
दीपकचा प्रेमभंग झाल्यानंतर त्याने परीक्षा देणार नसल्याचा निर्णय घेतला होता. त्याचं कुठेही लक्ष लागत नव्हतं. हळूहळू त्याला बोलतं केलं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं, हे समजावून सांगितलं. समुपदेशन केल्यानंतर तो हळूहळू खुलत गेला. निर्धास्त होऊन बोलत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य फुललं. तथाकथित प्रेमभंगाने गमावलेली एकाग्रता त्याने पुनश्च कमावली...
दीपक तू म्हणतोस, की तुझं त्या मुलीवर प्रेम होतं. मला प्रेम म्हणजे नक्की काय, हे सांगशील का? माझ्या प्रश्नावर दीपक विचारात पडला.तो म्हणाला, ‘‘मला ती आवडायची. तिचा सहवास आवडायचा. तिनं माझ्याबरोबर सतत असावं, असं वाटायचं.’’‘‘एखादी व्यक्ती आवडणं, एवढ्यापर्यंतच प्रेम मर्यादित असतं का? तू ज्याला प्रेम म्हणतोस ते कदाचित आकर्षणसुद्धा असू शकतं! तू थोडं समजून घे. तुझ्या वयामध्ये आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे. तू जीवशास्त्र आणि शरीरशास्त्र हा विषय वाचलेला आहेस. आपण सगळे त्या शास्त्राचा एक भाग आहोत. आकर्षण वाटणं आणि आकर्षण वाटण्यावर नियंत्रण मिळवणं हे दोन टप्पे महत्त्वाचे आहेत. तुला आकर्षण वाटलं, हे स्वाभाविक आहे. पण त्या आकर्षणामागे तू वाहवत गेलास, त्या मुलीचं म्हणणं काय आहे, हे ऐकूनसुद्धा घेतलं नाहीस, हे चुकीचं आहे. इथे तुझी गफलत झाली. समजा ती मुलगी तुला ‘हो’ म्हणाली असती, तर काय घडलं असतं? तुला कल्पना आहे का? तेच घडलं असतं, जे आता घडत आहे. तुझा आनंद गगनात मावेनासा झाला असता. कदाचित तुझं अभ्यासावरचं लक्ष विचलित झालं असतं.
कारण तुला सतत तिच्याबरोबर राहायला आवडलं असतं. सतत तिचेच विचार मनात येत राहिले असते. ती सध्या काय करते, जेवली असेल का, झोपली असेल का, वाचत असेल का, मित्र-मैत्रिणींबरोबर असेल का, पालकांबरोबर असेल का, मित्र-मैत्रिणींना आपल्याबद्दल कळलं असेल का, ती माझ्याशी कधी बोलेल... असे विचार डोकावत राहिलेच असते. तिची चौकशी करावी, तिला विचारावं, तिच्याशी बोलत बसावं हे तुला सतत वाटलं असतं. रुसवे फुगवे झाले असते. अभ्यास, अभ्यासाचे विषय याऐवजी तुझ्या डोक्यात सतत तिचेच विचार कदाचित येत राहिले असते. या वयामध्ये बऱ्याच मुला-मुलींना परस्परांचा सहवास हवाहवासा वाटतो; पण केवळ आपण वयात आलो आहोत म्हणून अशा सगळ्या गोष्टी करणं हे आपल्या उद्दिष्टापासून आपल्याला दूर नेऊ शकतं, हे लक्षात घे. तू हुशार मुलगा आहेस. तुझ्या स्वतःकडून काही अपेक्षा असतील. त्या साध्य करण्यासाठी तू सध्या तुझा तथाकथित प्रेमभंग झाल्याने कमी पडतो आहेस, हे तर तुला मान्य असेल?’’
माझ्या या प्रश्नावर दीपक विचारात पडला.‘‘पण मी मनापासून प्रेम केलंय तिच्यावर...’’ त्यानं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.‘‘आपल्याला खूपदा प्रेम आणि पझेसिव्ह वृत्ती यातला भेद लक्षात येत नाही. प्रेमाला नकाराचं, अव्हेरलं जाण्याचं भय नसतं. प्रेम निर्व्याज असतं. स्वाभिमान, गर्व, आत्मकेंद्री वृत्ती यापेक्षा खूप पलीकडचं असतं प्रेम. तुला ती मुलगी आवडली आणि ती आपल्या सोबत असावी, तिने आपल्याला स्वीकारावं, आपल्याला आयुष्यात साथ द्यावी, या भावना तुझ्या मनामध्ये येत राहिल्या. तिच्या असण्याने, समोर दिसण्याने, तिचे विचार मनात आल्याने तू सुखावत राहिलास... बरोबर ना?’’ मी दीपकला विचारलं. त्यानं होकार दिला.
‘‘तुझ्यासारखी गोष्ट घडलेला एक दहावीतला मुलगा मला गेल्या वर्षी भेटून गेला. त्याचंही एका मुलीवर प्रेम बसलं. त्याचंही अभ्यासावरचं लक्ष उडालं. आठवी-नववीतली मुलंही हल्ली प्रेमाबिमात पडतात..’’ मी म्हणालो. त्यावर दीपक उसळला.‘‘माझ्या आणि त्यांच्या प्रेमाची तुलना कशी होईल? त्यांचं प्रेम पोरकट असतं. उथळ असतात अशी मुलं या वयात. जराही सीरियस नसतात ती...’’ ‘‘असं तुला वाटतं रे... पण त्यांना नाही वाटत. त्यांनाही त्यांचं प्रेम खरं वाटतं.’’ मी म्हणालो.
