एका आईचा अंतर्मुख करणारा प्रश्न!

पालकत्वामध्ये आई आणि वडील या दोघांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे, हे मी माझ्या कार्यशाळेत समजावून देत होतो. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणेसुद्धा मी सांगितली.
Mother
MotherSakal
Summary

पालकत्वामध्ये आई आणि वडील या दोघांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे, हे मी माझ्या कार्यशाळेत समजावून देत होतो. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणेसुद्धा मी सांगितली.

आपण आपल्याच कुटुंबाचा विचार करत असतो. पण भारतासाठी अहोरात्र लढणाऱ्या, सीमेवर पहारा देणाऱ्या, भारताचे रक्षण करणाऱ्या लाखो सैनिकांच्या कुटुंबाचं काय? तेही सर्व त्यांच्या मुलांचे पालकच आहेत ना? पण ते देशाचे पालक झाल्यामुळे आज घराचे पालक होण्याला वेळेची मर्यादा पडते आहे. या पार्श्वभूमीवर एका आईचा प्रश्‍न अंतर्मुख करणारा आहे...

पालकत्वामध्ये आई आणि वडील या दोघांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे, हे मी माझ्या कार्यशाळेत समजावून देत होतो. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणेसुद्धा मी सांगितली. पालकत्व ही खूप गुंतागुंतीची जबाबदारी आहे. आई-वडील झाल्यानंतर आपोआपच आपल्यावर पालकत्वाची जबाबदारी येते आणि नव्याने जन्मलेले आई-वडील पालकत्वाचे धडे आजूबाजूला पाहून पाहून गिरवू लागतात. प्रचलित प्रथेनुसार, रुढीनुसार, संकेतानुसार ते आपल्या मुलांना वाढवू लागतात.

मात्र पालकत्वामध्ये आईइतकीच बाबांची भूमिकासुद्धा महत्त्वाची असते. बाबा नोकरी करत असल्यामुळे घरात मुलांकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाही, अशा प्रकारची तक्रार, समस्या, गाऱ्हाणे हे मला नेहमीच ऐकू येत असते. मुलांच्या संगोपनात आईइतकीच वडिलांचीसुद्धा इन्व्हॉलव्हमेंट ही महत्त्वाची असते. वडिलांचं जराही दुर्लक्ष झालं तर सर्व जबाबदारी ही आईवर येऊन पडते आणि आईची खूप ओढाताण होते. त्यात आईसुद्धा नोकरी करत असेल, तर तिच्यावर जबाबदारी दुप्पट पडते. पालकत्वाच्या जबाबदारीत वडिलांचा सहभाग नाममात्र असेल, तर मुलांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. शाळा, क्लास, मुलांचा घरचा अभ्यास, मुलांची वाढ, मुलांचं मूल्य शिक्षण, मुलांवरचे संस्कार, मुलांना खाऊ-पिऊ घालणे, मुलांचे कोडकौतुक करणे, मुलांचे हट्ट पुरवणे, प्रसंगी मुलांना रागवणे, मुलांना समजावून सांगणे, मुलांचं मनोरंजन करणे, मुलांच्या सर्वांगीण वाढीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणे, मुलांना शिस्त लावणे, मुलांमध्ये मानसिक स्थैर्य राखणे, मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना राखणे ही सर्व जबाबदारी एकट्या आईवर येऊन पडते. ते योग्य नव्हे. म्हणून आपण नोकरी करतो हे लक्षात घेऊनसुद्धा वडिलांनी विशेष वेळ काढून मुलांना शिस्त लावण्यासाठी, मुलांवर प्रेम करावे. अभ्यासावर लक्ष ठेवण्यासाठी वेळ काढायलाच हवा, हे माझ्या कार्यशाळेचं सूत्र होतं. त्यासाठी मी अनेक दाखले दिले.

माझं बोलणं संपलं. मग माईक श्रोत्यांमधून फिरायला लागला आणि पालक त्यांच्या वेगवेगळ्या शंका विचारू लागले.

