अद्‍भुत चमत्कारांचा आइसलँड

आइसलँड... उत्तर अटलांटिक समुद्र आणि आर्क्टिक समुद्र जिथं मिळतात, त्या बिंदूवर असलेला एक बेटवजा देश किंवा द्वीपसमूह. अटलांटिक समुद्राच्या पोटातून वर आलेल्या डोंगररांगेचा सर्वांत मोठा भाग.
Iceland
Icelandsakal
Summary

आइसलँड... उत्तर अटलांटिक समुद्र आणि आर्क्टिक समुद्र जिथं मिळतात, त्या बिंदूवर असलेला एक बेटवजा देश किंवा द्वीपसमूह. अटलांटिक समुद्राच्या पोटातून वर आलेल्या डोंगररांगेचा सर्वांत मोठा भाग.

आइसलँड... उत्तर अटलांटिक समुद्र आणि आर्क्टिक समुद्र जिथं मिळतात, त्या बिंदूवर असलेला एक बेटवजा देश किंवा द्वीपसमूह. अटलांटिक समुद्राच्या पोटातून वर आलेल्या डोंगररांगेचा सर्वांत मोठा भाग. याच्या मधल्या पठारावर आजही ज्वालामुखीचा उद्रेक सतत सुरूच असतो. अशा या देशाला भेट देण्याचा योग आला. तिथं जाईपर्यंत, नावाप्रमाणे इथं जास्तीत जास्त भागात बर्फच बर्फ असेल अशी कल्पना; पण तसं नाही.

आमची मूळ कल्पना होती काहीतरी साहसी करण्याची. अनेक पर्यायांमधून आम्ही भारतातून कारने लंडनला जाण्याचं नक्की केलं. व्हिसा वगैरेचे पैसेही भरले; पण दुर्दैवानं त्याच वेळी कोरोना आला आणि जगभर हाहाकार माजला व आता युक्रेन युद्धामुळे आमची ही कल्पना हवेत विरून गेली. अखेर आम्ही आइसलँडला भेट देण्याचं ठरवलं.

आइसलँड हा एक नितांतसुंदर देश आहे. इथं तुम्हाला ऑस्ट्रेलियासारखे सुंदर बीच बघायला मिळतात, आपल्याकडच्या हिमालयासारखे बर्फाचे पर्वत बघायला मिळतात, कारगिल-लेहसारखी थंड वाळवंटं बघायला मिळतात आणि उघडेबोडके डोंगर, हिमनद्या, हिमनग, गोठलेला समुद्र, गोठलेले धबधबे हेदेखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर दक्षिण ध्रुवावरच्या अंटार्क्टिकसारखे महाकाय व्हेल मासेही बघायला मिळतात... आणि हो, हे ज्वालामुखीचं क्षेत्र आहे.

northern lights
northern lightssakal

२०१० मध्ये इथं ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने संपूर्ण पश्चिम युरोपातील विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता. हे ज्वालामुखीचं क्षेत्र असल्यामुळे इथं असंख्य गरम पाण्याचे झरेदेखील आहेत. गंमत म्हणजे, ज्या भागामध्ये हे गरम पाण्याचे झरे आहेत, त्याचं नाव गिझिर आणि यावरूनच गरम पाणी पुरवणाऱ्या उपकरणाला इंग्रजीतलं गिझर हे नाव मिळालं आहे. इथला आणखी एक चमत्कार म्हणजे, इथं दिवसाला भूकंपाचे २०० ते ५०० सौम्य धक्के बसतात. पण, इथल्या या सगळ्या निसर्गाच्या चमत्कारांपैकी मला सगळ्यात काय आवडलेलं असेल, तर ते म्हणजे नॉर्दर्न लाइट्स किंवा उत्तर ध्रुवीय प्रकाश. अर्थात, असाच ध्रुवीय प्रकाश दक्षिण ध्रुवावरही पाहायला मिळतो आणि त्याला सदर्न लाइट्स म्हणतात.

शास्त्रीय परिभाषेत उत्तर ध्रुवीय प्रकाशाला ऑरोरा बोरिअॅलिस, तर दक्षिण ध्रुवीय प्रकाशाला ऑरोरा ऑस्ट्रेलिस असं म्हणतात. आपण आजकाल अनेक ठिकाणी रंगीबेरंगी दिवे लावून त्यांच्या झोतांचा लाइट अँड साउंड सोहळा बघतो; पण नॉर्दर्न लाइट्स हा पूर्णपणे निसर्गाचा लाइव्ह लाइट शो आहे. आकाशामध्ये हा सप्तरंगी सोहळा पाहणं खरोखरच डोळ्यांचं पारणं फेडणारा अनुभव आहे. हा प्रकाश उत्तर ध्रुवाला लागून असलेल्या अमेरिकेतील अलास्कापासून ते रशियाच्या उत्तर भागापर्यंत सर्वच ठिकाणी दिसतो. आयुष्यामध्ये एकदा तरी ही नैसर्गिक रंगपंचमी अनुभवावी असं माझं मत आहे.

