सुपर मॉम ‘माधुरी’

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील तेलिया तलावाच्या रम्य आणि निसर्गसंपन्न परिसरात तसेच मोहर्लीच्या बफर क्षेत्रात एकेकाळी निर्विवाद वर्चस्व गाजवणारी एक वाघीण.
Tiger
TigerSakal

- संजय करकरे

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील तेलिया तलावाच्या रम्य आणि निसर्गसंपन्न परिसरात तसेच मोहर्लीच्या बफर क्षेत्रात एकेकाळी निर्विवाद वर्चस्व गाजवणारी एक वाघीण. वयोवृद्ध झालेली ही वाघीण आज चंद्रपूर शहराच्या परिसरात डब्ल्यूसीएलच्या कोळशाच्या ढिगाऱ्याच्या आसऱ्याने झुडपी जंगलात वास्तव्याला आहे.

या वाघिणीला सात वेळा पिल्ले झाली. त्यातली सोनम, लारा, छोटी मधू यांसह अनेक वाघिणी आज ताडोबाच्या जंगलाचे वैभव वाढवत आहेत. या ‘सुपर मॉम’ वाघिणीचे नाव आहे माधुरी. तिला आता व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर पडून काहीसे एकाकी जीवन जगावे लागत आहे...

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘बिग डॅडी’ म्हणजेच ‘वाघडोह’ या नर वाघासोबतच रमलेली व त्याचा संसार फुलवणारी ‘माधुरी’ या वाघिणीची ही गोष्ट. वयोवृद्ध झालेली ही वाघीण आज चंद्रपूर शहराच्या परिसरात डब्ल्यूसीएलच्या कोळशाच्या ढिगाऱ्याच्या आसऱ्याने झुडपी जंगलात वास्तव्याला आहे. चरणाऱ्या गाईंच्या मागे एक वाघ धावत असल्याचा एक व्हिडीओ अलीकडेच समाजमाध्यमांवर फिरत होता.

यात गाईंच्या मागे धावणारी वाघीण ही ‘माधुरी’ असल्याचे म्हटले होते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील तेलिया तलावाच्या रम्य आणि निसर्गसंपन्न परिसरात तसेच मोहर्लीच्या बफर क्षेत्रात एकेकाळी निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या या ‘सुपर मॉम’ वाघिणीला आता व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर पडून काहीसे एकाकी जीवन जगावे लागत आहे. आयुष्याच्या उतारवयात केवळ माणसांच्या नशिबी नव्हे, तर वन्यप्राण्यांच्याही नशिबी अशीच काहीशी स्थिती येते, हे विदारक पण कटू सत्य आहे.

साधारणतः २००६ च्या सुमारास ‘माधुरी’चा जन्म झाला. व्याघ्र प्रकल्पाच्या दप्तरी ती ‘टी१०’ या नावाने ओळखली जाते. तिच्या आईचे नाव ‘तारा’. या ताराचे अत्यंत सुरेख फुटेज मला मोहर्लीच्या रस्त्याकडेच्या एका कृत्रिम पाणवठ्यावर मिळाले होते. त्या वेळी माझ्या हातात एका संस्थेचा एक मूव्ही कॅमेरा होता.

साहजिकच कार्यक्रम करता करता मी जंगलातील वन्यप्राण्यांचेही शूटिंग करत होतो. बऱ्यापैकी शूटिंग जमल्यावर त्यावर एक फिल्म तयार करण्याचे ठरले. पुण्यातील एका परिचिताला नागपूरला बोलवून सर्व शूटिंग दाखवले. त्याच्या म्हणण्यानुसार काही ॲडिशनल फुटेज फिल्ममध्ये आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही गाडी करून मोहर्ली येथे मुक्कामी गेलो होतो.

मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पायी फिरून झाल्यावर सहज जंगलात चक्कर मारून येऊ म्हणून गाडी जंगलात घेतली. मूव्ही कॅमेरा घ्यावा न घ्यावा या विचारात होतो; पण सोबत तो असू द्यावा, या विचाराने कॅमेऱ्याची बॅग सोबत घेतली होती. आमची गाडी मोहर्लीच्या जवळच असणाऱ्या जामुनझोरा पाणवठ्याला चक्कर मारून मुख्य रस्त्यावर आली.

