निर्णय (विलास गोरे)

vilas gore
vilas gore

‘अर्जंट भेटायला ये’ असा राजेशचा आज अचानक मेसेज आलेला बघून न राहवल्यामुळे सवितानं लगेचच त्याला फोन केला; पण ‘भेटल्यावर बोलू या’ एवढंच राजेश फोनवर तुटकपणे म्हणाला. त्याचं फोनवरचं हे काहीसं तुटक बोलणं सविताला खटकलं. मात्र, त्यावर जास्त विचार न करता ती लगेच राजेशला भेटायला निघाली...

सविता आज राजेशला भेटायला निघाली होती. गेल्याच आठवड्यात दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाला होता. दोघंही खूप आनंदात होते. सविता २१ वर्षांची सुंदर तरुणी. तांबूस गोरा रंग, धारदार नाक, टपोरे डोळे, नाजूक जिवणी, कुरळे केस, सुडौल बांधा आणि अतिशय टापटीप राहणीमान...यामुळे ती कुणाचंही लक्ष वेधून घेत असे. डोंबिवलीला राहणारी सविता दादरला एका सरकारी बँकेत नोकरीला होती. सविताचा स्वभाव मोकळा व बोलका होता, त्यामुळे तिची पटकन कुणाशीही मैत्री जमायची. आपल्या याच स्वभावामुळे बँकेत तिच्याकडं ‘मे आय हेल्प यू?’ हे काउंटर सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे तिचा लोकसंग्रह वाढत होताच आणि बँकेच्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होत होती. याच ठिकाणी तिला राजेश भेटला. राजेश पंचविशीचा उमदा तरुण. दिसायला देखणा. दादरला शिवाजी पार्कसारख्या मोक्याच्या ठिकाणी राहणारा आणि एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा. राजेशला प्रथमदर्शनीच सविता आवडली. काहीतरी निमित्त काढून राजेश वरचेवर बँकेत येऊ लागला. सविताची व त्याची ओळख वाढू लागली. मूळचा दादरचाच असल्यामुळे राजेशच्या त्या परिसरात खूप ओळखी होत्या. आपल्या कंपनीतल्या मित्रांचे व दादरमधल्या ओळखीच्या माणसांचे रेफरन्स त्यानं सविताला देऊन त्यांची खाती तिच्या बँकेत उघडून घेतली होती. त्यामुळे सवितावर बँकव्यवस्थापक खूश झाले व तिचा बँकेनं गौरव केला. अर्थात या मदतीसाठी राजेशचा हातभार होता, त्यामुळे तिनं त्याचेही आभार मानले. या प्रसंगातून सविता आणि राजेश जास्त जवळ आले. आता ते एकमेकांची थट्टा-मस्करीही करू लागले. अधूनमधून दोघं चहा-कॉफी घ्यायला, तर कधी लंच-डिनरसाठी निरनिराळ्या हॉटेलांत जाऊ लागले. एकमेकांना काही निमित्तानं भेटवस्तू देणं सुरू झालं. मोबाईलवरून मेसेजेस सुरू झाले. दोन-तीन दिवस जरी राजेश बँकेत फिरकला नाही तरी सविताला त्याची उणीव भासत असे, तर बँकेत आल्यावर राजेशचीही नजर सविताला शोधत असायची. आता सविताला बँकेत राजेशवरून चिडवणं सुरू झालं होतं. सवितालाही राजेश आवडला होता. आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत, हे दोघांनाही जाणवलं. आता सविता आणि राजेश यांच्या भेटी वाढू लागल्या. एक-दोन वेळा सविता राजेशच्या घरीही गेली होती. राजेशला थोरली बहीण होती. तिचं लग्न झालं होतं. तिच्या नवऱ्याचा माहीममध्ये होलसेल कपड्यांचा मोठा बिझनेस होता. ते माहीमलाच राहायला होते.

राजेशचं घराणं गर्भश्रीमंत होतं. त्याचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. त्यामुळे राजेशच्या आईनंच दोन्ही अपत्यांना घडवलं होतं. राजेश आपल्या आईला खूप मानायचा. सविताही राजेशचं श्रीमंती घर पाहून खूश होती. शिवाजी पार्कच्या समुद्रकिनाऱ्यावर एकांतात जेव्हा राजेशनं तिला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा सविताला ते अपेक्षितच होतं. तिनं लगेच होकार दिला. नंतर दोघांनीही घरी सांगितलं. सविताला एक धाकटी बहीण होती. ती फर्स्ट इअर कॉमर्सला होती. सविताचे बाबा
रेल्वे खात्यात, तर आई शिक्षिका होती. राजेश व सविता एकमेकांना अनुरूप होते; त्यामुळे दोघांच्याही घरच्या मंडळींनी लग्नासाठी मोठ्या आनंदानं परवानगी दिली आणि गेल्याच आठवड्यात मोठ्या थाटात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता दोन्ही घरांत आनंदाचं वातावरण होतं.

