Sanjiv Bhatt : ... या वेदनेबरोबर त्यांची पत्नी कशी जगत असेल?

Shweta Bhatt
Shweta BhattPhoto By Heramb Kulkarni

गुजरातमधील पोलीस अधिकारी संजीव भट यांना ४ वर्षांपूर्वी अटक झाली व त्यांना तेव्हापासून जामीन होत नाही हे जेव्हापासून कळाले तेव्हापासून संजीव यांच्याविषयी विलक्षण सहानुभूती वाटत होती. ५ सप्टेंबर २०१८ ला त्यांना अन्यायकारक अटक झाल्यापासून दर शिक्षकदिनी त्यांची आठवण येते. मध्यंतरी एकदा निरंजन टकले यांच्याकडून संजीव यांच्या पत्नी श्वेता भट यांचा फोन no घेऊन फोनही केलेला. सतत संजीव यांचं फेसबुक पेज व त्यावरील श्वेता यांच्या आर्त वेदना मांडणाऱ्या पोस्ट सतत वाचत होतो. काही पोस्ट अनुवाद करत होतो.त्यामुळं एकदा त्यांच्या पत्नीला भेटावं असं तीव्रतेने वाटायचं. बालविवाहाच्या अभ्यासाच्या निमित्ताने अहमदाबादमार्गे  राजस्थानला जाताना आवर्जून वेळ घेऊन श्वेता यांना भेटलो..सोबत अहमदाबाद येथील कार्यकर्ते संजय भावे होते.

अतिशय सुंदर कलात्मक घर. जुन्या वाड्याचे दार घराला बसवण्यापासून सुंदर फुलझाडी आणि घरातील सुंदर जुन्या वस्तू मोठी  बुद्ध मूर्ती हे सारं सारं कुटुंबाची कलासक्त जाणिवा दाखवणारी..पण त्या घरातली उदासी आणि सन्नाटा अक्षरश: अंगावर येतो..ती शांतता अस्वस्थ करते...घराचं सौंदर्य आणि कलात्मकता उलट टोचायला लागते...श्वेता भट हॉलमध्ये आल्यावर थोडेसे बरे वाटले..अगदी सहज इंग्रजी हिंदीत बोलू लागल्या. अशा व्यक्तींना अनेकदा तेच तेच प्रश्न विचारले जातात. त्यातून ते वैतागून जातात व पुन्हा पुन्हा जखम भळभळते त्यामुळे काहीच न विचारता परिचय देऊन महाराष्ट्रात त्या कुटुंबाविषयी किती प्रेमाची भावना आहे, सोशल मिडियावर मी अनुवाद केलेल्या पोस्ट व त्याला  कशा प्रकारे पाठिंबा दिला जातो ? हे सांगितलं तेव्हा विलक्षण समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं आणि खुलून बोलू लागल्या...

Justice for Sanjiv Bhatt
Justice for Sanjiv BhattPhoto By Heramb Kulkarni

बोलताना अधूनमधून आवाज कातर होत होता, डोळ्यात पाणी येत होते आणि पुन्हा सावरून कणखरपणे बोलत होत्या.. त्यांचं कोलमडून जाणं आणि सावरणे हे अधिक मानवी आहे..

२००२ च्या दंगलीत मोदींनी पोलिसांना,उद्या हिंदू राग व्यक्त करतील तेव्हा हिंदूंना राग व्यक्त करू द्या असे आदेश दिले व मी त्या बैठकीला उपस्थित होतो असे प्रतिज्ञापत्र त्यांनी दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगापुढे दिली. त्याने मोदींच्या प्रतिमेवर दंगलीचा कायमचा डाग लागला..की जो पंतप्रधान होऊनही पुसला गेला नाही. त्यातून एका खटल्यात अडकवून ते तुरुंगात आहेत. अयोध्या दंगलीत संजीव पोलीस उपअधीक्षक असताना पालनपूर पोलीस स्टेशनला भेट देतात. तिथे काही कैदी अगोदर अटक केलेले. संजीव ते कैदी  बघतही नाहीत .ते कैदी सोडल्यावर पुढे १८ दिवसांनी एक कैदी मरतो व त्याचा भाऊ कोठडीत मारहाण झाल्याची तक्रार दाखल करतो. त्या  खटल्यात संजीव यांना जन्मठेप झाली आहे. हे हास्यास्पद वाटले तरी सत्य आहे.

