English
EnglishSakal

हिंग्लिशची सुरुवात आणि तैनाती फौजा!

इंटरनेटचं युग आल्यानंतर बऱ्याच नवनवीन संज्ञा प्रचलित झाल्या- ‘हिंग्लिश’ यापैकीच एक. हिंदी वा मराठी शब्द देवनागरीत न लिहिता इंग्रजी (रोमन) लिपीतून लिहिणे म्हणजे हिंग्लिश.
Summary

इंटरनेटचं युग आल्यानंतर बऱ्याच नवनवीन संज्ञा प्रचलित झाल्या- ‘हिंग्लिश’ यापैकीच एक. हिंदी वा मराठी शब्द देवनागरीत न लिहिता इंग्रजी (रोमन) लिपीतून लिहिणे म्हणजे हिंग्लिश.

इंटरनेटचं युग आल्यानंतर बऱ्याच नवनवीन संज्ञा प्रचलित झाल्या- ‘हिंग्लिश’ यापैकीच एक. हिंदी वा मराठी शब्द देवनागरीत न लिहिता इंग्रजी (रोमन) लिपीतून लिहिणे म्हणजे हिंग्लिश. आज आपण फोनवर चॅटिंग किंवा कमेंट्स करताना रोमन लिपीतून मराठी लिहितो ते म्हणजे हिंग्लिश. काहीवेळा रोमन लिपीतल्या स्पेलिंग्जमुळे मराठी-हिंदीत अशक्य विनोद होतात... पण तो भाग सोडून देऊयात!

आता जर मी विचारलं की, भारतातलं सगळ्यात पहिलं आणि प्रसिद्ध असं हिंग्लिश वाक्य कोणतं? ह्याचं उत्तर थोडंसं कठीण वाटेल. थोडा विचार करून आठवेल की, सुमारे २३-२४ वर्षांपूर्वी आलेलं पेप्सीचं १९९८ मधलं ‘Yeh Dil Maange More’ ही कॅचलाइन हिंग्लिश होती. वाक्य हिंदीत आणि लिखाण रोमन लिपीतलं. पण हे खरंच भारतातलं पहिलं हिंग्लिश कॅम्पेन होतं? जर मी सांगितलं की, त्याआधीसुद्धा एक ‘हिंग्लिश’ नावाची ‘मोहीम’ भारतीय उपखंडात झाली होती आणि त्या मोहीमकर्त्यांनी अमाप पैसे कमावले होते तर?... काहींना माझ्या प्रश्नाचा रोख एव्हाना समजला असेल.

पुन्हा एकदा विचार करा आणि तुम्हाला आठवेल की आपल्याकडे झालेलं सर्वात पहिली हिंग्लिश ‘मोहीम’ होती ‘British Raj’. तसं पाहिलं तर ‘राज’ हे शब्दश: ‘Rule’ ह्या शब्दाचं हिंदी भाषांतर आहे आणि या इंग्रजी-हिंदी संकरातून रोमन लिपीमध्ये लिहिला गेलेला British Raj हा शब्दच मुळी हिंग्लिश आहे. लंडनमधल्या माझ्या ओळखीतल्या काही हिंग्लिशला हसणाऱ्या आणि इंग्रजीबद्दल दुराभिमान बाळगणाऱ्या लोकांना ‘नामोहरम’ करायला हे अस्त्र मला नेहमी कामी येतं!

