फॅशनवर मात पैठणीची! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paithani Saree

अस्सल देखणेपणाचा सन्मान लाभलेल्या पैठणीचा तोरा वाढतोय. नव्या फॅशनलाही येवल्याची पैठणी मागे टाकतेय, हे नक्की..!

फॅशनवर मात पैठणीची!

अस्सल देखणेपणाचा सन्मान लाभलेल्या पैठणीचा तोरा वाढतोय. नव्या फॅशनलाही येवल्याची पैठणी मागे टाकतेय, हे नक्की..! येवला (जि. नाशिक) शहराची संपूर्ण बाजारपेठ पैठणीच्या उलाढालीवर अवलंबून आहे. ‘येवला वजा पैठणी बरोबर शून्य’ असं इथल्या बाजारपेठेचं समीकरण. मध्यंतरी मंदीच्या गर्तेत सापडलेल्या पैठणीने पुन्हा एकदा वैभवाच्या शिखराकडे वाटचाल सुरू केली. विणकरांचे व कारागिरांचे अथक परिश्रम असलेल्या या व्यवसायात येवला व परिसरात सुमारे तीन हजार हातमागांची संख्या आहे. सुमारे १० हजारांवर हातांची पैठणी आधारवड असून, वर्षाला ३०० ते ४०० कोटींची उलाढाल होते.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भरजरी वस्त्र म्हणून पैठणीला मानाचं स्थान आहे. तशी तर पैठणी बनवण्याची कला साधारण दोन हजार वर्षं जुनी आहे. कालौघात ती आधुनिक बनली. पैठणीचं मूळ गाव मराठवाड्यातलं पैठण. प्राचीन काळात पैठण रेशीम व जरीच्या व्यापाराचं महत्त्वाचं ठिकाण होतं. त्या वेळी रोमन देशाच्या राजाला कापसाचं सूत व रेशीम धागा निर्यात होत असल्याचं सांगितलं जातं. अठराव्या शतकात पेशव्यांनी पैठणींच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याचं सांगितलं जातं. मजल-दरमजल करत पैठणीने अनेक स्थित्यंतरं पाहिली. कालप्रवाहात राजे-राजवाडे, वेद-पंडितांची परंपरा, हिरे-माणकांची व्यापारपेठ नामशेष झाली; पण समृद्ध भूतकाळाच्या स्मृती जागवणारा एक दुवा आजही कायम आहे, तो म्हणजे इंद्रधनुष्यी रंगांचं, मऊ-मुलायम रेशमी पोत व सुवर्णतंतूंनी गुंफलेलं हे रमणीय काव्य, म्हणजेच मराठी सौभाग्याचं लेणं असलेली पैठणी!

सोळाव्या शतकात रघूजीबाबा नाईक यांनी येवलेवाडीची स्थापना केली. त्याचवेळी पैठण शहरातून कारागीर आणून वाडीच्या भरभराटीसाठी येवल्यात पैठणी व्यवसाय सुरू केला, तो भरभराटीला आणण्यासाठी कारागिरांना आश्रय दिला. त्यानंतर सुमारे साडेचारशे वर्षांचा काळ लोटला; पण हे देखणं वस्त्र अधिक सुंदर होत गेलं. अंगभूत कलात्मकतेच्या बळावर विणकरांनी वर्षानुवर्षं हातमागावर या महावस्त्राला अधिकाधिक देखणं रूप प्राप्त करून दिल्याने हा वारसा चिरकाल टिकून आहे. पैठणी हा हस्तकलेचा सुंदर नमुना असून महावस्त्राला प्राचीन वारसा, पुरातन परंपरा आहे; दोन हजार वर्षांचा संपन्न इतिहास आहे.

