आदर्श कुणाला म्हणायचं?

आपल्याला आपल्या आदर्शांचा शोध स्वतःहून घ्यावा लागतो. तुम्ही कोणाला आदर्श मानता, यावर तुमचं भवितव्य ठरतं.
Ideal
IdealSakal
Summary

आपल्याला आपल्या आदर्शांचा शोध स्वतःहून घ्यावा लागतो. तुम्ही कोणाला आदर्श मानता, यावर तुमचं भवितव्य ठरतं.

तुम्हाला तुमच्या आदर्शांमधल्या कोणत्या गुणांचं आकर्षण वाटतं, हे खूप महत्त्वाचं आहे. सध्या ग्लॅमरस व्यक्ती आदर्शाची जागा घेऊ लागल्या आहेत; पण ग्लॅमर म्हणजे आदर्श नव्हे. झगमगाट म्हणजेही आदर्श नव्हे. जे वरवर दिसतं ते आदर्श मानता येत नाही. आदर्श हा प्रदर्शित होणाऱ्या प्रतिमेत नसून आंतरिक गाभ्यात दडलेला असतो.

आपल्याला आपल्या आदर्शांचा शोध स्वतःहून घ्यावा लागतो. तुम्ही कोणाला आदर्श मानता, यावर तुमचं भवितव्य ठरतं. आपल्या आयुष्यात योग्य किंवा अयोग्य आदर्शांची प्रतिष्ठापना करून आयुष्याची कुंडली तुम्हीच लिहीत असता. तुम्हाला जो आदर्श भावतो, तो का भावतो? हे जेव्हा आपल्याला नीट समजतं, तेव्हा आपल्या मनात आपल्या आदर्शाची खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापना होते. हा आदर्श एकच असेल असं नव्हे. आपल्या आयुष्यात असे अनेक आदर्श येऊ शकतात; पण आपल्या आयुष्यात आदर्श हा असावाच लागतो. कारण जेव्हा जेव्हा आपल्याला पेचप्रसंगाला, संकटाला, अडचणीला सामोरं जावं लागतं, तेव्हा या परिस्थितीत आपला आदर्श कसा वागला असता किंवा आपल्याला आपल्या आदर्शाने काय सल्ला दिला असता, याचा विचार करूनच आपण पुढचं पाऊल टाकतो. इतकंच नव्हे, तर आयुष्यात पुढे जाताना, यश मिळवताना आपण हेच आदर्श डोळ्यापुढे ठेवलेले असतात. ते ज्या प्रकारे यश मिळवतात किंवा ते ज्याला यश मानतात, तेच आपलं इप्सित होऊन बसतं. आदर्श आपले प्रेरणा असतात, मार्गदर्शक असतात.

आपला आदर्श जर चुकला, तर आपल्या आयुष्याची दिशाही काही काळापुरती का होईना, पण चुकू शकते किंवा कदाचित कायमची भरकटू शकते. त्यामुळे आदर्श हा आपल्याला तपासूनच घ्यावा लागतो. लहानपणीचे आपले आदर्श वेगळे असू शकतात. वयपरत्वे आदर्श बदलतात. आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण आदर्श डोळ्यापुढे ठेवतो. तोच आदर्श भंग पावलेला त्याच डोळ्यांनी पाहतो. असे आदर्श विस्मरणात जातात. नवे आदर्श जन्म घेतात. याचं कारण असं आहे, की प्रवाही जीवनामध्ये आपल्याला जे काही अनुभव येत असतात, त्यानुसार आपण आपल्या आदर्शांना फॉलो करत असतो. थोडक्यात आपले आदर्श ही आपल्या जीवनाची दिशा आणि उद्दिष्टही ठरवतात. आपल्या आयुष्याचं साध्य आणि साधनही ठरवतात. आदर्श आपल्या जीवनावर खूप प्रभाव गाजवत असतात. कदाचित तुम्ही त्यांच्याकडे आदर्श म्हणून पहात नसालही; परंतु तुमच्यावर अशा व्यक्तींचा जो प्रभाव असतो, तो अप्रत्यक्षपणे आदर्शाचाच असतो. म्हणून आदर्शांची निवड आपण कोणत्या निकषांवर करतो, तशी ती का करतो, याचा आपल्याला नीट विचार करता यायला हवा.

जो खूप वाजतो, जो खूप गाजतो, जो रोज टीव्हीवर दिसतो, माध्यमांमध्ये झळकतो, ज्याच्याबद्दल रोज चर्चा होते, अशी व्यक्ती ही आदर्श असू शकते का? नुसत्या चकाकीला किती किंमत द्यायची? आजचा जमाना हा लाईक्स, फॉलोवर्स यांचा आहे. ज्यांचे फॅन फॉलोइंग खूप आहे, त्यांना मोठं मानणाऱ्या व्यक्तींची संख्या बघता बघता वाढत आहे. ट्रेण्ड हा बळकट ठरतो आहे. प्रवाह कुठे वाहतो आहे, तो तसा का वाहतो आहे, प्रवाहाचे तसे वाहणे योग्य आहे का, प्रवाहाची दिशा चुकते आहे का... याचा बिलकुल विचार न करता स्वतःला प्रवाहात ढकलून, पाहिजे तिथे सोडून देण्याची वृत्ती ही आज आपण बळावलेली पाहतोच आहोत.

