संकल्प पालकांचे... नव्या वर्षाचे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकल्प पालकांचे... नव्या वर्षाचे!

संकल्प पालकांचे... नव्या वर्षाचे!

२०२१ साल पुन्हा कोरोनाच्या कल्लोळात बुडून गेलं; मात्र कोरोनामुळेच आपण अनेक गोष्टी शिकलो. मुलांचं जवळून निरीक्षण करता आलं. आपलं आत्मपरीक्षण करता आलं. २१ सालाची ही मोठी फलनिष्पत्ती आहे. कुठल्याही पालकाने या सालाचं ऋणी असलंच पाहिजे. आपल्या वाट्याला जे आलंय ते स्वीकारून प्रत्येक दिवस आनंदात साजरा करणं हे आता अनिवार्य ठरलं आहे. यापुढच्या काळात आपण दुःखाचा बाऊ न करता येणारा प्रत्येक दिवस मुलांसोबत आनंदाने साजरा करायला हवा. कारण आनंद हेच जीवनाचं सार आहे. मुलांसाठी तर ते चैतन्य आहे...

रत्या वर्षाला निरोप देताना आपण तो कृतज्ञभावनेने दिला तरच नव्या वर्षाच्या पोतडीत सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद भरभरून असणार आहे.

वर्ष हे एक मोजमाप आहे. ३६५ दिवसांचे एक वर्ष होते आणि ३१ डिसेंबरला इंग्रजी वर्ष संपून १ जानेवारीला नवं वर्ष सुरू होतं हे आपण जाणतोच. म्हणून आपण १ जानेवारीला नव्या वर्षाचं स्वागत करतो. नव्या वर्षाचं स्वागत करताना मागच्या वर्षाने आपल्याला काय चांगलं दिलं याचा विचार व्हायला हवा. बहुतेक वेळा आपण वाईट किंवा अप्रिय स्मृती मनात ठेवतो आणि चांगल्या गोष्टी मनातून अन् हातातून निसटून जातात. तसं व्हायला नको. आपण सरत्या वर्षाच्या चांगल्या आठवणी आपल्यापाशी जपून ठेवायला हव्यात आणि नकोशा आठवणींचं ३१ डिसेंबरला विसर्जन करायला हवं. जोपर्यंत आपण कटू स्मृती विसरत नाही तोपर्यंत आपण नव्या दिवसाचं, नव्या घटनांचं, नव्या आनंदाचं नव्याने स्वागत करू शकणार नाही. नवीन वर्ष म्हणजे काय असतं? नवीन वर्ष म्हणजे मनसुबे असतात. आपली स्वप्नं असतात. आपले संकल्प असतात. आपल्या इच्छा-आकांक्षा असतात. या सर्वच्या सर्व आपल्याला येणाऱ्या ३६५ दिवसांत पूर्ण करायच्या असतात. म्हणजेच आपली सगळी मदार ही येणाऱ्या वर्षावर असते. २०२२ या सालावरही आपली बरीच मदार असणार आहे. कारण २०२१ साल हे पुन्हा कोरोनाच्या कल्लोळात बुडून गेलं; मात्र याच कोरोनामुळे आपण अनेक गोष्टी शिकलो. मुलांचं जवळून निरीक्षण करता आलं. पालकांना एकमेकांना समजून घेता आलं. एकमेकांच्या मर्यादा समजल्या आणि आपली मुलं नेमकी कशी शिकतात, ती काय विचार करतात, त्यांच्या सवयी कशा आहेत हे जवळून पाहता आलं. कदाचित आपण केलेल्या चुकांचा लेखाजोखा घेता आला. आत्मपरीक्षण करता आलं; अन्यथा मुलांचा इतका प्रदीर्घ आणि निकटचा सहवास आपल्याला कधीच लाभू शकला नसता. करिअरच्या पातळीवर किंवा अर्थार्जनाच्या पातळीवर प्रत्येकाला फटका जरूर बसला, पण याच काळात आपलं कुटुंब आपल्याला जवळून समजून घेता आलं. २०२१ सालाची ही मोठी फलनिष्पत्ती आहे. कुठल्याही पालकाने २०२१ या सालाचं ऋणी असलंच पाहिजे. म्हणूनच २०२१ साली आपल्याला जे धडे मिळाले, जे ज्ञान मिळालं, ते २०२२ मध्ये आपल्याला अधिक प्रभावीपणे वापरता आले पाहिजे. पालक म्हणून आपले नव्या वर्षाचे कोणकोणते संकल्प असू शकतात?

  • कुटुंबातली मुलं समंजस आणि जाणती झाली की त्यांना स्वतःची स्पेस लागते. त्यांना सतत आपल्या नजरेखाली ठेवलं तर त्यांचा कोंडमारा होतो आणि ते पुरेसे फुलत नाहीत. म्हणून मुलांना आवश्यक तेवढी स्पेस द्यायला हवी.

  • वर्क फ्रॉम होम करताना अनेक पालकांच्या कामाच्या पद्धती, कामाची शैली आणि कामातील चुका मुलांनी पाहिल्या आहेत. मुलं आपलं निरीक्षण करतच होती. हे लक्षात घेऊन जशा आपल्याला मर्यादा असतात तशाच मुलांनाही असू शकतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नव्या वर्षात आपण मुलांच्या मर्यादा मान्य करायला हव्यात. त्या मनापासून स्वीकारायलाही हव्यात.

