कॉपीच्या झाडाला कधीच फळं लागत नाहीत...

सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे परीक्षेतील कॉपीचाही सुकाळ सुरू आहे. ठिकठिकाणहून बातम्या येऊन अक्षरशः आदळत आहेत, की प्रचंड प्रमाणात कॉपी सुरू आहे.
exam cheat
exam cheatsakal
Summary

सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे परीक्षेतील कॉपीचाही सुकाळ सुरू आहे. ठिकठिकाणहून बातम्या येऊन अक्षरशः आदळत आहेत, की प्रचंड प्रमाणात कॉपी सुरू आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्येष्ठ अशा मित्राच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. त्यांच्याकडे उमेदवारांच्या लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू होते. सर्व उमेदवार हे उच्चशिक्षित होते. त्यांची त्यांच्या-त्यांच्या विद्यापीठाची प्रमाणपत्रं त्यांनी जोडली होती. असं असताना तुम्ही पुन्हा एकदा लेखी परीक्षा कशासाठी घेता, तुमचा विद्यापीठांच्या किंवा शाळांच्या परीक्षा पद्धतीवर विश्वास नाही का, असं विचारल्यावर त्यांचं उत्तर खूप महत्त्वाचं होतं...

सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे परीक्षेतील कॉपीचाही सुकाळ सुरू आहे. ठिकठिकाणहून बातम्या येऊन अक्षरशः आदळत आहेत, की प्रचंड प्रमाणात कॉपी सुरू आहे. काही परीक्षा केंद्रांवर तर शिक्षकांनीच कॉपीसाठी विद्यार्थ्यांना मदत केल्याच्यासुद्धा बातम्या आहेत. कॉपी हे प्रकरण खूप जुनं आहे. त्याचं प्रमाण वाढलं असू शकेल; परंतु कॉपीचा रोग मात्र जुन्या स्वरूपाचाच आहे. परीक्षेत कॉपी केल्याने काही विद्यार्थ्यांचा तात्पुरता फायदा कदाचित होत असला, तरी त्यातील धोके हे दीर्घकालीन आहेत. म्हणजे शॉर्टकट जसा जीवावर बेततो तशीच कॉपी ही करिअरचा बळी घेते. कशी ते आपण पाहू...

मी एकदा कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्येष्ठ अशा मित्राच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. त्या दिवशी त्यांच्याकडे उमेदवारांच्या लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू होते. एकीकडे हे ज्येष्ठ मित्र लेखी परीक्षेबद्दल त्यांच्या ऑफिसमधील सीनियर स्टाफला सूचना करत होतेच, त्याशिवाय इंटरव्ह्यू व्यवस्थित लाईन अप होत आहेत की नाही हेही पाहत होते...

मी त्यांना विचारलं, ‘‘सर्व उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी त्यांच्या-त्यांच्या विद्यापीठाची प्रमाणपत्रं त्यांनी जोडली आहेत. असं असताना तुम्ही पुन्हा एकदा लेखी परीक्षा कशासाठी घेता? तुमचा विद्यापीठांच्या किंवा शाळांच्या परीक्षा पद्धतीवर विश्वास नाही का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘विश्वास नाही असं म्हणणं चुकीचं आहे; पण आम्ही आमच्या वतीने काळजी घेत आहोत... विद्यापीठ किंवा शाळा किंवा बोर्ड हे खूप मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेत असतात. परीक्षा जेव्हा मोठ्या प्रमाणात होते तेव्हा त्याच्या आयोजनात ढिसाळपणा येण्याची शक्यता असते.

ढिसाळपणातून कॉपी जन्माला येते... तुम्ही लक्षात घ्या, की एका दूरच्या ठिकाणी एखाद्या परीक्षा केंद्रावर एका खोलीत काही मुलं जर सुपरवायझरच्या संमतीने किंवा सुपरवायझरच्या अपरोक्ष कॉपी करत असतील, तर ते प्रशासनाच्या लक्षात कसं काय येऊ शकेल? कॉपी करणे हा अतिशय सोयीचा प्रकार आहे... मुलं लहानपणापासूनच कॉपी करत असतात. होमवर्कची कॉपी. असाईनमेंटची कॉपी... हे हळूहळू वाढत गेलं की परीक्षेतही कॉपी करण्याची उबळ येतेच. आपल्यावर कारवाई होईल या भीतीने अनेक मुलं कॉपी करत नाहीत; पण कॉपी करणे अनैतिक आहे, ते चुकीचं आहे असं मानणारा वर्ग कमी होत चालला आहे... वाढत चाललेलं कॉपीचं प्रमाण हे त्याचंच चिन्ह आहे!’’

‘म्हणजे कॉपी करणारी मुलं कॉर्पोरेट क्षेत्राला नको असतात असाच त्याचा अर्थ घ्यायचा का?’, मी विचारलं.