मात्र, ‘अर्जंट भेटायला ये’ असा राजेशचा आज अचानक मेसेज आलेला बघून न राहवल्यामुळे सवितानं लगेचच त्याला फोन केला; पण ‘भेटल्यावर बोलू या’ एवढंच राजेश फोनवर तुटकपणे म्हणाला. त्याचं फोनवरचं हे काहीसं तुटक बोलणं सविताला खटकलं. मात्र, त्यावर जास्त विचार न करता ती लगेच राजेशला भेटायला निघाली...
***

सविता आणि राजेश दादरच्या नेहमीच्या हॉटेलात भेटले.
राजेश थोडा गंभीर दिसत होता. तो सविताला म्हणाला : ‘‘सविता, मला पहिल्यांदा मला सांग, काय ऑर्डर करू तुझ्यासाठी? मी नाश्ता करून आलोय. मी फक्त कॉफी घेईन.’’
‘‘मीसुद्धा कॉफीच घेईन; पण राजेश, अचानक बोलावलंस ते...फोनवरही काही नीट सांगितलं नाहीस...काय झालंय? तू एवढा सीरिअस का दिसत आहेस?’’ सवितानं विचारलं.
‘‘हो, हो...सांगतो; पण रागावू नकोस. मला सांग, दोन दिवसांपूर्वी तू माहीममध्ये होतीस? आणि तुझ्याबरोबर महेश होता?’’ राजेशनं गंभीरपणे विचारलं. सविता थोडी आश्चर्यचकित झाली. महेश तिचा बालपणापासूनचा मित्र होता. तो तिच्या शेजारीच राहायचा. लग्न ठरल्यावर जेव्हा राजेश डोंबिवलीला सविताच्या घरी आला होता तेव्हा सवितानं आपण होऊन महेशची ओळख त्याच्याशी करून दिली होती.
‘‘अरे, तू आला होतास आमच्याकडं तेव्हा मी ओळख नव्हती का करून दिली महेशशी? मित्र आहे तो माझा... पण त्याचं काय?’’
‘‘अगं, ताईनं आणि जिजाजींनी तुला आणि महेशला हॉटेलमध्ये बघितलं. तुम्ही लंच घेत होता, हसत-खेळत गप्पा चालल्या होत्या तुमच्या. ताईला धक्काच बसला. जिजाजीही संतापले. कालच ताई आली होती आमच्याकडं. आईला हे सगळं कळल्यावर आई तर खूप भडकली. रात्रीच तुमच्या घरी फोन करणार होती. नशीब! मी घरीच होतो. मी थांबवलं त्यांना. म्हटलं, ‘अग तो तिचा कुणी नातेवाईक असेल. मी विचारीन तिला.’ मग सगळे शांत झाले. सविता, मी तुला सांगितलं होत ना, माझी आई थोडी जुन्या वळणाची आहे तेव्हा आपल्या लग्नानंतर तुला वागताना काळजी घ्यावी लागेल. आता मी सांभाळून घेतलंय. तेव्हा तू आईला सांग, तुझ्याबरोबर तुझा दूरचा भाऊ होता म्हणून, त्यानं आईचं समाधान होईल. मात्र, यापुढं काळजी घे,’’ राजेश सविताला समजावत म्हणाला.
मात्र, राजेशचं बोलणं ऐकून सविताला खूप मोठा धक्का बसला.
ती म्हणाली : ‘‘राजेश अरे, महेशनं त्याचं लग्न ठरवलंय. त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायला गेलो होतो आम्ही दोघं. जेवायचीही वेळ होतंच आली होती तेव्हा आम्ही गेलो हॉटेलात लंचला. यात कसली आली आहे अमर्यादा? तू यासंदर्भात घरी खोटं का सांगितलंस? मी काही लपवलं नाही तुझ्यापासून. तुला सर्व माहीत आहे. मला लोकांमध्ये मिसळायला आवडतं. मला जशा मैत्रिणी आहेत तसे
मित्रही आहेत. माझ्यावर विश्वास ठेव, अरे, प्रेम मी फक्त तुझ्यावर केलं आहे, तेव्हा तुला का खटकतंय माझं वागणं? महेश तर माझा बालपणापासूनचा मित्र आहे.’’
‘‘सविता, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे गं; पण लक्षात घे, मी माझ्या आईला खूप मानतो. तिला हे नाही चालणार. मी तिला नाही दुखवू शकत. त्यामुळे तुला आपल्या प्रेमासाठी, माझ्यासाठी मी सांगतोय तस वागावं लागेल,’’ राजेश तिची समजूत घालत म्हणाला.
‘‘राजेश अरे, नवीन नाती जुळली की जुनी नाती तोडून टाकायची का? स्त्रीच्या वागण्याच्या मर्यादा मी चांगल्या जाणते व मी कधीच मर्यादा सोडून वागले नाही आणि वागणारही नाही. मात्र, तुझ्याशी माझं लग्न झालं म्हणून मी माझं एखाद्याशी असलेलं निर्मळ मैत्रीचं नातं तोडून टाकू का?’’ आता सवितानं थोड्याशा संतापानंच विचारलं.