शेकडो परकीय आक्रमणं पचवून हे सांस्कृतिक वैभव टिकून आहे. एकेकाळी राजाश्रय होता म्हणून पैठणीची भरभराट होत गेली. शेकडो वर्षांच्या उलथापालथीत आता पैठणी वस्त्राला लोकाश्रयाने तारलं. पूर्वी श्रीमंतांचा शौक म्हणून ऐट मिरवणारी पैठणी साडी मागील २० ते २५ वर्षांत सामान्यांची स्वप्नपूर्ती करणारी ठरली. म्हणूनच आज ती खेड्यात अन् सातासमुद्रापार आपला तोरा मिरवत आहे. येवला शहरच नव्हे, तर नागडे, बल्हेगाव, कोटमगाव, सुकी, पारेगाव, बाभूळगाव, जळगाव नेऊर, आडगाव आदी २५ ते ३० गावांत मोठ्याप्रमाणात पैठणीचं विणकाम होत असून, बेरोजगार तरुणाईच्या हाताला हक्काचा रोजगार मिळाला. तिच्या विणकामाचं कौशल्य तसं सहज जमणारं नाही; परंतु कोणतंही प्रशिक्षण नसताना विणकरांनी वर्षानुवर्षं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला सोपवून त्यात अधिकाधिक नावीन्यच आणलं आहे. नव्या पिढीने नव्या जमान्यात; पण जुन्या हातमागावरच पैठणी तयार करण्याचं काम सुरू ठेवलं. म्हणूनच या देखण्या महावस्त्रावर दुनिया निस्सीम प्रेम करत असून, येवला ‘टुरिस्ट प्लेस’ बनलंय. आता तर विणकरांच्या विस्तृत व्याख्येत क्षत्रिय, साळी, कोष्टी, नागपुरे यांबरोबर आता तेली, वडार, मराठा हा वर्गही मोठ्या संख्येने विणकर क्षेत्रात उतरला. येवला म्हटलं की, डोळ्यांसमोर उभी राहते ती नाजूकशी, कलाकृतींनी सजलेली, फुललेली अप्रतिम पैठणी. प्रत्येक स्त्रीमनावर अधिराज्य गाजविणारी व स्त्रीचं रूप फुलविणारी अस्सल पैठणी बनते ती येवल्यात. पैठणीचे वेगवेगळे प्रकार तयार होत असले तरी अस्सल पैठणीचा बाज टिकवून ठेवण्याचा प्रयत्न इथल्या प्रत्येक कलाकाराचा आहे, त्यामुळे ‘फॅशन’च्या जमान्यातही या महावस्त्राचं मोल कमी न होता वाढत आहे.

सव्वा किलो सोनं व चांदी

नक्षीदार, नारळी, धूपछाव रंग, लांब व रुंद असा काठपदर, सुमारे सव्वा किलो सोनं व चांदी वापरून १०० वर्षांपूर्वी ही अस्सल पैठणी तयार केली जात होती. २५ ते ३० इंचांचा खऱ्‍या जराने भरलेला पदर व त्यावर आकारलेली बुट्टी, हे पैठणीचं भूतकाळातील रूप आजही येवल्यात पहावयाला मिळतं. अस्सल महावस्त्रातून आजही ते सोनं आणि चांदी तशीच प्राप्त होते, हा तेव्हाचा खरेपणा आजही ८० ते ८५ वर्षांची वृद्धमंडळी सांगतात. सध्याच्या काळात ९ हजार रुपयांपासून ४ ते ५ लाखांपर्यंतची पैठणी येवल्यात तयार केली जाते. काळानुरूप या पैठणीत बदल होत गेला. नाचऱ्‍या मोरासह पोपट, पदरावर सिल्क मटेरियल, घागरा, दुपट्टा, टोप, मुलांचे शर्ट, मोदी जॅकेट व मुलींसाठी ड्रेस मटेरिअलही तयार होऊ लागलं आहे. हे राजवस्त्र पोफळी (ऑकर), लाल (रेड), फिक्कट जांभळा (लॅवेंडर), जांभळा (वायोलेट), निळा (ब्ल्यू), किरमिजी तांबडा (मॅजेंटा), मोतीया (पर्ल पिंक), वांगी (ब्रिन्जॉल), मोरपंखी (पिकॉक ब्ल्यू) आदी रंगांमध्ये तयार होत असून हे रंग महिलांना भावत आहेत. नव्या रंगांच्या स्वरूपात आपला बाज अजूनच उठावदार करत पैठणी साकारू लागली आहे.

