कुणालचे हात का भाजले?

कुणाल हा इयत्ता आठवीमधला मुलगा. त्याने दिवाळीत फटाके फोडता-फोडता स्वतःचे दोन्ही हात भाजून घेतले होते. त्याची मलमपट्टी, औषध-उपचार यामध्ये त्यांची दिवाळी चिंतायुक्तच झाली.
कुणालचे हात का भाजले?
Summary

कुणाल हा इयत्ता आठवीमधला मुलगा. त्याने दिवाळीत फटाके फोडता-फोडता स्वतःचे दोन्ही हात भाजून घेतले होते. त्याची मलमपट्टी, औषध-उपचार यामध्ये त्यांची दिवाळी चिंतायुक्तच झाली.

कुणाल हा इयत्ता आठवीमधला मुलगा. त्याने दिवाळीत फटाके फोडता-फोडता स्वतःचे दोन्ही हात भाजून घेतले होते. त्याची मलमपट्टी, औषध-उपचार यामध्ये त्यांची दिवाळी चिंतायुक्तच झाली. दिवाळीचा सगळा आनंद हा कुणालच्या भाजलेल्या जखमेने हिरावून नेला... कुणालचे आई-वडील फटाके फोडण्याच्या विरोधात असूनही, हे घडलं कसं, त्याचा पूर्वार्ध...

दिवाळीची धामधूम संपल्यानंतर एके दिवशी कुणालच्या (नाव बदलले आहे) आईचा फोन आला. ‘कुणाल अजिबात ऐकत नाही. त्याला कितीही सांगितलं, तरी तो त्याच्याच मनाप्रमाणे करतो. खूप हट्टी आहे. त्याला वळण कसं लावायचं,’ अशी तिची विचारणा होती... तिच्या मनात काळजी होती, चिंता होती आणि तातडीसुद्धा होती. त्यांचा सूर किंचित रडवेला होता.

असं एकदम काय झालं, या विचाराने मी त्यांना प्रश्न केला, ‘काय केलं कुणालनं? एवढं टेन्शन कशाचं आलंय?’

कुणाल हा इयत्ता आठवीमधला मुलगा. कुणालने दिवाळीत फटाके फोडता फोडता स्वतःचे दोन्ही हात भाजून घेतले होते. त्याची मलमपट्टी, औषध-उपचार यामध्ये त्यांची दिवाळी चिंतायुक्तच झाली. दिवाळीचा सगळा आनंद हा कुणालच्या भाजलेल्या जखमेने हिरावून नेला... मी कुणालच्या आईकडे बरीच चौकशी केली आणि सगळा घटनाक्रम समजावून घेतला, तेव्हा कळलं ते असं...

कुणालचे आई-बाबा हे दोघेही फटाके फोडण्याच्या विरोधात होते. फटाक्यांमुळे प्रदूषण होतं, पर्यावरणाची हानी होते, धोका वाढतो, शिवाय आजारी माणसांना त्रास होतो, विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही, पशुपक्षी घाबरतात, एका क्षणात हजारो रुपयांची नासाडी होते... त्यामुळे फटाके फोडू नयेत, असं त्यांचं मत होतं. कुणालचे आई-बाबा हे अतिशय संवेदनशील पालक आहेत. त्यामुळे आपल्याप्रमाणेच आपल्या मुलानेही पर्यावरणाचा आणि जीवसृष्टीच्या रक्षणाचा विचार महत्त्वाचा मानावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी दर वर्षी कुणालला फटाक्यांपासून लांब ठेवलं, त्याला परावृत्त केलं; पण या वर्षी ते नेमके नव्या घरात राहायला गेले आणि त्या सोसायटीत दिवाळीला फटाक्यांची अक्षरशः आतषबाजी सुरू होती. धूमधडाक्यात फटाके फुटत होते. कुणालचे आई-बाबा दार लावून बसले होते आणि कुणालनेही घरातच बसावं, अशी त्यांची इच्छा होती; पण कुणालला मात्र सारखं मित्रांसमवेत खाली जावं, त्यांच्याबरोबर खेळावं, असं वाटत होतं. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे तो रिकामाही होता. शेवटी आई-बाबांनी नाराजीने त्याला खाली जाण्याची परवानगी दिली. फटाके फोडू नकोस, फटाक्यांपासून लांब राहा, फटाके किती वाईट असतात, हे तुला माहिती आहे... असं सर्व बजावून आई-बाबांनी कुणालला खेळण्यासाठी खाली सोडलं.

कुणालने आई-बाबांच्या म्हणण्याला होकार दिला. ‘हो’ला हो म्हटलं आणि तो खाली खेळण्यासाठी धूम पळाला. बराच वेळ तो आला नाही म्हणून आई-वडिलांनी गॅलरीतून पाहिलंही. तो बऱ्यापैकी बाजूला उभा राहून फटाक्यांची गंमत पाहत होता. आई-बाबांनी एकमेकांकडे हताशपणे पाहिलं... पण ते त्याला थांबू शकत नव्हते! कुणालची खूप वेळ वाट पाहून दोघांचीही जेवणं झाली... आणि थोड्याच अवधीत कुणालचा जोरजोरात रडण्याचा आवाज आला. कुणाल ‘‘आई... बाबा’’ अशा हाका मारत होता. त्याच्याभोवती गर्दी जमली होती. बाबा तीरासारखे धावत सुटले आणि खाली जाऊन त्यांनी कुणालला पाहिलं तर कुणालचे दोन्ही हात गंभीररीत्या भाजले होते आणि कुणाल प्रचंड घाबरला होता...

