सायितरीचा करतुक थोर (संतोष शेणई)

संतोष शेणई santshenai@gmail.com
रविवार, 16 जून 2019

वटपौर्णिमा आणि सत्यवान-सावित्रीची आख्यायिका हे एकजीव झालेलं "सूत्र'. या आख्यायिकेचा अर्थ आजवर अनेकांनी आपापल्या परीनं लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एक वेगळा अर्थ गवसलेला हा लेख आजच्या (16 जून) वटपौर्णिमेनिमित्त...

वटपौर्णिमा आणि सत्यवान-सावित्रीची आख्यायिका हे एकजीव झालेलं "सूत्र'. या आख्यायिकेचा अर्थ आजवर अनेकांनी आपापल्या परीनं लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एक वेगळा अर्थ गवसलेला हा लेख आजच्या (16 जून) वटपौर्णिमेनिमित्त...

नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यासंगे मला सावित्रीची कहाणी कोडं घालत येते. वटवृक्षाला धाग्यांनी बांधून टाकणाऱ्या स्त्रियांनाच पारंपरिकतेच्या धाग्यांनी करकचून बांधून टाकलेलं आहे की काय, असं मला वाटत राहतं. वटसावित्रीच्या व्रतातल्या सावित्रीभोवती एक आकर्षक वलय निर्माण करण्यात आलं आहे; पण महाभारतातली मूळ सावित्री विलक्षण वाटावी अशी आहे. डॉ. मॉरिस विंटरनिट्‌झ (हिस्ट्री ऑफ इंडियन लिटरेचर) यांनाही आश्‍चर्य वाटावं अशी ही कहाणी आहे खरी. ही कहाणी विलक्षण वाटतानाच कोडं घालत राहते. माझं श्रद्ध मनही शंकेखोर होऊन जातं. म्हणजे पाहा, या कहाणीचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे सावित्रीनं प्रत्यक्ष यमाशी संवाद करून पती सत्यवानाचे प्राण, सासऱ्यांची दृष्टी, त्यांचं राज्य, आपल्याला शंभर बंधू व तेवढेच पुत्र एवढं सगळं मिळवलं ही घटना. हे सगळंच विस्मयकारी आहे, तेवढंच मनात प्रश्नांची उतरंड मांडणारंही आहे.

मृत्यूविषयीचं गूढ तर माणसाच्या मनात कायमच असतं. मृत्यू कुणालाही चुकला नाही की कुणी त्याला चकवूही शकलेलं नाही; पण सावित्रीनं आपल्या पतीचा मृत्यू चुकवला. केवळ पातिव्रत्य तिथं तिला उपयोगी पडलं का? मग इथं प्रश्न पडतो की इतर स्त्रियांचं पातिव्रत्य कमी पडतं का? सावित्रीनं वाक्‍चातुर्य व बुद्धिकौशल्य यांच्या जोरावर यमाचं मन जिंकलं असं म्हणावं तर असं वाक्‍चातुर्य व बुद्धिकौशल्य असलेले इतरही अनेकजण असतातच की! तरी सावित्रीलाच हे का शक्‍य झालं? सावित्रीची पतिपरायणताच तेवढी महत्त्वाची की त्याहून तिचं आणखी काही कर्तृत्व आहे? ती केवळ वाक्‍चतुरा आहे की त्याहून अधिक ज्ञानी आहे? तिनं शूरवीर राजे, साम्राज्यांचे राजपुत्र यांना नाकारून वन-वासी सत्यवानालाच का निवडलं? पतिनिधनाचा काळ जवळ आल्यावर तिच्या मनाची काहीच घालमेल झाली नसेल? जोडीदाराच्या मृत्यूनं तिची चलबिचल झाली नसेल? ती यमामागून दक्षिणेला चालत गेली असं कहाणी सांगते. ती कुठवर दूर गेली? पतीचं शव अरण्यातल्या प्राण्यांपासून सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करून ती यमामागून गेली. या व्यवस्थेसाठी काही काळ गेला असेल. महिषावरून निघालेला यम तोवर दूर गेलेला असेल, तिनं त्याला पायी जात कुठं कसं गाठलं? काळ गतीनं जात असताना ती त्याच्याबरोबर वेग कसा राखू शकली? यम कुठं राहतो? तिथून ती परतली कशी? अनेक शंकेखोर प्रश्न श्रद्ध मनात दाटत जातात; पण महाभारतातलं आख्यान किंवा वटसावित्रीची व्रतकहाणी या दोहोंकडून समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत.
* * *

