मुलं मोठी झाल्यानंतरची पोकळी...

अनेक गृहिणी, ज्या क्षमता असूनही नोकरी करत नाहीत किंवा ज्यांनी मुलांसाठी नोकरी सोडली आहे, त्यांच्या मनात हेच विचार येत असतात.
मुलं मोठी झाल्यानंतरची पोकळी...
Summary

अनेक गृहिणी, ज्या क्षमता असूनही नोकरी करत नाहीत किंवा ज्यांनी मुलांसाठी नोकरी सोडली आहे, त्यांच्या मनात हेच विचार येत असतात.

अनेक गृहिणी, ज्या क्षमता असूनही नोकरी करत नाहीत किंवा ज्यांनी मुलांसाठी नोकरी सोडली आहे, त्यांच्या मनात हेच विचार येत असतात. मुलं मोठी होईपर्यंत आपण गृहिणी-पालक खूप बिझी असतात. मुलं हीच आपला प्राधान्यक्रम होऊन जातात. मुलांचं विश्व हे आपलं विश्व होतं. त्यामुळे मुलं मोठी झाल्यानंतर अनेकींना आयुष्यात कमालीची पोकळी जाणवते.

रेश्माताईंशी (नाव बदलले आहे) बोलणे झाल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. सहसा पालक मुलांच्या समस्या सांगायला फोन करतात आणि (कधीकधी) मुलांच्या समस्या मुळात निर्माण होण्यात आणि सोडवण्यात पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे सांगण्यात माझा बराच वेळ खर्च होतो. मुलांची वर्तणूक हा परिणाम असतो आणि त्या परिणामाचे कारण हे पालकांमध्ये, मुलांच्या संगतीमध्ये, मुलांच्या मूळ स्वभावात, पालक आणि मूल यांच्या संबंधांमध्ये अनेकदा दडलेलं असतं. खूपदा याव्यतिरिक्तही कारणं असू शकतात.

रेश्माताईंनी सुरुवात करतानाच मला सांगून टाकलं, ‘‘माझ्या मुलीची समस्या नाहीये... सृष्टी खूप हुशार आहे आणि तिचं छान चाललं आहे... ती आता अकरावीला गेली आहे. तिला पंख फुटले आहेत... माझे पती हे कामानिमित्त सतत फिरतीवर असतात आणि यामुळे आता मला स्वतःला खूप रिकामपण आलं आहे... माझी खूप चिडचिड होते. सृष्टी मला समजून घेण्याचा प्रयत्न करते; पण माझा तिच्यावर आणि तिच्या बाबांवर राग निघतोच...’’

‘‘म्हणजे तुम्हाला समस्या माहिती आहे आणि समस्येचं कारणही माहिती आहे... मग अडचण काय आहे?’’ मी रेश्माताईंना विचारलं.

‘‘कधी कधी असं वाटतं, की मी माझ्याकडे खूप दुर्लक्ष केलं आहे... मी डबल ग्रॅज्युएट आहे. माझं करियर खूप चांगलं चाललं होतं... मी चांगल्या पगाराची नोकरी करत होते... नोकरीत माझी प्रगती सुरू होती... त्याचदरम्यान सृष्टीचा जन्म झाला, मग सृष्टीसाठी मी आधी रजा घेतली. सृष्टी मोठी झाल्यानंतर मी पुन्हा नवीन नोकरी शोधली आणि ती करू लागले... पण माझी खूप ओढाताण व्हायला लागली... अखेरीस सृष्टीला वाढवण्यासाठी मी नोकरी सोडावी, असं ठरलं आणि मी पूर्णवेळ सृष्टीला दिला... या काळात मी स्वतःकडे फारसं लक्ष देऊ शकले नाही... आज असं वाटतं, की मी आयुष्यात फारसं काही भरीव करूच शकले नाही. माझ्या आजूबाजूला अनेक जणी अशा आहेत, की त्यांची नोकरी, त्यांचं करियर हे सुंदर चाललं आहे आणि मुलंही चांगली घडली आहेत... मग आपण नोकरी सोडून चूक केली की काय, असं मला आजकाल वाटतं... मी कितीही म्हटलं तरी आज आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाही. माझा जगाबरोबरचा संबंध मर्यादित आहे... माझ्या क्षमता मला पूर्णपणे वापरता आल्या नाहीत, याचं कुठेतरी वैषम्यही आहे...’’

रेश्माताईंचा जडावलेला स्वर मला जाणवत होता. त्यांनी एक दीर्घ उसासा सोडला आणि त्या पुन्हा बोलू लागल्या...

‘मी माझा विचार करते, याचा कधीकधी गिल्टसुद्धा येतो; पण आता माझा पूर्वीचा रोल पूर्णपणे बदलला आहे. सृष्टीचा अभ्यास ती स्वतः करते. तिला तिचं स्वतःचं विश्व आहे. मित्र-मैत्रिणी आहेत. तिला तिची खूप मोठी-मोठी स्वप्न आहेत... तिला आणि यांना डबा भरून दिला की दोघेही घरातून निघतात. आठ-दहा तास कोणीच नसतं घरी. वीकेंडला त्यांचे त्यांचे प्लान ठरतात. माझा काहीच प्लान नसतो... माझ्यापाशी फक्त रिकामपण असतं. खरं म्हणजे मी मागच्या काळात काही छंद जोपासायला हवे होते, पण तेही राहून गेलं... कारण सृष्टीचा डान्स क्लास, तिचं कराटे, तिचं स्वीमिंग यातच माझा उरलासुरला वेळ भरपूर जायचा. कधी कधी असं वाटतं, की आपण मुलांचा नको इतका विचार करतो... आज म्हणाल तर सृष्टी डान्सही करत नाही आणि कराटेही करत नाही,’’ असं म्हणत रेश्माताई खिन्न हसल्या.

