इतिहास अमेरिकी वंशवादाचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहास अमेरिकी वंशवादाचा!
इतिहास अमेरिकी वंशवादाचा!

इतिहास अमेरिकी वंशवादाचा!

अमेरिकन वंशवाद, गदर पार्टी आणि जालियनवाला बाग हत्याकांड! आश्चर्य वाटलं ना, या तीन गोष्टी मी एकत्र घेतोय म्हणून. काय संबंध असेल बरं या तीन गोष्टींचा? वरवर तरी वाटत नाही, होय ना? चला तर मग, बघू या की या तीन गोष्टी एकमेकांशी कशा संबंधित होत्या.

भारतीय मंडळी अमेरिकेच्या पश्‍चिम किनाऱ्यावर १८९९ पासून यायला सुरू झाली, त्यांना ‘हिंदू’ म्हणत. पण हे लोक प्रामुख्याने शीख होते. ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य न मावळण्याचे ते दिवस! त्यात ब्रिटिशांनी अगदी शेवटी म्हणजे १८४९ मध्ये पंजाब जिंकला. पंजाबमधल्या या शिखांवर ब्रिटिशांनी अनेक जुलूम केले. धान्याऐवजी जबरदस्तीने नगदी पिकांची शेती करायला लावली. परत त्यावर भरपूर कर. हे कमी की काय म्हणून वर अवर्षण आणि दुष्काळ. यालाच कंटाळून अनेकजण ब्रिटिश सैन्यात भरती झाले. काही मानी लोकांनी मात्र देश सोडून जाणं पसंत केलं. हे लोक अमेरिकेत आणि कॅनडात आले. लाकूडकटाई कारखान्यांत किंवा लोहाराच्या भट्टीवर हे मजूर म्हणून काम करत असत. पुढे १५-२० वर्षांत अनेक पंजाबी कुटुंबांनी मध्य आणि दक्षिण कॅलिफोर्नियातल्या सॅक्रामेंटो, सॅनहोआक्वीन आणि इंपिरियल व्हॅली भागांत शेती करणं सुरू केलं. १८९९ ते १९०८ पर्यंत दरवर्षी १५०-२०० भारतीय अमेरिकेत येत असत. १९१० पर्यंत ४७१३ भारतीय अमेरिकेत होते. यामध्ये कॅनडामार्गे आलेल्या भारतीयांचाही समावेश होता. १९२० मध्ये ही संख्या ६७९५ पर्यंत गेली.

