कृष्णा नदीच्या काठावरील खिद्रापूरचे प्राचीन नाव कोप्पम

khidrapur temple
khidrapur temple

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील हे गाव. नरसोबावाडीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर. या गावी कोपेश्वर मंदिर आहे. बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारे शिलाहार शिल्प-स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर. इ.स. 1109-1178 दरम्यान गांधारादित्य, विक्रमादित्य व भोज-2 या शिलाहार राजांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधण्यात आले. कोप्पम या गावचा देव तो कोप्पेश्वर, असे म्हणता येईल. पण येथे 'कोप्पेश्वर' या नावामागे रंजक पौराणिक कथा आहे.

शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही. एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू येथे आले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोप्पेश्वर व दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. शिव व विष्णू दोघेही येथे शाळुंका रुपातच आहेत, हे महत्त्वाचे. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान.

दुसरे एक वैशिष्ट्य असे की, येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. सतीसंगे तो तिच्या माहेरी गेला होता. तो परतलाच नाही. हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. खिद्रापूर येथील कोप्पेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

कोप्पमचे खिद्रापूर कसे झाले, याची एक आख्यायिका आहे.
आपण कोप्पेश्वर मंदिरात प्रवेश करतो, तो मंडप स्वर्गमंडप म्हणून ओळखला जातो. मुख्य मंडपापासून काहीसा विलग. खुला. या मंडपाला छत नाही. अठ्ठेचाळीस खांबांवर तोललेल्या या मंडपाला छताच्या जागी मधोमध वर्तुळाकार मोकळी जागा. या आकाशगवाक्षाच्या नेमकी खाली गुळगुळीत काळ्या दगडाची रंगशिळा आहे. एका मोठया, अखंड शिळेवर अठ्ठेचाळीस खांबांच्या आधाराने स्वर्गमंडपाचे गोल छत उभे केले आहे. अशी दुसरी स्थापत्यरचना माझ्या ऐकण्यात नाही. या मंडपातील दगडाची चकाकी, गुळगुळीतपण लगेच लक्षात येते. येथील प्रत्येक खांबावरील कोरीव काम पाहात राहावे असे आहे. खांबांवरील कामात सुबकता आहेच, पण एका साच्यातून काढावेत इतकी एकसंधता या कामात आहे. अष्टदिक्पालांची दंपती मंडपात कोरून काढलेली आहे. छताखाली नऊ ग्रहांची मांडणी केली आहे.

म्हणतात, स्वर्गमंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. या मंडपाला यज्ञमंडप असेही म्हणतात. होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठी छत गोलाकार मोकळे सोडले असावे, असे सांगितले जाते. पण यज्ञयागाच्या अन्य कोणत्याही खुणा येथे दिसल्या नाहीत. या मंडपात रंगशिळा आहे, म्हणून एक वेगळा विचार मनात येतो. पूर्वी गाभाऱ्यातील देवाला सन्मुख असा रंगभोग चाले. रंगभोग म्हणजे प्रवचन, कीर्तन, नर्तन, गायन अशा प्रकारची सेवा. या रंगभोगासाठीच हा मंडप खुल्या आकाशासह तयार केला गेला असावा. आपण या मोकळ्या छतातून दिसणाऱ्या आकाशाची गंमत लुटायला, येथील स्थापत्य पाहायला जायला हवे. आणि हो, स्वर्गमंडपाच्या या छिद्रामुळेच या गावाचे नाव छिद्रापूर पडले आणि त्याचा अपभ्रंश खिद्रापूर झाला, असे म्हणतात.

