अपशब्दांपासून मुलांना ठेवू दूर!

शिव्या ही सर्वांसाठीच वाईट गोष्ट आहे; पण मुलांसाठी ती जास्त वाईट आहे. शब्द खुंटले की माणूस शिव्यांकडे वळतो. मुलांचं तेच होतं.
Childrens
ChildrensSakal
Summary

शिव्या ही सर्वांसाठीच वाईट गोष्ट आहे; पण मुलांसाठी ती जास्त वाईट आहे. शब्द खुंटले की माणूस शिव्यांकडे वळतो. मुलांचं तेच होतं.

शिव्या ही सर्वांसाठीच वाईट गोष्ट आहे; पण मुलांसाठी ती जास्त वाईट आहे. शब्द खुंटले की माणूस शिव्यांकडे वळतो. मुलांचं तेच होतं. ज्या मुलांकडे शब्द नसतात ती मुलं शिव्यांकडे आणि शिव्यांकडून हिंसेकडे वळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांना अपशब्दांपासून दूर ठेवण्याची गरज आहे.

धुळे शहरातील एका शाळेमध्ये नुकताच ‘शिव्यामुक्त शाळा अभियान’ उपक्रम राबवण्यात आल्याचे वृत्त वाचले. हा उपक्रम राबवणाऱ्या सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन! शालेय मुलांमधली वाढती व्यसनाधीनता हा जसा चिंतेचा विषय आहे, तसाच शालेय मुलांमधील शिव्या देण्याचे वाढते प्रमाण हाही चिंतेचा विषय आहे...

बातमीनुसार या शाळेत काय घडलं? तर या अभियानात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने त्यांना येत असलेल्या किंवा ते देत असलेल्या शिव्या कागदावर आधी लिहून काढल्या. त्यानंतर शपथ देऊन ते कागद विद्यार्थ्यांकडून फाडून नष्ट करण्यात आले. थोडक्यात आपल्या जीवनातून शिव्यांचे उच्चाटन व्हावे, अशी इच्छा विद्यार्थ्यांनी या अभियानामार्फत व्यक्त केली... अशाप्रकारे संपूर्ण शाळा ही शिव्यामुक्त व्हावी, अशी इच्छा व्यवस्थापनाने आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन व्यक्त केली.

शाळेचं अभिनंदन अशासाठी की, विद्यार्थ्यांमध्ये सध्या काय सुरू आहे हे शाळा डोळसपणे पाहते आहे. सर्वसाधारणपणे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच आपल्याकडे कार्यवाही सुरू करण्याची प्रथा आहे; परंतु विद्यार्थ्यांमधील वाईट गोष्टी ध्यानात घेऊन त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या शाळेनं उचललेलं पाऊल कौतुकास्पद आहे.

घरामध्ये मुलांवर अनेक बंधनं असतात, धाक असतो. पालक काय म्हणतील ही भीती असते. शाळेमध्ये पोहोचल्यावर काही विद्यार्थी या सर्व दडपणापासून मुक्त होतात आणि आपलं वेगळं स्वरूप शाळेत आणि शाळेच्या परिसरात दाखवू लागतात. कारण तिथे त्यांना भरपूर मोकळीक असते. इथे आपल्याला जाब विचारणारे कोणीही नाही, अशी त्यांची भावना असते. दुसरीकडे शाळेच्या व्यवस्थापनाला आणि शिक्षकांच्या कार्यक्षेत्रालाही मर्यादा असतात. बहुसंख्य मुलांच्या तोंडात शिव्या असतील तर शिक्षक काय करणार? मुलं शिव्या देत असतील तर सर्वच पालक त्याकडे गांभीर्याने बघतीलच, याची शिक्षकांना हमी नसते. काही पालक त्याकडे कानाडोळा करतात, कारण पालक स्वतःच घरात मुलांसमोर अपशब्द किंवा शिव्या देत असतात... कधी कधी मुलांसमोर काही शिक्षकांच्या तोंडातूनही अपशब्द बाहेर पडतात. त्यामुळे शिव्या आणि अपशब्द ही रूटीनमधली गोष्ट होऊन बसते.

