कृत्रिम बुद्धिमत्ता (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

सन १९५६ मध्ये अमेरिकेत न्यू हॅम्पशायर इथं ‘डार्टमाउथ कॉन्फरन्स’ नावाची ‘थिंकिंग मशीन्स’वरची एक कॉन्फरन्स झाली. ही कॉन्फरन्स भरवण्यात साह्य करणाऱ्या जॉन मॅकार्थी या संगणकतज्ज्ञानं ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ (AI) हा शब्द प्रथमच वापरला. उद्याच्या जगात केर काढणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, कारखान्यातली बरीचशी कामं करणं, प्रोग्रॅम्स लिहिणं, टेस्ट करणं, डॉक्टर, वकील, शिक्षक आणि शेअर ब्रोकर्स अशा अनेक व्यावसायिकांची कामं करणं, वित्तीय सल्ला देणं, जोखमीचे आणि अवघड प्रयोग करणं, हॉटेलमध्ये वेटर्स किंवा कूकचं काम करणं, चंद्र-मंगळापासून इतरही ग्रहांवर फेरफटका मारणं, साहित्य, चित्रकला, संगीत यांच्यामध्येही मदत करणं अशा अनेक गोष्टी AI मध्ये लीलया होऊ शकतील.

यंत्रं किंवा कॉम्प्युटर्स माणसासारखंच वागू, बघू, चालू, ऐकू आणि विचार करू शकतील का अशा अनेक शतकांपासून अनेकांनी अशा कल्पना केल्या होत्या. न्यूझीलंडमधल्या ‘द प्रेस’ नावाच्या एका वर्तमानपत्रात सॅम्युअल बटलर नावाच्या लेखकानं सन १८६३ मध्ये ‘डार्विन अमंग दि मशिन्स’ या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखामध्येही आजच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’सारखीच (AI) संकल्पना मांडली होती. यानंतर अधूनमधून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कल्पना साहित्यामध्ये डोकावू लागली.

विज्ञानकथा लिहिणारा प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विज्ञानलेखक आयझॅक अॅसिमोव्ह यानं सन १९४२ मध्ये ‘रनअराउंड’ या लघुकथेमध्ये रोबोंविषयी त्याचे प्रसिद्ध तीन नियम मांडले. रोबो कधीही माणसाला इजा करणार नाही, रोबो माणसानं दिलेल्या सर्व आज्ञांचं पालन करेल आणि रोबो स्वत:चं संरक्षण करेल असे हे तीन नियम होते. कालांतरानं अॅसिमोव्हनं या तीन नियमांआगोदरचा शून्यावा (झीरोएथ) नियमही मांडला. अनेक लेख, विज्ञानकथा आणि नैतिकतेविषयीचे लेख/पुस्तकं यांच्यामध्ये अनेक दशकं या सगळ्या नियमांविषयी भरपूर चर्चा झाल्या.

सन १९४३ मध्ये आपण ज्यावर प्रोग्रॅम लिहू शकू असे कॉम्प्युटर्स आले. युद्धकाळात जर्मनांची कोडभाषा ओळखता येण्यासाठी अॅलन ट्युरिंग या प्रसिद्ध आणि बुद्धिमान गणितज्ज्ञाच्या देखरेखीखाली ‘कलॉसस (collossus)’ नावाचा कॉम्प्युटर इंग्लंडमधल्या ब्लेचली पार्क इथं तयार झाला. अॅलन ट्युरिंगनंच ‘थिएरी ऑफ कॉम्प्युटेशन’ची थिएरी मांडली. यावेळी ट्युरिंगनं सन १९५० मध्ये ‘ट्युरिंग टेस्ट’ या प्रसिद्ध चाचणीची निर्मिती केली.

