अरे ओ गब्बर!

शोले चित्रपटात अमजद खान यांनी ‘गब्बर’ ही खलनायकाची व्यक्तिरेखा अजरामर केली. आजच्या गोष्टीतील वाघाचे नावही ‘गब्बर’च आहे; पण हा वाघ खलनायक नाही.
Gabbar Tiger
Gabbar TigerSakal

- संजय करकरे

शोले चित्रपटात अमजद खान यांनी ‘गब्बर’ ही खलनायकाची व्यक्तिरेखा अजरामर केली. आजच्या गोष्टीतील वाघाचे नावही ‘गब्बर’च आहे; पण हा वाघ खलनायक नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात २०११ ते २०१७ पर्यंत ‘गब्बर’ या नर वाघाने आपली हद्द, आपले वर्चस्व पणाला लावले; पण त्याच्या इलाख्यात दुसऱ्या एका वाघाने हक्क प्रस्थापित केला.

गब्बरने माघार घेत खुटवंडा, आष्टा या बफरच्या परिसराकडे आपले लक्ष वळवले. २०१८ नंतर मात्र हा आगळ्यावेगळ्या चेहऱ्याचा गब्बर कुठे गायब झाला, हे अद्यापही कळलेले नाही.

ताडोबाच्या जंगलात गब्बर नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाचे आणखीन एक नाव त्या वेळी प्रचलित झाले होते, ते म्हणजे ‘लेपर्ड फेस’ टायगर. आता तुम्ही म्हणाल, वाघाचा चेहरा बिबट्यासारखा कसा असू शकतो? पण आपण जर या वाघाचा चेहरा नीट बघितला, तर हे लक्षात येईल की इतर सर्व नर वाघांपेक्षा या वाघाचा चेहरा नाजूक आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर असणारी काळी नक्षी जवळजवळ होती.

हे नाव त्याला कोलारा परिसरातील एका रिसॉर्टमधील नॅचरलिस्टने दिले होते. या गब्बरची एन्ट्री २०११ च्या सुमारास ताडोबातील पांढरपौनी या परिसरात झाली. हा वाघ मूळ कुठून आला याबद्दल मतमतांतरे आहेत. काही जणांच्या म्हणण्यानुसार काटेझरी परिसरातील वाघिणीचा तो बछडा आहे, तर काही जण हा वाघ कोलारा परिसरात असणाऱ्या एका वाघिणीचे पिल्लू होते.

या वाघाने एंट्री केल्यावर ताडोबाच्या जंगलातील महत्त्वाचा भाग ताब्यात घेतला. जंगलातील ताडोबा तलाव, वसंत बंधारा, पांढरपौनी, कोसेकनाल रस्ता व जामनी तलाव परिसरात तो बिनधास्तपणे फिरू लागला. त्या वेळी या परिसरात माया आणि छोटी तारा या दोन वाघिणींचा वावर होता.

साहजिकच या दोन वाघिणीही ‘गब्बर’च्या ताब्यात आल्या. ताडोबातील या सर्व परिसरात पर्यटक फिरत असल्याने या परिसरात दिसणाऱ्या सर्व वाघांची ओळख पर्यटकांना नेहमी होत असते. परिणामी या ठिकाणी दिसणारे सर्व वाघ हे छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध होतात.

गब्बर हे नाव कुठून आले, याचाही एक किस्सा आहे. त्या वेळेस ताडोबातील मोहर्ली परिसरात एक डॉक्युमेंटरी बनवली जात होती. फिल्म बनवणाऱ्या टीमकडून या वाघाचे शूटिंग झाले. या टीमकडून त्याला ‘गब्बर’ असे भारदस्त नाव दिले गेले, असे म्हटले जाते. हा नर वाघ जरी लहान चेहऱ्याचा असला, तरी त्याची शरीरयष्टी जबरदस्त होती. त्याचे समोरचे दोन्ही पाय चांगलेच जाड व ताकदवान होते.

या वाघाबद्दल माझ्या तीन आठवणी २०१४ मधील आहेत. मी व मुंबईतील माझे गुरुवर्य सतीश प्रधान जंगलात फिरत होतो. पांढरपौनीच्या परिसरात आतल्या बाजूला कुठेतरी चितळांचे सतत अलार्म कॉल सुरू होते. चितळांना वाघ अथवा बिबट्या दिसल्यावर ते धोक्याची सूचना देणारे हे अलार्म कॉल करतात.

बराच वेळ काहीच हालचाल न झाल्याने पर्यटक निघून गेले. अचानक चितळांची धावपळ उडाली आणि झाडीतून एक वाघ बोराच्या झाडाखालून चालत येत असल्याचे लक्षात आले. आमच्या जिप्सीचालकाने गाडी योग्य जागी उभी केली. हा वाघ चालत येत असताना मध्येच थांबून एका लहानशा खड्ड्यातील पाणी पिऊ लागला.

