बिग डॅडी... वाघडोह

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आज वाघांची जी चांगली संख्या बघायला मिळते, त्यात वाघडोह वाघाचा मोठा वाटा आहे.
Tadoba Forest Tiger
Tadoba Forest Tigersakal

- संजय करकरे

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आज वाघांची जी चांगली संख्या बघायला मिळते, त्यात वाघडोह वाघाचा मोठा वाटा आहे. खास करून मोहर्ली कोअर व बफर क्षेत्रात वाघडोहोचा दबदबा होता. त्या परिसरात या वाघाचे वंशज आजही बघायला मिळत आहेत. सर्वसाधारणपणे चाळीस वाघांच्या पिल्लांचा तो बाप होता, असे सांगितले जाते. त्या अर्थाने हा वाघ ताडोबाचा ‘बिग डॅडी’च म्हणावा लागेल.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात आमची जिप्सी मातीच्या रस्त्यावरून निघाली होती. उंच-सखल, खाचखळग्यांचा रस्ता गाडीत स्वस्थ बसू देत नव्हता. एका ठिकाणी अचानक गाईडने जिप्सीचालकाला थांबायला सांगितले. गाडी मागे घे, मागे घे असे करत त्याने एका फायर लाईनवर गाडी थांबवण्यास सांगितली.

या फायर लाईनवरील काहीतरी हालचाल त्याच्या तीक्ष्ण नजरेत लक्ष्यात आली होती. माझ्याजवळील दुर्बिण आपल्या हातात घेत त्याने डोळ्याला लावली. फायर लाईनच्या एका कडेला मलाही काहीतरी हालचाल लक्षात आली. वाघीण झोपली आहे आणि तिची दोन पिल्ले जवळपास पळापळी करीत असल्याचे दिसले. काही वेळात झोपलेल्या वाघिणीने मान सरळ केली. ती उठून बसली. गाईड पुटपुटला, सर ‘वाघडोह’.

‘वाघडोह’ नावाचा नर वाघ मस्तपैकी पिल्लांच्या संगोपनात गुंतला होता. चार-पाच महिन्यांची दोन पिल्ले बिनधास्तपणे या बसलेल्या वाघाला आपले तोंड आणि अंग घासत होते. एखादी वाघीण ज्या पद्धतीने आपल्या पिल्लांची काळजी घेते, त्यांचे लाड करते असेच काहीसे हा नर वाघ येथे करत होता. आम्ही डोळे भरून हे अद्भुत दृश्य बघितले. वर्ष होते २०११-१२ च्या सुमारासचे.

या भल्या मोठ्या, अंगाने भारदस्त आणि कमालीची ताकद असणाऱ्या या कुटुंबवत्सल ‘वाघडोह’शी माझी ही पहिली भेट होती. यानंतर २०१९ पर्यंत अनेक वेळा मोहर्ली कोअर व बफर क्षेत्रात वावरणाऱ्या आणि पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या जबरदस्त वाघाशी भेट होत राहिली.

२००९-१०च्या सुमारास कोळसा आणि मोहर्ली वनपरिक्षेत्रातील ‘वाघडोह’ नावाच्या पाणवठ्याच्या जवळपास हा वाघ सर्वप्रथम बघितला होता. अंधारी नदीत हा पाणवठा आहे. ताडोब्यातील ही जीवनदायी नदी बांबू आणि मिश्र वनातून वाहत जाते. भरउन्हाळ्यातही या नदीत ठिकठिकाणी अनेक डोह, पाणवठे बघायला मिळतात. या पाणवठ्यावरूनच त्याला हे नाव मिळाले; पण त्याहून त्याचे एक नाव स्थानिक पातळीवर अधिक प्रसिद्ध झाले ते म्हणजे ‘भोकण्या’.

या नर वाघाच्या उजव्या डोळ्याजवळ जखम झाल्याने, त्याचा डोळा किंचित दबल्यासारखा व बारीक झाला. त्यामुळे तो या नावाने अधिक प्रसिद्ध झाला. इंग्रजीत ‘स्कारफेस’ म्हणूनही त्याची प्रसिद्धी झाली. ही जखम गव्याशी लढताना झाली, असे बोलले जाते. व्याघ्र प्रकल्पाच्या दस्ताऐवजात टी-३८ या नावाने त्याची नोंद झाली.