स्त्रियांमध्ये प्रचंड ‘क्रेझ’ !

कोणताही सण असो, कोणतीही वेळ असो... भारदस्त पेहराव ठरतो तो पैठणीचा. बाजारात कितीही फॅशन आल्या अन् कितीही पिढ्या बदलत असल्या, तरी पैठणीची ‘क्रेझ’ कमी झाली नाही. नवनव्या अंगाने तिचं रूप खुलतंच आहे. म्हणूनच येवल्याच्या बाजारपेठेला शोभा आणली आहे ती पैठणीने..! पैठणीला स्वतःचं असं एक ‘ग्लॅमर’ असल्याने पाश्चात्त्य पेहराव घालणाऱ्या मुलींनाही पैठणीची क्रेझ असते. डिझायनर साड्यांचं कितीही कौतुक केलं, तरी ठेवणीतल्या साड्यांमध्ये एक तरी पैठणी मराठमोळ्या स्त्रीला हवीहवीशी वाटते. जरतारी पारंपरिक पैठणीचं पारंपरिक रूप कायम ठेवत त्यात ‘व्हॅल्यू अ‍ॅडिशन’ केलं, तर भल्या-भल्या डिझाइनच्या साड्यांची ‘छुट्टी’ होऊ शकते. कपाटं साड्यांनी भरलेली असली, तरी पैठणीशिवाय त्याला पूर्णता नाही, असं स्त्रियांना वाटतं. प्रत्येक स्त्रीच्या मनात पैठणी घर करून बसलेली आहे अन् असतेच. म्हणूनच आयुष्यात एकदा तरी पैठणी नेसायला मिळावी, यात स्त्रीला धन्यता वाटते. अस्सल सौंदर्य अन्‌ कशिदाकारीमुळे कलात्मक दागिना पूर्णपणे हातमागावर कारागिरांच्या कलात्मकतेतून अन् एक-एक धागा विणून ती साकारते... सोळाव्या शतकात शालूच्या रूपातील हे महावस्त्र आज हातमागावर आठ-आठ तास घाम गाळून विणकरांच्या कलात्मक शक्तीमुळे अजून खुलत आहे. नव्हे-नव्हे तर, फॅशनच्या जमान्यात एकच पैठणी हजार साड्या, जिन्स, टॉप, सलवार अन्‌ नाना प्रकारच्या वस्त्रांच्या नाकावर टिच्चून भाव खात आहे. पैठणीवरचा पोपट, मोर, बुट्टी अन्‌ देखणं नक्षीकाम या महावस्त्रालाही ‘ग्लोबल’ बनवत आहे.

