाचे अत्यंत सुंदर फुटेज मिळत होते. नल्ला यांनीच ‘माया’च्या या दोन्ही बछड्यांचे नामकरण केले.

ते सांगतात, साधारणतः बछडे नऊ-दहा महिन्यांचे असताना पांढरपौनीच्या जवळच त्यांनी या बछड्यांना ‘माया’ म्हणजेच त्यांच्या आईसोबत सकाळी बघितले. यावेळी ‘मटकासुर’ आणि ‘छोटी तारा’ यांच्यापासून जन्म घेतलेल्या ‘छोटा मटका’ नर वाघाने प्रौढ वयात पदार्पण केले होते.

तो वाघ ‘माया’च्या मागे लागण्याचा प्रयत्न करीत होता. ‘माया’ त्याला दाद देत नव्हती. यावेळी ‘माया’चा हा नर बछडा, आईची बाजू घेत आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या वाघाला दूर करण्यासाठी उभा ठाकला. त्याने एवढ्या मोठ्या वाघाला विरोध दर्शवला. एवढेच नव्हे तर ‘छोटा मटका’ दूर जाईपर्यंत तो त्याच्यामागे गवतातून चालत गेला होता.

हे सर्व धाडसी कृत्य बघून मला या वाघाला ‘सूर्यम्’ म्हणजेच ‘धाडसी’ असे नाव सुचले. पुढे याचे ‘सूर्या’ असे नामकरण झाले. या ‘सूर्या’ची बहीण अत्यंत शांत होती. आईप्रमाणेच ती समंजस वागत असे. त्यामुळे या शांत स्वभावाच्या मादी पिल्लाला मी ‘मीरा’ या दाक्षिणात्य दूरदर्शन अभिनेत्रीचे नाव दिले, असे नल्ला यांनी सांगितले.

या अगोदर मी १० आणि ११ ऑक्टोबर २०१८ ला हे सर्व कुटुंब खूप जवळून बघितले. १० तारखेला सकाळच्या फेरीत साधारणतः साडेआठ वाजण्याच्या सुमारास काळाआंबा रोडवरती आम्हाला ‘माया’ रस्त्यावर बसलेली दिसली. पावसाळा संपला असला तरी ओलसर गारवा जंगलात जाणवत होता. रस्त्यावर बसलेली ‘माया’ अत्यंत निवांत होती.

तिची पिल्ले जवळपास असल्याचे तिच्या हावभावांमधून समजले होते, पण ती पिल्ले नेमकी कुठे आहेत हे काही दिसत नव्हते. पाच-सहा गाड्या निवांतपणे तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून थांबल्या होत्या. साधारणतः दहा मिनिटांनंतर ‘माया’ने बारीक आवाज केला. याबरोबरच आमच्या उजव्या बाजूला असणाऱ्या जंगलातून एक पिल्लू बाहेर आले.

बिबट्याच्या आकाराचे ते पिल्लू होते. हळूहळू चालत ते आईच्या जवळ आले. मग मायाने बसूनच त्याला चाटायला सुरुवात केली. या पिल्लाने आपले तोंड, मान व गळा आईच्या चेहऱ्याला घासून आपले प्रेम व्यक्त केले. मग हळूच काहीसे घाबरत तो खाली बसून दूध पिऊ लागला. वाघाची पिल्ले पाचव्या महिन्यापर्यंत आईच्या दुधावर मुख्यतः असतात. त्यानंतर ते मांस खाऊ लागतात.

सहा-साडेसहा महिन्यांचे हे पिल्लू असावे. त्यामुळे आईच्या संमतीनेच, लाडीगोडी लावून ते दूध पिऊ लागले होते. पण दोन मिनिटांतच ते उठून उभे झाले आणि आमच्याकडे थेट बघू लागले. हा ‘सूर्या’ होता. त्याच्या चेहऱ्यावर आमच्या गाड्या व आमच्याबद्दल कुतूहलता दिसत होती. आमच्याकडे बघत असताना त्याच्या इवळ्याशा चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता.

या पाठोपाठ दुसरे पिल्लूही झाडीतून बाहेर आले आणि आईजवळ आले. हे पिल्लू आकाराने काहीसे लहान होते. ते पिल्लू म्हणजेच ‘मीरा’ वाघीण होती. हे पिल्लू जवळ आल्यावरही ‘माया’ने पहिल्या नर पिल्लाप्रमाणेच तिचेही लाड पुरवले. दोन्ही पिल्ले आईजवळ काही मिनिटे थांबली. यावेळेस काळा आंब्याच्या दिशेने वनरक्षक व दोन मदतनीस पायी गस्त करत आमच्या दिशेने येताना दिसले.

‘माया’ या पायी चालत येणाऱ्या माणसांकडे बघून एकदम सावध झाली. पिल्लेही सावध होऊन सर्वजण त्यांच्याकडे बघू लागले. रस्त्यावर वाघ बसल्याचे बघून हे सर्व वनकर्मचारी दूरवरच थांबून राहिले. यावेळी ‘सूर्या’ने सरळ रस्त्यावरून या वनकर्मचाऱ्यांकडे चालायला सुरुवात केली. पंधरा-वीस फूट तो त्यांच्या दिशेने चालत गेला आणि मग तो डाव्या बाजूला झाडीत शिरला.