या चाचणीत एक माणूस एकाच वेळी दुसऱ्या बाजूला त्याला न दिसणाऱ्या ठिकाणी असलेल्या एका कॉम्प्युटरशी आणि एका माणसाशी एकाच वेळी प्रश्नोत्तरानं संवाद साधत असेल आणि त्यावेळी त्याला त्यातला कोण माणूस आहे आणि कोण कॉम्प्युटर आहे हे ओळखता येत नसेल, तर तो कॉम्प्युटर बुद्धिमान समजावा असं ट्युरिंगनं मांडलं होतं.

सन १९५१ मध्ये मर्विन ली मिन्स्की या विद्यार्थ्यानं डीन एडमंड्ससोबत एक ‘शिकत जाणारं’ यंत्र बनवलं. आपल्या मेंदूत १०००० कोटी पेशी असतात. त्यांना ‘न्यूरॉन्स’ म्हणतात. याच न्यूरॉन्सच्या जाळ्यांचा उपयोग करून माणूस शिकतो, लक्षात ठेवतो, भावना व्यक्त करतो आणि असं बरंच काही करतो. मिन्स्कीनं १९५१ मध्ये वेगवेगळ्या वाटा असणाऱ्या जाळ्यामध्ये (maze) एखादा उंदीर एका विशिष्ट ठिकाणापर्यंतचा मार्ग कसा शोधेल याचं मॉडेलिंग या यंत्रात केलं होतं. या यंत्रात एकमेकांना जोडल्या गेलेल्या ४० कृत्रिम न्यूरॉन्स होत्या. त्यांना शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म मेमरीदेखील होती. त्यामुळं कुठला रस्ता चुकीचा आहे याचा त्या यंत्राला एकदा अनुभव आल्यावर समजायचं आणि लक्षातही राहायचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा महत्वाचा भाग असणारे न्यूरल नेटवर्क्स या यंत्रामध्ये पहिल्यांदाच प्रत्यक्षात बनवले गेले असं मानण्यात येतं.

सन १९५१ मध्येच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संकल्पना वापरणारे कॉम्पुटर गेम्स बनवायला सुरुवात झाली. १९५६ नंतर मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संकल्पनेला प्रसिद्धी मिळायला लागली आणि ती विज्ञानाची एक स्वतंत्र शाखा म्हणून ओळखली जायला लागली. आता बीजगणितातले शब्दांत दिलेले प्रश्न सोडवणं; भूमितीमधली प्रमेयं सिद्ध करून दाखवणं आणि इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न करणं अशी कामं कॉम्प्युटर करायला लागले. या क्षेत्रात काम करणारे लोक आशावादी तर होतेच; शिवाय या क्षेत्रात आता सरकार गुंतवणूक करायला लागलं होतं. सन १९५६ ते १९७४ पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुवर्णकाळ होता. ट्युरिंगनं त्याकाळी बुद्धिबळ खेळणाऱ्या कॉम्प्युटर्सची कल्पनाच मांडली नाही, तर तसा खेळ खेळण्यासाठी एक प्रोग्रॅमही लिहिला. सन १९५६ मध्ये अमेरिकेत न्यू हॅम्पशायर इथं ‘डार्टमाउथ कॉन्फरन्स’ नावाची ‘थिंकिंग मशीन्स’वरची एक कॉन्फरन्स झाली; पण त्याअगोदरच एक वर्ष ट्युरिंगचा मृत्यू झाला होता. ही कॉन्फरन्स भरवण्यात साह्य करणाऱ्या जॉन मॅकार्थी या संगणकतज्ज्ञानं ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ (AI) हा शब्द प्रथमच वापरला.