आम्ही परतीची वाट धरणार इतक्यात रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या सिमेंटच्या टाक्यात बसलेली एक वाघीण व दोन पिल्ले झटकन पाण्यातून बाहेर पडून जवळच्या बांबूच्या झुडपात पळाले. एप्रिलचा महिना होता आणि सकाळचे नऊ वाजत आले होते. आमची गाडी पाणवठ्याच्या अलीकडे थांबवली. गाडी बंद करून आम्ही शांतपणे बसलो.

अवघ्या पाच मिनिटांत ‘तारा’ बांबूच्या झुडपातून आमच्याकडे थेट नजर ठेवून टाक्यातील पाण्यात उतरली. टाक्यातील पाण्यात उभे राहून ती पाणी पिऊ लागली. एक मिनिटानंतर ती तिथेच बसली. बसून पाणी पीत असतानाच मागच्या बाजूला असलेल्या बांबूच्या दाट रांजीतून तिची दोन पिल्ले आमच्याकडे आणि आईकडे बघत होती. ती पिल्ले बाहेर आली नाही.

पाणी पिऊन झटक्यात ती दक्ष आई मागे फिरली आणि झुडपात नाहीशी झाली. त्या वेळेस पिल्ले साधारणतः चार ते पाच महिन्यांची असावी. हा संपूर्ण व्हिडीओ कमालीचा सुंदर टिपला गेला असून ‘चला निसर्गात भ्रमंतीला’ या माझ्या फिल्ममध्ये मी तो आवर्जून वापरला आहे.

त्या काळी वाघांची वंशावळी फारशी लक्षात ठेवली जात नव्हती. पर्यटनही मर्यादित होते. आत्तासारखे मोठ्या लेन्स असणारे कॅमेरेही मर्यादित होते. साहजिकच वाघांचे छायाचित्र मोजकेच उपलब्ध असल्याने ‘माधुरी’ या वाघिणीची सुरुवातीच्या काळातील माहिती उपलब्ध नाही. व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली येथे काम करणारे जुने गाईड मात्र माधुरी वाघिणीचा आवर्जून उल्लेख करतात.

माधुरी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आली ती २०१२-१३ च्या सुमारास. या वेळेस तेलिया तलावाच्या परिसरात माधुरी आणि वाघडोह या जोडीचे फुललेले कुटुंब होते. या जोडीला चार पिल्ले झाली होती, ज्या माद्या होत्या. या वाघिणींची नावे सोनम, लारा, गीता व मोना अशी होती. हे सहा जणांचे कुटुंब त्या वेळेस ताडोबातील पर्यटन वाढवण्यास कमालीचे यशस्वी ठरले होते.

प्रेमळ वाघडोह, दक्ष माधुरी आणि या चार बहिणींचे अनोखे वागणे पर्यटकांना कमालीचे भावणारे होते. तेलिया तलावाच्या परिसरात मी हे कुटुंब दोन-तीन वेळा बघितले. प्रत्येक वेळी काही ना काही चित्तथरारक बघायला मिळतच होते. कधी चितळांच्या मागे लपतछपत धावणे असो, तलावाच्या पाण्यात त्यांची सुरू असलेली मस्ती असो की अस्वल व रानकुत्र्यांच्या मागे धावणे, सारे खूप रोमांचकारी होते.

या साऱ्यांचे सुरेख चित्रण ‘टायगर सिस्टर्स ऑफ तेलिया’ नावाच्या फिल्ममध्ये आले आहे. आज युट्युबवर ही फिल्म उपलब्ध आहे. या फिल्मचा मुख्य फोकस हा माधुरीच्या पिल्लांवरती असला तरीही ही वाघीण पिल्लांना कशा पद्धतीने वाढवते, स्वतंत्र झाल्यानंतर पिल्ले कशी वागतात, हे येथे बघायला मिळते.