अमेरिका हा स्थलांतरितांचा - बाहेरून आलेल्यांचा देश; पण तरीही यामध्ये युरोपमधून आलेले गोरे स्वतःला वरचढ समजत, आजही समजतात; पण वरचढपणाबद्दलची भावना ही तेव्हापासूनची. सुरुवातीला भारतीयांबद्दलचं कुतूहल ओसरल्यानंतर या गोऱ्यांना भारतीय नकोसे वाटू लागले. भारतीयांबद्दलच्या द्वेषातून त्यांच्यावर हल्ले होऊ लागले. पुढे जाऊन या युरोपियन स्थलांतरितांनी जपानी, कोरियन आणि भारतीयांना कामं मिळू नयेत म्हणून, म्हणजे ६७ लेबर युनियन्सनी राजरोसपणे त्यांच्याविरुद्ध १४ मे १९०७ ला सॅन फ्रॅन्सिस्को इथं ‘एशियन एक्सक्लूजन लीग’ची स्थापना केली. यात बिल्डिंग ट्रेडस कौन्सिल आणि सेलर्स युनियन या मोठ्या युनियन्सचाही समावेश होता. गमतीची गोष्ट म्हणजे, बिल्डिंग ट्रेडस कौन्सिलचा अध्यक्ष पॅट्रिक मॅकार्थी हा आयरिश होता, तर सेलर्स युनियनचा ॲड्र्यू फुरुसेथ नॉर्वेजियन होता. ‘एशियन एक्सक्लूजन लीग’चा पहिला अध्यक्ष ओलाफ व्हिटमो हापण नॉर्वेजियन होता. ‘एशियन एक्सक्लूजन लीग’ची मुख्य मागणी म्हणजे, ‘चायनीज एक्सक्लूजन ॲक्ट’ सगळ्या आशियायी लोकांना लागू करावा. काय होता हा ॲक्ट? तर १८८२ मध्ये अमेरिकन अध्यक्ष चेस्टर आर्थरने पास केलेल्या या कायद्यानुसार चिनी स्थलांतरितांना अमेरिकेत नागरिकत्व मिळायला बंदी होती. (हा कायदा पुढे १९४३ मध्ये रद्द करण्यात आला. का? तर अमेरिकन सैन्य दुसऱ्या महायुद्धात चीनच्या रक्षणासाठी जपानशी लढलं होतं, त्यामुळे म्हणे चीन व अमेरिकेत मैत्रीचे संबंध प्रस्थापित झालेले होते!) भारतीयांविरुद्धच्या ह्या द्वेषाचा उद्रेक वॉशिंग्टनजवळ बेलिंगमजवळ झाला. बेलिंगममध्ये लीगचे सुमारे ८०० ‘कार्यकर्ते’ रहात होते. तसंच, अनेक भारतीय, चिनी व जपानी कामगारही रहात होते. भारतीयांची संख्या सुमारे २५० होती. १९०७ मध्ये ४ सप्टेंबरला सुमारे ५०० गोरे कामगार भारतीयांवर चालून गेले - त्यांना शहरातून हाकलून लावण्यासाठी. दोन शीख नागरिकांना रस्त्यात मारहाण झाली. हा गोऱ्यांचा जमाव घरोघर जाऊन भारतीयांना हुसकावून लावत होता. सुमारे २०० भारतीयांना सिटी हॉलमध्येच कोंडून ठेवलं गेलं. १० दिवसांच्या आत बेलिंगममध्ये एकही भारतीय शिल्लक नव्हता. सगळे भारतीय शहर सोडून निघून गेलेले होते!

बाहेरचे लोक येऊन आमच्या नोकऱ्या घेतील ही भीतीपण अमेरिकन जनसामान्यांत खूप आधीपासूनची आहे. बाहेरचे लोक स्वस्तात कामं करतील आणि आमचे पगार कमी होतील, हा मुद्दाही तेव्हाचाच. यात हे ‘गोरे अमेरिकन’ लोक ते किंवा त्यांचे पूर्वज हे कधीकाळी बाहेरूनच आलेले होते हे सोईस्करपणे विसरतात.

बाहेरच्यांबद्दलचा शंकेखोरपणा ही अमेरिकन समाजमनाची कोनशिला होती. आजही हेच चित्र आहे. ह्यातूनच ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ वगैरे स्लोगन्सचा उदय होतो आणि हे म्हणणाऱ्याला अमेरिकन मतदार जिंकूनही देतात. या गोष्टींचं मूळ ह्या इतिहासात निश्चितच आहे.

पुन्हा ‘एशियन एक्सक्लूजन लीग’कडे वळू. त्यांचा ‘लढा’ हळूहळू यशस्वी झाला. १९१० मध्ये सॅन फ्रान्सिस्को बे मध्ये एंजेल आयलंड इमिग्रेशन स्टेशन उघडलं गेलं. ह्याचं मुख्य काम होतं आशियायी आणि मुख्यत्वेकरून भारतीयांना कॅलिफोर्नियात येऊ न देणं. पुढे जाऊन ‘एशियन एक्सक्लूजन लीग’ने आपला दबाव गट बनवला आणि अमेरिकन सरकारकडून ‘इमिग्रेशन अॅक्ट १९१७’ पास करून घेतला. ह्या ॲक्टला ‘एशियाटिक बार्ड झोन ॲक्ट’ असंही नाव होतं - आणि उद्देश एकच - भारतीय किंवा आशियायी लोकांना अमेरिकेत येऊ न देणं!