कैदीही न बघितलेल्या अधिकाऱ्याला त्या कैद्याच्या मृत्यूबद्दल जन्मठेप आणि जे साक्षीदार तपासायला हवेत अशा ३० साक्षीदारांची यादी देऊनही त्यांना कोर्टासमोर बोलावले जात नाही व माहितीच्या अधिकारात तेव्हाची कागदपत्रे मागितली तर उपलब्ध नाहीत असे उत्तर दिले जाते अशावेळी कसे लढायचे ? ४ वर्षे झाले तरी एकही बेंच त्यांची केस चालवत नाही.फक्त एका महिला न्यायाधीशने या केसमध्ये काहीच तथ्य नाही असा शेरा मारताच त्यांची बदली करण्यात आली. तेव्हापासून ४ वर्ष लढा जामिनासाठी सुरूच आहे.अलीकडे तिस्ता सेटलवाड यांच्यासोबत याना आणखी एका खटल्यात सहआरोपी करण्यात आलं.त्यामुळं त्यांचे सुटणं अधिकच कठीण झालं.

श्वेता सांगत होत्या..महाराष्ट्राशी संजीवचे  खूप जुने नाते आहे. संजीवचा जन्म मुंबईचा,त्याचे शालेय महाविद्यालयीन शिक्षण आणि आय आय टी त्याने मुंबईत पूर्ण केले..त्यामुळे संजीवला मुंबई खूप जवळची वाटते...

हे ऐकून संजीवचा प्रश्न हा घरातला प्रश्न वाटू लागला..

मोदी,दंगल, त्याविषयी संजीव यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र ,त्यावर खरे खोटे झालेला विवाद हे सारं मी पुन्हा विचारलं नाही. पण त्यांनी स्वतः हून सध्या सुरू असलेल्या केसविषयी तपशील सांगायला सुरूवात केली. पालमपूर येथे असलेली ३० वर्षांपूर्वीची ही  केस उघडून खूप वेगाने तिची सुनावणी पूर्ण केली आणि शिक्षाही लागली आणि ज्या जामिनावर आमचा हक्क आहे तिथे मात्र ४ वर्षे झाली तरी साधी सुनावणीही होत नाही..तेव्हा ज्यात शिक्षा होईल तिथे वेग घ्यायचा व जिथे जामीन होईल तिथे प्रक्रियाच सुरू होऊ द्यायची नाही...अशा स्थितीत आम्ही काय करू शकतो..? आणि ही विषम लढाई आहे.न्यायालयात समोरच्या बाजूने किती वकील असतात व त्यांना किती रक्कम दिली जाते ? हे ऐकलयावर ही लढाई किती विषम आणि थकवणारी आहे हे जाणवलं.

Shweta Bhatt
Shweta BhattPhoto By Heramb Kulkarni

त्यांच्या मुलांची चौकशी केली. मुलगा आणि मुलगी दोघेही ऑक्सफर्ड मध्ये शिकतात.दोघांनाही शिष्यवृत्ती मिळाली. त्यावर मुलगी मेडिकलमध्ये उच्चशिक्षण घेते आहे तर मुलगा आर्किटेक्ट करतोय. दोघे हुशार असल्याने शिष्यवृत्ती मिळवून शिकत आहेत नाहीतर अशा स्थितीत मी कशी शिकवू शकले असते...? असे म्हणाल्या तेव्हा काहीसे निशब्द झालो.

त्या म्हणाल्या " संजीव तुरुंगात आणि मुले शिकताहेत उत्पन्न काहीच नाही आणि कोर्टाचा इतका प्रचंड खर्च सुरू आहे." कोर्टाच्या खर्चाचे तपशील त्या सांगत होत्या. सगळी कागदपत्रे गुजरातीत. ते भाषांतर करून इंग्रजी त करावी लागतात.एका पानाचे १५० रुपये घेतात. अशी शेकडो पाने भाषांतरित करावी लागतात .पालनपूर येथे केस चालते.आठवड्यातून २ ते ३ वेळा तरी जावे लागते. एका ट्रिपचे  गाडीभाडे ७००० रुपये लागतात.ही खर्चाची एक झलक. सर्वोच्च न्यायालयात मुख्य वकिलाच्या खालची यंत्रणा त्या सांगत होत्या. त्या प्रत्येक घटकाला किती पैसे द्यावे लागतात हे सारे ऐकवत होत्या. ४ वर्षात  किती लाखांचा चुराडा झाला असेल ? याचा हिशोब लावत होतो ..तितक्यात त्या उसासा टाकत म्हणाल्या : "इस्टेट विकायला सुरुवात केलीय...." आणि गप्प झाल्या..न्यायालय, तारखा,निकाल हे सारं आपण किती सहज वाचतो पण स्वतःला निर्दोष शाबीत करण्याची  किंमत किती भयानक असते...इथे संजीव भट यांची पत्नी उच्चशिक्षित आणि कर्ज काढून पैसे उभारू शकेल..खोट्या आरोपाखाली डांबलेल्या गरीब आरोपींचे कुटुंबीय खरंच काय करत असतील..? 

