मुलांच्या मनात काय चाललंय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children Mind
मुलांच्या मनात काय चाललंय?

मुलांच्या मनात काय चाललंय?

मुलांच्या वयानुसार त्यांचं भावविश्व बदलत असतं आणि यासाठी आपण समाजात आणि आजूबाजूला काय चाललं आहे हे डोळे उघडे ठेवून नीट पाहिलं म्हणजे आपल्याला आपल्या मुलांचाही थांग लागू शकतो. आपली मुलं नेमका काय आणि कसा विचार करतात हे एकदा समजलं, की त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि करिअरला आकार देणं तसंच दिशा देणं हे खूप सोपं जातं. म्हणून मुलांच्या मनात काय चाललंय, हे ज्याला ओळखता येतं तो यशस्वी पालक म्हणावा लागेल!

मध्यंतरी दहावीच्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली. एका खासगी क्लासने ती आयोजित केली होती. मी काही मोजक्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या मोटिवेशनल कार्यशाळा घेत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांची परीक्षेतील कामगिरी अधिकाधिक उत्तम व्हावी. परीक्षा जवळ येतानाच मुलांचं टाइम मॅनेजमेंट उत्तम व्हावं, आत्मविश्वास वाढावा आणि इच्छाशक्ती बळकट व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. नववी-दहावीतील मुलं विचार कसा करतात? त्यांचं स्वतःबद्दलचं मत काय असतं? ते पालकांबद्दल कसा विचार करतात? आणि एकूणच त्यांच्या भावविश्वात काय घडत असतं? हे समजून घेण्यासाठी या कार्यशाळांचा खूप उपयोग होतो.

मी असं खात्रीपूर्वक सांगू शकेन, की मुलांची मानसिकता समजून घेण्यासाठी, मुलांचं म्हणणं ऐकून घेणं हा एकमेव उपाय आहे आणि त्यातूनच मुलांचं हित साधता येतं. मला मुलांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकता येतं, त्यांना समजून घेता येतं, मी या मुलांशी संवाद साधू शकतो आणि त्यांना विश्वास देऊ शकतो, ही या कार्यशाळांमधली माझ्या दृष्टीने महत्त्वाची फलनिष्पत्ती आहे. मुलांची कामगिरी उंचावावी म्हणून असे प्रयत्न करणाऱ्या खासगी क्लासचं मला कौतुक वाटतं.

बहुतेकदा आपण मुलांच्या बाबतीत निवाडे देत असतो. म्हणजे त्यांचं काही चुकत असेल, तर त्यांना दोष देतो आणि आपण पालकाधीश असल्याप्रमाणे त्यांना शिक्षाही सुनावतो, पण मुलांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देतो का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुलांचं म्हणणं आपण लक्षपूर्वक ऐकतो का? त्यांच्या म्हणण्यावर संवेदनशीलपणे विचार करतो का? की सरसकट एकच न्याय या पद्धतीने काही टोकाचं पाऊल उचलतो, ज्यामुळे मुलांना वाईट वाटू शकतं... त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात... आपण नेमकं काय करतोय, याचा आपण विचार करतो का?

कामाचं प्रेशर असलं, टेन्शन असलं की कामातली गंमत निघून जाते. आपण जे काही काम करतो, ते सहजपणे झालं पाहिजे. त्यात गंमत आली पाहिजे. आपल्याला त्या कामाचा आनंद मिळाला पाहिजे. म्हणजे आपण जे काही काम करतो, ते दर्जेदार होतं. कामात जीव ओतण्यासाठी ते चांगलं समजावं लागतं आणि चांगलं जमावं लागतं आणि त्यासाठी कष्ट उपसावेच लागतात. कष्ट करायचे म्हणजे आपला कंफर्ट झोन सोडावा लागतो. स्वतःपुढे नवनवी आव्हानं रचावी लागतात, ती यशस्वीपणे पेलावीही लागतात. आव्हानं पेलण्याची मानसिकता तयार व्हावी लागते. आपल्या वरिष्ठांनी कामाचं कौतुक केलं की बरं वाटतं... हेच वरिष्ठांनी बारीकसारीक चुका काढल्या, उत्साहावर पाणी ओतलं, येता-जाता पाणउतारा केला, आपण कसे काहीच कामाचे नाहीयोत, याचा पाढा वाचला की कामावर जावंसं वाटणार नाही.

मुलांच्या अभ्यासाचं तेच आहे.

