नातीनं पांग फेडले... (रश्मी पटवर्धन)

रश्मी पटवर्धन
रविवार, 4 ऑगस्ट 2019

सकाळी कमरेत नवऱ्याची लाथ सणकन् बसली तेव्हा सुमनला जाग आली. ‘‘ए ऽऽ ऊठ. झोपा काय काढती? कामाला जा आईबरूबर.’’
सासूनं आपल्या पोराला कसंबसं रोखलं.
‘‘आरं, नवी नवरी हाय ती. लगीच काय कामाला लावतो तिला? आजच्या दिस ऱ्हाऊं दे घरीच. उद्यापास्नं यील ती माज्यासंगं कामाला...’’

सकाळी कमरेत नवऱ्याची लाथ सणकन् बसली तेव्हा सुमनला जाग आली. ‘‘ए ऽऽ ऊठ. झोपा काय काढती? कामाला जा आईबरूबर.’’
सासूनं आपल्या पोराला कसंबसं रोखलं.
‘‘आरं, नवी नवरी हाय ती. लगीच काय कामाला लावतो तिला? आजच्या दिस ऱ्हाऊं दे घरीच. उद्यापास्नं यील ती माज्यासंगं कामाला...’’

‘‘ताई, माझी नात इंजिनिअर झाली...’’ उत्साहभरल्या आवाजात सुमनबाईंचा फोन आला.
‘‘व्वा, व्वा! अभिनंदन! नाव काढलं पोरीनं... आणि खरं अभिनंदन तुमचं बरं का...’’
सुमनबाई गेली पंचवीस वर्षं माझ्याकडं घरकामाला होत्या. आयुष्यभर आभाळाएवढी दुःख झेलली त्यांनी; पण सदा हसतमुख. कधी रडगाणं नाही की आयुष्याबद्दल तक्रार नाही.
त्यांच्या आयुष्याची चित्तरकथाच माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागली.
***