ट्युरिंगच्या चाचणीमुळेच संवाद आणि संभाषणं करता येण्यासाठी चॅटबॉट (Chatbots) नावाचं सॉफ्टवेअर लिहिण्यात आलं. सन १९६६ मध्ये जोसेफ वायझनबॉन या जर्मनीत जन्मलेल्या संगणकतज्ज्ञानं ‘एलिझा’ हा प्रोग्रॅम लिहिला होता. ‘युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग’ इथं एका समारंभात ट्युरिंग टेस्ट जाहीररीत्या घेण्यात आली. त्यावेळी या प्रोग्रॅममुळे तो कॉम्प्युटर ट्युरिंग टेस्ट चक्क ‘पास’ झाला आणि ‘बुद्धिमान’ ठरला. म्हणजे थोडक्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो प्रोग्रॅम चालत असलेल्या त्या कॉम्प्युटरनं इतकी माणसासारखी दिली, की तो कॉम्प्युटर आहे की माणूस हे दुसऱ्या बाजूला ओळखताच येईना!

आज ‘ऑनलाइन कस्टमर सर्व्हिस’साठी चॅटबॉट्स वापरले जातात. ट्युरिंग टेस्टला आता ‘दि इमिटेशन गेम (नक्कल करण्याचा खेळ)’ असं म्हणतात. याच नावाचा अॅलन ट्युरिंगच्या आयुष्यावर निघालेला सिनेमाही २०१४ मध्ये खूप गाजला.
कॉम्प्युटर्स शक्तिशाली होत असतानाच त्यांची ज्ञान साठवण्याची, विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढत गेली. असं करत करत जेव्हा कॉम्प्युटर्स अनंत पटीनं स्मार्ट होतील, तेव्हा अशा अवस्थेला ‘सिंग्युलॅरिटी’ असं म्हणावं असं जॉन फॉन न्यूमन या गणितज्ञानं म्हणून ठेवलं होतं.

अशी अफाट आणि अनंत बुद्धिमत्ता असलेले सुपरइंटलिजंट कॉम्प्युटर्स असणारी सिंग्युलॅरिटीची अवस्था सन २०४५ पर्यंत नक्कीच येईल असं रे कुर्झवेल या संगणकतज्ज्ञाचं मत आहे. मात्र, कितीही केलं तरी कॉम्प्युटरला माणसाची बुद्धिमत्ता कधीच गाठता येणार नाही असंही मानणारे अनेक होते.
सुरुवातीला AI या विषयात सगळ्यांना वाटणारा उत्साह १९६० च्या दशकात बराचसा मावळला आणि १९७५ पर्यंत AI साठीचं फंडिंगही आटत चाललं. या काळात या क्षेत्रातलं संशोधन ‘नीट’ (neat) आणि ‘स्क्रुफी’ (scruffy) अशा दोन दिशांनी चाललेलं होतं. ‘नीट’मध्ये कॉम्प्युटर बुद्धिमान माणसासारखं वागेल यासाठी पूर्णपणे नियोजन करून त्याप्रमाणे सुसूत्रपणे प्रोग्रॅम्स लिहिले जातात. ‘स्क्रुफी’मध्ये जास्त ह्यूरिस्टिक आणि ‘फजी’ तऱ्हेनं विचार केला जातो. आपला मेंदूही निर्णय घेताना कित्येकदा हीच पद्धत वापरतो. या पद्धतीतूनच ‘न्यूरल नेटवर्क्स’विषयी विचार सुरू झाला. आपण काहीही शिकतो, त्यातून मिळालेलं ज्ञान साठवतो आणि त्याचा वापर करून निर्णय घेतो, तसंच मग न्यूरल नेटवर्क्सचा उपयोग करून यंत्राला किंवा कॉम्प्युटरला शिकता येईल का (मशीन लर्निंग), ज्ञान साठवता येईल का (नॉलेज रिप्रेझेंटेशन) आणि त्यातून निर्णय घेता येतील का, याविषयी विचार सुरू झाले.

