एकदा सांगितलंय ना; कळत कसं नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child and Parents

आपण मुलांना समजावून सांगण्याचे सर्व प्रयत्न सोडून देतो, तेव्हा नकळत ‘एकदा सांगितलं ना? तुला कळत कसं नाही?’ हे वाक्य उच्चारलं जातं. हे खूप कॉमन असलं तरी ते तितकंच डेंजरस आहे.

एकदा सांगितलंय ना; कळत कसं नाही?

आपण मुलांना समजावून सांगण्याचे सर्व प्रयत्न सोडून देतो, तेव्हा नकळत ‘एकदा सांगितलं ना? तुला कळत कसं नाही?’ हे वाक्य उच्चारलं जातं. हे खूप कॉमन असलं तरी ते तितकंच डेंजरस आहे. या वाक्यानंतर मुलांशी होणाऱ्या संवादाचे सर्व दरवाजे बंद होतात. हे वाक्य म्हणजे पालकांची सहनशक्ती संपुष्टात आल्याचं एक निदर्शक आहे.

गोष्ट तशी किरकोळ वाटणारी आहे. मी एका परिचिताच्या घरी गेलो होतो. बाबा माझ्याशी बोलत होते. मुलगा मध्येमध्ये येऊन त्यांना सारखे काही तरी प्रश्न विचारत होता, त्यांच्याशी काही तरी बोलू पाहत होता. बाबा त्याला सांगत होते, की आता काका आले आहेत. तू आतमध्ये जा... तुझं काम कर किंवा अभ्यास कर... आम्हाला बोलू दे. थोडा वेळ आम्ही बोललो की तो मुलगा पुन्हा येई आणि त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडे. काही केल्या तो ऐकत नव्हता. तो पुन:पुन्हा वेगवेगळे प्रश्न किंवा तेच ते प्रश्न विचारत होता. बाबा जे थातूरमातूर किंवा वेळ मारून नेणारं सांगत होते. त्यानं त्याचं समाधान होत नव्हतं बहुतेक. त्यामुळे तो ऐकायला जाम तयार नव्हता. शेवटी बाबा वैतागून म्हणाले ‘‘एकदा सांगितलं ना? तुला कळत कसं नाही?’’

प्रत्येक घरामधल्या विसंवादाच्या सुरुवातीला पहिलं वाक्य उच्चारलं जातं ते म्हणजे, ‘‘तुला एकदा सांगितलं ना! कळत कसं नाही?’’

खूप ओरडा खाल्ल्यानंतर तो मुलगा बाहेर खेळायला गेला. मी निघेपर्यंत तो काही आला नाही... परिचित माझे घनिष्ट होते. माझं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत होते. मी त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही टीका समजा किंवा टिप्पणी समजा, पण मला तुमच्याशी आता घडलेल्या प्रसंगाबद्दल थोडंसं बोलायचं आहे...’’

त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. ‘‘कशाबद्दल?’’ त्यांनी विचारलं. मी म्हटलं, ‘‘आताच तुम्ही तुमच्या मुलाशी जे वर्तन केलं ते योग्य नव्हतं!’’ ते हसत हसत म्हणाले, ‘‘मी घरी असलो की सारखा मला भंडावून सोडतो. कधी कधी वैताग येतो आणि त्या वैतागपोटी मी असं बोलतो.’’

मी म्हटलं, ‘‘तुम्ही यापुढे बोलताना... तुला कळत कसं नाही... तुला समजत कसं नाही... मी सांगतो ते ऐक... अशा प्रकारची वाक्यं टाळा. तो तुमच्याकडे सारखासारखा येत होता, कारण त्याला तुम्ही हवे होतात. तुमचा वेळ, तुमचं अटेन्शन, तुमचं प्रेम, तुमचा सहवास त्याला हवा होता. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळेही असेल, पण त्याला असं वाटत असू शकतं, की तुमच्यावर आज फक्त त्याचा अधिकार आहे. अशात मी तुमच्याकडे आलो... त्यामुळे तो मनातल्या मनात खट्टू झाला... म्हणून तो सारखा सारखा येऊन तुम्हाला काही ना काही विचारत होता. लक्षात घ्या, मुलांसाठी अटेन्शन खूप महत्त्वाचं असतं... त्याला तुमचं अटेन्शन हवं होतं... मी येणार याची तुम्ही त्याला पूर्वकल्पना दिली होती का?’’ मी बाबांना विचारलं.

ते मान झटकून तात्काळ म्हणाले, ‘‘छे! त्यात त्याला सांगण्यासारखं काय आहे?’’