आई-वडिलांनी लाडाकोडानं वाढवलेली सुमन वयाच्या पंधराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी आली. मोठं तीन खोल्यांचं घर, घरात चकाचक भांडीकुंडी, झोपायला मोठा पलंग आणि त्यावर मऊशार गादी...डोक्‍यावर गरगरणारा पंखा...हरखूनच गेली सुमन. तिनं नवऱ्याला विचारलंसुद्धा : ‘‘काय वं धनी, हे समदं आपलंय का?’’
‘‘व्हय व्हय,’’ म्हणून नवऱ्यानं वेळ मारून नेली आणि तो बाहेर निघून गेला. काहीही कामधंदा न करता, आत्तापर्यंत आईच्या जिवावर जगणाऱ्या त्या ऐतखाऊ माणसानं घरमालकाकडं मिनतवारी करून लग्नापुरता हा थाटमाट मांडला होता हे सुमन आणि तिचे आई-वडील वगळता सगळ्यांनाच माहीत होतं.
लग्नानंतरचे दोन-तीन दिवस घरात पाहुणेरावळे होते. नव्या
नवरा-नवरीचं कौतुक चाललं होतं. सत्यनारायणाच्या पूजेला बसताना सुमन मोहरून गेली होती. माहेरच्यांना सगळं दाखवताना आनंदून जात होती.
पूजा झाल्यावर वडील लेकीला दोन दिवस माहेरपणासाठी घेऊन गेले.
दोन दिवसांनी नवरा सुमनला घेऊन घरी आला. वाड्याच्या तोंडाशीच
एक लहानशी खोली होती. भिंतींचा रंग उडालेली आणि बरीचशी पडकीही. तिथं जरुरीपुरतं सामान होतं. सुमनला तिथं बसवून तो बाहेर निघून गेला. सुमननं बराच वेळ त्याची वाट पाहिली. एका जागी बसून तिचे पाय अवघडले होते. भूक लागली होती. खूप तहानही लागली होती. तिनं उठून माठातलं थंडगार पाणी प्यायलं आणि गुपचूप बसून राहिली.
थोड्या वेळानं शेजारणीनं हाक मारली म्हणून सुमन लाजत बाहेर आली. शेजारणीनं तिला आपल्या घरी नेलं. एका ताटलीत थोडं खायला आणून दिलं. सुमननं भराभर खाणं संपवलं. पाणी प्यायली. चुळबुळत तिनं शेजारणीला विचारलं : ‘‘काकी, आमचं घर कुटं हाय? धनी मला कुटं घिऊन आल्यात? आन् ते कुटं गेल्यात? घरातली मानसं कुटं हायेत?’’
शेजारीणही गांगरली. आता या अजाण पोरीला काय सांगावं?
तरी पण उसनं अवसान आणत ती म्हणाली : ‘‘अगं, लग्नाचं
पाव्हनं-रावळं गेलं आपापल्या घरी आन् तुजी सासू तिच्या बहिणीकडं गेली. यील दोन-चार दिसांत परत; पन तू काळजी करू नगं. तू निवांत ऱ्हा हितं. सासू गावावरनं आली की जा तुज्या घरी.’’
‘‘घरी? पन कुटल्या घरी? धनी तर मला म्हन्ले व्हते, वाड्याच्या तोंडाशी जे घर हाय तेच आपलं घर!’’
शेजारीण खिन्नतेनं म्हणाली : ‘‘पोरी, आपल्यासारक्यांच्या नशिबी कुटलं गं तसलं चकाचक घर? लगीन जुळावं ना म्हून तुज्या नवऱ्यानं घरमालकाची मिनतवारी करून आठ दिसांपुरतं घेतलं होतं ते. आता ही खोली हेच तुजं घर आन् हीच तुजी दुनिया बघ. वाईट नगं वाटून घिऊ. तुजी सासू लई चांगली हाय. लेकीवानी माया लावंल तुला. तुजा नवरा हाय जरा हुल्लडबाज. दादागिरी करत उंडारत असतुय दिसभर.’’
‘‘पन, ते तर रिक्षा चालीवत्यात ना? स्वतःची रिक्षा हाय त्येंची...’’
‘‘स्वतःची कुटली आलीया गं? कदीमदी लहर आली तर भाड्याची रिक्षा चालवतुय. चार पैसं कमावतुय. पन समदं दारू न् जुगारात घालवून बसतुय. तुज्या सासूनं नवऱ्याच्या मागारी काबाडकष्ट करून तिन्ही लेकरान्ला वाढीवलं. दोनी पोरींची लगीन लावून दिली. आता याचं बी लगीन लावलंय, मातर त्यो काई सुधरंल असं वाटत नाय.
पन, पोरी तू धीरानं वाग. कष्टाला कमी पडू नगंस. नवऱ्याला आता तुलाच पोसायचंय.’’
हे सगळं ऐकून सुमनच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण पुरते फसवले गेलोय याची जाणीव होताच तिचं डोकं गरगरायला लागलं. तोंडाला कोरड पडली. ती गुडघ्यात डोकं खुपसून सुन्नपणे बसून राहिली.
शेजारणीला लाजल्यासारखं झालं. भिरभिरली पोर आपल्या बोलण्यानं, असं तिला वाटून गेलं.
तिनं जेवणाचं ताट वाढून आणलं. बळं बळं चार घास सुमनला खायला लावले. ग्लानी आल्यानं पोर तिथंच लवंडली. तिथंच डोळा लागला तिचा.
थोड्या वेळानं नवऱ्याचा आवाज आला. त्यानं तिला आपल्या खोलीत नेलं आणि दिवसाढवळ्याच तो तिला ओरबाडू लागला. त्याच्यापासून कशीबशी सुटका करून घेत सुमन शेजारणीकडं धावली. रात्री काय वाढून ठेवलंय म्हणून धास्तावली; पण त्या रात्री नवरा घरी परत आलाच नाही. तिला हायसं वाटलं!
दोन दिवसांनी सासू परत आली. तिनं स्वतःच्या हातांनी रांधून सुनेला जेवायला लावलं. रात्री उशिरा कधी तरी तिचा नवराही आला; पण शुद्धीत नसल्यानं न जेवताच झोपून गेला.

दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून सासूनं सगळं रांधून ठेवलं आमि मग चहा करून तिला उठवलं. ‘घरात काई काम करू नगं’ म्हणून तिला सांगून गेली.
सकाळी नऊ वाजता नवरा उठून, खाऊन-पिऊन बाहेर निघून गेला तो थेट रात्रीच उगवला. तो रात्री कधी परत आला ते सुमनला कळलंच नाही.
सकाळी कमरेत नवऱ्याची लाथ सणकन् बसली तेव्हा तिला जाग आली.
‘‘एऽऽ ऊठ. झोपा काय काढती? कामाला जा आईबरूबर.’’
सासूनं त्याला कसंबसं रोखलं.
‘‘आरं, नवी नवरी हाय ती. लगीच काय कामाला लावतो तिला? आजच्या दिस ऱ्हाऊं दे घरीच. उद्यापास्नं यील ती माज्यासंगं कामाला.’’
आज-उद्या करत करत एका महिन्यानंतर सुमन घरकामाला जायला लागली. नवऱ्याचा एकेक प्रताप रोज कानावर येतच होता. हाणामारी, भुरट्या चोऱ्या करण्यात पटाईत होता तो. पोलिसांना गुंगारा देऊन दरवेळी सुटत असे. चुकून पकडला गेलाच तर दादा-बाबा करत आई त्याला सोडवून आणत असे. मग, पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
लग्नानंतर दोन-तीन महिन्यांत तिला ‘हवं-नको’ सुरू झालं.
‘आता कामावर येऊ नगं’ असं सासूनं तिला सांगितलं; पण सुमननं ऐकलं नाही. ती काम करतच राहिली. सासूनं इकडून-तिकडून
उधार-उसनं आणून तिचे डोहाळे पुरवले. पहिलटकरीण म्हणून शेजारच्या आयाबायाही काहीबाही आणून देत. आईनं तिची परिस्थिती पाहून तिला सहाव्या महिन्यातच माहेरी नेलं. चांगलं खाऊ-पिऊ घातलं. हौसेनं डोहाळजेवण केलं. चांगल्या खाण्या-पिण्यानं आणि आरामामुळं तिची तब्येत सुधारली. तिनं एका गोड, गोंडस मुलीला जन्म दिला. सासूला आनंद झाला. तीन महिने ती माहेरीच राहिली. आईनं मुलीचं नाव राणी ठेवलं. तिचंच रूप घेऊन आलेलं ते बाळमुख पाहून ती रोज हरखत होती; पण नवऱ्याचं डोकं फिरलं.
‘मुलीला घेऊन तू माहेरीच राहा’ असं तो म्हणू लागला. शेवटी तिच्या वडिलांनी पोलिसी हिसका दाखवल्यावर तो तिला सासरी घेऊन आला.
मुलीला सांभाळण्यासाठी सुमन महिनाभर घरीच राहिली; पण नवऱ्यानं बळजबरीनं तिला कामावर जायला लावलं. ती आणि सासू आळीपाळीनं मुलीला कशाबशा सांभाळत. कधी ती तिला कामावरही घेऊन जाई. कामावरच्या मालकिणी राणीला खाऊ-पिऊ घालत. आपल्या मुलांबरोबर गाणी-गोष्टी शिकवत. राणी घरी आली की
आई-आजीला गाणी-गोष्टी म्हणून दाखवत असे; पण राणीचं कौतुक करायला सासू फार दिवस जगली नाही. साधं तापाचं निमित्त होऊन एक दिवस अचानक ती गेली. सुमनचा एकमेव आधारही तुटला. सुमन अगदी एकटी पडली. नवऱ्याला आयुष्यभराचा भक्कम मैतर करायचं स्वप्न तिनं बघितलं होतं; पण तो तिचा मैतर कधी झालाच नाही. आई गेल्यापासून तो जास्त वेळ बाहेरच राहू लागला. कधी पैशाची गरज लागली की मग यायचा सुमनकडं लाडीगोडी लावायला. दोन-चार दिवस प्रेमाचं नाटक करायचा. सुमन त्याला भुलायची.