‘आम्ही दहा ते बारा तास कामानिमित्त बाहेर असतो. घरी येतो तेव्हा खूप थकून जायला होतं. आजकाल स्पर्धेचं युग आहे. नोकरीत रोज आपली कामगिरी सिद्ध करावी लागते. त्यावर आमचं इन्क्रिमेंट, इन्सेंटिव्ह, बोनस हे ठरतं. कामात जराही कुचराई झाली, तर नोकरीवर गदा येण्याची शक्यता असते... अशा परिस्थितीत पूर्ण जाणीव असूनसुद्धा घराकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. यावर तोडगा काय? ऑफिसमध्ये घरचं कारण सांगून चालत नाही. रजा अजिबात नसतात. तुम्ही सांगा मी काय करू?’, एका वडिलांनी कळकळीनं प्रश्न विचारला.

‘तुम्हाला नोकरीचं टेन्शन येतं का?’, मी त्या पालकांना विचारलं. ते ‘हो’ म्हणाले. मी म्हटलं, ‘बहुतेक पालकांना कामाचं, नोकरीचं, स्वतःला सिद्ध करण्याचं टेन्शन असतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण नोकरी टिकवण्यासाठी धडपडत असतो. नोकरीतली जबाबदारी कशीबशी पार पाडण्याकडे आपला कल असतो. आपल्यापैकी अनेक जण आपलं काम एन्जॉय करत नाहीत. मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी किती जण स्वतःचं काम एन्जॉय करता? नोकरीतल्या कामांमध्ये किती जणांना आनंद मिळतो?’’

माझ्या या प्रश्नावर फार थोडे हात वर आले. मी म्हणालो, ‘लक्षात घ्या, नोकरीत स्ट्रेस आला, की तो सर्व स्ट्रेस हा आपोआपच पालकत्वावर येतो आणि तुमचं पालकत्वसुद्धा बिघडू शकतं. कारण तुम्हाला कुठलाच स्ट्रेस सहन होत नाही. त्यामुळे पालकत्वाचाही तुमच्यावर स्ट्रेस येतो. तुम्ही जे काम करता ते मनापासून केलं, आनंदाने केलं तर तुम्हाला थकवा निम्म्यानेपण येणार नाही! घरी आल्यावरसुद्धा तुम्ही फ्रेश असाल आणि मग तुम्हाला मुलांबरोबरचा आनंद द्विगुणित करता येईल... पालकत्व ही नोकरी नाही, आहे तो एक आनंद आहे! मुलांबरोबर आपल्याला वेळ मिळणं हा आपल्या आनंदाचा भाग आहे, या मानसिकतेतून जर आपण पालकत्वाकडे बघितलं तर तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. मुलांबरोबरच सहवास तुमच्यात ऊर्जा निर्माण करेल...’’

माझ्या म्हणण्यावर पालकांनी मनापासून प्रतिसाद दिला आणि जोरदार टाळ्याही दिल्या. म्हणजे माझं म्हणणं वडील मंडळींपर्यंत व्यवस्थित पोहोचलेलं होतं! अनेक बाबांच्या चेहऱ्यावर मी आनंद पाहत होतो... एवढ्यात एका आईने प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला. त्यांच्यापर्यंत माईक पोहोचला. ती आई बोलू लागली...