  • कोरोनाच्या काळात आपल्या सगळ्यांनाच एक प्रकारचं दडपण होतं. टेन्शन होतं. नैराश्य आलं होतं... आणि स्वतःबद्दल, परिस्थितीबद्दल अनिश्चितता तयार झाली होती. आपल्याला आयुष्याचा विचार करताना एक नवं परिमाण सापडलं आणि या परिमाणामुळे आपल्याला हेही समजलं, की आयुष्य हे आनंदाने आणि हसत-खेळत जगायला हवं. आपल्या वाट्याला जे आलंय ते स्वीकारून प्रत्येक दिवस आनंदात साजरा करणं हे आता अनिवार्य ठरलं आहे. यापुढच्या काळात आपण नैराश्याच्या गर्तेत न सापडता आणि दुःखाचा बाऊ न करता येणारा प्रत्येक दिवस हा मुलांसोबत आनंदाने साजरा करायला हवा. कारण आनंद हेच जीवनाचं सार आहे. मुलांसाठी तर ते चैतन्य आहे. मुलांची ती संजीवनी आहे. आनंदात असतील तर मुलं खूप छान फुलतात. खूप छान खेळतात आणि त्यांचा अभ्यासही अतिशय दर्जेदार होऊ शकतो.

  • मागील वर्षाने आपल्याला दिलेला आणखी एक महत्त्वाचा धडा म्हणजे आयुष्य एकसुरी झालं की ते कंटाळवाणं होतं हे आपल्याला समजलं. आपण सगळे घरात बसलो होतो. आपल्या फिरण्याला आणि मुलांच्या खेळण्याला मर्यादा होत्या. टीव्ही किती पाहणार असा प्रश्न होता. वाचनासाठी साहित्य उपलब्ध नव्हतं आणि त्यामुळे आयुष्य एकसुरी झालं, बेचव झालं. अशा आयुष्याचा साहजिकच कंटाळा येतो. कारण त्यातून आपल्याला पुरेसा जीवनरस मिळत नाही. जगण्यासाठी जीवनरस लागतो. हा जीवनरस म्हणजे अर्थातच आयुष्यातला आपला रस. तो अनेकविध गोष्टी केल्यामुळेच मिळतो. एकसुरी आयुष्यातून तो मिळत नाही. म्हणूनच तुम्ही स्वतः आयुष्य एकसुरी करू नका आणि मुलांसाठीसुद्धा तसे आयुष्य ठेवू नका. अभ्यास एके अभ्यास असं करण्यात अर्थ नाही. अभ्यासाबरोबरच जीवनाची इतर अंगे मुलांना समजली पाहिजेत यासाठी आपण नव्या वर्षात नक्की प्रयत्न करू.

  • तुम्ही स्वतः या काळात तुमच्या मित्र-मैत्रिणींना मिस केलं असेल. तुम्ही नातेवाईकांना नियमित भेटू शकला नसाल. आपल्याला कदाचित या गोष्टींचं महत्त्व तेवढं नसेलही; परंतु मुलांना त्यांचे मित्र भेटणं हे अत्यावश्यक असतं. मुलं आपल्याबरोबर जेवढी फुलतात त्याहीपेक्षा जास्त ती मित्रमंडळींबरोबर फुलतात आणि वाढतातही. म्हणून मुलांनी चांगली संगत ठेवावी आणि अशा चांगल्या मित्र-मैत्रिणींसोबत काही काळ व्यतीत करावा. ही त्यांच्या वाढीची गरज असते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. बालपणात मैत्री ही फार महत्त्वाची असते. मुलांसाठी हा मैत्रीचा सुंदर कप्पा आपण अलगदपणे जपला पाहिजे.

  • घरात बसून बसून आणि वारेमाप खाऊन कोरोनाच्या काळात अनेक मुलांचे वजन वाढण्याचे प्रकार अनेक घरांमध्ये घडले आहेत. जोपर्यंत मुलं आपलं ऐकतात तोपर्यंत आपण त्यांच्या चौरस आणि संतुलित आहाराबद्दल आग्रही असलंच पाहिजे. त्यांच्या शारीरिक हालचाली वाढाव्यात, त्यांना व्यायाम घडावा, यासाठी आपण कटाक्षाने प्रयत्न करायला हवेत. मुलं कुरबूर करतीलही; परंतु त्यांना आपण संतुलित आहाराचं आणि व्यायामाचं महत्त्व पटवून द्यायला हवं!

  • ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आणि ते ऑनलाईन जास्त राहू लागले. कदाचित त्यांना ऑनलाईन राहण्याची सवय लागू शकते. तशी ती लागली असेल तर समंजसपणे आणि शांतपणे त्यांना ऑफलाईन ॲक्टिव्हिटीचे पर्याय आपण उपलब्ध करून द्यायला हवेत. सध्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे; मात्र सध्याची लाट ओसरली की मुलांबरोबर आपण शक्य तेवढा वेळ हा ऑफलाईन ॲक्टिव्हिटीमध्ये व्यतीत करायला हवा. उदा. खेळ, गप्पा, पर्यटन इत्यादी...

हे काही प्राथमिक संकल्प आहेत, पण आपणही पालक म्हणून नव्या वर्षासाठी अतिशय सुंदर संकल्प करू शकता आणि त्यांची भेट आपल्या मुलांना नव्या वर्षात देऊ शकता... आपल्या सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

sanjeevlatkar@hotmail.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top