आता हा विनोदाचा भाग सोडून आता आपण कॅप्टन जॉन फोर्डकडे वळूयात. १८०२मध्ये वसईचा तह झाल्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’कडून जी तैनाती फौज ठेवून घेतली, तिच्या एका बटालियनचा हा कॅप्टन. पुण्यात साधा सैनिक म्हणून आलेला आणि पुढे स्वकर्तबगारीवर वर आलेला असा हा कॅप्टन फोर्ड. तैनाती फौजेचे मुख्य झाल्यावर याने पुण्याजवळ दापोडीला मोठा बंगला बांधला होता. पेशव्यांचे कारभारी मोर दीक्षित मराठे वसईकर यांच्याबरोबर फोर्डचा विशेष स्नेह होता. कामानिमित्त एकत्र उठबस होती. फोर्डशी झालेल्या पत्रव्यवहारात मोर दीक्षित वा फोर्ड यापैकी कुणाचं बरेवाईट झालं तर एकमेकांच्या कुटुंबीयांना सांभाळण्याच्या शपथा एकमेकांत झाल्या होत्या. फोर्डची फौजही पेशवेच पोसत होते. पण हे सगळे असले तरी फोर्ड होता इंग्रज. ‘इंग्रज राष्ट्रा’समोर बाकीच्या या सगळ्या गोष्टी नगण्य मानणारा. पेशव्यांच्या सैन्यातल्या सगळ्या बातम्या तो चिठ्ठ्या पाठवून एलफिन्स्टनला कळवी. मोर दीक्षितांबरोबरचे हे संबंध एलफिन्स्टननेच त्याला मजबूत बनवायला सांगितले होते. अनेकदा एलफिन्स्टन फोर्डला मोर दीक्षितांकडून गुप्त बातम्या विचारायला सांगत असे. या आशयाची पत्रेही ब्रिटिश लायब्ररीत आहेत. फोर्डला जर कुणी पेशव्यांकडची महत्त्वाची व्यक्ती मसलतींसाठी भेटली तर त्याचा वृत्तान्त बरेचदा फोर्ड एलफिन्स्टनला गुप्तपणे चिठ्ठ्या पाठवून कळवत असे.

सोबतचा फोटो फोर्डच्या अशाच एका अप्रकाशित गुप्त चिठ्ठीचा आहे. चिठ्ठीची तारीख आहे १० जानेवारी १८१८. पुणं आणि शनिवारवाडा इंग्रजांच्या ताब्यात होता. पेशवे पुण्याहून निघून गेलेले होते. फोर्ड आणि त्याची फौज मात्र न लढता पुण्यातच होते. त्या वेळी कोपरगावावरून परशुरामपंत नावाचा पेशव्यांचा माणूस फोर्डला भेटायला आला. फोर्ड आणि त्याची तैनाती फौज पुढं तरी पेशव्यांकडून लढेल, अशी पेशव्यांची अपेक्षा होती. हेच विचारायला त्याला पेशव्यांनी पाठवलं होतं. परशुरामपंतांबरोबर झालेलं गुप्त बोलणं काय झालं, ते फोर्डने ह्या चिठ्ठीतून एलफिन्स्टनला कळवलंय. हस्ताक्षर स्वत: फोर्डचं आहे. गडबडीत लिहिलेली ही चिठ्ठी असावी, असं अक्षरावरून आणि एकूण वापरलेल्या शॉर्ट फॉर्म्सवरून वाटतं. पेशव्यांसाठी बरेचदा HH हा शॉर्टफॉर्म वापरलाय. पण आपल्याला हवा असलेला भाग हा आहे...

‘Tum do din ooska naimmuck kia, hum do din ooska naimmuck kia", and me ought not forsake him at this particular juncture- I could not venture to offer an opinion. I said, but it appeared to me, that His Highness had nothing left, but the most unconditional submission...’

ह्या चिठ्ठीत फोर्डनं कळवलंय ः ‘‘...(परशुरामपंत त्याला सांगतोय की) तुम्ही काही दिवस त्यांचे मीठ खाल्ले आहे, मी काही दिवस त्यांचे मीठ खाल्ले आहे, (हा भाग हिंग्लिशमध्ये आहे!) आणि म्हणून मी (फोर्डने) यावेळी (पेशव्यांची) साथ सोडू नये. ह्यावर काही प्रतिक्रिया न देता मी (फोर्ड) म्हणालो की, मला असं वाटतं की या परिस्थितीत पेशव्यांकडे बिनशर्त शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा उपाय नाही...’’

स्वतःच्या इंग्रज देशबांधवांशी लढावं लागू नये म्हणून प्रत्यक्ष पोशिंद्या मालकाशी - म्हणजे पेशव्यांशी - बेइमानी करून वर त्यांनाच शरणागतीचा सल्ला देणाऱ्या कॅप्टन फोर्डचं दोनशे वर्षांपूर्वीचं हिंग्लिश हस्ताक्षर उपलब्ध असावं, हाही दुर्मीळ योगायोगच म्हणायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com