मोठमोठ्याने रडत होता! काय झालं, कसं झालं याची चौकशी करत न बसता दोघेही त्याला घेऊन डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी मलमपट्टी केली. औषधे लावली. खाण्याच्या गोळ्या दिल्या आणि अतिशय मलूल अवस्थेत कुणाल घरी परत आला. तो खूप घाबरलेला होता. बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता, की त्याला जेवणाची इच्छा होत नव्हती. आईच्या मनात त्याला जाब विचारावा, असं खूप होतं; पण बाबांनी तिला रोखलं. उद्या सकाळीच त्याच्याशी बोलू, असं ते म्हणाले...

कुणाल दुसऱ्या दिवशी उशिरा उठला. तोपर्यंत कुणालच्या मित्रांकडून बाबांनी माहिती जमा केली होती. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी कुणालच्या बाबांना काही माहिती दिली, त्यानुसार बराच वेळ कुणाल लांबूनच फटाक्यांची गंमत पाहत होता. त्याला कोणीतरी विचारलं की, का रे तू कधीच फटाके फोडले नाहीस का? त्यावर कुणालने अवघडून ‘‘नाही’’ असं उत्तर दिलं. मग कुणीतरी विचारलं ‘‘फोडायचेत का? ये इकडे...’’ तरी कुणाल तयार होईना.

‘‘अरे घाबरू नकोस.. मी आहे ना!’’ असं म्हणून एकाने उत्साहाने त्याच्या हातात फुलबाजी दिली. कुणालने फुलबाजी फटाक्याला लावताच फटाक्याचा जागीच स्फोट झाला आणि त्याचे दोन्ही हात भाजले. फटाक्याला फुलबाजी टेकवून मागे पळण्याचं तंत्र कुणालला माहितीच नव्हतं. त्याला ते माहिती नाही, हे मित्रांना माहिती नव्हतं. त्यामुळे मोठाच विचित्र प्रसंग उद्भवला आणि कुणालने हात भाजून घेतले.

हे सगळं समजल्यानंतर आई-बाबांना प्रचंड मनस्ताप झाला. आपण याला इतकं समजावून सांगूनसुद्धा हा फटाके फोडायला गेला आणि हात भाजून घेतले याचं त्यांना खूप दुःख झालं. दुसऱ्या दिवशी आई-बाबांनी त्याला पुन्हा एकदा समजावलं... खरंतर खडसावलं... त्यांची बोलणी खाताना कुणाल सतत रडत होता. आता बाबांच्याही संतापाचा पारा हळूहळू वर चढला..

‘‘तुला किती समजवायचं? किती सांगायचं? फटाक्यांमुळे माणसांचं नुकसान होतं... अपघात होतात... हानी होते हे तुला किती वेळा सांगितलं? आज तुला त्याचीच शिक्षा झाली ना? कशासाठी गेलास फटाके फोडायला? आमचं तू का ऐकत नाहीस? तुझ्या मित्रांना उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे ते फटाके फोडून पैसे वाया घालवतात... तुला तर समजतं ना? मग तू गेलासच का त्यांच्यात?’’

बाबा कुणालवर तोंडसुख घेत होते. अधूनमधून आईसुद्धा बोलत होती. त्याचा परिणाम इतकाच झाला की दुसऱ्या दिवशीही कुणाल जेवला नाही. तो त्याच्या खोलीत एकटाच बसून होता. त्याला प्रचंड दुखत होतं. गोळ्या खाऊनही वेदना फार कमी होत नव्हत्या. मग पुन्हा डॉक्टरकडे जाणं झालं... पुन्हा मलमपट्टी... पुन्हा नव्याने औषध... या सगळ्या उपदव्यापामुळे दिवाळीचा अभ्यास मागे राहिला. शाळेतून दिलेले प्रोजेक्ट कुणाल पूर्ण करू शकला नाही. क्लासचा अभ्यासही मागेच राहिला. लिहिताच येत नसल्यामुळे आणि वाचण्यासाठी पुस्तक हातात धरू शकत नसल्यामुळे त्याला केवळ बसून राहण्यापलीकडे काहीच करता येत नव्हतं. या सगळ्यामुळे घरातली शांतता पूर्ण बिघडली. कुणालचाही सतत राग राग होत होता आणि आई-बाबांचाही सतत राग राग होत होता. शेवटी न राहवून आईने मला फोन केला... म्हणाली, ‘‘तुम्ही कुणालला थोडं समजावून सांगाल का?’’

मी त्यांना म्हटलं, ‘‘मला यात कुणालची काहीच चूक दिसत नाही. मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे... तुम्हाला दोघांना वेळ असेल तेव्हा आपण कॉन्फरन्स कॉलवर बोलूया... चालेल का?’’

कुणालची आई आश्चर्यचकित झाली. ‘‘म्हणजे आमचं चुकलं असं तुम्हाला म्हणायचं की काय?’’

मी त्यांना म्हटलं, ‘‘तुम्हा दोघांशी बोलताना मी माझं म्हणणं स्पष्ट करतो... तुम्ही मला एक-दोन दिवसांत नक्की फोन करा...’’

कुणालच्या आई-बाबांना मी काय सांगितलं हे अर्थातच आपण पुढल्या भागात वाचू...

(पूर्वार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com