अर्ध्या मिनिटातच त्याने पाणी पिणे बंद केले आणि पुन्हा समोर चालू लागला. त्याच्या आकारावरूनच सर्वांनी त्याला ओळखले की तो ‘गब्बर’ आहे. आमच्यापासून सुमारे शंभर फुटावरून थेट आमच्याकडे बघत त्याने रस्ता पार केला. या वेळी त्याचा लहान चेहरा, त्यावरील नक्षी आणि त्याचे पिळदार शरीर नजरेत भरणारे होते. गब्बर या नावाला साजेसे!

या काळात माया वाघिणीला तीन पिल्लं झाली, ती या गब्बरची होती. २०१४ च्या ऑक्टोबरमध्ये वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने गब्बरला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यात कॉलर लावली. पूर्व विदर्भातील वाघांचा अभ्यास करण्यासाठी या इन्स्टिट्यूटने मोठा प्रकल्प सुरू केला आहे. वाघ कुठे स्थलांतर करतात, त्यांची हद्द कुठवर असते, यासह इतर बाबींचा या अभ्यासात समावेश असतो.

वाघ पकडून, त्याला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यात कॉलर लावण्याचा पहिला मान ‘गब्बर’ला मिळाला. यानंतर छोट्या तारालाही कॉलर लावण्यात आली. ताडोबाच्या बाहेर कॉलर लावण्याचा मान त्यानंतर ‘जय’ वाघाला मिळाला. यानंतर गब्बर आपली हद्द आणखीन वाढवू लागला. तो मोहर्लीच्या दिशेने सरकू लागला.

२०१४ च्याच डिसेंबरमध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास वसंत बंधाऱ्यात मी या गब्बरला बघितले. त्या वेळी त्याच्या गळ्यात कॉलर होती. या अरुंद रस्त्यावर हा वाघ आम्ही खूपच जवळून बघितला. सुरुवातीला रस्त्याच्या डाव्या बाजूला, नाल्याच्या वरच्या बाजूने तो चालत होता. आम्ही आमची जिप्सी मागे घेऊन, नाल्याच्या वरच्या बाजूला थांबवली.

गब्बर सरळ आमच्या दिशेने चालत, नाला पार करून रस्त्यावर आला आणि गाडीच्या तीस फुटापर्यंत येऊन गवतात शिरला. यावेळीही या भारदस्त वाघाला न्याहाळता आले. या नंतर तिसऱ्यांदा तो ताडोबा तलावात बसलेला पाहिला; पण तो दूर होता. २०१६ मध्ये त्याची कॉलर काढण्यात आली.

गब्बर जिथे वावरत होता ते ताडोबातील क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. येथील वाघिणींवर, तिथे असणाऱ्या विपुल खाद्यावर व पाण्यावर हक्क मिळवण्यासाठी सातत्याने बाहेरून येणारे नर वाघ या परिसरावर हक्क मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तिथे सत्तासंघर्ष बघायला मिळतो.

कोलारा परिसरातून आलेला ‘नामदेव’ हा नर वाघ आणि त्याच्याच तोडीचा असणारा ‘टायसन’ हा दुसरा वाघ, गब्बरच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. दोन वेळा गब्बरची व त्यांची लढाईही झाली. कोसेकनाल रस्त्यावर एका सकाळी गब्बर आणि नामदेवची जोरदार लढाई झाली. या लढाईत गब्बरच्या चेहऱ्यावर नखांचा जोरदार प्रहार झाला.

त्या वेळी कोलारा येथील काही पर्यटकांनी गब्बरचा रक्ताने माखलेला चेहरा बघितला होता. यानंतरच्या काळात हा लढवय्या वाघ आपल्या चेहऱ्यावर या जखमांची खूण घेऊन वावरत होता. अनेक पर्यटकांच्या हे लक्षातही असेल.

२०१७ च्या सुमारास या परिसरात मटकासूर या वाघाने हक्क प्रस्थापित केला. गब्बरने माघार घेत खुटवंडा, आष्टा या बफरच्या परिसराकडे आपले लक्ष वळवले. ताडोबातील अत्यंत समृद्ध असे हे क्षेत्र सोडून या देखण्या वाघाला माघार घ्यावी लागली.

कोअरचे क्षेत्र सोडून तो मोहर्लीच्या बफर क्षेत्रामध्ये काही काळ वास्तव्यास होता. २०१८ नंतर हा वाघ पर्यटकांच्या नजरेस पडला नाही. सत्तासंघर्षात प्रत्येक वेळी हेच बघायला मिळते. ‘जो जीता वही सिकंदर’ ही म्हण या सत्तासंघर्षात चपलख ठरते.

आता ताडोबाच्या या महत्त्वपूर्ण क्षेत्रावर ‘मटकासूर’ या वाघाचे नवे राज्य सुरू झाले होते.

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

sanjay.karkare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com