१९८० नंतर म्हणजेच एक्स्पर्ट सिस्टिम्स आल्यावर या क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस आले. AIच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचं लक्ष कॉम्प्युटरमध्ये ‘ज्ञान’ (knowledge) कसं भरता येईल याकडे वळलं. वकील, डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांना त्यांच्या शिक्षणातून आणि अनुभवावरून जे ज्ञान किंवा जी कौशल्यं प्राप्त झालेली असतात, त्याविषयीचे प्रोग्रॅम्स लिहून त्या व्यावसायिकांना मदत करणं किंवा लांबपल्ल्यात त्यांच्या जागी काम करणं हे एक्स्पर्ट सिस्टिम्सचं उद्धिष्ट होतं. मात्र, AI च्या क्षेत्रात होत असलेली गुंतवणूक, १९८७ च्या दरम्यान एक्सपर्ट सिस्टिम्सची हवा कमी झाल्यावर आटली ती १९९३ पर्यंत! अशातच ११ मे १९९७ रोजी आयबीएमनं बनवलेल्या ‘डीप ब्लू’ या कॉम्प्युटरनं त्यावेळच्या बुद्धिबळाच्या जगज्जेत्या गॅरी कॅस्पारोव्ह याचा बुद्धिबळाच्या खेळात पराभव केला!! डीप ब्लूची क्षमता १९५१मधल्या बुद्धिबळ खेळणाऱ्या कॉम्प्युटर्सपेक्षा तब्बल एक कोटीपटीनं जास्त होती !!

सन २००० नंतर मात्र AI च्या क्षेत्रानं पुन्हा उचल खाल्ली. याचं कारण तोपर्यंत कॉम्प्युटर्सचा आकार कमी होऊनही त्यांची शक्ती अफाट वाढली आणि त्यांच्यातलं कम्युनिकेशनही सुधारलं. आता सायबरनेटिक्स, भाषाशास्त्र (लिंग्विस्टिक्स) अशाही AI शी संबंधित अनेक क्षेत्रात कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स लिहिले जायला लागले आणि त्यांच्यातही संवाद सुरू झाला. यातूनच कॉम्प्युटर व्हिजन, रोबॉटिक्स, न्यूरल नेटवर्क्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अशा अनेक संकल्पना आणि तंत्रं (टेक्नॉलॉजी) निर्माण झाल्या.

सन २००४ मध्ये नासानं ‘स्पिरिट अँड ऑपॉर्च्युनिटी एक्स्प्लोरेशन रोव्हर्स’ नावाचे बुद्धिमान रोबो मंगळावर उतरवले. २००९ मध्ये गुगलनं जगातल्या पहिल्या ‘ड्रायव्हरलेस कार’चा प्रोजेक्ट सुरू केला, तर २०१० मध्ये अँड्रॉईडचं नवीन व्हर्शन काढलं. त्याला आपण टाईप करण्याऐवजी बोलून सूचना देऊ शकायला लागलो आणि गुगल तसंच अॅमेझॉन यांच्या उपकरणांना माहिती विचारून त्यांच्याकडून उत्तरंही मिळवायला लागलो. २०११ मध्ये आयबीएमनं वॉटसन नावाच्या एका कॉम्प्युटरनं ‘जिओपार्डी’ (jeopardy) या अमेरिकेतल्या क्विझच्या कार्यक्रमातल्या (अमेरिकेतलं KBC) चँपियन्सनाही हरवलं. २०१४ मध्ये युजीन गूस्टमन नावाचा एक रशियन चॅटबॉटही ट्युरिंग टेस्टमध्ये उत्तीर्ण झाला!