मंदिराचे अवयव कसे असावेत, हे अग्निपुराणात सांगितले आहे. मनुष्यदेहाशी मंदिराचे साम्य दाखवण्यात आले आहे. म्हणजे की, ग्रीवा म्हणजे मान, डोके म्हणजे आमलक, कळस म्हणजे केस. गर्भाशय आणि गर्भगृह यात साम्य मानले आहे. गर्भाशयात काळोख असतो म्हणून गर्भगृहही फार प्रकाशमान असणार नाही, याची काळजी घेतली जाते. गर्भाशयात गर्भ तशी गर्भगृहात मूर्ती. गर्भात आत्मा, तसा गाभाऱ्यातील मूर्तीत सृष्टीचा आत्मा. असे काही. कोपेश्वराच्या मंदिराचा गाभाराही अंधाराच आहे. मंद तेवत्या समईंच्या प्रकाशात कोपेश्वर व धोपेश्वर दिसतात. दक्षिणाभिमुखी आडवे विभूती लेपन केलेला कोपेश्वर आणि त्याच्यापुढे समजूत घालायला आलेला उभा गंध लावलेला धोपेश्वर. डोळे अंधाराला सरावले की भिंतीवर कोरलेल्या शिवलीलामृतातील कथाही दिसतील.

मंदिराच्या प्रत्येक भागामागे एक उद्देश असतो. त्यानुसारच मुखमंडप, सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना असते. खिद्रापूरच्या मंदिराला मुखमंडप नाही. त्याऐवजी मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला स्वर्गमंडप आहे. त्यानंतर सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे.

आपण स्वर्गमंडपाच्या आकाशगवाक्षाने भारलेले असतो. पण आतील सभामंडपही खूप सुंदर आहे. सभामंडपात मधोमध असणार्‍या चार खांबांमध्ये जमिनीवर रंगशिला आहे. येथेही रंगभोग म्हणजे देवाची कलेच्या माध्यमातून सेवाउपासना केली जाते. येथे भक्तगण उपासनेला, कीर्तन-प्रवचन ऐकायला बसलेले असतात. त्यांना सहज आतबाहेर करता यावे यासाठी या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. एक व्यालशिल्प आवारात पडलेले दिसले. पण यापेक्षा मंदिरातील शिल्प अधिक सुबक आहे. सर्वच व्याल मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर उचललेल्या अशा अवस्थेत आहेत. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे व्याल कोरलेला असतो. हा काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा, आकर्षक आणि आवश्यक भाग झाला होता, असे लक्षात येते. सभामंडपाच्या मधे बारा स्तंभ आहेत. त्यांच्याभोवती वीस स्तंभ आहेत. या स्तंभांच्यापलीकडे मंडपाची भिंत आहे. मंडपाला प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. तसेच हवा खेळती राहावी यासाठी जालवातायनेही आहेत.

या मंडपातून अंतराळकक्षात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. अंतराळकक्षातही सुरेख कोरीव स्तंभ आहेत. इथल्या प्रत्येक खांबावर रामायणातील कथा कोरलेल्या आहेत. नरसिंह अवतार, भक्त प्रल्हाद, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आढळतात. पंचतंत्रामधील माकड आणि मगरीची कथा, दोन पक्ष्यांनी काठीच्या आधारे कासवाला वाचवण्याची केलेली धडपड या कथा कोरलेल्या दिसतात. गर्भगृहात जाताना उंबरठ्यापाशी सुंदर रांगोळीसारखी सुघड नक्षी कोरलेली दिसते. कोप्पेश्वर मंदिर ही अंतर्बाह्य सुंदर, सुघड कलाकृती आहे. हे मंदिर जेवढे आतून सुंदर आहे, तेवढेच बाहेरूनही. कितीही वेळ निरखावे, डोळे निवत नाहीत.

मंदिराच्या दक्षिण-उत्तर अंगाला ऋषभ जोडलेले रथ आहेत. रथात दंपती. शिव-पार्वती वाटत नाहीत, पण तीच अपेक्षित असतील का? विवाहानंतरची नवथरता चेहऱ्यावर दिसते. दक्षाघरी यज्ञाला जाण्याआधीची शिव-पार्वती असतील का ही? मंदिराच्या मागे भिंतीवर नंदीवर आरुढ शिव-पार्वती शिल्पित आहेत. या शिल्पाच्या एका बाजूला ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला विष्णूही आहेत. मंदिराच्या समोर नंदी नसला तरी, भद्रावरील देवकोष्ठात नंदीचे दर्शन होते, तेही शिव-शक्तीसह. नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा. त्यांना शेत नांगरताना मिळालेला. नंदीने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांने त्याला आपले वाहन केले आणि आपल्या गणांचे नायकही बनवले. शंकराचा निस्सीम भक्त, देवाची सर्व कामे करणारा निष्ठावंत सेवक. शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचेच एक नाव सांगितले आहे. नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशा नामांनी त्याची ओळख आहे.