मुंबई-पुण्यात होतेय विक्री

पूर्वी येवल्यात ४ ते ५ शो-रूम होते. कापसे, सोनी, भांडगे, लक्कडकोट ही या क्षेत्रातील जुनी अन् टॉपची नावं... मात्र गेल्या दोन दशकांत पैठणीला राज्यात अन् परराज्यांतून विक्रमी मागणी वाढली, त्यामुळे इथे शंभरच्या आसपास पैठणीचे शो-रूम उघडले गेलेत. शिर्डी-मनमाड, नाशिक-औरंगाबाद महामार्ग भागात शो-रूम झालेत. व्यवसायाचा आयाम विस्तारला आहे. वर्षभर इथल्या बाजरपेठेत खरेदीची धूम असते. दिवाळी आणि लग्नसराईत अधिकचा व्यवसाय होतो. शनिवार-रविवारी शो-रूममध्ये गर्दी मावत नाही. होलसेल दरात पैठणी खरेदी करून त्या मुंबई-पुण्यात विकल्या जातात, किंबहुना शिर्डीत साईबाबांचं दर्शन अन् इथे पैठणी खरेदी, असं पर्यटकांचं समीकरण तयार झालं आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी लिमिटेड असलेला हा व्यवसाय ‘ग्लोबल’ होऊन चार पटीने विस्तारला आहे. केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालयाने कोट्यवधीच्या योजनाही आणल्या, तर राज्य शासनही पर्यटनाच्या ‘अँगल’ने याकडे पाहत असल्याने वेळोवेळी ‘फॅशन-शो’ मोठ्या शहरांत होऊ लागले आहेत, त्याचमुळे येवल्यातला ग्राहक वाढला आहे. पैठणीसोबत गावाची प्रगती होऊ लागली असून, शहर, तालुक्याचा आवाका बदलला आहे. पैठणी अमेरिका, लंडन, न्यूयॉर्क, न्यूझिलंड आदी देशांत पोचली आहे. शेतकऱ्यांची पोरंही शेती करता-करता घरातच हातमाग टाकून पैठणीचं विणकाम करू लागली आहेत. देखण्या पैठणीला राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यासह अनेक पुरस्कारांची मोहोर उमटली आहे.

विशेष म्हणजे मुंबई-दिल्लीच्या प्रदर्शनात पैठणी भाव खात असून, ‘ग्लोबल’ जमान्यात विणकर व विक्रेत्यांनी आत्मसात केलेल्या बदलामुळे नव्या रूपातील पैठणीने येवल्याच्या अर्थकारणाला चालना दिली आहे. सोशल मीडियाचा वापर करून मोठे विक्रेते परदेशात अन् देशभरात, तर हजारावर तरुण व महिलांनी घरातून ऑनलाइन पैठणीच्या व्यवसायाला गती दिली. ग्राहकांचे व्हॉट्‍सॲप ग्रुप, इन्स्टाग्राम पेज व फेसबुक पेज वाढले असून, त्यावर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. विक्रेते तसेच विणकर या पेजवर रोज नव-नवीन पैठणी व इतर साड्यांचे फोटो ‘अपलोड’ करतात. ग्राहक आवडलेल्या पैठणी व साडीची माहिती मिळवत खरेदीचा व्यवहार करतात. फोन पे, गुगल पे अथवा इतर पर्यायांद्वारे साडीची रक्कम दिली जाते, विक्रेते कुरिअरद्वारे साडी ग्राहकांना पाठवतात. हाच व्यवहार आता भरवशाचा झाल्याचं चित्र असून, रोज ५०० ते हजारापर्यंत साड्या अशा व्यवहारात विक्री होतात. अनेक युवक व महिलांनी जोडव्यवसाय म्हणून ऑनलाइन पैठणीचा व्यवसाय सुरू केला. स्वतः विणलेली, अथवा विणकर-विक्रेत्यांकडून होलसेल दरात पैठणी घेऊन खरेदी केलेल्या ग्राहकांना कुरिअरद्वारे पाठवली जाते. घरगुती व्यवसाय करणारे असे ३५० वर विक्रेते आहेत. आता इथल्या शंभर विक्रेत्यांनी आपल्या दुकानांमध्ये ऑनलाइन विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारलीय.

‘ड्युप्लिकेट सेमी पैठणी’चं आव्हान!

