

पंढरपूर रस्त्यावर दहिवडीपासून २० किलोमीटर पूर्वेस पळशी गाव आहे. या रस्त्यापासून पळशी गावात जाण्यासाठी दोन किलोमीटर जावे लागते.
सातारा - पंढरपूर रस्त्यावर दहिवडीपासून २० किलोमीटर पूर्वेस पळशी गाव आहे. या रस्त्यापासून पळशी गावात जाण्यासाठी दोन किलोमीटर जावे लागते. पळशी हे माण तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येचे मोठे गाव. गावात पाण्याचा दुष्काळ असला, तरी गुणवत्तेच्या बाबतीत पुढारलेले आहे. पूर्वी शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अधिकारी होण्याची परंपरा निर्माण झाली आहे. दर वर्षी लोकसेवा व राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या गावातील कोणाची निवड झाली, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागून असते. गावात फिरताना लक्षात आले, की प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठी असल्याने घराघरांत शैक्षणिक वातावरण आहे. गावातला साक्षरतेचा दरही इतर गावांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे इथं घरटी एक अधिकारी, कर्मचारी आहे. गावात जन्म घेतला, की मुलगा असो वा मुलगी पुढे जाऊन अधिकारी होणार हे नक्कीच, असं ग्रामस्थ मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. त्याच कारणही आहे.
इथं लहानपणापासूनच मुलांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा दिली जाते. प्राथमिक व माध्यमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षेचे स्वप्न विद्यार्थ्यांना दाखवले जाते. त्याप्रमाणे शिक्षकही तळमळीने प्रश्नमंजूषासारखे उपक्रम राबवितात. हे उपक्रम राबवून शिक्षक थांबत नाहीत, तर जिल्हा व तालुका पातळीवरील प्रश्नमंजूषा स्पर्धेची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतात. त्यामुळे गावातील विद्यार्थी या स्पर्धांमधून चमकत आहेत. त्यामुळे पुढे महाविद्यालयात असतानाही या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागते.
कोणत्याही शाखेतील पदवी मिळाली, की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतात. तसे वातावरणच गावात तयार झाले आहे. सध्याही पुणे व दिल्ली येथे गावातील सुमारे शंभरवर विद्यार्थी अभ्यास करत आहेत. या परीक्षेत यश मिळवलेले काही जण आणखी पुढचे यश मिळवण्याची जिद्द ठेऊन प्रयत्न करताना दिसत आहेत. या सगळ्यांची सुरुवात झाली गावातील पहिले फौजदार म्हणून बाळकृष्ण कुलकर्णी यांची निवड अधिकारी म्हणून झाली होती. त्यांचे बंधू विठ्ठल कुलकर्णी शिक्षक होते. त्यांच्यानंतर या गावातून अधिकारी निवडले जाण्याचा सपाटाच लागला. एका कुटुंबातील सर्वच मुले अधिकारी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. एक अधिकारी झाला, की त्याचे भाऊ व बहीणही अधिकारी झाले. केवळ अधिकारीच नाही तर इतर क्षेत्रांतही या गावातील तरुण मागे नाहीत. अगदी शेळीपालनापासून छोट्या- मोठ्या उद्योगापर्यंत सर्वच क्षेत्रात काम करत आहेत.
गावाच्या वेशीवरच पाडेगाव आश्रमशाळेत बारावीत शिकत असलेला किरण विठ्ठल माळवे हा भेटला. त्याला बोलते केल्यावर तो म्हणाला, ‘‘आमची आठ एकर शेती आहे. मात्र, सततच्या दुष्काळामुळे पाणी कमी असते. घरात दोन- तीन जनावरेही आहेत. आई- वडील रोजगारावर जाऊन मला व भावाला शिक्षणासाठी पैसे पाठवतात. भाऊ सिंधुदुर्गला कृषी पदवी करत आहे. तो आतापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारीही करत आहे. मीही बीएस्सी नर्सिंग करून स्पर्धा परीक्षा देणार आहे. मिळेल ती नोकरी पटकवणार असून, नंतर पुढे पुन्हा परीक्षा देणार असल्याचे मोठ्या आत्मविश्वासाने त्याने सांगितले. त्याला या वयात आलेली समज गावातील भावी पिढी कसा विचार करत आहे, याची चुणूकच दिसली.