हे सगळं होत असताना जपानी, कोरियन किंवा चिनी कामगार आपापल्या देशांच्या सरकारांना सांगून अमेरिकेवर दबाव टाकायच्या उपाययोजना करत होते; पण अमेरिकास्थित भारतीयांना मात्र कोणीच वाली नव्हता. ब्रिटिश सरकार कोणत्याही प्रकारे भारतीयांच्या हक्कांसाठी अमेरिकन सरकारशी वाटाघाटी करणार नव्हतं.

मग काय करावं भारतीयांनी? वंशभेदी अमेरिकन सरकारला कसं पुरून उरावं?यावर उपाय म्हणून १ नोव्हेंबर १९१३ रोजी अमेरिकेतल्या ओरिगॉन इथं ‘हिंदुस्थान असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’ ह्या संस्थेची स्थापना झाली. ह्या संस्थेत अमेरिकेतले भारतीय कामगार, विद्यार्थी आणि नोकरदार होते. रशियातही राज्यक्रांती तेव्हा जोर धरू लागलेली होती. बदलाचं वारं जगात वहात होतं. ‘हिंदुस्थान असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’चा पहिला अध्यक्ष होता सोहनसिंग बखना. हा माणूस ओरिगॉनमधल्या लाकूडकटाई कारखान्यात कामाला होता; पण त्याच्याकडे नेतृत्वगुण भरपूर होते. अमेरिकेतल्या भारतीयांवरील होणाऱ्या वंशभेदी जुलुमाला तोंड देणं हे ‘हिंदुस्थान असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’चं ध्येय होतंच; पण भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देणं हेपण संस्थेचं ध्येय सोहनसिंगनी बनवलं. कारण त्यांचं हे स्पष्ट मत होतं की, जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत भारतीयांना जगात किंमत नाही. ब्रिटिश सरकार कोणत्याही प्रकारे भारतीयांना मदत करणार नाही.

आपली मतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘हिंदुस्थान असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’ने एक साप्ताहिक सुरू केलं, त्याचं नाव ‘गदर’ (‘गदर’ म्हणजे क्रांती). ह्या साप्ताहिकाचं ब्रीदवाक्य होतं, ‘अंग्रेजी राज का दुश्मन’ आणि या साप्ताहिकाचे संपादक होते लाला हरदयाल. १९१२ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी लाला हरदयाल अमृतसरमधून लाला लजपतराय यांच्या सांगण्यावरून अमेरिकेत आले होते. स्टॅनफर्ड विद्यापीठात लाला हरदयाल संस्कृतचे प्रोफेसर होते. एक चांगले वक्ते म्हणूनही त्यांची ख्याती होती. साहजिकच ‘हिंदुस्थान असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’च्या सगळ्या सभांमध्ये ते प्रमुख वक्ते असत. काँग्रेसबद्दल ‘हिंदुस्थान असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’ला खास राग होता. काँग्रेसला ते ब्रिटिश सरकारचे हस्तक आणि चाटू - भाट मानत असत. ‘हिंदुस्थान असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’ने ‘गदर’मध्ये बरंच ब्रिटिशविरोधी साहित्य प्रकाशित केलं. हे साहित्य पॅसिफिक समुद्रातील सिंगापूर, पेनांग, मनिला वगैरे शहरांमार्गे भारतात येत असे. पुढे पुढे हे ‘गदर’ साप्ताहिक इतकं प्रसिद्ध झालं की, ‘हिंदुस्थान असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’ऐवजी लोक त्यांना ‘गदर पार्टी’ म्हणूनच ओळखू लागले. ब्रिटिश सरकारविरोधी ज्वालाग्रही लिखाण आणि भाषणांमुळे एप्रिल १९१४ मध्ये लाला हरदयाल यांना स्टॅनफर्डमधून काढून टाकण्यात आलं. ते तिथून जर्मनीत गेले आणि मॅडम कामांसोबत काम करू लागले.