‘मग मी माझा वेळ नेमका कशासाठी घालवला? त्या वेळेत कदाचित मी माझा छंद जोपासू शकले असते... मला चूक की बरोबर ठरवता येत नाहीये; पण मी माझ्याकडे लक्ष दिलं नाही, याचं अलीकडे खूप वाईट वाटतं, एवढं खरं..’’ असं बोलून त्या किंचित थांबून म्हणाल्या, ‘‘आता मी या विषयावर तुमच्याशी जेवढं बोलले, तेवढं कोणाशीही कधीच बोलले नाही. कारण आपल्या मनात असं काहीतरी येतंय, याचाही त्रास व्हायचा; पण मनातलं बोलून टाकल्यामुळे आता मला हलकं हलकं वाटत आहे...’

रेश्माताईंनी मलाच विचारात टाकलं होतं.

आजवर अनेक पालकांशी झालेल्या चर्चा मला त्या क्षणी आठवल्या. मी त्यांना म्हणालो, ‘‘रेश्माताई, तुमच्या मनात आज जे विचार सुरू आहेत किंवा तुमच्या ज्या भावना आहेत त्या जराही चुकीच्या नाहीत... किंबहुना अनेक गृहिणी, ज्या क्षमता असूनही नोकरी करत नाहीत किंवा ज्यांनी मुलांसाठी नोकरी सोडली आहे, त्यांच्या मनात हेच विचार येत असतात. मुलं मोठी होईपर्यंत आपण गृहिणी-पालक खूप बिझी असतात. मुलं हाच आपला प्राधान्यक्रम होऊन जातात. मुलांचं विश्व हे आपलं विश्व होतं. मुलांचा अभ्यास, त्यांच्या समस्या, शाळेतले प्रश्न, क्लासमधले प्रश्न, परीक्षा, परीक्षांचे बरे-वाईट रिझल्ट, मुलांचे मित्र मैत्रिणी, घरचा अभ्यास, ताणतणाव, प्रोजेक्ट, मुलांचा डबा, त्यांच्या आवडीनिवडी, सणवार आणि वाढदिवस, त्यांच्यासाठी खरेदी, मुलांचे रुसवे-फुगवे, मुलांचे तऱ्हेतऱ्हेचे स्वभाव, त्यांचं खेळणं, त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इत्यादी इत्यादी... अशा खूप गोष्टी आपल्याला २४ तास गुरफटून टाकतात आणि आपण त्या प्रचंड समरसून करत असतो.

कधी-कधी मुलांपेक्षा आपणच त्यांच्या विश्वात जास्त समरस होतो... पण एक दिवस मुलं आपल्यापासून वैचारिकदृष्ट्या वेगळी होतातच. शारीरिकदृष्ट्या आपण एकाच घरात राहत असलो, तरी मानसिकदृष्ट्या मुलं वेगळी होतात. त्यांचं वेगळं विश्व तयार होतं, ज्यात ते सहसा आपल्याला प्रवेश देऊ इच्छित नाहीत किंवा मर्यादित प्रवेश देतात. ती स्वतंत्र होतात. त्यांचं ती बघू लागतात. त्यांना त्यांच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप केलेला चालत नाही. वाढत्या वयामुळे त्यांच्या जाणिवा अधिक टोकदार झालेल्या असतात. त्यांचे विचार वेगळे होतात... आपल्यापेक्षा पुढचा विचार करण्याची त्यांची क्षमता तयार होते... भले त्यांचं व्यवहार ज्ञान कमी असेल, त्यांना पैसे कमावता येत नसतील, परंतु त्यांच्या अंगातली हिंमत आणि रग वाढत जाते. अशा वेळी मुलांमध्ये आणि आपल्यात स्वाभाविक अंतर तयार होतं. तुम्ही आता नेमक्या त्याच टप्प्यात आहात...’’

माझं बोलणं ऐकताना रेश्माताईंच्या मनातला तणाव कमी होत गेलेला मला जाणवला. माझ्या बोलण्याला त्या उत्साहाने प्रतिसाद देत होत्या.

‘हा विषय खूप गुंतागुंतीचा आहे...’’, असं सांगून मी रेश्माताईंना म्हटलं, ‘‘रेश्माताई, आपलं बोलणं चटकन आवरणार नाही. मी पुन्हा आपल्याशी बोलेन... पण तोपर्यंत, तुमचं कुठेही चुकलेलं नाही, एवढं लक्षात घ्या... आपण दोन-चार दिवसांत पुन्हा बोलू’’, असं म्हणून मी माझं बोलणं थांबवलं. मी रेश्माताईंशी पुढच्या संवादात काय बोललो, हे आपण पुढच्या लेखात वाचू...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com