गावात लोकल बोर्डाची चौथीपर्यंत शाळा १८९८ मध्ये सुरू झाली. त्यानंतर मुला व मुलींची वेगळी प्राथमिक शाळा सुरू झाल्या. चौथीनंतर गोंदवल्यात सातवीपर्यंत शाळा होती. त्यासाठी चालत जावे लागायचे, अशी आठवण ८४ वर्षांचे निवृत्त शिक्षक शिवदास मारुती खाडे सांगतात. आयुक्त, पोलिस अधीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, अभियांत्रिकी क्षेत्रातील अधिकारी, पोलिस, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक आदी क्षेत्रांत गावातील काही जण काम करताना दिसतात. भारतीय प्रशासकीय सेवेत नितीन खाडे अधिकारी झाले असून, सध्या ते आसाम राज्यात निवडणूक आयुक्त आहेत. ज्ञानेश्वर खाडे पश्चिम बंगालमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये पोलिस अधीक्षक आहेत. डॉ. राहुल खाडे औरंगाबादला लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक आहेत. श्रीकांत रंगनाथ खाडे व पूनम खाडे विक्रीकर आयुक्त म्हणून मुंबईला काम पाहतात.
मोनिका सचिन खाडे या बीडमध्ये वर्ग एक अभियंता आहेत. नूतन बाळासाहेब खाडे ठाणे महापालिकेच्या उपायुक्त आहेत. अंतम खाडे, किशोर खाडे, सागर खाडे, अमोल खाडे, किरण लिटे, सुहास खाडे, प्रकाश हांगे पोलिस उपनिरीक्षक आहेत. विजया वंजारी सहायक पोलिस निरीक्षक आहेत. याशिवाय कांता कुलकर्णी, ज्ञानदेव नागरगोजे यांच्यासह चार उपनिरीक्षक निवृत्त झाले आहेत. शैलजा दराडे-खाडे या पुण्यात शिक्षण विभागाच्या उपसंचालक आहेत.
सचिन खाडे, विकास गंबरे, शारदा खाडे-गंबरे तहसीलदार आहेत. विजय सावंत, नितीन खाडे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. डॉ. भगवान गोविंद खाडे लोणावळा पालिकेचे मुख्याधिकारी आहेत. चिराग शशिकांत डोईफोडे वैमानिक झाले आहेत. राहुल शिवदास गंबरे रेल्वेत उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
वर्षा छगन खाडे पनवेल (मुंबई) येथे सेल्स टॅक्स अधिकारी आहेत. सुनीता खाडे-खेडकर पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत, तर वर्षा अर्जुन खाडे औंध (पुणे) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक आहेत. धर्मा शंकर गंबरे जिल्हा हिवताप अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. अश्विनी खाडे उरण (रायगड) येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. डॉ. बजरंग खाडे कोल्हापूरच्या कळंबा कारागृहाचे निरीक्षक आहेत. तेजस गंबरे रत्नागिरीत उपशिक्षणाधिकारी आहेत. हेमंतकुमार खाडे सातारा जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात अधिकारी आहेत. अशोक दत्तात्रय खाडे आटपाडीत वनपरिक्षेत्रपाल अधिकारी आहेत. अर्जुन पोपट गंबरे साताऱ्यात वनअधिकारी आहेत. गजानन अशोक खाडे मंडलाधिकारी (गगनबावडा) आहेत. स्वाती ज्ञानेश्वर खाडे या गोंदिया येथे वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. रामबुवा सानप विट्यात वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. हणमंत सुरेश दौंड गावातील पहिले आरटीओ असून, सध्या ठाण्यात कार्यरत आहेत. अशोक महामुनी रोहा पंचायत समितीत कृषी अधिकारी होते. रमेश गंबरे शिक्षणविस्तार अधिकारी दहिवडीत आहेत. संतोष शामराव सावंत पुण्यात अन्न व औषध विभागात निरीक्षक आहेत. स्मृती सुनील गंबरे कोल्हापूर येथे न्यायालयीन व्यवस्थापक आहेत. गावातील पहिले प्राध्यापक काका धर्मा खाडे आहेत. याशिवाय अशोक श्रीरंग लांडगे, प्रकाश रंगनाथ खाडे, प्राचार्य बबन शिवदास खाडे, आनंदा तुकाराम खाडे उच्च महाविद्यालयात आहेत. याशिवाय धनंजय गंबरे, मधुकर करडे, धनाजी खाडे, गुलाबराव खाडे, उत्तम खाडे हे निवृत्त प्राध्यापक आहेत. गावात सुमारे शंभरावर आजी, माजी प्राथमिक शिक्षक असून, माध्यमिक शिक्षक ४० आहेत. त्यामुळेच शिक्षकांचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली होती. ती आता अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख झाली आहे. एतकेच नाही तर गावातील भीमराव मल्हारी खाडे हे पुण्यातील एकलव्य शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
गावातील नव्या पिढीतील शंभरावर तरुण दिल्ली व पुण्यात केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत आहेत. याशिवाय बॅंका, रेल्वे आदी विविध स्पर्धा परीक्षांतही काही जणांचा अभ्यास सुरू आहे. हनुमान विद्यालयात ७२९ विद्यार्थी असून, आठ प्राथमिक शाळेत ७२९ विद्यार्थी आहेत.