पहिल्या महायुद्धाचे पडसाद १९१४ मध्ये उमटू लागलेले होते. हीच संधी पाहून गदर पार्टीने भारतात एक बंड करायचं ठरवलं. लाला हरदयाल यांच्यानंतर गदर साप्ताहिकाचे संपादक झाले रामचंदर पेशावरी. त्यांनी अमेरिकेतल्या भारतीयांना सरळ आवाहनच केलं की, ‘भारतात परत जा. कोणत्याही मार्गाने शस्त्र मिळवा. श्रीमंतांना लुटा. गरिबांवर दया करा. उठावासाठी तयार रहा.’

सोहनसिंग बखना, मोहम्मद बर्कतुल्ला आणि भगवान सिंग ह्यांना या बंडाची जबाबदारी देण्यात आली. ते भारतात परत गेले. त्यांच्या हाकेला ओ देऊन सुमारे आठ हजार भारतीयही अमेरिकेतून भारतात परत गेले. हे सगळे लोक मुख्यत्वेकरून पंजाबमध्ये होते. भारतीय क्रांतिकारकांशीही त्यांनी संबंध ठेवले होते. बंडाची तारीख ठरली होती २१ फेब्रुवारी १९१५. पण, या कटाचा सुगावा ब्रिटिशांना लागला. सोहनसिंग बखना पकडले गेले. सोबत अजून १७५ लोकही पकडले गेले. १३६ लोकांवर खटले भरले गेले. ४२ लोकांना फाशी झाली. हे बंड आणि कट संपूर्णपणे उधळलं गेलं. इतर लोक जे अमेरिकेतून आले होते, ते कसेबसे पुन्हा अमेरिका, कॅनडाला पोचले. १९१७ च्या मध्यापर्यंत गदर पार्टीचे कोणीच सभासद भारतात उरले नाहीत.

आता शेवटचा प्रश्न उरतो की, याचा जालियनवाला हत्याकांडाशी काय संबंध? तर तो असा - गदर पार्टीच्या फसलेल्या उठावामुळे ब्रिटिश सरकार काळजीत पडलं होतं. एखादा मोठा जमाव जमला तर ते बंड असू शकतं ह्याची भीती त्यांना वाटू लागली होती. ह्यावर उपाय म्हणून जमावास बंदी करणारा आणि मग जमावातल्या कोणालाही विनाचौकशी तुरुंगात टाकायची परवानगी देणारा रौलेट ॲक्ट १९१९ मध्ये संमत झाला. पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओड्वायरने अमृतसरमध्ये देखरेखीसाठी जनरल डायरला बोलावून घेतलं. यातूनच जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. यात घटना काय घडली हे आपण जाणतोच. पण या हत्याकांडाने भारतीयांच्या भावना जुलमी ब्रिटिश सरकारविरुद्ध अधिक तीव्र बनल्या. ह्या हत्याकांडानंतर डायरला पुन्हा इंग्लंडमध्ये बोलावून घेण्यात आलं. त्याची बरीच निंदाही झाली; पण बऱ्याच ठिकाणी त्याने ब्रिटिश राज्यसत्तेविरुद्धचं बंड (?) यशस्वीपणे मोडून काढल्याबद्दल त्याचं कौतुकही झालं. भारतातून एक फंड जमा करून ती थैली त्याला इंग्लंडमध्ये देण्यात आली. ही सुमारे ३० हजार पौंडांची रक्कम होती आणि ती जमवण्यात पुढाकार घेतला होता रूडयार्ड किपलिंगने (होय तोच - ‘द जंगल बुक’चा लेखक!) असो!

अशारीतीने अमेरिकन वंशवाद, गदर पार्टी आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संबंधांची ही कहाणी.

(सदराचे लेखक इतिहासाचे लंडनस्थित अभ्यासक आहेत.)

Web Title: Sanket Kulkarni Writes History Of American Racism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top