सावित्रीचं हे कोडं एका मालवणी लोकगीतात उलगडलेलं दिसतं. हे गीत मला ऐकवणारीही होती सावित्रीच. सावित्री आडेलकर या हरिजन स्त्रीकडून हे गीत मला मिळालं आहे. ते असं ः

सत्सायितरीची काणी आयका धरमानं, आयकली बाये धरमानं आयकली
ध्रुपदेवून थोर करतुकाचा पोर, दुनिया हराकली बाये दुनिया हराकली
पोर सुंदरी गुनाची जनू केवड्याचा फाक बाये केवड्याचा फाक
बोल्ला सायितरी कायी, पसारती चान्न्यो लाख बाये चान्न्यो लाख
केळ फोपावली तरी कोनी मागना घालीना बाये मागना घालीना
दुसऱ्या घरचो जपूचो किती राजानं दागिनो बाये राजानं दागिनो
सायितरी गेली देशोदेशी, सोदल्यान सालभर बाये सोदल्यान सालभर
कोनी धनी सामराज्याचो, कोनी लाडको परजेचो, सरस राजपुतर बाये राजपुतर
कोनी युद्धात हुशार, कोनी बुद्दीन चतुर, गावना मनभर बाये गावना मनभर
खय गावात गो हिच्या आवडीचो राजपुतर बाये आवडीचो राजपुतर
सायितरी गेली वनी, गावलो त्येच्या मनाचो गो धनी बाये मनाचो गो धनी
सादोसालस पोरगो रवलो मठयेक धरूनी, मठी सत्वचनी बाये मठी सत्वचनी
सोडला राज्य बापसाचा, धरली वाट गो रानाची बाये वाट रानाची
वरसाचो कुकूलाभ तरी पोर धीराच्या मनाची बाये धीराच्या मनाची
रीतीभातीन करी सगळ्यांचा गेला वरास निगून बाये गेला वरास निगून
उचंबळ सायितरीची इली येळकाळ गे सांगून बाये येळकाळ सांगून
सायितरी गेली पतीवांगडा आणाया लाकडा बाये आणाया लाकडा
येळ येताच लवांडलो सत्यवान, सायितरीन केला कडा बाये सायितरीन कडा
त्येच्ये दक्‍खिनेक पाय सायितरी चपापला बाये सायितरी चपापला
येळवकत वळकून त्येका झाडोऱ्यांनं झाकला बाये झाडोऱ्यांनं झाकला
रानपानांचो गो रस त्येच्या नाकात सोडलो बाये नाकात सोडलो
कोनी मदतीस येवा, टावो सायितरीन फोडलो बाये टावो फोडलो
जाण्तो व्हतो येक त्येची वाट गो दुरून बाये वाट दुरून
सत्सायितरी गेली त्येच्यालागी धावानं बाये त्येच्यालागी धावानं
जाण्तो इलो आनी पायालागी उबो रवलो बाये पायालागी रवलो
हातीत दांडको, दांड्यार कोंबडो, सायितरीनं त्येका वळाकलो बाये वळाकलो
सायितरीनं इनइला, माज्या वखदीक दे गुण बाबा वखदीक गुण
मनिसाच्या भल्यासाटी तुजी पटय रे खूण बाबा पटय रे खूण
सायितरी गो चतुर त्येचा बोलना मधुर जाण्त्याक जिंकले बाये जाण्त्याक जिंकले
मावळतीक उबो रवलो जाण्तो, सत्यवानाक उठयले त्येना बाये उठयले
देव इस्वटीनं राखला भैनीचा कुकू बाये भैनीचा कुकू
सत्सायितरीचा करतुक थोर, ध्रुपदा धाकू बाये ध्रुपदा धाकू