हे वनकर्मचारी काही वेळ थांबून एकूण सर्व हालचाली बघून पायी चालत आल्या दिशेने निघून गेले, पण हा ‘सूर्या’ आत्मविश्वासाने व उत्सुकतेपोटी सतत ज्या दिशेने ही माणसे गेली होती, त्याच दिशेने झाडीतून बघत होता. काही वेळाने कंटाळून ‘सूर्या’ परत माघारी आईकडे आला.

साधारणतः पाऊण तास हा सर्व प्रकार शांतपणे सुरू होता. यानंतर ‘माया’ मेमसाब उठल्या आणि आमच्या डावीकडील जंगलात दोन्ही पिल्लांना घेऊन निघून गेल्या. ११ तारखेला संध्याकाळच्या फेरीत पुन्हा हे कुटुंब दिसले. त्यानंतर दोन-तीन वेळा या सर्वांनी दर्शन दिले, पण दहा तारखेला जे काही दिसले आणि कॅमेऱ्यात टिपले ते विलक्षण असेच होते.

कोलारा येथील गाईड विनोद उईके ‘सूर्या’बद्दल आपल्या आठवणी सांगतो. तो म्हणतो, ‘या कुटुंबाने ताडोबात येणाऱ्या हजारो पर्यटकांना खूप खूश केले आहे. आम्ही या पिल्लांना त्यांच्या लहानपणापासून बघत आलो. कधी माकडाच्या मागे झाडावर चढण्याचा प्रयत्न कर, तर कधी चितळ, सांबर दिसले की सावधपणे लपतछपत त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न हा ‘सूर्या’ करायचा. अतिशय धाडसी आणि बिनधास्त असा हा ‘सूर्या’ वागायचा. हा वाघ उत्सुकतेपोटी गाडीच्या जवळ येणे, यासोबतच अनेक करामती करत असल्याने तो पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला होता.’

‘मीरा’ या वाघिणीसंदर्भात विनोद पुढे सांगतो, ‘‘३ ऑक्टोबर २०१९ च्या सकाळच्या फेरीत मी ‘मीरा’ वाघिणीला ताडोबा तलावाजवळ बघितले. त्यावेळेस तिला जखमा झाल्याचे तसेच ती थकली असल्याचे लक्षात आले. एक ऑक्टोबरला पावसाळ्यानंतर जंगल पर्यटन सुरू झाले होते. ही ‘मीरा’ पूर्ण वाढ झालेली होती. ती एकटीच होती.

यानंतर ती रस्ता पार करून डाव्या बाजूला असलेल्या खडकाळ भागावरून पलीकडच्या जंगलात गेली, त्यावेळेस तिला चालणेही होत नव्हते. वनविभागाला याची कल्पना दिली गेली.’’ या घटनेनंतर दोन दिवसांनी ‘मीरा’ वाघिणीचा मृतदेह तलावाच्या शेजारीच सापडला. दोन दिवस या वाघिणीला शोधण्याचा प्रयत्न वनकर्मचाऱ्यांनी केला होता; पण त्यांना या देखण्या आणि अत्यंत शांत स्वभावाच्या वाघिणीचा मृतदेहच सापडला.

ऑक्टोबर २०१९ च्या सुमारास ‘सूर्या’ वाघ अखेरचा ताडोबाच्या जामनी परिसरात दिसला. या ठिकाणी असणाऱ्या अनुभवी आणि वयाने मोठ्या असणाऱ्या नर वाघांना टक्कर देण्यास कदाचित तो समर्थ नव्हता. त्यामुळे त्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेकडील बाजूला स्थलांतर केले.

यावेळेस साधारणतः दोन वर्षे वयाच्या, पूर्ण वाढ झालेल्या या ‘सूर्या’ने चालत जाऊन उमरेड-करंडला अभयारण्यात पाऊल ठेवले होते. आकाराने मोठा, बलवान व पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या मटकासूर वाघाचे जीन्स घेऊन हा ‘सूर्या’ वाघ उमरेडच्या जंगलात आता आपली ताकद आजमावण्यास सज्ज झाला होता. आपल्या नावाप्रमाणे तो येथे आता आपले उज्ज्वल भविष्य आजमावू पाहत होता.

एकेकाळी ‘जय’ नावाच्या भल्यामोठ्या वाघाने वर्चस्व व लौकिक मिळवलेल्या या जंगलात आता ‘सूर्या’ आपले भवितव्य आजमावत होता. मार्च २०२० पासून कोरोनाच्या काळात सर्व जंगले बंद झाली. ज्यावेळी कोरोनानंतर सर्व जंगले सुरू झाली, तेव्हा असे लक्षात आले की, या उमरेडच्या जंगलात ‘सूर्योदय’ झाला आहे. त्याची गोष्ट पुढच्या भागात...

(पूर्वार्ध)

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

sanjay.karkare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com