२०१५-१६च्या सुमारास माधुरी मोठ्या झालेल्या पिल्लांना सोडून जवळच्याच जुनोना क्षेत्रात निघून गेली. यानंतर तेथून ती लागून असलेल्या आगरझरी व देवाडा परिसरात आली. तिच्यापाठोपाठ ‘वाघडोह’ या परिसरात पोहोचला होता. या ठिकाणीही या दोघांचा संसार फुलला.

‘वाघडोह’ला या परिसरातून हाकलल्यानंतर ‘खली’ नावाच्या एका मोठ्या वाघाने माधुरीसोबत संसार थाटला. या वेळीही तिला चार-चार पिल्ले होत राहिली. आज संपूर्ण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात माधुरीची ‘वंशावळ’ पसरली आहे.

या वाघिणीच्या प्रेमात पडणारा आणि तिच्यावरती फिल्म करणारे श्रीहर्ष गजबे मला भेटले. नागपुरात खासगी व्यवसाय करणाऱ्या गजबे यांनी माधुरीवर ‘ब्लडलाईन’ नावाची फिल्म तयार केली आहे. वन्यप्राण्यांच्या अथवा वाघाच्या प्रेमात एखादी व्यक्ती पडली तर काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण येथे बघायला मिळते.

श्रीहर्ष म्हणतात, स्थिर छायाचित्रण करत असतानाच मला माधुरी वाघीण दिसली. या वाघिणीचा इतिहास बघून मला फिल्म करावी, असे वाटले. मी मूवी कॅमेऱ्याच्या सहाय्याने तिला टिपू लागलो. २०१६ पासून मी तिचा मागोवा घेत आहे. माधुरीचा स्वभाव, माधुरीचे पिल्लांना वाढवण्याचे कसब, तिची शिकारीची पद्धत, तिचे आगरझरी, देवाडा व आडेगाव या परिसरात असणारा वावर या साऱ्या गोष्टी मी या फिल्ममध्ये टिपल्या आहेत.

पाळीव गुरांच्या मागे ती अधिक असे. साहजिकच त्यामुळे तिचे वावरणे गावाजवळील शेतात आणि जंगलात होते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्राचे पर्यटन खऱ्या अर्थाने या वाघिणीमुळे वाढीस लागले. ही वाघीण अनेक ग्रामस्थांच्या जीवनाचा आधार बनली.

ते पुढे सांगतात, या वाघिणीने सुरुवातीच्या काळापासून कोणाशीही आपल्या हद्दीबाबत संघर्ष केला नाही. तिची पिल्ले जशी मोठी झाली, तशी तिने आपल्या पिल्लांना आपली जागा उपलब्ध करून दिली आणि नवीन हद्दीत ती गेली. तिचा हा समर्पणाचा भाव मला कमालीचा भावला. साधारणतः ५५ मिनिटांची माझी फिल्म तयार झाली आहे.

बरेच वेळा परदेशातील फिल्ममेकर आपल्या परिसरात येऊन फिल्म तयार करतात. त्यांच्याजवळ प्रचंड आर्थिक पाठबळ असते. आपण मात्र मोजक्याच संसाधनात फिल्म तयार करतो. त्याच्यासाठी खिशाला परवडत नसतानाही काम करतो. मात्र आपल्याला या फिल्मच्या प्रसारणासाठी मदत होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

माधुरी वाघिणीला आतापर्यंत सात वेळा पिल्ले झाली आहेत. पहिले वेत वगळता तिची अन्य पिल्ले मोठी झाली आणि संपूर्ण जंगलात पसरली. सोनम, लारा, छोटी मधू यासह अनेक वाघिणी आज ताडोबाच्या जंगलाचे वैभव वाढवत आहेत. माधुरी या जंगलाची खऱ्या अर्थाने ‘सुपर मॉम’ ठरली आहे.

भारदस्त आकाराची, उजवा कान अर्धा गमावलेली आणि चेहऱ्यावरील पांढरी छटा अधिक जाणवणारी देखणी माधुरी वाघीण आज आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर आली आहे. तिच्याकडे बघितल्यावर तिला ‘माधुरी’ हे समर्पक नाव का दिले हे समजू शकेल. तिची अदाही काही औरच आहे!

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

sanjay.karkare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com