आणि इतकं करूनही साधी केस ऐकलीही जात नाही..सतत राजकीय हस्तक्षेप.अनौपचारिक चर्चेत सगळे राजकीय दडपण आहे हे मान्य करतात  त्याबाबत न्यायमूर्ती ही पराधीन आहेत या युक्तिवादविषयी श्वेता उसळून म्हणतात : दडपण आहे असे कितीदा तुम्ही सांगणार, शेवटी तुम्हाला ज्यासाठी नेमले आहे  त्या कामाला कधीतरी न्याय देणार की नाही ? सद्सद्विवेक बुद्धी नावाची काही गोष्ट आहे की नाही ? 

श्वेता एकट्या राहतात.सोबत एक घरेलू कामगार महिला. इतके मोठे घर ,मुले दूर आणि सतत भीतीचा तणाव. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळणाऱ्या धमक्या..डोक्यात सतत तेच विचार..ही बाई कसे सारे सहन करत असेल..? स्वतःला कसे समजावून सांगत असेल..? रात्री एकदा झोपमोड झाल्यावर पुन्हा झोप तरी पुन्हा येत असेल का..?

कोणत्या आशेवर जगणं सुरू असेल.?

मी म्हणालो : अशावेळेस मुले जवळ असायला हवी होती ...त्या म्हणाल्या : "नको, मुलांना जवळ ठेवायचीच भीती वाटते.मागे एकदा मुलगा व त्या गाडीतून जाताना ट्रकने त्यांना धडक दिली. त्या ट्रकच्या हालचाली संशयास्पद होत्या.त्यातून ते बचावले. तेव्हापासून त्या मुलांना इकडे येऊ नका सांगतात. त्या म्हणाल्या केवळ मुलांकडे बघून संजीव हे सारे सहन करतात. मुलगी तर संजीव ची जीव की प्राण आहे.तिच्यासाठी ' संजीव एक तरफ और बाकी दुनिया दुसरी तरफ "इतकं प्रेम आहे.उद्या या मुलांना इकडे आणून काही विपरीत घडलं तर संजीव पुरा टूट जायेगा " त्यामुळं मुले जवळ असावी वाटते खूप पण मन होत नाही...? आपल्याच मातृभूमीत मुलांना सुरक्षितता म्हणून आणावेसे वाटत नाही..ही भीती आणि तो तणाव कसा असेल याचा अंदाज येतो..

तणाव कमी करावा म्हणून मी संजीव यांच्या नोकरीतल्या आठवणी काढल्या तेव्हा त्या अगदी भरभरून सांगत होत्या. संजीव रोज १५ किलोमीटर पळण्याचा व्यायाम करतात. त्यामुळे पळण्याचा स्टॅमिना खूपच आहे.एकदा ते ऑफिस सुटल्यावर लवकर घरी आले नाही तेव्हा पोलीस म्हणाले की काही आरोपी पळाले व त्यांच्यामागे संजीव पळत गेले त्यामुळे रात्र होईल यायला..श्वेता म्हणाल्या जर पळून आरोपी पकडायचे तर संजीवसाठी  काही मिनिटांचे काम आहे कारण कोणीच टिकणार नाही...आणि खरेच पकडून  अटक करून ते अर्ध्या तासात घरी आले...!!!! जिथे नोकरी केली तिथे जनतेचे खूप प्रेम मिळाले...एका ठिकाणाहून बदली झाली तर आदर व्यक्त करायला एक किलोमीटर दुतर्फा लोक उभे राहिले होते व फुले टाकत होते.. साबरमती कारागृहात असताना कैद्यांना त्यांनी खूप चांगली वागणूक दिली.तेथून त्यांची अन्यायकारक बदली केली तेव्हा निषेध म्हणून सर्व कैद्यांनी उपवास केला व ५/६ कैद्यांनी तर हाताची नस कापून घेतली होती. एका जेलरला कैद्यांचे इतके प्रेम मिळते हे खूप अपवादात्मक उदाहरण असेल...हे सांगून श्वेता किंचित थांबल्या आणि म्हणाल्या : ज्या माणसाला कैद्यांचे इतके प्रेम मिळाले त्या माणसावर कैद्याला मारहाण करण्याचा आरोप व्हावा हे किती दुःखदायक आहे.."