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल दत्तात्रय खाडे यांनी सांगितले, की आम्ही मुलांची निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी लहान वयातून करतो. विद्यार्थी घडावेत, यासाठी आम्ही प्रश्नमंजूषा वर्ग स्तरावर रोज घेतो. प्रश्नमंजूषा स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर बक्षिसे मिळवली आहेत. सुरेखा वंजारी, संगीता गंबरे, संगीता खाडे, अंजली खाडे अशा उपक्रमशील शिक्षिकाही स्वयंप्रेरणेने विविध उपक्रम राबवतात, हे त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आले.
वेशीवरच्या गावांनाही स्पर्धा परीक्षेचे वेड
पळशीची प्रेरणा शेजारच्या जाशी गावातही दिसत आहे. गावाच्या शिवेशेजारील जाशी गाव आहे. आजही जाशी पळशी असे म्हटले जाते. जाशीतील औदुंबर शामराव खाडे- पाटील हे पहिले तहसीलदार झाले. सध्या ते समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे यांचे ओएसडी आहेत. शरद खाडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे ओएसडी आहेत. मोनाली पाटील या आरटीओ झाल्या आहेत. उद्धव खाडे सहायक पोलिस निरीक्षक आहेत. हे सगळे पळशीच्या हनुमान विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. पळशीच्या शिवेवरील मणकर्णवाडी, पिंपरी, धामणी, वाकी, रांजणी, जाशी या गावांना हनुमान विद्यालयाचा फायदा झाला. या गावांतूनही स्पर्धा परीक्षेत वारे वाहू लागले आहे.
गुरुजनांचे कष्ट
पळशी गावाचे नाव राज्याच्या पटलावर कोरण्याचे काम गुणवंत शिक्षकांनी केले आहे. त्यांनी चांगल्या पिढ्या घडविण्याचे अनमोल काम केले आहे, असे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले. अचूक ध्येय गाठण्यासाठी शिक्षणाबरोबर जिद्द व चिकाटी असण गरजेचे आहे. गुरुजन वर्गांनी अगदी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी कष्ट घेतल्यामुळेच गावात अधिकारी निर्माण झाल्याचेही आवर्जून सांगितले.
अधिकाऱ्यांचं कुटुंब!
जिद्द व चिकाटी असेल अन् त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असेल, तर यश पायाशी लोळण घेते. परिस्थिती कशीही असो त्यावर मात करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पळशीतील सर्वसामान्य शेतकरी बाळासाहेब खाडे व त्यांची प्रशासकीय सेवेत यश मिळवणारी ज्ञानेश्वर, सचिन व नूतन ही मुले. दुष्काळाशी सामना करणाऱ्या माणमधील अधिकाऱ्यांचे गाव म्हणून पळशीची ओळख आहे. याच गावातील बाळासाहेब खाडे या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर आपल्या तिन्ही मुलांना प्रशासकीय अधिकारी बनवले आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या बाळासाहेबांनी मुलांनी अधिकारी बनावे, म्हणून पहिल्यापासूनच प्रयत्न केले. कृषी व अभियांत्रिकी पदव्या घेतल्यानंतर मुलांना स्पर्धा परीक्षांकडे वळवलं. त्याचाच परिणाम म्हणून त्यांचा मोठा मुलगा ज्ञानेश्वर हा केंद्रीय पोलिस अधीक्षक, दुसरा मुलगा सचिन खाडे हा तहसीलदार, तर मुलगी नूतन खाडे ही मुख्याधिकारी झाली आहे. त्यांची स्नुषा स्वाती ही रेंज फॉरेस्ट ऑफिसरपदी नियुक्त झाली आहे. स्नुषा मोनिका अधीक्षक अभियंता आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचे कुटुंब आता अधिकाऱ्यांचे कुटुंब बनले आहे. घराणे अधिकाऱ्यांचे म्हणून ओळखले जातेय, याचे आजोबा रंगनाथ खाडे यांनाही कौतुक वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.