येवल्यातील पैठणी पूर्णतः हातमागावर विणकाम करून गुंफण केलेल्या असल्याने सात हजारांपासून ते चार लाखांपर्यंतच्या आहेत. साधारणतः सिंगल पदर पैठणी घ्यायची असल्यास सात हजारांपासून पुढच्या दरात मिळते. ब्रॉकेट, मुनिया या पैठणी २० हजारांच्या पुढे मिळतात. जर व रेशीम यांच्या धाग्यातून बनलेली अस्सल पैठणी उत्पादित करायला पाच ते सात दिवसांच्या पुढे वेळ लागतो. ब्रॉकेट व तत्सम साडीला अगदी तीन ते चार महिने लागतात. त्यातुलनेत दक्षिणेकडील राज्यांत याच रंग-रूपाची ‘सेमी पैठणी’ तयार होऊ लागली असून, यंत्रमागावर तयार झालेली ही सेमी पैठणी अल्पदरात मिळत आहे. दिसायला आकर्षक आहे. ‘सेमी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पैठणी बंगलोर, धर्मावरम, हिंद्पूर, बेळगाव, कोडाकोट्टा आदी ठिकाणी तयार होत असून, ३०० ते १५ हजारांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. महिलांचीही या पैठणीला पसंती मिळत असल्याने सगळीकडे दुय्यम दर्जाच्या सेमी पैठणी व ड्युप्लिकेट पैठणी साड्या सर्रासपणे विकल्या जात आहेत. ड्युप्लिकेट पैठणीचा बाजार मोठ्या प्रमाणात थाटला आहे. हे मोठं आव्हान येवल्याचे विणकर व ‘ओरिजिनल’ पैठणीपुढे उभं ठाकलं आहे.

क्लस्टर पडलं धूळखात

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पैठणीसाठीचे प्रयत्न विसरता येणार नाहीत. भरजरी, कलाकुसरीची, देखणी व अद्ययावत पैठणीला बळ देण्यासाठी श्री. भुजबळ यांनी पैठणी क्लस्टर मंजूर केलं. त्यामुळे हजारो पैठणी विणकर बांधवांना डाइंग, ट्रेनिंग, डिझाइन व डेमो आदी मार्गदर्शन मिळून त्यांचं जीवनमान उंचावणार होतं; कुशल कारागीर, नक्षीदार पैठणी साडीबरोबर ड्रेस मटेरियल, बेड लिनन, होम टेक्सटाइल्स यासारखं वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन होणार होतं, हा व्यवसाय यांत्रिकी युगात टिकवण्यासाठी क्लस्टरमुळे फायदा होणार होता. मात्र, पुढे केंद्र शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे सुमारे ६० कोटींच्या क्लस्टरची इमारत होऊन अर्धवट राहिली, सुमारे दोन हजार विणकरांना कुशल बनवण्याचं नियोजन कागदावर राहिलं आहे. त्यामुळे व्यवसाय चार पटीने वाढला, मात्र त्या तुलनेत पैठणीचा साचा व कारागीर हे आहे त्याच स्थितीत आहेत.

अस्सल पैठणी कशी ओळखावी?

 • अस्सल येवला पैठणीच्या पदरावर असलेल्या मोर, पोपट, असावली, लोटस या डिझाइन मूळ बाजूने दिसतात, अगदी तशाच पदराच्या उलट बाजूनेही दिसतात.

 • अस्सल पदरावर असलेल्या डिझाइनचा जो रंग असतो, तसाच रंग ‘सेम टू सेम’ उलट बाजूने दिसतो.

 • येवला पैठणी हस्तकला आहे, तिचा धागा ‘लॉक’ झालेला दिसतो, जर रेशीमचा वापर त्यात असतो.

 • नकली पैठणीच्या उलट बाजूने धागे उफाळून, उचकलेले दिसतात.

 • पदरावर मूळ बाजूने असलेली डिझाइन उलट बाजूने दिसत नाही.

 • नकलीचे धागे सरळपणे निघून येतात, नकली साडीचं कापड हे हलक्या दर्जाचं सिल्क असतं.

असे आहेत पैठणीचे प्रकार

 • सिंगल पदर* डबल पदर

 • ब्रॉकेट पैठणी

 • कडियल पैठणी

 • डबल मुनिया पैठणी

 • ट्रिपल मुनिया पैठणी

 • पोपट ब्रॉकेट पैठणी

 • मोर ब्रॉकेट पैठणी

 • बरो पंजा

 • आसावरी बॉर्डर

 • साधा लोटस पैठणी

 • झवरा लोटस पैठणी

 • टिश्यू पदर

 • बारा मोर पैठणी

 • तोता-मैना ब्रॉकेट