शिव्या ही सर्वांसाठीच वाईट गोष्ट आहे; पण मुलांसाठी ती विशेष वाईट आहे, कारण भाषा शिकण्याच्या संस्कारक्षम वयात मुलं चांगले चांगले शब्द आणि त्याचे प्रकटीकरण शिकण्याऐवजी शिव्या आणि शिव्यांचं प्रकटीकरण शिकतात... शब्द खुंटले की माणूस शिव्यांकडे वळतो. मुलांचं तेच होतं. चिंतेचा विषय केवळ शिव्यांपाशी संपत नाही. शिव्या ही हिंसेची सर्वसाधारणपणे सुरुवात असते. ज्या मुलांकडे शब्द नसतात ती मुलंही शिव्यांकडे आणि शिव्यांकडून हिंसेकडे वळण्याची शक्यता जास्त असते. आपण आज काही शाळांमध्ये नजर टाकली तर शाळांच्या बाहेर मुलांची भाषा आणि मुलांमधल्या मारामाऱ्या यांनी चिंताजनक स्वरूप प्राप्त केलं आहे. जे काही सुरू आहे ते शाळेबाहेर सुरू आहे, असं म्हणून काही शाळा त्याकडे दुर्लक्ष करतात आणि पालकांना तर कशाचीच कल्पना नसते. कारण सर्वच नसली तरी काही मुलं जशी मोठी होतात, तशी ती मुखवटे धारण करायला शिकतात. घरी कसं वागायचं, शाळेत कसं वागायचं आणि मित्रांमध्ये कसं वागायचं हे त्यांना व्यवस्थित समजतं आणि ते तिन्ही स्तरावर वेगवेगळी वर्तणूक करतात.

जेव्हा भांडण, मारामारी, हिंसा हे घरापर्यंत येतं तेव्हा पालकांना जाग येते. माझ्या परिचयामध्ये एका घरात आठवीतल्या मुलाने गंभीर स्वरूपाची मारामारी केली. शाळा सुटल्यावर त्याच्या मित्राला प्रतिस्पर्धी गटातील कोणीतरी त्याच्या मैत्रिणीवरून चिडवायला सुरुवात केली. म्हणून याच्या मित्राने शिव्या दिल्या. यावरून मोठ्या प्रमाणात भांडण सुरू झालं. शिवीगाळ झाली आणि या मुलाने प्रतिस्पर्धी गटाच्या मुलांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्रतिस्पर्धी गटातला एक मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला खोक पडली आणि त्यातून रक्तस्राव झाला...

काही घडलंच नाही अशा आविर्भावात ही मुलं आपापल्या घरी गेली; परंतु त्या जखमी मुलाच्या पालकांनी हे सर्वच प्रकरण गंभीरपणे घेतलं. ते शाळेत गेले. शिक्षकांना भेटले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या मुलाच्या घरी ते हजर झाले आणि आम्ही पोलिस कम्प्लेंट करणार आहोत, असा इशारा दिला तेव्हा या मुलाच्या पालकांचे धाबे दणाणले. ते घाबरले. प्रकरण हाताबाहेर जायला नको म्हणून त्यांनी माफी मागितली. औषधोपचाराचा खर्च देण्याची तयारी दाखवली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मध्यस्थी केल्यावर हे प्रकरण मिटलं; परंतु ते वर्षभर तसंच धुमसत होतं. त्यानंतर पुन्हा एकदा मारामारी झाली...

मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता, विवेक, योग्य काय किंवा अयोग्य काय हे समजण्याची क्षमता ही खूप कमी होत गेली तर मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास हा जवळपास खुंटला जातो. त्यामुळे शिव्या या केवळ वरकरणी घेऊन चालत नाही. शिव्यांचा संबंध हा व्यक्तिमत्त्वाशी असतो. व्यक्तिमत्त्व रोगट बनण्याची, हिंसक बनण्याची ती सुरुवात असू शकते. अनेक मुलं केवळ फॅशन म्हणून, आपणही मागे नाही हे दाखवण्यासाठी शिव्या देतात आणि ते त्या पॉईंटवरून माघारीही फिरत असतात. कारण त्यांना त्यांच्या करिअरची, स्वतःच्या विकासाची उत्तम जाण असते. पालकांचा दबाव असतो. शिक्षकांचा दरारा असतो, पण अशी मुलं ही अपवादात्मक. बहुतेक मुलं ही शिव्या आणि मारामाऱ्या यांच्यात वाहून जाण्याची शक्यता जास्त असते...

धुळ्यातील शाळेने राबवलेला उपक्रम म्हणून खूप महत्त्वाचा आणि कौतुकास्पद ठरतो. जेव्हा शाळा या काही अंशी पालकांच्या भूमिकेत जातात आणि पालक जेव्हा काही अंशी शिक्षकांच्या भूमिकेत जातात, तेव्हाच विद्यार्थ्यांच्या जीवनात समतोल तयार होतो. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि करिअरच्या प्रगतीमध्ये हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com