सुमनला परत दिवस गेले. आता घरातलं करून, राणीला आणि पोटातल्या जीवाला सांभाळत काम करायचं दिव्य पार पाडणं तिला कठीण जाऊ लागलं. कसंबसं कामं उरकत तिनं सहा महिने काढले; पण अपुरं अन्न, विश्रांती नाही, नवऱ्याची साथ नाही, उलट त्याचा मारच खावा लागायचा. या सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. अपुऱ्या दिवसांची मुलगी जन्मली. मग तर नवऱ्यानं घरी येणंच बंद केलं. तीन-चार महिने तो घरी फिरकलाच नाही. सुमनची आई
तिच्याकडंच येऊन राहिली होती. घरखर्च वडील भागवत होते; पण मुलीचं औषधपाणी नीट होत नव्हतं.
सुमननं परत कामावर जायला सुरवात केली. मग मुलीची आबाळ होऊ लागली. आधीच अशक्त, आईचं दूध नाही, नीट औषधपाणी नाही त्यामुळं त्या नवजात मुलीनं जगाचा निरोप घेतला. मग मात्र सुमन खडबडून जागी झाली. आपली आईची माया पातळ करून तिनं राणीला आजीकडं, म्हणजे स्वतःच्या आईकडं ठेवलं. राणीला खूप शिकवायचं ठरवलं. तिला चांगल्या शाळेत घातलं. राणी भराभर शिकत होती. सुमनला तिची प्रगती पाहून आनंद होत होता.
नवऱ्याला कशाचंच सोयरसुतक नव्हतं. नवरेपणाचा हक्क गाजवायला अधूनमधून तो घरी येत होता. पैशासाठी मारहाण करत होता. एक दिवस त्यानं रागाच्या भरात तिच्या पोटावरच लाथ मारली. पोटातल्या अजाण जीवानं पोटातच प्राण सोडला.
मग तर नवरा आणखीच पिसाळला. ‘तू माझ्या वंशाला दिवा देत नाहीस. आता मी तुला नांदवणार नाही’ असं सांगत त्यानं दुसरा घरोबा केला.
सुमनचे काबाडकष्ट सुरूच होते. राणीकडं बघून ती दिवस काढत होती. तशातच नवऱ्याला चोरीच्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांची शिक्षा झाली. ती त्याला भेटायलाही गेली नाही. राणीलाही त्याच्यापासून दूर ठेवलं.
नवऱ्याला तुरुंगात अमली पदार्थांचं व्यसन लागलं. तुरुंगातून बाहेर आल्यावर व्यसन भागवता येईना म्हणून त्यानं एके दिवशी आत्महत्या केली. सुमनला एका परीनं बरंच वाटलं! आपल्या आणि राणीच्या जीवनावरचं सावट टळलं अशी तिची भावना झाली.
तिनं राणीला बारावीपर्यंत शिकवलं. सततच्या कष्टानं सुमनचं शरीर आता आतून पोखरलं गेलं होतं. तिला टीबीनं गाठलं. तिचं अवसानच गळालं; पण आई-वडिलांनी धीर देऊन तिला औषधपाणी केलं. राणीपासून दूर राहिली; पण मनानं खंबीर असल्यामुळं ती त्यातून पूर्ण बरी झाली.

राणी अठरा वर्षांची झाल्यावर एक चांगला मुलगा बघून सुमननं राणीचं लग्न लावून दिलं. राणीचा सुखाचा संसार बघून आपल्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं सुमनला वाटलं. वर्षभरातच राणीला ‘हवं-नको’ झालं. सुमनला अत्यानंद झाला; पण आनंद, सुख तिच्या नशिबात लिहिलंच नव्हतं जसं काही...
राणीनं एका गोड-गोबऱ्या मुलीला जन्म दिला आणि मुलीला आईच्या ओटीत टाकून स्वतः मात्र देवाघरी गेली. तिच्या नवऱ्यानं, सासरच्या माणसांनी मुलीला पाहिलंही नाही. सुमननं तिला पोटाशी धरलं. पुन्हा एकदा मातृत्वाचं ओझं पेलायला ती तयार झाली. त्या बाळजीवात राणीला पाहत जीव रमवत राहिली. देवावर भरवसा ठेवून मोठ्या कष्टानं नातीला घडवत राहिली.
राणीसारखीच तिची मुलगीही हुशार होती. काकणभर सरसच. एकेक इयत्ता चांगल्या पद्धतीनं पार करत बारावीचीही परीक्षा ती चांगल्या गुणांनी पास झाली.
दरम्यानच्या काळात सुमनचे आई-वडीलही देवाघरी गेले होते; पण वडिलांनी आपली आयुष्यभराची पुंजी - तुटपुंजी का होईना- सुमनसाठी मागं ठेवली होती. त्यामुळं त्या पुंजीच्या काडीएवढ्या आधारामुळं आणि कामावरच्या सुहृदांनी केलेल्या मदतीमुळं नात आज इंजिनिअर झाली होती. त्याचंच सुमनला अप्रूप होतं. ती नातीचं यश कौतुकानं मिरवत होती. नातीनं पांग फेडले होते.
***

सुमनाबाईंना छानशी साडी आणि त्यांच्या नातीला सुरेखसं गिफ्ट देऊन मी त्या माउलीला, म्हणजे तिच्या कष्टांना आणि धीराला, लोटांगण घालणार होते. मी वाट पाहत होते त्या दोघींच्या येण्याची...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptaramg rashmi patwardhan write kathastu article