Shweta Bhatt
Shweta BhattPhoto By Heramb Kulkarni

त्या पुढे म्हणाल्या "अटकेनंतर तर मी संजीव वर लोक किती प्रेम करतात हे मी अनुभवते आहे. ज्या क्षणी जन्मठेप जाहीर झाली त्याक्षणी कोर्टात संजीव यांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. पण श्वेता कोर्टातच बेशुद्ध झाल्या. त्यांना घरी आणले. त्यांचा जगण्यावरचा विश्वासच उडून गेला..पण तितक्यात त्यांचा फोन वाजू लागला..आणि सलग तीन दिवस संपूर्ण देशातून फोन येत होते. We are with you असे शेकडो मेसेज येत होते..त्याने त्यांना धीर आला. केरळमधून सर्वात जास्त फोन आले व आजही येतात.त्या म्हणाल्या की विश्वास बसणार नाही पण आजही दिवसातून जितके फोन येतात त्यातील १० फोन फक्त केरळचे असतात.केरळच्या लोकांनी त्यांना निमंत्रित केले व मोठी रॅली काढून संजीव भट यांना जनसमर्थन दिले. आर्थिक मदतही जमवली..त्यामुळे लढण्याची हिंमत मिळाली.

त्या सांगत होत्या की एकदा पाऊस पडत होता कोर्टातून  पोलीस गाडी पर्यंत जाईपर्यंत संजीव भिजेल म्हणून पोलिसांची पर्वा  न करता  लोक छत्री घेऊन संजीवकडे  धावले..साधी पाण्याची बाटली विकत घेतली, झेरॉक्स काढली तरी  ते दुकानदार पैसे घेत नाहीत इतकं प्रचंड प्रेम लोकांचे त्यांच्यावर आहे...ते गरीब दुकानदार ' भाभीजी हमारी इतनीही मदद' असे नम्रपणे बोलतात " या सामान्य गरीब माणसांचा हा आधार व प्रेम हीच माझी ताकद आहे...

बाहेर पाऊस सुरू झाला..घरात श्वेता यांच्या डोळ्यातील अश्रू आणि बाहेर धुवांधार पाऊस..त्या निशब्द होऊन पावसाकडे बघत होत्या.. घरातील समृद्धतेच्या खुणांपासून त्या नकळत विलग झाल्या आहेत...एकटेपणाची भावना पावसात अधिकच गडद होत होती..आम्हालाही ती शांतता असह्य झाली...त्याच बोलू लागल्या "पाप पुण्य या कल्पना नेमक्या कशा समजून घ्यायच्या ? इतकं जनतेचं प्रेम आणि पुण्य मिळवून हे संजीवच्या नशिबी का यावं...? जन्मभर इनामदारीने केलेल्या कामाची ही उतराई असते का...? श्वेता स्वतः शीच बोलत होत्या..

तुरुंगात संजीव कसे राहतात ? हे विचारल्यावर त्या म्हणाल्या : ' मी दुःखी झालो आहे असे संजीव किंचितही दाखवत नाहीत, एकदम नॉर्मल राहतात त्यामुळे त्रास दिल्याचा आनंद संजीव सरकारला मिळूच देत नाहीत. त्यामुळं ते गडबडले आहेत.संजीव रोज सकाळी खूप पळतात व्यायाम करतात.पुस्तके वाचतात.इतर कैद्यांना कायदेशीर मार्गदर्शन करतात. पोलीस त्यांना सवलती द्यायला उत्सुक असतात पण हे अजिबात नियम मोडत नाही. फोनवर बोलण्याची ५ min परवानगी असते , जास्त बोलले तर त्यांना कोणीच बोलणार नाही पण बरोबर ५ min झाले की फोन बंद करतात..फोनवर मला  संजीव शी बोलता येते पण  कायदेशीर रुक्ष विषयावर चर्चा करण्यातच ५ min संपून जातात...