‘‘अगं, माझ्यापेक्षा तुला महेश महत्त्वाचा आहे का? मी एवढं कळकळीनं सांगतोय, त्याचं काहीच नाही का तुला? अगं, माझ्या आईला नाही चालणार लग्न झाल्यावर तुला कुणी मित्र असलेला. ती म्हणते, मैत्री केव्हा मर्यादा सोडेल याचा नेम नसतो. त्यामुळे लग्नानंतर तुला एकच मित्र व तो म्हणजे मी. माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला ही तडजोड करावी लागेल.’’
सविताला राजेशच्या स्वरात नकळत एक हुकमत जाणवली.
‘‘शी...किती बुरसटलेले विचार आहेत हे? कोणत्या काळात आहात तुम्ही? आणि राजेश, तुझ्यासारख्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये वावरणाऱ्या माणसाला हे सर्व पटतं? आईचं एक सोडून दे; पण ‘आपल्या बायकोला मित्र असू नये’ हे तुझंसुद्धा मत दिसतंय...’’ सविताचा राग आता अनावर होत चालला होता.
‘‘मला काय पटतं, ते या क्षणाला महत्त्वाचं नाही, सविता. माझं तू ऐकणार आहेस की नाही?’’ राजेशनंही काहीसं चिडून विचारलं.
‘‘राजेश, मला नाही वाटत, मी काही गुन्हा केलाय आणि खोटं का बोलायचं? लग्नानंतर मी माझ्या मित्राशी बोलले तर ते तुमच्या घरी चालणार नाही?’’ सवितानं विचारलं.
‘‘सविता, एक लक्षात घे. तुझ्या या हट्टापायी आई आपलं लग्न मोडू शकते; मग मलाही नाही तुझा बचाव करता येणार. आपलं नातं तुटलेलं तुला चालेल? एवढा तो महेश महत्त्वाचा आहे का तुला? अगं, साखरपुडा झालेल्या मुलीचं लग्न मोडलं तर काय होतं याची कल्पना नाहीये तुला. त्यातून तुला एक धाकटी बहीणही आहे.
तिचंही लग्न जमणं मुश्किल होईल मग. तुझ्या आई-वडिलांचा, बहिणीचा तरी विचार केलायस का तू?’’
राजेशचा पारा आता चढू लागला होता.
राजेशच्या या उद्गारांनी सविता हादरली. तिचा खूप मोठा अपेक्षाभंग केला होता राजेशनं. नकळत त्याच्या मनाची एक वेगळीच खिडकी उघडली गेली होती. एका निश्चयी स्वरात ती राजेशला म्हणाली : ‘‘वा राजेश! नातं टिकवणं, त्याग करणं ही सर्व माझीच जबाबदारी समजतोयस तू...एवढ्यावरून तू नातं तोडायला निघालास? अरे, अजून लग्न झालेलं नाही आपलं; पण नवरेशाहीसुद्धा गाजवायला लागला आहेस की तू...आपलं नातं तुटल्याचं तुलाही काहीच वाटणार नाही का? एका अर्थानं बरं झालं, मला आधीच सगळं समजलं. नाहीतर लग्नानंतर माझी घुसमट झाली असती. मात्र, आता मलाच हे लग्न नको आहे. हे सांगताना खरं तर मला अतिशय दुःख होतंय...कारण, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं; पण लग्नानंतर सतत तडजोड करत राहून दडपणाखाली जगायला मला नाही आवडणार. माझी खूप घुसमट होईल. माझा हा निर्णय मी माझ्या घरच्यांना समजावेन. त्यांना थोडं वाईट वाटेल; पण माझी बाजू ते नक्की समजून घेतील. आपलं लग्न न होणं हेच योग्य आहे असं मला वाटतं. तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!’’ हे सगळं बोलताना सविताचे डोळे थोडे भरून आले...पण स्वतःला सावरत ती एका वेगळ्याच आवेशात हॉटेलच्या बाहेर पडली. तिचं हे बोलणं आणि कृती राजेशला पूर्णतः अनपेक्षित होती. तो गोंधळून गेला. तिला थांबवावं याचं भानही त्याला राहिलं नाही.
सविता निघून गेलेल्या दिशेकडं तो एकटक बघत राहिला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com