‘वाघडोह’चे माता-पिता कोण होते, याची माहिती नाही; मात्र कोळसा परिसरातून येणारे वाघ बलदंड व ताकदवान असतात आणि संपूर्ण ताडोब्यातील विविध क्षेत्रांत वर्चस्व गाजवतात, या गृहितकाला धरूनच या नर वाघाने मोहर्ली व तेलिया तलावाच्या परिसरात बस्तान बसवले. हे करत असताना त्याने या ठिकाणी वर्चस्व असलेल्या ‘येडाअण्णा’ या नर वाघाला परास्त करून आपला एकछत्री अंमल सुरू केला.

यावेळी ‘वाघडोह’ने या परिसरात प्रमुख व देखण्या आणि बिनधास्त असलेल्या माधुरी नावाच्या वाघिणीशी घरोबा केला. त्यापूर्वी त्याने ‘माधुरी’ला येडाअण्णापासून झालेल्या तीन पिल्लांना मारल्याचेही सांगितले जाते. यानंतर ‘माधुरी’ व ‘वाघडोह’ यांची जोडी या परिसरात रमली. २०११ च्या सुमारास या जोडीला चार पिल्ले झाली. या चारही माद्या होत्या.

त्यांची नावे सोनम, लारा, गीता व मोना अशी ठेवण्यात आली होती. या वेळी ही चारही पिल्ले आणि माधुरी तसेच वाघडोह अनेक वेळा एकत्र बघितले जात होते. माधुरीची ही दुसरी वेत होती. पर्यटकांना एकाच वेळी सहा वाघ एकत्र दिसत होते. आणि या वेळी वाघडोहचा पिल्लांकडे बघण्याचा, त्यांना सांभाळण्याचा व तो कशा पद्धतीने पिल्लांची काळजी घेतो, हे डोळे भरून बघता येत होते.

या कुटुंबावर आणि खास करून या चारही माद्यांवर ‘तेलिया सिस्टर’ नावाची एक सुरेख फिल्म त्या वेळेस तयार केली गेली. या फिल्ममध्ये या प्रत्येक वाघांच्या सवयी, त्यांची लकब याचे चित्रीकरण बघायला मिळते.

या सुमारास मी या सहा जणांच्या कुटुंबांना बघण्याचे कसे टाळले याचाही एक अनोखा किस्सा येथे आवर्जून सांगावसा वाटतो. बीएनएचएसचे तत्कालीन संचालक असद रहमानी त्यावेळेस ताडोबा परिसरात सुरू असलेले काम बघण्यासाठी आले होते. आम्ही दुसऱ्या दिवशी कोलारा येथे मुक्कामाला होतो. मी दोन सफारी राखून ठेवल्या होत्या. आमची सायंकाळची सफारी सुरू झाली.

एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा असल्याने उन्हाचा पारा चांगलाच चढलेला होता. रहमानी सर पक्षीतज्ज्ञ असल्याने साहजिकच माझा ओढा जास्तीत जास्त पक्षी कसे दिसतील, याकडे होता. सरांना वाघाबद्दल तेवढे प्रेम नाही, याचीही मला पुरेपूर कल्पना होती. आम्ही आमची जिप्सी वसंत बंधाऱ्यातील नाल्याच्या काठी सावलीत उभी करून दाट सावलीत दिसणारे पक्षी बघत थांबलो होतो. पाऊण तासांमध्ये आम्ही २६ पक्ष्यांच्या प्रजाती तेथे बघितल्या.

यानंतर मी जिप्सी काटेझरीकडे वळवली. गाईड व जिप्सीचालक ‘आपण मोहर्लीकडे जाऊ’ असे मला सांगत होते; पण मी त्यांना आपल्याला वाघ बघायचा नाही, पक्षी जास्तीत जास्त बघायचा प्रयत्न करू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यटकांची गर्दी व गोंधळ टाळून आपण सफारी करू, असे स्पष्ट बजावले होते. मला मोहर्ली परिसरात वाघाचे हे सर्व कुटुंब दिसत असल्याने, तिकडे जाण्याचे टाळून आंबटहिरा व काटेझरी पाणवठ्याकडे गाडी वळवण्यास सांगितले.

या ठिकाणीही आमचे मनसोक्त पक्षीनिरीक्षण झाले. सर खुश होते. आमची एकटीच गाडी या परिसरात फिरत होती. काटेझरी येथून बाहेर पडत असतानाच, डाव्या बाजूला दाट झाडीत वाघ बसलेले दिसले. अप्रौढ असलेले चार वाघ जांभळीच्या दाट व ओलसर जागी निवांत झोपलेले होते. आम्ही अवघे पाच मिनिटे तेथे थांबून गाडी पुढे घेतली. मग जामुनझोरा, काळाआंबा व आंबेपाट करत आमची जिप्सी पांढरपौनीच्या बोडी नंबर दोनजवळ आली.