सुरुवातीला मी तुरुंगात भेटायला जायची पण ऐनवेळी मला परवानगी नाकारायचे व रांगेत उभे राहून माझे केविलवाणे होणे संजीवला आवडत नाही..त्यापेक्षा कोर्टात त्यांना आणतात तेव्हा मी थोडावेळ भेटून घेते...

महाराष्ट्राच्या राजकारणावर ही त्यांनी अनेक प्रश्न विचारले.निवडणुकीत काय होईल ? हे ही विचारलं. नंतर २०२४ च्या निवडणुकीत बदल होईल का ? यावरही चर्चा केली..मला ते विचारण्यामागची  त्यांची भावना कळली तेव्हा फारच वेदना झाल्या. हे सरकार जर बदलले तर न्यायाल्यावरचे दडपण जाईल आणि मग संजीव निर्दोष शाबीत करणे विना अडथळा पूर्ण होईल इतकी माफक अपेक्षा त्यांची २०२४ च्या सरकार बदलाकडून आहे...एखादी केंद्रीय सत्ता जेव्हा अधिक पाशवी होत जाते तेव्हा भयभीत नागरिक कसा विचार करू शकतात याचे हे उदाहरण होते.. हताश करणारे

एका उच्चविभूषित कुटुंबातील ही परवड ऐकणं पिळवटून टाकणारे होते. श्वेता स्वतः आय ए एस ची परीक्षा पास होऊन फक्त  interview दिलेला नव्हता इतकेच. स्वतः वकील झाल्या आहेत. इतक्या बुद्धीमान आहेत.त्यांचे इंग्रजी अतिशय दर्जेदार व लालित्यपूर्ण आहे.त्यांच्या पोस्ट वाचताना हे नेहमी जाणवतं.. my days with sanjeev ' असे काहीतरी पुस्तक लिहा,भावनांचेही विरेचन होईल  असे सुचवले...प्रकाशक धाडस करतील का ? असे म्हणाल्या तेव्हा अनुभवाने त्या अधिक वास्तववादी झाल्यात लक्षात आलं.त्यांचा सगळ्यावरचा विश्वासच डळमळीत झालाय.

मी शेवटी विचारलं : आपण एक हरणारी लढाई लढतोय असे वाटत नाही का..?" त्या काहीशा अस्वस्थ झाल्या म्हणाल्या : नाही हो, ही हरणारी लढाई नाही. इथलं सरकार बदलेल..सरकारला न मोजणारे न्यायाधीश भेटतील. समाज दडपण निर्माण होईल आणि संजीव सुटेल.. . " त्यांचा आशावाद अजूनही पक्का आहे. थोडे थांबून त्या म्हणाल्या : आणि समजा न्याय मिळणार नसेल तरी मी दुसरे काय करू शकणार आहे ? सुटण्याचा रस्ता जर न्यायालयच आहे तर तिथेच सतत प्रयत्न करावे लागणार आहेत ना ? नवरा तुरुंगात असताना मी गप्प कशी काय राहू शकते...? " ही त्यांची स्पष्टता आणि भावनांची तीव्रता हलवून गेली..घरटे उद्धवस्त झालेल्या जखमी पक्षिणीचा आकांत  आणि त्यातील आर्तता पिळवटून टाकत होता.. पती आय आय टी आय पी एस ,पत्नी आय ए एस पर्यंत पोहोचलेली, ऑक्सफर्ड ला शिकणारी दोन मुले अशा सुंदर चौकोनी कुटुंबाच्या वाटयाला हा कोणता चक्रव्यूह आला आहे..? 

दारापर्यंत सोडायला आल्या..दाराजवळच्या बागेत संजीव ची बसायची जागा दाखवली. छान कॉर्नर केला होता. म्हणाल्या : रोज सकाळी मी व संजीव तिथं बसून चहा घ्यायचो, आमचा सुंदर दिवस व्हायचा. पण संजीव जेलमध्ये गेल्यापासून मी एकदाही तिथं गेली नाही की तिथं बसून चहा घेतला नाही....इतकी तरल वेदना आणि एका स्त्रीची उत्कट भावना भावनाशून्य सत्तेपर्यंत कधी पोहोचणार.....?

श्वेता यांची उत्कटता वेदना अंगावर येते... एखादा तासही आपण ऐकू शकत नाही..त्या वेदनेबरोबर त्या कशा जगत असतील...?

herambkulkarnikulkarni1971@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com