ते म्हणाले, ‘‘कॉपी करणारी मुलं ओळखायची कशी, हा आमच्यापुढचा मुख्य प्रश्न असतो. लक्षात घ्या, मोठ्या प्रमाणावर कॉपी होते आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण आमच्याकडे इंटरव्ह्यूसाठी आलेल्या उमेदवाराने कॉपी केली आहे किंवा काय, हे कसं कळणार? एक प्रकारे ते कळूही शकतं... म्हणजे मार्कांमध्ये जर सातत्य असेल, तर हा उमेदवार कॉपी करत नाही हे आम्ही ताडतो. कधी कधी सामान्य गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक चांगले गुण मिळतात, तेव्हाही आम्ही त्याकडे लक्षपूर्वक पाहतो. पण हे सर्व जजमेंटल आहे. त्यात पूर्वग्रह येण्याची शक्यता आहे किंवा संबंधित विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याचीही शक्यता आहे.

म्हणजे असं, की एखाद्या सुमार मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने खूप कसून अभ्यास केला आणि चांगले मार्क मिळवले तर त्याच्याकडे संशयाने पाहिलं जाऊ शकतं. हा त्याच्यावरचा अन्याय आहे. त्यापेक्षा आम्हाला साजेशी, आमच्या इंडस्ट्रीला योग्य अशी परीक्षा पद्धती तयार करणे आमच्यासाठी केव्हाही चांगलं आहे. त्यामुळे एक तर विद्यार्थ्याचं आमच्या इंडस्ट्रीसाठीचं ओरिएंटेशन योग्य आहे की नाही हे आम्हाला कळतं आणि त्याची हुशारीही समजते... असा विद्यार्थी पुढे इंटरव्ह्यूला पाठवणं हे जास्त संयुक्तिक ठरतं...’

‘या पद्धतीचा फायदा होतो?’ मी विचारलं.

ते म्हणाले, ‘‘नक्कीच होतो! आज बँकिंग, इन्शुरन्स, आयटी, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि असंख्य खासगी क्षेत्र स्वतःची परीक्षा पद्धती राबवत असतात. ही परीक्षा पद्धती म्हणजे प्रचलित परीक्षा पद्धतीवरचा अविश्वास आहे असं नव्हे; पण प्रचलित परीक्षा पद्धती अपुरी आहे, याचंच हे निदर्शक आहे आणि ते स्वाभाविकही आहे. कारण उद्योग क्षेत्र विस्तारतंय, गरजा वाढतायेत, वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्यबळ आवश्यक आहे... हे साचेबद्ध शिक्षण पद्धतीतून कसं तयार होईल? पण याकडे आपल्याला असं पाहावं लागेल, की उत्तम करिअर घडवण्यासाठी अशा प्रकारच्या परीक्षा या मदतरूपच असतात... आम्ही आमच्या परीक्षेकडे एक सेफ्टी वॉल म्हणून पाहतो. एक अतिरिक्त काळजी घेण्याचा तो प्रकार आहे. यामुळे कॉपी करणारा उमेदवार जर समजा आमच्या परीक्षेत प्रयत्न करत असेल, तर तो लेखी परीक्षेतून आपोआपच बाद होतो. कारण आमच्या परीक्षा या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीच्या नसून तुमच्या हुशारीला, कल्पनाशक्तीला, तर्काला वाव देणाऱ्या असतात...’’

‘म्हणजे कॉपी करत करत पास झालेला विद्यार्थी तुमच्या परीक्षेत अक्षरशः एक्स्पोज होतो असं म्हटलं तरी चालेल..’, मी मला समजलेला अर्थ त्यांना सांगितला.

‘तुम्ही कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतलं आहे यावर बरंच काही अवलंबून आहे. जेव्हा आपण फॉर्मल एज्युकेशन घेतो, तेव्हा फॉर्मल एज्युकेशनच्या मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजेत. आम्हाला इंडस्ट्रीसाठी योग्य उमेदवार हवेच असतात आणि फॉर्मल एज्युकेशन क्षेत्राला असे उमेदवार तयार करणं खूप कठीण जातं. कारण क्षेत्रागणिक उमेदवार तयार करणे सध्या तरी अशक्य आहे... अशात जर कॉपी बोकाळली तर भविष्यात इंडस्ट्रीचा फॉर्मल एज्युकेशनवरचा विश्वास कमी होऊ शकतो.

यामुळे जे विद्यार्थी खूप मेहनती, हुशार आणि प्रामाणिक आहेत त्यांच्यावरही अन्याय होऊ शकतो; पण आम्ही जेव्हा आमच्या परीक्षा तयार करतो तेव्हा अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची शक्यता अधिक असते. कॉपी करणारा विद्यार्थी मात्र भरकटला जातो आणि पुढे त्याला करियर सापडतच नाही... किंवा तो चुकीच्या मार्गाने आयुष्यात पुढे जाऊ शकतो. कॉपी हा एक सापळा आहे, ज्यात मुलं सापडलीच तर पुढे त्यांना प्रचंड त्रास होतो... शाळा-शाळांमध्ये आणि प्रत्येक कॉलेजमध्ये याबद्दल जागृती झाली पाहिजे, की कॉपी करणाऱ्याच्या झाडाला कधीच फळं लागत नाहीत...’

हा संदेश खरोखरच प्रत्येक शाळेत, कॉलेजात आणि घराघरात पोहोचावा अशी सदिच्छा देऊन मी त्यांचा निरोप घेतला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com