या ठिकाणी दूरवर तीन वाघ पाण्यात तर एक वरच्या बाजूला बांधावरती सावलीत बसलेला दिसला. येथेही वाघांची चार अप्रौढ पिल्ले आहेत, हे मला माहीत होते. आम्ही टाळूनही आम्हाला या वाघांना बघावे लागत होते. संध्याकाळची वेळ झाली होती. आम्ही परतीच्या वाटेला निघत असताना अनेक गाड्या आम्हाला समोरून येताना दिसत होत्या. सहा वाघ मोहर्लीच्या मुख्य रस्त्याच्या जवळ असणाऱ्या टाका नंबर दोनवर बसले असल्याचे पर्यटक तसेच गाईड हातवारे करून सांगत होते.

वाघडोह, माधुरी व चार पिल्ले असणारे हे कुटुंब त्या सायंकाळी या पाण्याच्या टाक्यावर मुक्कामाला होते. पर्यटकांची एवढी गर्दी झाली होती की व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी रस्त्यावर उभे राहून गाड्यांचे नियोजन व सुव्यवस्था बघत होते. आम्ही माहीत असूनही ते टाळण्याचा प्रयत्न करूनही आमच्या नशिबी आठ वाघ आले होते. माझे एका सफारीमध्ये १४ वाघ बघण्याचे भाग्य त्या दिवशी राहून गेले.

यानंतर मी वाघडोहला तेलीया तलावाच्या परिसरासह खातोडा व इतर ठिकाणी कॅमेऱ्याने टिपले. प्रत्येक वेळी या दणकट वाघाची सवय, त्याचे चालणे, त्याचा दरारा अनुभवत होतो आणि त्याच्या प्रेमात अधिकाधिक पडत गेलो. २०१४-१५च्या सुमारास या परिसरात आलेल्या बजरंग वाघाने त्याला धक्का दिला. आपली मोक्याची जागा सोडून हा नर वाघ व त्याची प्रिय सखी माधुरी वाघीण ही जागा सोडून मोहर्लीतील बफर क्षेत्रात गेले.

माधुरीला तिच्या एका पिल्लाकडून म्हणजेच सोनम वाघिणीकडून धक्का मिळाला होता. यावेळी वाघडोहने आगरझरी व देवाडा परिसरात असणाऱ्या शर्मिली व इतर वाघिणींशीही घरोबा केला. २०१९ च्या सुमारास उतारवयाकडे झुकू लागलेल्या वाघडोहला या परिसरात आलेल्या खली नावाच्या नर वाघाने ललकारले. मग वाघडोहला बफर क्षेत्रातील मामला परिसरामध्ये आपले बस्तान हलवावे लागले.

वाघांच्या साम्राज्यात एकेकाळी प्रचंड सत्ता उपभोगलेल्या वाघडोहला उतारवयात हे सारे धक्के पचवावे लागले. २०२२ च्या सुरुवातीला हा वाघ लोहाराजवळील चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्ग ओलांडून जात असल्याचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले. चंद्रपुरातील एका छायाचित्रकाराने हे चित्र टिपले होते. म्हणजेच हा वाघ नंतर प्रादेशिकच्या मामला, लोहारा व जुनोना जंगलातही फिरू लागल्याचे लक्षात आले.

प्रत्येक वाघाबाबत असेच काहीसे बघायला मिळते. प्रादेशिकच्या जंगलात वाघांची मॉनिटरिंग सहसा होत नसल्याने तसेच तेथे नियमित पर्यटक फिरत नसल्याने प्रसिद्धीच्या शिखरावरील हे वाघ नंतर अक्षरशः अज्ञातवासातच जातात. वाघडोहबाबतही असेच घडले.

चंद्रपूर वन विभागातील सिन्हाळा परिसरात एक जखमी वाघ फिरत असल्याची बातमी आली. साधारणतः दहा-पंधरा दिवस वन कर्मचारी या वृद्ध वाघाला बघत होते व लक्ष ठेवून होते. २१ मे २०२२ ला या वाघाचा मृत्यू झाला. या वेळी हा वाघ ताडोबातील सुप्रसिद्ध वाघडोह असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी या वाघाचे वय साधारणतः १७ ते १८ वर्षांचे होते. वृद्धत्वामुळे त्याचा मृत्यू झाला होता. ज्या वेळेस ताडोबाचा इतिहास लिहिला जाईल, त्या वेळेस निश्चितच या वाघावरती मजकूर असेल, या दुमत नाही.

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

sanjay.karkare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com