
एक पालक दाम्पत्य भेटायला आले. बाबांना मुलीचे वागणे खटकत होते; पण मुलगी, त्यांच्या दृष्टीने असलेली तिची ‘चूक’ सुधारत नव्हती... त्यांचे मुलीला बोलून झाले.
बाबा, सोडा हा अबोला!
एक पालक दाम्पत्य भेटायला आले. बाबांना मुलीचे वागणे खटकत होते; पण मुलगी, त्यांच्या दृष्टीने असलेली तिची ‘चूक’ सुधारत नव्हती... त्यांचे मुलीला बोलून झाले. रागावून झाले; पण त्यातून काहीच साध्य झाले नाही. शेवटी मुलीचे आणि बाबांचे जोरदार भांडण झाले. खटके उडाले आणि दोघांनी अबोला धरला. त्याला आता सहा महिने उलटून गेले...
किस्सा तसा गंभीर आहे; पण पालकांच्या मानसिकतेचे गमतीशीर पैलू उलगडून दाखवणाराही आहे.
एक पालक दाम्पत्य भेटायला आले होते. त्यापैकी विशेषतः बाबांची, त्यांच्या मुलीच्या वर्तनाबद्दल गंभीर स्वरूपाची तक्रार होती. मुलीचे वागणे त्यांना खटकत होते; पण मुलगी, त्यांच्या दृष्टीने असलेली तिची ‘चूक’ सुधारत नव्हती... त्यांचे मुलीला बोलून झाले. रागावून झाले; पण त्यातून काहीच साध्य झालं नाही. शेवटी मुलीचे आणि बाबांचे जोरदार भांडण झाले. खटके उडाले आणि दोघांनी अबोला धरला. बाबांनी आणि मुलीने अबोला धरला, त्याला आता सहा महिने उलटून गेले. बाबा आणि मुलगी यांच्यात अजिबात संवाद नव्हता. दोघे एकमेकांसमोर उभेही राहात नसत. एकमेकांकडे पाहतही नसत. त्याचा ताण आईवर पडला. जो अर्थातच तिला असह्य झाला होता. त्यामुळे हे सर्व सांगताना आईच्या डोळ्यात अश्रू जमले होते...
‘एका घरात राहून हे दोघे तिऱ्हाईत असल्यासारखे वागतात. सहा महिने उलटले या अबोल्याला. मला आता खूप त्रास होतोय. खरं म्हणजे सर्वांनाच त्रास होतो. यांनाही खूप त्रास होतो; पण हे त्रास करून घेतात. तिच्याबद्दल त्यांना खूप प्रेम आहे बरं का! म्हणजे ती जेवली का, तिला डबा दिला का, तिचा अभ्यास झाला का, ती वेळेवर आली का... हे सर्व त्यांना समजून घ्यायचे असते. तिला काही कमी पडू नये, अशी इच्छाही असते; पण ते तिच्याशी बोलत नाहीत. याला हट्टीपणा म्हणायचा नाहीतर काय? तीसुद्धा तितकीच हट्टी आहे! बापावरच गेलीय ना. तीही यांच्याशी बोलत नाही. बरं ती लहान आहे. त्यामुळे तिचा जीव ती कसाही रमवते. घरात सतत या दोघांची भांडणं होतात. त्यामुळे ती मैत्रिणींकडे जास्त काळ थांबते. त्यावरून पुन्हा भांडणं होतात... ती म्हणते, मी घरात येऊन काय करू? भांडणंच होणार असतील, तर मी घरी वेळेवर येऊच कशाला? आता तिचेही म्हणणे बरोबर आहे. मला काय करावे सुचत नाहीये...’
आई हताशपणे म्हणाली. बाबांनाही मघापासून काहीतरी बोलायचे होते. म्हणून आईचे बोलणे झाल्यानंतर अपेक्षेने मी बाबांकडे पाहू लागलो. बाबा खूप उसळून आणि त्वेषाने म्हणाले, ‘अहो, अजून बारावीची परीक्षा नाही दिली मुलीने आणि प्रेमात पडलीय ती... संताप होणार नाही तर काय होणार, तुम्ही मला सांगा? या वयात आपला अभ्यास करायचा, आपले करिअर घडवायचे, स्वतःचे भविष्य सुरक्षित करायचे... हे सगळं सोडून ती प्रेमात पडलीय... कुठला बाप हे सहन करेल, तुम्हीच मला सांगा?’
मग बराच वेळ दोन्ही पालकांमध्ये, म्हणजे आई आणि बाबा यांच्यात, त्यांची मुलगी खरोखरच प्रेमात पडली आहे का, याच्यावर जोरदार चर्चा, खरंतर खडाजंगी झाली! मी शांतपणे तीही ऐकत होतो.