हॉंगकॉंगमधल्या हॅन्सन रोबोटिक्स कंपनीनं १४, फेबुवारी २०१६ रोजी ‘सोफिया’ नावाच्या, हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्न हिच्यासारख्या दिसणाऱ्या रोबोला जगासमोर आणून खळबळ माजवली. शरीर यांत्रिक असलं, तरी सोफिया एखादी जिवंत सुंदर तरुणी आहे असाच भास व्हावा इतका जिवंतपणा तिच्यात आहे. सोफिया तब्बल ६०-६२ प्रकारचे हावभाव (फेशियल एक्स्प्रेशन्स) आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यातून दाखवू शकते. अगदी माणसांप्रमाणंच ती हसते, दु:खी होते, मिश्किल होते, गाणं म्हणते, माणसांना ओळखते, त्यांच्याशी आपल्यासारख्या गप्पा मारते, विविध भाषा बोलते, माहिती देते आणि चालतेसुद्धा! तिला सौदी अरेबियाचं चक्क नागरिकत्व मिळालं आहे. कुठल्याही देशाचं नागरिकत्व मिळवणारी सोफिया ही पहिली रोबो ठरली आहे.

उद्याच्या जगात केर काढणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, कारखान्यातली बरीचशी कामं करणं, प्रोग्रॅम्स लिहिणं, टेस्ट करणं, डॉक्टर, वकील, शिक्षक आणि शेअर ब्रोकर्स अशा अनेक व्यावसायिकांची कामं करणं, वित्तीय सल्ला देणं, जोखमीचे आणि अवघड प्रयोग करणं, हॉटेलमध्ये वेटर्स किंवा कूकचं काम करणं, चंद्र-मंगळापासून इतरही ग्रहांवर फेरफटका मारणं, साहित्य, चित्रकला, संगीत यांच्यामध्येही मदत करणं अशा अनेक गोष्टी AI मध्ये लीलया होऊ शकतील. रोबोंना वेटर्सचं काम देण्याची कल्पना पहिल्यांदा १९८३ मध्ये शायन हायाशी या रोबो निर्मात्याला सुचली. चीन, जपान, न्यूयॉर्क; तसंच भारतातल्या चेन्नई, राजस्थान, बंगलोर आणि पुणे इथं रोबो असलेली रेस्टॉरंट्स आहेत.

AI मुळे ६०-७० टक्के लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे, असा एक अंदाज आहे. याचबरोबर जुन्या नोकऱ्या जाऊन नव्या तयार होतील; पण त्या तेवढ्या प्रमाणात नसल्यामुळे बेरोजगारी वाढेलच, असं अनेकांना वाटतं. तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे उत्पादन वाढलं, की सरकारकडेही करांच्या मार्फत खूप पैसा येईल आणि सर्वांना एक ठराविक रक्कम दरमहा मिळेल, ही ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’च्या (UBI)मागची कल्पना आता मूळ धरतेय.

‘क्रीव्ह इंटरअॅक्टिव्ह मोबाईल कंपॅनियन’ (CIMON) या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोला २०१८ मध्ये अंतराळवीरांबरोबर पाठवण्यात आलं. सायमन यशस्वीरीत्या परतल्यावर ५ डिसेंबर २०१९ रोजी सायमन-२ ची रवानगी अंतराळात झाली आहे. सायमन हा फक्त यांत्रिक मदतनीस होता; पण सायमन-२ मात्र अंतराळवीराच्या मित्रासारखा त्याच्याशी गप्पा मारेल आणि वेळप्रसंगी भावनिक आधारही देईल!
थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण काय काय करू शकतो, याची प्रचीती आता सगळ्यांनाच हळूहळू यायला लागली आहे. त्यामुळे आपल्या कल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेला कुठवर जाताहेत हे बघणं मजेशीर ठरेल! पण याचबरोबर अॅसिमोव्हचा नियम तोडून दुसऱ्यांना इजा पोचवणारे किंवा मारून टाकणारे रोबो उद्या तयार झाले, तर मात्र तिसरं महायुद्ध दोन देशातल्या रोबोंमध्ये होईल आणि ज्या देशातले रोबो वरचढ ठरतील- ते मग त्या देशातल्या माणसांनाही नष्ट करतील ही फक्त एक कल्पनाच न राहता वास्तवातही उतरण्याची शक्यता नाकारता येणार नाही हेही तितकंच खरं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com