समूह धबधब्यांचा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Waterfall
समूह धबधब्यांचा !

समूह धबधब्यांचा !

आम्हा काही मित्रांचा एक साहसगट आहे. आम्ही हिमालयामध्ये गिर्यारोहणाच्या अनेक मोहिमा केल्या आहेत. ट्रेकिंग, सायकलिंग आणि माउंटेनियरिंग अशा आमच्या कितीतरी साहस मोहिमा आम्ही यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत आणि करत असतो. आता नवं काय, असा आमचा विचार सुरू होता. दरवर्षीच काहीतरी नवं साहस करावं अशी आमची इच्छा असायची, आजही असते. काही वर्षांपूर्वी आम्ही ठरवलं की आपण अंटार्क्टिकाला जाऊ या, तो एक वेगळाच अनुभव ठरेल. हिमालयामध्ये अनेकवार गेल्यामुळे बर्फ आम्हाला नवा नव्हताच.

एखादी मोहीम आखायची म्हणजे सर्वात महत्त्वाच्या तीन गोष्टी असतात. संभाव्य खर्च, वेळ आणि त्याकरिता आवश्यक असलेली तंदुरुस्ती, अर्थात फिटनेस. सगळा विचार केला. सर्वच जण साधारणपणे सधन असल्यामुळे खर्चाचा प्रश्न नव्हता आणि साहस मोहिमांची सवय असल्यामुळे तंदुरुस्तीचीही अडचण कुणालाच नव्हती.

या मोहिमेकरिता एकूण कालावधी लागणार होता वीस दिवस. दरम्यान, आमची संख्या वाढत-वाढत दहा झाली होती. आम्ही रोज भेटू लागलो. अंटार्क्टिकाला जाण्याकरिता अर्जेंटिना या देशातून जावं लागतं. तिथं पृथ्वीच्या दक्षिण दिशेचं शेवटचं गाव असलेलं ओशाया येथून एक सहलबोट किंवा क्रूझ तुम्हाला अंटार्क्टिकाला नेते. आम्ही अंटार्क्टिकाला जाण्याचं ठरवत असतानाच राजीवने टूम काढली की, अंटार्क्टिकावरून परतल्यानंतर आपण इग्वाझू धबधबा पाहण्याकरिता जाऊ.

या नव्या प्रस्तावावर आमच्यात दोन गट पडले. अंटार्क्टिका खंडाच्या अद्‍भूत अनुभवानंतर धबधबा पाहण्याचं काय कौतुक, असा एका गटाचा प्रश्न; तर काय हरकत आहे, चारच दिवसांचा तर प्रश्न आहे, असं दुसऱ्या गटाचं म्हणणं. चहूकडे बर्फ, पेंग्विन, सील, हिमखंड अशा जणू स्वर्गात जाऊन आल्यानंतर एक धबधबा काय पाहायचा? असून, असून किती सुंदर असणार तो? असं माझं मत होतं. पण, राजीवने न सांगता सगळ्यांची विमानाची तिकिटं आरक्षित करूनही टाकली. आम्ही अंटार्क्टिकाला गेलो. तिथला अवर्णनीय निसर्ग पाहिला. तिथली बर्फदृश्यं, तिथले प्राणी-पक्षी आणि मुख्य म्हणजे अंटार्क्टिकावरचं संशोधन केंद्र, हे सर्व आम्ही अक्षरशः सर्वांगाचे डोळे करून पाहिलं. मन खरोखर तृप्त झालं. त्यानंतर आम्ही दक्षिण अमेरिकेला गेलो आणि खरोखरच इग्वाझू धबधबा पाहून आमचे डोळेच निवले.

इथं येण्यापूर्वी विरोध करणारे आम्ही सर्वजण आता राजीवचे आभार मानू लागलो. या स्थानाबद्दल थोडक्यात सांगतो. इग्वाझू हे एका नदीचं नाव असून, या नदीचं पाणी एका ठिकाणी उंचावरून खाली धबधब्याच्या रूपात कोसळतं. वस्तुतः हा एकच एक धबधबा नसून धबधब्यांचा एक संचच आहे आणि एकत्रितरीत्या धरले तर हा जगातला सर्वांत मोठा धबधबा आहे. याच्यापुढे नायगाराचा धबधबादेखील खुजा ठरतो. इग्वाझू ज्या कडेसाखळीवरून खाली पडतो, तिची एकूण लांबी २.७ किमी इतकी आहे. ही कडेसाखळी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेली आहे आणि जिथून पाणी पडतं, तिथे दोन पायऱ्या असाव्यात अशी रचना आहे. इ.स. १५४१ मध्ये या धबधब्यांचा शोध लागला.

इग्वाझू धबधबे संचामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते ३०० धबधबे असतात आणि विविध ठिकाणी त्यांची उंची वेगवेगळी आहे. एका वेळी आणि एका ठिकाणाहून हे धबधबे पाहणं शक्य नाही. त्याकरिता तुम्हाला हेलिकॉप्टरमधून आकाशातून ते पाहावे लागतील. खालून पाहायचं तर तब्बल १९ ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. निसर्गाचा हा अद्‍भूत चमत्कार शब्दांमध्ये वर्णन करणं केवळ अशक्य आहे. या नदीचं जवळपास पन्नास टक्के पाणी ज्या प्रचंड खोल खाईत पडतं, त्याला डेव्हिल्स थ्रोट असं म्हणतात. ही खाई म्हणजेच अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यामधली सीमारेषा आहे.गमतीचा भाग म्हणजे, इग्वाझू नदीचं मुख्य पात्र ब्राझीलमध्ये आहे; पण हिच्या प्रवाहातले सर्व धबधबे मात्र अर्जेंटिनामध्ये कोसळतात. त्यामुळे धबधब्यांचं फक्त २० टक्के पाणी ब्राझीलला, तर ८० टक्के पाणी अर्जेंटिनाला मिळतं. धबधब्याचं सौंदर्य पाहण्याकरिता दोन्ही देशांनी इग्वाझू नॅशनल पार्क याच नावाने स्थळं निर्माण केली आहेत आणि हे दोन्ही पार्क जागतिक वारसा घोषित केली गेली आहेत. मात्र, तो ब्राझीलमधून जास्त सुंदर दिसतो. ब्राझीलमध्ये हेलिकॉप्टरमधून धबधबे बघण्यास परवानगी आहे, तसंच कड्याच्या काठाने बसने किंवा पायी जाता येतं. अर्जेंटिनामध्ये हेलिकॉप्टरला परवानगी नाही; पण डिस्नेलँडमधील छोट्या रेल्वेसारखी पर्यावरणस्नेही रेल्वेची सोय केलेली आहे. दोन्ही देशांमधून धबधबे पाहणं तितकंच मनोरंजक आहे. हे धबधबे आयुष्यामध्ये किमान एकदा तरी पहावेतच असे आहेत.

(लेखक साहसी पर्यटक व गिर्यारोहक असून विविध मोहिमांमध्ये सहभागी झाले आहेत.)

Web Title: Sanjiv Shaha Group Waterfall

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
go to top