एक स्मरण..
कोपेश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर असलेल्या वेगवेगळ्या शिल्पांवर जैन शिल्पकलेचा प्रभाव आहेच. मंदिराच्या शिल्पपट्टीत महावीरांचे एक शिल्पही आढळते. मंदिराच्या प्राकारात एक दिगंबर तीर्थंकरांचे ध्वस्त शिल्प आहे. साहजिकच या मंदिरात गौतम बौद्ध व महावीर यांची शिल्पे आढळतात.

गजवैभव व मंदिरशिल्प ही भारतभऱ जाणवणारी जुळणी आहे. येथील गजथरातील पंच्याण्णव मोठ्या हत्तींवर वेगवेगळ्या देवदेवता आरुढ आहेत. मंडोवरावरील विष्णू अवतार, गणपती, चामुंडा, दुर्गा यांची शिल्पेही सुंदर आहेत. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर अनेक अन्य शिल्पेही लक्ष वेधून घेतात. बाळाला खेळवणारी माता, विविध केशरचना करणाऱ्या ललना मला पाहता आल्या. सगळ्याच शिल्पांची रेखणी आखीव आहे. शिल्पांमध्ये आखीव ऱेखणी करणे अवघड असते, पण येथे ते सुघड झाले आहे. ही शिल्पे पाहायला वेळ कमी पडतो. ज्येष्ठ चित्रकार मित्रवर्य चंद्रमोहन कुलकर्णी यांचा फोन आलाच, शिल्पपट्टीतील गुजराती-राजस्थानी भारतीय व्यापारी, अरब व्यापारी, माल वाहून नेणारे हबशी यांची शिल्पे पाहिलीस का रे? नाही, अजून खूप पाहायचे राहिले आहे. पुढच्यावेळी एक छोटी दुर्बीणही सोबत नेईन, जरा नजरेच्या वरच्या पट्ट्यातील शिल्पे निरखायला.

म्हणतात, औरंगजेबाच्या कन्येने कोप्पेश्वराचे मंदिर पाहिले आणि ती येथील शिल्पांच्या प्रेमात पडली. ती येथेच राहिली. अनेक प्रकारे तिच्या मिनतवाऱ्या करण्यात आल्या, पण ती खिद्रापूर सोडेना. अखेर, या मंदिराला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचणार नाही, असे औरंगजेबाने वचन दिल्यावर ती माघारी परतली. या मंदिराच्या रक्षणासाठी खैदरखान याची नेमणूक करण्यात आली.

म्हणतात, खैदरखानलाही हे मंदिर, हा परिसर खूप आवडला. त्याने आपल्या नावावरून कोप्पमचे खिद्रापूर केले. म्हणतात, खैदरखानने या मंदिराच्या बाह्यभागावरच्या शिल्पांची नासधूस केली. अनेक कहाण्या या मंदिराच्या प्राकारात विखरून पडल्या आहेत ध्वस्त शिल्पासारख्याच. या मंदिराच्या उभारणीनंतर एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. देवगिरीचा यादवसम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवल्यावर या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराच्या खर्चासाठी दान दिले होते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाज्याबाहेरच्या शिलालेखात तसा उल्लेख आहे. जे उरले आहे तेही विलक्षण आहे.

कोप्पेश्वर मंदिराच्या प्राकारात सोळा प्रकारची कीर्तीमुखे पाहायला मिळतात. शिवालयांच्या प्रवेशद्वारापाशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प कोरलेले दिसते, तेच कीर्तीमुख. येथील या शिल्पांतील कलाकुसरीला तोड नाही. प्रत्येक कीर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम वेगळे. शिल्पकाराने शिव-पार्वतीलाही कीर्तीमुखात बद्ध केलेले दिसते. कीर्तीमुखाची एक कहाणी आहे. कीर्तीमुख नावाचा असूर शिवभक्त होता. त्याने तहान-भूक विसरून घोर तपश्चर्या केली. महादेव त्याला प्रसन्न झाले. वर माग म्हणाले. तेंव्हा प्रचंड भुकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांकडे अन्नाची मागणी केली. महादेव म्हणाले, स्वत:चेच शरीर पायापासून खा. त्या असुराने तसे केले. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून महादेव म्हणाले, आजपासून तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पापे खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हापासून कीर्तीमुखाचे शिल्प शिवालयाच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली.

