पालकत्वाचा वारसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

guardianship

आपण जसे आपल्या मुलांना वाढवतो, त्याचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर इतका प्रदीर्घकाळ होत असतो की त्यांच्या मुलांनाही ते तशाच पद्धतीने वाढवत असतात... म्हणूनच पालकत्व हा एक वारसा आहे, ही एक परंपरा आहे.

पालकत्वाचा वारसा

आपण जसे आपल्या मुलांना वाढवतो, त्याचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर इतका प्रदीर्घकाळ होत असतो की त्यांच्या मुलांनाही ते तशाच पद्धतीने वाढवत असतात... म्हणूनच पालकत्व हा एक वारसा आहे, ही एक परंपरा आहे. तिचा पाया हा अधिक डोळस असायला हवा. आपल्या मुलांकडून आपल्या फाजील अपेक्षा नसाव्यात. आपण मुलांना सतत दूषणं देण्यात, टोमणे मारण्यात, शब्दांचे चाबूक मारण्यात अर्थ नाही. मुलांकडे जे नाही, त्यावर सतत बोलण्यापेक्षा मुलांकडे जे आहे, त्यावर सतत बोललं तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो.

पालकांनी मुलांबरोबरच्या संवादाची आणखी काही वाक्य आपापल्या चिठ्ठीत लिहिली होती. ती मी वाचू लागलो... ‘आज आमच्या ऑफिसमध्ये माझ्या एका कलीगने बॉसचा असा ओरडा खाल्ला की काही विचारू नकोस! तुमच्या वर्गात आज कोणी असा ओरडा खाल्ला का?’

‘आजची डब्यातली भाजी फारच चविष्ट होती... मला आवडली! तुला आवडली की नाही?’

‘आज सकाळी तुझं जेवण पुरेसं झालं नव्हतं... तुला आपला डबा पुरतो ना? नाही पुरला एखाद दिवस तर कॅन्टीनमधून काहीतरी घेऊन खा!’

‘तू सर्व डबा एकटाच खातोस की मित्रांबरोबर शेअरसुद्धा करतोस?’

‘कुणाच्या डब्यातलं तुला काय काय आवडतं?’

‘आजची भाजी आवडली नाही का? टेस्टी नव्हती का? भाजी परत आणलीस म्हणून विचारलं?’

‘अरे वा! तू अलीकडे सर्व डबा संपूर्ण संपवून येतोयस! छान... बरं वाटतं!’

‘मी तुला होमवर्कला नक्की मदत केली असती; पण तुझं होमवर्क तुलाच करावं लागेल... जसं माझ्या ऑफिसचं काम मलाच करावं लागतं... कारण आपण कामातून शिकतो!’

‘तुझं तुलाच उठावं लागेल... तुझ्या उशाशी गजराचं घड्याळ ठेवलं आहे... गजर वाजला की उठायचं आणि आपलं आपण आटपायला लागायचं... करशील ना? याने तुझाच फायदा आहे... कारण तुला दुसरं कोणी उठवणार नाही. तुझं तुलाच उठावं लागेल. समजा तू उठला नाहीस तर तुला उठायचं नाही, असं आम्ही गृहीत धरू. तुझी शाळा बुडेल. तुला चिठ्ठी लिहून देताना मला हे खरं खरं सांगावं लागेल, की तू लवकर उठत नाहीस... उशिरापर्यंत झोपल्यामुळे शाळा बुडाली... अभ्यास मागे राहिला... चालेल का?’

‘तू खूप गुणी आहेस. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे... अभ्यासापासून तुझं सगळं उत्तम आहे... तुझे प्रयत्न खूप छान असतात आणि यापुढेही उत्तमच करशील याची आम्हाला खात्री आहे!’

‘आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो!’

‘किती स्मार्ट आहेस तू!’

‘तुझ्या वर्गात बेस्ट फ्रेंड कोण! आणि आवडत नाही, अशी व्यक्ती कोण? असं का?’

‘आमच्या ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत मोबाईल बघायला परवानगी नाही. फक्त कामापुरतं बोलायचं आणि मोबाईल खणात ठेवायचा असा नियम आहे... आणि घरी तर माझा वेळ मला तुमच्याबरोबर घालवायला जास्त आवडतो. त्यामुळे घरीही मी मोबाईल बघत नाही. मला असं वाटतं की हा नियम आपण सर्वांनीच पाळायला पाहिजे. गरज असेल तेवढ्यापुरताच मोबाईल बघू या...’

‘तुझं अभिनंदन! आज संपूर्ण दिवसात तू खूप कमी वेळा मोबाईल बघितलास... तू एक दिवस खरंच खूप मोठा होणार आहेस...’

‘मला तुझं काय आवडतं माहितीये का? तुझी स्वच्छता, टापटीप आणि शिस्त आम्हाला खूप आवडते... तुझ्यात आळसाचा जराही लवलेश नाही!!’