असं का होतं? बरेच जण प्रवाहाबरोबर वाहत का जातात? बहुतेकदा याचे मुख्य कारण असं की आपण आपली दिशाच ठरवलेली नसते... जसे आपल्याला आपले विचार तपासून बघावे लागतात, तसेच आपल्याला आपले आदर्शसुद्धा तपासून बघावे लागतात. तुम्ही ज्यांना आज आदर्श मानता, ते उद्या तुमचा आदर्श असतीलच असं नाही. असं का होतं? तर काही तत्कालीन कारणामुळे, वयाच्या अपरिपक्वतेमुळे, वैचारिक बैठक तयार न झाल्यामुळे, भावनिकतेच्या आधारावर आपण आपल्या आदर्शांची निवड करतो. हेही स्वाभाविक म्हणावं लागेल. कारण असं ठरवून कोणी आदर्श वगैरे निवडत नाही. ते आपोआप आपले आदर्श होतात. कारण आपल्याला ते सतत समोर दिसतात आणि आपल्याला त्यांच्यासारखा आयुष्य जगायला मिळावं, अशी अनिवार इच्छा असते. प्रत्यक्षात होतं असं की आपले आदर्श जर स्वतःच तकलादू पायांवर उभे असतील, तर काळाच्या ओघात ते स्वतः उन्मळून पडतात आणि आपण दिशाहीन होतो. अशी दिशाहीन माणसं मग कुठल्याही प्रवाहाबरोबर वाहून जाण्यासाठी सज्ज होतात. प्रवाहाबरोबर वाहून जाणं सोपंही असतं. कारण त्यात फारसं काही करावं लागत नाही आणि आपण सर्वांबरोबर आहोत, याचं सुख मनाला लाभत असतं. प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपण कुठे चाललो आहोत? कशासाठी चाललो आहोत? आपण प्रवाहपतित होतोय का? आपण आपल्या आदर्शांची निवड करण्यात चूक केली का? आपले आदर्श कसे असायला हवेत? असे अस्वस्थ करणारे प्रश्न आपल्याला पडायला लागतात. हे प्रश्न पडू लागले की समजावं की आपण खऱ्या आदर्शांच्या शोधासाठी निघालो आहोत...

तुम्हाला तुमच्या आदर्शांमधल्या कोणत्या गुणांचं आकर्षण वाटतं, हे खूप महत्त्वाचे आहे. वर म्हटल्याप्रमाणे, सध्या ग्लॅमरस व्यक्ती आदर्शाची जागा घेऊ लागल्या आहेत; पण ग्लॅमर म्हणजे आदर्श नव्हे. झगमगाट म्हणजेही आदर्श नव्हे. जे वरवर दिसतं ते आदर्श मानता येत नाही. आदर्श हा प्रदर्शित होणाऱ्या प्रतिमेत नसून आंतरिक गाभ्यात दडलेला असतो. म्हणून त्या आदर्शाचा गाभा तपासायला हवा. त्याचा आत्मा तपासायला हवा. आदर्श ही आपली शक्तिस्थानं असतात, जी आपल्याला ऊर्जा देतात. जी आपल्याला प्रेरणा देतात. जी आपल्याला यशस्वी होण्यासाठी झपाटून टाकतात. आदर्शाने श्रीमंत असू नये असं नव्हे. आदर्शाने सुप्रसिद्ध असू नये, असेही नव्हे. पण एखादी व्यक्ती केवळ श्रीमंत आहे, म्हणून ते तुमचा आदर्श होत असतील, तर तुम्ही धोक्याच्या मार्गावर चालत आहात. ती व्यक्ती ज्या कारणांमुळे आज श्रीमंत झाली आहे, ती कारणं कोणती आहेत, हे तपासायला आपण शिकलं पाहिजे. आपल्याला हेही तपासायला पाहिजे, की आपल्या आदर्शाने या समाजासाठी काय केलं? त्याचे कॉन्ट्रिब्युशन किती आहे? तो समाजासाठी, देशासाठी आणि जगासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या मानतो आहे? त्याचं प्राधान्य कशाला आहे? त्याची मूल्य कोणती आहेत? आज सर्वांत श्रीमंत असणारे रतन टाटा हे कितीतरी लोकांचे, तरुणांचे आदर्श आहेत. ते केवळ श्रीमंत आहेत म्हणून ते आदर्श नव्हेत, तर त्यांची मूल्य, त्यांची माणुसकी, त्यांची मानवता, त्यांची विशाल दृष्टी, त्यांचं कार्य, त्यांचा उत्साह, नवीन तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांची व्यावसायिक दृष्टी, त्यांची गरुडझेप घेण्याची जिद्द या सगळ्यामुळे ते आपले आदर्श बनतात.

या न्यायाने केवळ गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली... लाल दिव्याची गाडी मिळाली... कोणाच्या तरी मागे लाखो तरुण लागले... कुणाला तरी खूप प्रसिद्धी मिळाली... कुणीतरी खूप लोकप्रिय झालं... कुणाच्या भाषणाला लाखो श्रोते गर्दी करू लागले... कोणाचे तरी शोज हाऊसफुल्ल जायला लागले... कोणाकडे प्रचंड पैसे आले... कुणाची लाइफस्टाइल अत्यंत श्रीमंत आहे... म्हणून यातलं कोणीच आदर्श ठरू शकत नाही!

आपले आदर्श हे आपली दिशा ठरवतात (आणि चुकले तर दशाही!). त्या अर्थाने आपल्या आदर्शांची निवड आपण डोळसपणे करायला हवी. कारण शेवटी तेच आपल्या आयुष्याचे खरे दिग्दर्शक असतात!

स्पर्धा परीक्षा आत्मविकास अभियान

तुमचे प्रश्न groomandgrow@gmail.com या ई-मेलवर पाठवा आणि प्रेरणादायी मार्गदर्शन मिळवा... आम्ही प्रश्नकर्त्याचे नाव गोपनीय ठेवू.

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com