या प्रकारचा प्रकाश फक्त ध्रुवीय प्रदेशामध्येच दिसतो, त्याचं कारण पृथ्वीचा चुंबकीय अक्ष आणि सूर्य यांच्यातील संबंध. शास्त्रज्ञांनी असं निरीक्षण नोंदवलं आहे की, सूर्यावर जास्त स्फोट वा इतर घडामोडी होतात, तेव्हा ध्रुवीय प्रकाश जास्त तीव्र होतो आणि तो दीर्घकाळ टिकतो. ही झाली शास्त्रीय माहिती; पण प्रत्यक्ष तो हिरवा, निळा आणि इतर असंख्य छटांचा नयनरम्य देखावा पाहताना आपलं भान हरपून जातं.

भौगोलिकदृष्ट्या आइसलँड उत्तर अमेरिकेच्या जास्त जवळ असला तरी भाषा, संस्कृती आणि इतिहास यांच्यानुसार हा देश युरोपात गणला जातो. आइसलँडमध्ये मानवी वसाहत इसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये सुरू झाली. नॉर्वेचा एक सरदार तिथं जाऊन राहू लागला. तिथपासून या देशाचा इतिहास सुरू होतो. आम्ही इथल्या काही शहरांना भेट दिली. त्यामध्ये रेकजेविक, विक, बोर्गारनेस आणि अकुरेरी ही समाविष्ट होती.

प्रसिद्ध रेकजेविक हे इथलं एक प्रमुख शहर आणि राजधानी. १९७० च्या दशकात गाजलेली रशियन बुद्धिबळपटू बोरिस स्पास्की आणि अमेरिकन बुद्धिबळपटू बॉबी फिशर यांच्यात विश्वविजेतेपदाची लढत झाली होती आणि १९८०च्या दशकात, म्हणजे शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यामध्ये एक शिखर परिषद झाली होती. हे शहर पक्कं युरोपियन शहर आहे. इथं रोमांचक साहसी खेळ, गिरिभ्रमण, सायकलिंग यांचा आनंद घेण्याच्या सोयी आहेत, तसंच मौजमजेची ठिकाणंही. स्कीइंग, गिर्यारोहण, स्नोबोर्डिंग, आइस क्लाइंबिंग असेही खेळ खेळण्याचा आनंद तुम्हाला आइसलँडमध्ये मिळू शकतो.

आम्ही ज्या ठिकाणांना भेटी दिल्या, त्यांपैकी काहींची नावं उच्चारणं थोडं कठीण आहे, जसं सैलँड्सफॉस, हराऊनफोसर, बार्नाफॉस, मायवतन तलाव इत्यादी; पण ही सर्व ठिकाणं अतिशय सुंदर आहेत. तेथील एका समुद्रकिनाऱ्यावर काळी वाळू आहे. तो किनारा आम्ही पाहिला. या समुद्रकिनाऱ्याची भुरळ भारतीय चित्रपटसृष्टीलाही पडली आहे. शाहरुख खानच्या एका चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण या समुद्रकिनारी झालं आहे. हिमनदीमध्ये बर्फाच्या गुहा तयार होतात, त्याही आम्ही पाहिल्या. अशाच गुहांमध्ये पोलर बेअर हा प्राणी आपल्या पिलांना जन्म देतो.

अर्थात, आपण तिथं जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. पण, इथं पोलर बेअर क्वचितच येतो, तो जास्तकरून ग्रीनलँडमध्ये आढळतो. मात्र, इथं आर्क्टिक फॉक्स ही कोल्ह्याची जात आहे, तसंच इथले घोडे, बकऱ्या इ. प्राणीदेखील वेगळे आहेत. रेकजेविक, विक या ठिकाणी लाव्हा शो म्हणजे ज्वालामुखीबद्दलची माहिती देणारे कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. हा शो बघताना जाणवणारा थरार बाहेर पडल्यावरही काही काळ मनामध्ये राहतो.

आइसलँडची लोकसंख्या साधारण चार लाख आहे. जगातल्या आनंदी लोकांच्या देशांमध्ये प्रत्येक वेळी आइसलँडचा वरचा क्रमांक असतो व २०२२ मध्ये चौथा नंबर आहे, त्यावरून इथले लोक सर्वसाधारणपणे समाधानी असावेत असं भासतं. इथं संगीत, कला, खेळ अशा विविध क्षेत्रांमध्ये सतत काही ना काही घडत असतं. म्हणूनच या प्रदेशाची सैर करण्यासाठी एकदा तरी आनंदयात्री व्हायला हवं.

(लेखक गिर्यारोहक असून थरारक किंवा चाकोरीबाहेरचा प्रवास किंवा अनुभव घेण्यास ते पसंती देतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com