मग मी दोघांनाही शांत केले आणि एक एक करून घटनाक्रम सांगा, म्हणालो. त्यानुसार दोघेही आलटून पालटून बोलू लागले. दोघांच्या बोलण्यातून मला जे आकलन झाले ते असे...
त्यांची मुलगी सोना (नाव बदलले आहे) ही खूप हुशार आणि एकुलती एक. दोघांचीही लाडकी. बाबा स्वतःचा व्यवसाय सांभाळतात. त्यामुळे खूपदा बाहेर फिरतीवर असतात. आई गृहिणी आहे आणि एका सामाजिक संस्थेची जोडलेली आहे. तिथे जाऊन ती जमेल तसे सामाजिक कार्य करते. दोघांचे माझ्यासमोर खटके उडाले तेव्हा आईच्या सामाजिक कार्याचा मुद्दा बाबांनी काढला म्हणून याचा मुद्दाम उल्लेख केला. मुलीकडे दुर्लक्ष झाले आणि समाजकार्य केले तर उपयोग काय, असा प्रश्न बाबांनी केला. त्यावर आई उसळली. ती म्हणाली, ‘‘म्हणजे मी काय सतत २४ तास मुलीवरच लक्ष ठेवू का? ते मुलीला आवडणारे का? मला माझ्या आवडीनिवडी, माझे काम असे काहीच नको का! वगैरे वगैरे... असो.
एके दिवशी पेन सापडेना म्हणून बाबांनी सोनाच्या रूममध्ये जाऊन तिच्या टेबलाच्या खणात पेनाची शोधाशोध सुरू केली. पेन सापडले नाहीच, पण एक पत्र सापडले. बाबांनी ते उत्सुकतेने उघडले; तर ते चक्क प्रेमपत्र होते! सोनाला तिच्या जय (नाव बदलले आहे) नावाच्या मित्राने ते प्रेमपत्र लिहिले होते. ते वाचून बाबा प्रचंड संतापले. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी ते पत्र आईला वाचायला दिले. सोनाची आईसुद्धा हबकून गेली. सोना त्यावेळी तिथे नव्हती; पण बाबांनी ते पत्र ताब्यात घेतले आणि दोघेही सोनाची वाट पाहू लागले.
संध्याकाळी सोना आली. तिला बाबांनी त्या पत्राबद्दल जाब विचारला. त्यावर सुरुवातीला सोना थोडी बावचळली. मग आश्चर्यचकित झाली. मग हळूहळू सावरली. तिने ते पत्र हसण्यावारी नेले. तुम्ही माझ्या प्रायव्हसीवर घाला का घातला, तुम्हाला माझे पत्र वाचण्याचा अधिकार कोणी दिला, तुम्ही माझ्या खासगी आयुष्यात का डोकावता, असे प्रश्न केले. त्यावर बाबांच्या संतापाचा कडेलोट झाला. मग भांडण सुरू झाले. ते मध्यरात्र उलटली तरी सुरूच होते. सोना रडत होती. आई रडत होती. बाबा संतापाने येरझाऱ्या घालत होते.
रात्री सोना आईच्या कुशीत विसावली तेव्हा म्हणाली, की ‘‘त्याने मला प्रेमपत्र दिले, हे खरे. त्याचे माझ्यावर प्रेम आहे, असं तो म्हणतो; पण माझे असे काहीही नाही. एक गंमत म्हणून मी ते पत्र ठेवले आहे. कोणीतरी आपल्यावर प्रेम करतो, पत्र देतो, ते पत्र मी नष्ट का करू? म्हणून मी ते ठेवले! बाबांना सांग, मला ते पत्र परत द्या...’
इतक्यात बाबा तिथे आले. सोना ते प्रेमपत्र परत मागते आहे, असे आईने सांगताच त्यांच्या संतापाचा पारा पुन्हा एकदा चढला. ते तिला निर्लज्ज म्हणू लागले. खूप वाईटसाईट बोलले आणि पुन्हा माझ्याशी आयुष्यात बोलू नकोस.. या घरातून चालती हो, वगैरे वगैरे उद्गार त्यांनी काढले. सोनाला खूप अपमानास्पद आणि घाणेरडे बोलले. तेव्हापासून आजपर्यंत हा अबोला कायम आहे...
‘तुम्हीच सांगा मी यावर काय करू? काय केलं म्हणजे दोघे एकमेकांशी बोलू लागतील?’
सोनाच्या आईने मला अगतिकपणे विचारले. मी सोनाच्या बाबांची समजूत कशी काढायची, या विचारात पडलो.
सोना आणि तिचे बाबा यांच्यातला अबोला कसा दूर झाला, हे आपण पुढल्या भागात वाचू.
(पूर्वार्ध)