लोकगीतकार सावित्रीचा उल्लेख "सत्सायितरी' असा तीन वेळा करतो. तिच्या कर्तृत्वाचा उल्लेख करताना दोन वेळा आणि ती "जाणत्या'कडं धावून गेली त्या वेळी एकदा. "सत्यवान-सावित्री' असं आपण म्हणत असलो, तरी "सत्सायितरी'मधलं "सत्‌' हे "सत्यवाना'साठी नाही; ते सावित्रीतल्या "सत्‌'साठीच आहे. "सत्‌' म्हणजे सतत असणं. जे "कधीही नाही' असं होणे नाही म्हणजे सत्‌. आपलं अस्तित्व संपूनही त्यापलीकडं सत्‌ उरतंच. सावित्रीकडं पाहण्याची एक वेगळी नजर इथं आपल्याला मिळते. सावित्रीचं आख्यान महाभारतातल्या वनपर्वात आहे. धर्मराज युधिष्ठिरांनी मार्कंडेय ऋषींना विचारलं ः "द्रौपदीहून श्रेष्ठ भक्ती असणारी कुणी स्त्री आहे?' त्यावर मार्कंडेय ऋषी सावित्रीची गोष्ट सांगतात. त्या घटनेची आठवण पहिल्या दोन ओळींतच करून देतानाच लोकगीतकार सावित्रीच्या कर्तृत्वाचा निर्देश करतो. महाभारतातल्या आख्यानात किंवा व्रतकहाणीत सावित्रीचं कर्तृत्वकथन नाहीच, ते इथं आहे. तिच्या सौंदर्याचं वर्णन करताना "केवड्याचा फाक' गीतकाराला आठवला. तिच्या अंगकांतीचा गंध सुचवला आहेच; पण केवड्याचा सोनरंग सूर्यतेज सूचित करणारा आहे. केवड्याची पाती धारण करणाऱ्या दांड्याला "कर' असं मालवणीत म्हणतात. "कर' म्हणजे "किरण' असाही एक अर्थ आहे. सावित्रीचं सौंदर्य सूर्यासारखं तेजस्वी आहे, असंही गीतकार सूचित करतो. तिचं वाक्‍चातुर्य कथन करताना त्याला चांदण्यांचा प्रसन्न व स्निग्ध प्रकाश आठवतो. ती तारुण्यात आली तरी तिला मागणी येईना ही चिंता राजाला होतीच. "केळ' हे रंभेचं पृथ्वीवरचं रूप मानलं जातं. सावित्री रंभेसारखी यौवनोत्फुल्ल दिसू लागली तरी ती उजवेना याची चिंता राजाला वाटू लागली.

पित्याच्या इच्छेनं ती राजपुरोहिताबरोबर देशोदेशी फिरून वरसंशोधन करते आहे. इथवर आख्यानातली गोष्टच येते; पण तिनं राज्य गमावलेल्या अंध राजाच्या वन-वासी पुत्राचा पती म्हणून मनोमन का स्वीकार केला याचं उत्तर आख्यानात नाही. ते उत्तर या गीतात आहे. कुटुंबवत्सल, अंध माता-पित्यांची सेवा करण्यात रत असलेला, कोणताही गर्व नसलेला साधा, सालस, माणूसपण जपणारा सत्यवान तिला मोहवतो. ती राजसुखाचा त्याग करते आणि सत्यवानाबरोबर वनात सासू-सासऱ्यांची सेवा करू लागते. नारदाकडून पतिनिधनाची वेळ माहीत झालेली असतानाही ती लग्न करायला तयार झाली हे तिचं धैर्य मोठं आहे. आपण एरवी म्हणतो, "काळ-वेळ सांगून येत नाही'. इथं मात्र "इली येळकाळ गे सांगून'. अशा क्षणी कुणाचीही घालमेल होईल; पण महाभारतातलं आख्यान किंवा व्रतकहाणी त्याविषयी बोलत नाही. मात्र, इथं "उचंबळ' या शब्दानं ही अस्वस्थता व्यक्त झाली आहे.

आख्यानात यमसंवादात सावित्रीचं बुद्धिचापल्य, संवादकौशल्य आणि वाक्‍चातुर्य दिसतं. इथं ते झाकलं आहे. मात्र, आख्यानात किंवा व्रतकहाणीत न दिसणारं सावित्रीचं ज्ञानीपण, तिचं कर्तृत्व इथं उठून दिसतं. मृत्युसमय समीप येताच सत्यवान लवंडतो. तिथं मुद्दाम उपस्थित राहिलेली सावित्री वैद्यकीय ज्ञान असलेली होती. ती झाडपाल्यानं सत्यवानाचं शरीर झाकून त्याची शुश्रूषा करू लागते. अशा समयी नाकातून रसौषधी दिल्या जातात. लक्ष्मण निश्‍चेष्ट पडला होता तेव्हाही त्याला संजीवनीरस नाकातूनच देण्यात आला होता. तेच ती करत आहे. त्याच वेळी ती मदतीसाठी धावा करत आहे. त्या वेळी तिला एक वृद्ध जाणकार व्यक्ती थोडी दुरून जाताना दिसते. ती त्या व्यक्तीकडं धावते व तिला घेऊन येते. यमाबरोबर सात पावलं चालण्याचा संदर्भ आख्यानात आहे, त्याला पूरक ठरेल असं हे आहे.