त्यावर दीपक गप्प बसला.
‘‘तुला निसर्गाची गंमत माहितेय? आंब्याच्या झाडाला तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी मोहर येतो आणि आंबेही धरतात. पण जाणकार शेतकरी, ज्याला आंब्याची उत्तम काळजी घेता येते आणि जोपासना करता येते, तो मोहर खुडून टाकतो. कारण अवेळी आणि नको त्या वयात आलेला मोहर झाडाची वाढ थांबवतो. असा मोहर झाडांसाठी खूप वाईट असतो...’’
माझ्या म्हणण्यावर दीपक विचारात पडला. काहीसा निरुत्तरही झाला.
‘‘समजा तुझा दहावीतला धाकटा भाऊ किंवा बहीण कुणाच्या प्रेमात पडले आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागले तर तू काय करशील?’’ मी विचारलं.
‘‘फटकावून काढेन! प्रेमात पडण्याचं त्यांचं हे वय आहे का? या वयात त्यांनी अभ्यास केला पाहिजे.. शेवटी करियर महत्त्वाचं आहे...’’ दीपक रागाने आणि त्वेषाने म्हणाला.
‘‘त्यांचं प्रेमात पडण्याचं वय नाही, तर मग तुझं प्रेमात पडण्याचं वय कसे रे? हे शिक्षण आणि करियर... तुझेसुद्धा बाकीच आहे की! तुझ्यासाठी वेगळा न्याय आणि तुझ्या भावंडांसाठी वेगळा न्याय, असं कसं होईल?’’ मी विचारलेल्या प्रश्नावर दीपक निरुत्तर झाला.
‘‘तू वयाने मोठा आहेस! सगळ्या कुटुंबाच्या आशा-आकांक्षा तुझ्याभोवती केंद्रित झाल्या आहेत. तुझ्या आई-वडिलांच्या मनातसुद्धा नेमक्या याच भावना आहेत. पण तू मोठा आहेस, त्यामुळे ते अगतिक आहेत. त्यांनी तुला काही बोलल्यावर तू काही उलट-सुलट करशील अशी त्यांना भीती वाटते, म्हणून ते शांत आहेत. पण तुझं वागणंसुद्धा तितकंच चीड आणणारं आहे, हे समजून घे. प्रेमात पडण्याचं आणि प्रेम निभवण्याचं एक वय असतं. तू त्या वयात अजून आलेला नाहीस. तुला आकर्षण वाटणं हे नैसर्गिक आहे. पण तुझं आता वाटणारं आकर्षण म्हणजे अकाली आलेला मोहर आहे. तुला तो स्वतःहून खुडून टाकावा लागेल. तरच तुझी चांगली वाढ होईल भविष्यात! चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी करणं हे करिअरच्या दृष्टीने आणि जीवनाच्या दृष्टीने घातक असतं. फार कमी लोकांना पुढच्या आयुष्यात स्वतःला सावरण्याची संधी मिळते. खूप जणांचं आयुष्य हे चुकीच्या गोष्टी चुकीच्या वयात केल्यामुळे बरबाद झालेलं आहे, हे लक्षात घे...’’
दीपकच्या चेहऱ्यावर आता थोडे पश्चातापाचे भाव उमटू लागले होते. त्याला त्याची चूक कळली आहे, असंही वाटत होतं.
‘‘तू वयाच्या पस्तिसाव्या वर्षी कॉलेजात जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर ते खूप आव्हानात्मक असेल. अशक्य नसेल, पण कठीण असेल. खूप गोष्टी या तुझ्यासाठी प्रतिकूल असतील... पण तेच शिक्षण तू आता घेतलं तर तुझं वय हे शिक्षणाला अनुकूल आहे. तुझ्यावर कसलीही जबाबदारी नाही. जबाबदाऱ्या वाढल्या की शिक्षण घेण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. कारण आपला प्राधान्यक्रम बदलतो. आपलं आयुष्य हे प्राधान्यक्रमावर चालतं. आपल्याकडे पूर्वी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास असे जे चार टप्पे होते ना, ते या प्राधान्यक्रमाचाच भाग होते. तुझा प्राधान्यक्रम आता केवळ आणि केवळ शिक्षण हाच असला पाहिजे. तो जराही तू बदललास तर त्याचा प्रतिकूल परिणाम तुझ्या पुढच्या टप्प्यावरती १००% होऊ शकतो...’’
दीपकच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तो हुंदके देत म्हणाला, ‘‘माझी चूक झाली. मी आई-बाबांशी खूप उद्धट बोललो. खूप उद्धटपणे वागलो... खूप चुकीचं वागलो... आय एम सॉरी!’’
मी त्याचे खांदे थोपटले आणि त्याला म्हटलं, ‘‘अजूनही वेळ गेलेली नाही. कसून अभ्यासाला लाग. परीक्षेचा आणि अभ्यासाचाच विचार कर. आपल्या डोक्यात कोणते विचार येतात, याकडे लक्ष ठेव. थोडेही चुकीचे विचार आले तर ते दूर होतील असं बघ आणि अभ्यासावरचा फोकस ढळू देऊ नकोस. तुझ्या तथाकथित प्रेमभंगाने तुझी एकाग्रता जवळपास संपली होती. मला खात्री आहे, की तुझी एकाग्रता पुन्हा पहिल्यासारखीच होईल आणि तू परीक्षेत उत्तम मार्क मिळवशील.’’ दीपकच्या चेहऱ्यावर मंद हास्य फुललं.
मला खात्री होती, की दीपकसाठी आता कोणताही अडथळा शिल्लक नव्हता!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.