‘आज शाळेत झालेल्या अभ्यासात तुला सर्वात आवडलेला धडा कोणत्या विषयाचा होता? धड्यात तुला नेमकं काय आवडलं? कोणत्या शिक्षकांचं शिकवणं तुला आवडतं?’

‘तुला वर्गात शिकवलेलं सगळं समजतं, की काही अडचणी येतात? आज शिकवल्यापैकी तुला कोणता भाग नीट समजला नाही?’

मुलांबरोबरच्या संवादाची आणखीन काही वाक्य खूपच स्पर्श करून जाणारी आणि चांगली होती; परंतु ती खूपच व्यक्तिगत होती.. म्हणजे विशिष्ट समस्यांविषयी होती. पण प्रामुख्याने ज्या पालकांनी वरील आशयाची वाक्य लिहिली, त्यांचं मी मनापासून अभिनंदन केलं. असे पालक संख्येने कमी होते... परंतु होते हे महत्त्वाचं! पालकत्व ही आपल्यावर एक येऊन पडलेली जबाबदारी नसून तो आनंद घेण्यासारखा एक अनुभव आहे, हे या पालकांना नीट समजलेलं होतं. त्यामुळेच ते आपल्या मुलांकडे खूप सकारात्मक दृष्टीने बघत होते. सर्व पालकांच्या पोटात काळजी एकच असते... ती म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य कसं असेल? ते चांगलं असेल ना? त्यांच्या काळात ते स्वतःच्या पायावर नीट उभे राहतील ना? स्पर्धात्मक आणि स्वार्थी युगातही ते सचोटीने राहून स्वतःचे स्थान निर्माण करतील ना? त्यांचं आयुष्यात भलं होईल ना? त्यांना फार टक्के-टोणपे तर सहन करावे लागणार नाहीत? वगैरे वगैरे...

मुलांच्या भवितव्याबद्दल मनात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली की ती पालकांच्या डोक्यात सतत घोळत राहते आणि तेच विचार वर्तनात आणि वाक्यांमधून बाहेर पडत असतात. तुमच्या पोटात काय आहे आणि तुमच्या ओठांवर काय आहे याला खूप महत्त्व आहे. आपल्या मुलांचं चांगलं होईल ही खात्री बाळगायला हवी. कारण तुम्ही मुलांबद्दल जेवढे असुरक्षित राहता, तेवढा मुलांबरोबरचा तुमचा संवाद हा बाधित आणि दूषित होतो. तुम्ही निर्मळपणे, मोकळेपणाने आजूबाजूच्या लोकांकडे, घटनांकडे पाहू शकत नाही. सतत कसलं तरी टेन्शन असतं. पालकत्व हा जेव्हा आनंदापेक्षा टेन्शनचा विषय होतो, तेव्हा पालक आणि पाल्य यांच्यामध्ये आपोआप एक दरी तयार होते. कारण लहान मुलांना भविष्याची भीती नसते ना त्यांच्यावर भूतकाळाचं ओझं असतं... ते शंभर टक्के वर्तमानात जगत असतात! पालकांनीही मुलांबरोबर उत्तम ट्युनिंग साधण्यासाठी वर्तमानावर फोकस करायला हवं...

आपण जसे आपल्या मुलांना वाढवतो, त्याचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर इतका प्रदीर्घकाळ होत असतो की त्यांच्या मुलांनाही ते तशाच पद्धतीने वाढवत असतात... म्हणूनच पालकत्व हा एक वारसा आहे, ही एक परंपरा आहे. तिचा पाया हा अधिक डोळस असायला हवा. आपल्या मुलांकडून आपल्या फाजील अपेक्षा नसाव्यात हे तर सगळ्यांना समजलेलंच आहे, परंतु आपण अधिकाधिक व्यवहारी आणि निरपेक्ष राहून पालकत्वाकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की मुलं ही विशिष्ट टप्प्यावर चुका करणारच आहेत, हेळसांड करणारच आहेत, थोडासा आळस करणारच आहेत... आपण त्याबद्दल मुलांना सतत दूषणं देण्यात, टोमणे मारण्यात, शब्दांचे चाबूक मारण्यात अर्थ नाही. मुलांकडे जे नाही, त्यावर सतत बोलण्यापेक्षा मुलांकडे जे आहे, त्यावर सतत बोललं तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि आपल्यातले दोष दूर करण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करतात. आपण आपल्या मुलांच्या दोषांवर आपलं लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यांच्या गुणांवर जर लक्ष केंद्रित केलं तर आपलं पालकत्व हे सुसह्य होईलच, पण याचा परिणाम आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर होऊन आपला दृष्टिकोन हा अधिक सकारात्मक होईल हे नक्की!

sanjeevlatkar@hotmail.com

Web Title: Sanjeev Latkar Writes Inheritance Of Guardianship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanjeev Latkarsaptarang