आख्यानात सावित्री यमामागून चालत जाते असं म्हटलेलं आहे. इथं ती सत्यवानाच्या देहापाशीच आहे. उपचार करते आहे आणि वृद्ध जाणत्याच्या रूपात यमदेव तिच्यापाशी आले आहेत. ते यमदेव आहेत हे तिनं ओळखलं आहे. दक्षिण दिशा ही गमनदिशा मानली जाते. सत्यवानाचे पाय दक्षिणेकडं आहेत आणि त्याच्या पायापाशी वृद्ध येऊन उभा राहिला आहे, ही एक खूण. आणखी एक खूण म्हणजे त्या व्यक्तीच्या हातात काठी व कोंबडा आहे. या यमरूपाचा उल्लेख "देवतामूर्तिप्रकरणम्‌' या ग्रंथात आहे. वडनगरमधल्या (गुजरात) हाटकेश्‍वराच्या मंदिरात दिक्‍पालरूपात यमदेवता अशीच उभी आहे. ती खूण सावित्रीला पटली. संपूर्ण गीतात "बाये' असा लयीसाठी शब्द येतो; पण यमदेवांसाठी विनंती करणाऱ्या दोन पंक्तीत "बाबा' असा शब्द योजलेला आहे. ती आपण करत असलेल्या उपचारांना गुण मागते. "माणसाच्या भल्यासाठी तू हे केलं पाहिजेस' असंही सांगते. ऋग्वेदात यमाचा उल्लेख आद्यमानव, मानवांना एकत्र करून त्यांचं भलं साधणारा, मार्गदर्शक असाच आहे. तो अमर आहे, तरीही त्यानं स्वतःचा बळी देत प्रजा निर्माण केली आहे. वेदोत्तर काळात, विशेषतः पुराणकाळात मनूनं यमाची जागा घेतली आणि यम कठोर मृत्युदेवता झाला, नरकलोकीचा स्वामी झाला. यमाच्या आद्यरूपाचं स्मरण सावित्री त्याला इथं करून देत आहे. तो आता दिशा बदलतो आणि मावळतीच्या दिशेनं उभा राहतो. यमाची दक्षिण दिशा ठरली तीही पुराणकाळात. वेदात यम हा मावळत्या सूर्याचं प्रतीक आहे. "मृत्यूचा स्वामी' याऐवजी तो "मानवहितदक्षी' झाला हे गीतकार इथं सूचित करतो.

यातल्या एका ओळीनं थोडं छळलंच. "देव इस्वटीनं राखला भैनीचा कुकू' या ठिकाणी अचानक "इस्वटी' कसा प्रकटला हे कळेना. "इस्वटी' ही क्षेत्रपाळ देवता आहे. मोठं परसू राखणारी देवता आहे. तिचं स्थान वटवृक्षाखाली असतं. कुलक्षय होऊ नये यासाठी राखण करणारी ही देवता आहे. हा "इस्वटी' म्हणजे यमच का? असेल. वेदात यमाचा व वटवृक्षाचा संबंध सांगितला नसला तरी गर्द पानांच्या वृक्षातळी यमाचं विश्रांतिस्थान मानलेलं आहे. यम म्हणजे विवस्वानाचा (सूर्याचा) पुत्र वैवस्वत. वैवस्वताचं "इस्वटी' झालं असेल. सावित्रीचं जन्मरहस्यही ध्यानात घ्यायला हवं. सवितृच्या मंत्रजपानं, सूर्याच्या आशीर्वादानं सावित्रीचा जन्म झाला आहे. सावित्री-मंत्र म्हणजे गायत्री-मंत्रच. सूर्याच्या आशीर्वादानं जन्मलेली सावित्री ही एका अर्थी वैवस्वताची बहीणच ठरते. म्हणून तर "इस्वटी' बहिणीचं कुंकू राखतो. पर्जन्यकाळ सुरू झाला की वटपौर्णिमा येते.

यम ही वरुणाबरोबरची पर्जन्यसमूहातली देवता असं वेदात मानण्यात आलेलं आहे.
आता आपण ठरवायचं, केवळ पारंपरिकतेनं वटवृक्षाला दोरांचे फेरे मारायचे की सावित्रीसारखं ज्ञानाचं, कर्तृत्वाचं सूत्र हाती धरायचं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh shenai write vat savitri and satyawan sawitri article in saptarang