मी म्हटलं, ‘‘नक्कीच आहे! कारण तुम्ही जेव्हा घरी असता, तेव्हा तुमच्या घरातल्या वेळेवर कुटुंबीयांचा हक्क असतोच! म्हणजे तुम्ही त्याचा वेळ माझ्यासाठी खर्च करत होता... त्यात त्याच्या दृष्टीने मी अचानक आलो... त्यानं मी येण्याची अपेक्षा केलेली नव्हती... त्याचेही काही प्लॅन्स असतील... त्यालाही तुमच्याबरोबर दिवसभर काही तरी करावंसं वाटत असेल; पण मी अचानक दरवाजात आलेला पाहून तो खट्टू झाला आणि त्यांना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे येऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे प्रश्न नव्हते. हा त्याच्या बाजूने, त्याच्या दृष्टीने एक संवाद होता! माझ्याकडे पाहा. माझ्याकडे लक्ष द्या. मला वेळ द्या... असं मुलं स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. मुलांना भावना असतात, पण लहान वयात त्यांच्याकडे योग्य एक्सप्रेशन नसतं. शब्द नसतात. व्यक्त करण्याची योग्य पद्धत नसते. अशा वेळी आपण मुलांना समजून घ्यायचं असतं. तुला समजत कसं नाही हे वाक्य, खरं तर आपल्याला समजत नाही याचं निदर्शक आहे...’’

मग मी त्यांना या वाक्यात दडलेले धोके सांगू लागलो...

आपण मुलांना समजावून सांगण्याचे सर्व प्रयत्न सोडून देतो, तेव्हा नकळत हे वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य खूप कॉमन असलं, तरी ते तितकंच डेंजरस आहे. या वाक्यानंतर मुलांबरोबर होणाऱ्या संवादाचे सर्व दरवाजे बंद होतात. हे वाक्य म्हणजे पालकांची सहनशक्ती संपुष्टात आल्याचं एक निदर्शक आहे. या वाक्यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत...

एक : मी एकदा सांगितलं ना? म्हणजे तुला ऐकायलाच पाहिजे!

दुसरं : मी सर्व ठरवलेलं आहे. तुला ते फक्त अमलात आणायचं आहे.

तिसरं : तुला कोणत्याही शंका, प्रश्न, उपप्रश्न विचारण्याची मुभा नाही.

चौथं : या घरात मी म्हणेन तेच फायनल असतं.

पाचवं : तुला कमी कळतं. त्यामुळे तुला लक्षात येत नाही...

सहावं : तू फार विचारू नकोस... मी सांगितलं तसं वाग म्हणजे झालं... तू स्वतःचा विचार करूच नकोस.

या आणि अशा अनेक छटा या वाक्यांमध्ये दडलेल्या आहेत...

माझं बोलणं ऐकून मुलाचे बाबा अंतर्मुख झाले. ते म्हणाले, ‘‘मी तुमचं बोलणं मनापासून ऐकलं आणि मला ते पटलं. मुलांच्या बाबतीत इतका हळुवार विचार करावा लागतो, हे माझ्या ध्यानीही नव्हतं! आम्हाला आमच्या पालकांनी वाढवताना कधीही हे पैलू लक्षात घेतले नसावेत, म्हणूनही असेल किंवा आजवर कुणी अशा दृष्टिकोनातून काही सांगितलं नाही म्हणूनही असेल... असो. पण यापुढे मी हे लक्षात ठेवेन.’’

मी त्यांना म्हटलं, ‘‘एकदा सांगितलं ना! तुला कळत कसं नाही?’’ हे वाक्य समजा तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा बॉस रोज बोलू लागला तर तुम्ही काय कराल?’’

त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं, ‘‘मी नोकरी सोडून देईन, नोकरीचा राजीनामा देईन!’’

मी त्यांना म्हटलं, ‘‘तुम्हाला आता जसा राग आला आहे, तसाच त्यालाही या वाक्यामुळे राग येतो. त्याची घुसमट होते. त्याला त्याचा पाणउतारा झाल्यासारखं वाटतं. मनात अपमानाची बोच असते... शिवाय त्याचा आत्मविश्वासही खच्ची होतो... पण तुमचा मुलगा राजीनामा देऊ शकत नाही! लक्षात घ्या, या वाक्यात नक्कीच सन्मान, कौतुक, प्रेम, आदर, स्नेह या भावना दडलेल्या नाहीत... या वाक्यात जे काही आहे ते निगेटिव्हच आहे आणि या निगेटिव्ह वाक्याचे पॉझिटिव्ह परिणाम कधीच होऊ शकत नाहीत! गंमत अशी आहे, की मुलांकडून आपल्याला पॉझिटिव्ह वर्तणूक अपेक्षित असते आणि आपली वाक्यं... आपले संदेश हे मात्र निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह गोष्ट देऊन पॉझिटिव्ह गोष्ट पदरात पडण्यासाठी चमत्कारच घडावा लागतो! तो मुलांच्या बाबतीत घडणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही जेवढे निगेटिव्ह होता त्यापेक्षा मुलं जास्त निगेटिव्हली प्रतिसाद देतात. म्हणूनसुद्धा हे वाक्य आपण संवादातून बाहेर फेकून दिलं पाहिजे.’’

बाबांना माझं म्हणणं मनोमन पटलं. त्यांनी माझे आभार मानले... मी निघालो तेव्हा बाबा उठून उभे राहिले. त्यांनी पायात चपला सरकवल्या, गाडीची चावी घेतली आणि माझ्याबरोबर ते बाहेर पडले. मी त्यांना विचारलं, ‘‘कुठे निघालात?’’

ते म्हणाले, ‘‘काही नाही! थोडा वेळ मुलासाठी देतो... त्याला बाहेर फिरवून आणतो...’’

मी मनापासून हसलो!