मुलांना एखादा विषय जमत नसेल, समजत नसेल तर तो का जमत/समजत नाही? याचा विचार किती पालक करतात? बऱ्याच पालकांची प्रतिक्रया उसळून ‘‘असं कसं समजत नाही? इतकं सोपं तुला कसं कळत नाही?’’ अशी असते. वारंवार असं घडू लागलं तर त्यातून आधीच प्रेशरमध्ये आलेली मुलं न्यूनगंडाची शिकार होऊ शकतात. मग तो विषय नावडता होतो. त्यांना घाम फोडू शकतो... अशा वेळी आपण खडूस वरिष्ठांसारखे वागतोय की प्रेमळ पालकांसारखे, याचा विचार प्रत्येक पालकाने करायचा आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपला वेळ वाया जाण्यात गॅजेट्स, मोबाईल, टीव्ही, वायफळ गप्पा, झोप, कंटाळा, खेळ हे जबाबदार आहेत, हे खुद्द दहावीच्या मुलांनीच त्यांच्या तोंडून मला सांगितलं. पालकही पुन्हापुन्हा तेच सांगतात. जिव्हारी लागतील असं काही तरी बोलतात, वारंवार टोमणे मारतात असं मुलांचं म्हणणं होतं. पालक जे काही सांगतात ते आपल्या हिताचंच आहे, याची मुलांना जाणीव नव्हती असं नाही, पण त्यांना पालकांची संवादाची शैली रुचली नव्हती, पद्धत आवडली नव्हती.

म्हणजे जे मुलांना माहिती आहे, तेच आपण त्यांच्या कानीकपाळी पुन:पुन्हा ओरडून त्यांनाच सांगतो. मग त्यांना नेमकं हवं काय असतं? तर मुलांना सोल्युशन हवं असतं! तुम्ही जे काही करताय, ते चुकीचं नाहीय, पण त्याचं टायमिंग चुकतंय हे समजावून सांगावं लागतं. मुलांशी संवाद साधल्याशिवाय, त्यांचं म्हणणं नीट समजून घेतल्याशिवाय आपण त्यांना कोणतीच गोष्ट कन्विन्स करू शकत नाही. त्यांना मनापासून पटण्याला महत्त्व आहे. त्यांचं सेल्फ रियलायझेशन होण्याला महत्त्व आहे.

दहावीची मुलं ही पौगंडावस्थेत आलेली असतात. त्यांना त्यांचं स्वतःचं असं व्यक्तिमत्त्व प्राप्त झालेलं असतं. आत्मविश्वास नुकताच बहराला येत असतो. ते स्वतःची आयडेंटिटी निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. स्वतःच्या प्रेमात असतात. या सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊनच त्यांच्याशी आपल्याला उत्तम संवाद साधता आला पाहिजे. अभ्यास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तितकीच व्यक्तिमत्व हीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यांच्या पुढच्या आयुष्याची वाटचाल ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर जास्त अवलंबून आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याची मोठी जबाबदारी ही पालकांवर आहे. व्यक्तिमत्त्वाचा विकास हा पालकांच्या देखरेखीखाली घरीच उत्तम होऊ शकतो. तो अन्यत्र तितका प्रभावी होईलच याची खात्री नाही...

आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम पालकांचं आहे. आपण मुलांबरोबर जे बोलतो आणि जसं वागतो तो प्रत्येक घाव हा त्यांचं व्यक्तिमत्त्व मूर्तीसारखं घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो. मुलं म्हणजे मातीचा गोळा नव्हेत, की मूर्तीही नव्हे हेही खरं. त्यांना मन असतं. भावभावना असतात. आत्मसन्मान असतो. या सगळ्याचा अंदाज घेऊनच मुलांबरोबर आपण संवाद साधायचा असतो. मुलांच्या मनात नेमकं काय चाललंय, हे समजून घेण्याची आपली इच्छा प्रबळ हवी. मुलं खूपदा पालकांना आवडेल असं बोलतात आणि पालकांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो संवाद हा मनमोकळा नसतो. कधी कधी पालकांच्या अवाजवी धाकामुळे मुलं मनापासून संवाद साधत नाहीत, मनातलं बोलत नाहीत. म्हणून मुलांना प्रथम आश्वस्त केलं पाहिजे, की त्यांनी पालकांपाशी मन मोकळं करावं. एकदा त्यांच्या भावना या दडपणविरहित झाल्या की आपण त्या भावनांचा विचार करायचा. मुलांच्या भावना या बाळबोध असू शकतात. कधी कधी गमतीशीरही असतात, पण त्या एकदम हसण्यावारी नेऊन मुलांचा मुखभंग करायचा नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण आदर राखून आपण त्यावर आपले म्हणणे मांडायचे. मुलांच्या वयानुसार त्यांचं भावविश्व बदलत असतं आणि यासाठी आपण समाजात आणि आजूबाजूला काय चाललं आहे हे डोळे उघडे ठेवून नीट पाहिलं म्हणजे आपल्याला आपल्या मुलांचाही थांग लागू शकतो. आपली मुलं नेमका काय आणि कसा विचार करतात हे एकदा समजलं, की त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि करिअरला आकार देणं तसंच दिशा देणं हे खूप सोपं जातं. म्हणून मुलांच्या मनात काय चाललंय, हे ज्याला ओळखता येतं तो यशस्वी पालक म्हणावा लागेल!

sanjeevlatkar@hotmail.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :childrenMindset
loading image
go to top