या मंदिरावरील सुरसुंदरींची शिल्पे देखणी आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा अथवा पर्‍या असाही समज आहे. समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असेही अनेकजण मानतात. या सुरसुंदरी मंदिराच्या भिंतीवर आवर्जून कोरण्यात येतात. आपल्याला शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध या विषयांनी ग्रासलेले असते. या विषयांत मन न गुंतवता, मंदिरात जातांना सावध चित्त असावे, असे  या सुरसुंदरी सुचवतात. तसेच, यातील काही जणी देवदर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे, देवदर्शनाला कसे जायचे असते याचेही मार्गदर्शन करतात. रिक्त हस्ते देवाला जाऊ नये. पाने, फळे, फुले असे काहीच जवळ नसेल तर मनोभावे केवळ जलही अर्पण केले तरी चालते. या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात, परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नताही असावी लागते. भक्तजनांमध्ये नीतीमूल्ये निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उद्धार होईल, या भावनेने मंदिरासारख्या सांस्कृतिक केंद्रात सुरसुंदरींची योजना मध्ययुगात करण्यात आली होती. या सुरसुंदरींविषयी डॉ. गो. ब. देगलूरकर (सुरसुंदरी, भारतीय विद्याभवन, पुणे केंद्र) यांनी विस्ताराने लिहिले आहे.

प्राचीन काळापासून लोकश्रद्धेत स्थान मिळवून बसलेल्या यक्ष-यक्षींची योजना भारतीय शिल्पकारांनी वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी केलेली पाहायला मिळते. मंदिरशिल्पात यक्ष-यक्षीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पौराणिक कथांमधून यक्ष-यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा कनिष्ठ प्रकारची योनी दिलेली दिसते. यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. स्वाभविकपणे त्यांची शिल्पे मंदिरावर कोरण्यात आली. या मंदिरावरही ती दिसेल. एका यक्षाला भक्तांकडून हळद-कुंकू वाहिलेलेही दिसते.

दक्षिण भारतात नाग अनंताची पूजा मंदिराच्या प्राकारात केलेली आढळते. या मंदिराच्या प्राकारातही बाहेर एका वृक्षातळी भंगलेले शिल्प आढळते. नाग हे काळाचे प्रतीक आहे. नाग हा अतिशय वेगाने सरपटत जातो, वेगाने पुढे सरकणाऱ्या काळासारखा. तो केंव्हा सुरु झाला आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाला अंत नाही म्हणून तो अनंत. म्हणूनच नागालाही अनंत म्हणतात. हा नागपुरूष सर्वांवर कृपाक्ष ठेवून असतो. तोच विष्णूसाठी शय्या होतो आणि शिवाच्या गळ्यात डोलतो.

काळ वेगाने सरकतो आहे. ऊन-वारा-पावसाच्या माऱ्यातही ही शिल्पे आपल्याला आनंद देण्यासाठी उभी आहेत. आक्रमकांचे हातोडे झेलूनही ती उभी आहेत. कोण होता हा आक्रमक? खैदरखानचे नाव घेतले जाते, पण त्याच्याविषयीच्या अन्य कहाण्या ऐकल्यावर त्याचे हे कृत्य असेल हे तेवढेसे पटत नाही. म्हणतात, स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाने वाटेतील मंदिरे ध्वस्त केली, त्यात खिद्रापूरचे हे शिवालयही होते. विजापूरकडून वाईकडे येण्याच्या वाटेत खिद्रापूर आहे. त्यामुळे मला तरी हेच पटते.

जाल कसे?
सांगली किंवा कोल्हापूर या दोन्हीकडून नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) येथे जायचे. तेथून कुरूंदवाड मार्गे खिद्रापूर. नरसोबाच्या वाडीपासून 25 किलोमीटरवर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com