‘आमची दोन मुलं आहेत. मोठा मुलगा आठवीत आहे आणि मुलगी पाचवीत आहे. मुलगा आता आठवीला गेल्यामुळे जाणता झाला आहे... पण वयाप्रमाणे कधीतरी हट्ट करतो. त्यामुळे माझीपण चिडचिड होते. अशा वेळी मला त्याचे बाबा बरोबर असायला हवेत, असं वाटतं... पण मुलांचे बाबा लष्करात असतात. त्यांची नेमणूक कायम बॉर्डरवर असते. त्यामुळे आमच्याशी त्यांचा फार कमी संपर्क असतो. मुलांची जबाबदारी माझ्यावरच येते. घरी सासू-सासरे आहेत; पण ते वृद्ध आहेत. मला त्यांचंही बघावं लागतं... तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे, की मुलांना त्यांचे बाबा हवे असतात. मलासुद्धा खूपदा वाटतं की मुलांना माझ्याइतकीच बाबांचीही गरज आहे; पण माझ्या मिस्टरांची नोकरीच अशी आहे, की ते अनेक दिवस घरापासून लांब असतात आणि त्यांची इच्छा असली, तरी ते घरच्यांबरोबर वेळ घालवू शकत नाहीत. अशा वेळी आमच्यासारख्या कुटुंबांनी काय करायचं?’

त्या आईने माईक ठेवला आणि संपूर्ण पटांगण अक्षरशः नि:शब्द झालं.

तिचा प्रश्न काळीज हलवून टाकणारा होता...

आपण आपल्याच कुटुंबाचा विचार करत असतो. आपल्या कुटुंबापुरतं बघत असतो; पण भारतासाठी अहोरात्र लढणाऱ्या, सीमेवर पहारा देणाऱ्या, भारताचे रक्षण करणाऱ्या लाखो सैनिकांच्या कुटुंबाचं काय? तेही सर्व त्यांच्या मुलांचे पालकच आहेत ना? पण ते देशाचे पालक झाल्यामुळे आज घराचे पालक होण्याला वेळेची मर्यादा पडते आहे. अशा वेळी आपण काय करायला हवं?

मी माईक हातात घेतला. मला उत्तर सुचत नव्हतं... ‘‘वडील दूर असल्यामुळे त्या आईवर किती जबाबदाऱ्या येऊन पडतात, याची आपण कल्पना करू शकतो... या आईच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही... कारण आपण आपल्याच कुटुंबापुरतं बघत आलेलो आहोत.. पण मला असं वाटतं, की आज आपण सर्वांनीच डोळे उघडायला हवेत आणि आपल्या आजूबाजूला अशी अनेक कुटुंबं असू शकतात, ज्यांना आपल्या मदतीची गरज असू शकेल. समजा, आपल्या मुलांच्या वर्गात कुणी सैनिकाची मुलं असतील, तर त्यांना सर्व प्रकारची मदत करणं, हे आपलं पालक म्हणून कर्तव्य आहे. घरचा अभ्यास असेल, मुलांचा सर्वांगीण विकास असेल, खेळ असतील, पालक सभा असेल... असे अनेक प्रसंग असतात... जिथे आपण अशा कुटुंबांना मदत करू शकतो. खरं म्हणजे ही मदत नसून हे आपलं कर्तव्य आहे... आपण आपल्या मुलांइतकाच सैनिकांच्या मुलांचाही प्राधान्याने विचार करायला हवा...’

माझ्या म्हणण्यावर पुन्हा एकदा पटांगणात शांतता पसरली. मी त्या आईला उद्देशून म्हटलं की, ‘‘आई, तुम्ही एकट्या नाही आहात. इथले सर्व पालक तुमच्यासोबत आहेत. तुम्ही कधीही हाक मारा, हे सगळे पालक तुमच्या मदतीला धावून येतील. कारण आम्ही तुमच्या कुटुंबाचे ऋणी आहोत. आम्ही कृतज्ञ आहोत...’

मी स्टेजवरूनच लवून त्या आईला नमस्कार केला. सर्व पालकांनी टाळ्यांच्या गजरात त्या आईला अभिवादन केलं. जणू माझ्या म्हणण्याला पुष्टी दिली.

आपण भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करतोय. त्यानिमित्ताने मला पुन्हा एकदा त्या आईचा निरुत्तर करणारा प्रश्न आठवला. आपल्या देशाच्या पालकांसाठी आपण काहीतरी करायला हवं, ही कृतज्ञतेची भावनाही जागी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com