बिटकॉईन्स आणि त्याचं ‘खाणकाम’ (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

जग सन २००८ मध्ये एका आर्थिक पेचातून जात होतं. या काळात इंटरनेटवर एका विशिष्ट समूहामध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीनं एक शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामध्ये सातोशीनं बिटकॉईन नावाच्या चलनाची क्रांतिकारक संकल्पना मांडली होती. ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करून हे इलेक्ट्रॉनिक चलन कसं वापरता येईल हे त्यानं या शोधनिबंधामध्ये लिहिलं होतं. जगातले कुठलेही दोन लोक या चलनाचा वापर करून निनावी राहत एकमेकांना पेमेंट करू शकणार होते. ब्लॉकचेनचा वापर करणारी ही पहिलीच क्रिप्टोकरन्सी होती.

सन २००९ च्या दरम्यानची गोष्ट. एक भारतीय तरुण अमेरिकेत गेलेला असताना तिथल्या एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. खरंतर तिलाही तो आवडत होता. तिला प्रपोज करण्यासाठी त्यानं एक महागडी अंगठी घेतली. या अंगठीची किंमत १६०० डॉलर होती. मात्र, काही कारणानं त्यांची प्रेमकहाणी पुढं जाऊ शकली नाही. त्यामुळं तो तरुण निराश झाला. आपल्या प्रेयसीसाठी घेतलेल्या अंगठीचं मूल्य आता त्याच्या दृष्टीनं शून्य होतं.

अशातच ऑफिसमधल्या एका माणसानं त्याला एक ‘ऑफर’ दिली. हा माणूस २०,००० बिटकॉईन्सच्या बदल्यात त्या तरुणाकडून ती अंगठी मागत होता. बिटकॉईन हे नवीनच सुरू झालेलं चलन त्या काळात अक्षरशः कवडीमोलाचं मानलं जायचं. इतर लोकांच्या मते ही शुद्ध फसवणूक होती. त्या भारतीय तरुणाच्या बऱ्याचशा सहकाऱ्यांनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला; पण प्रेमभंगातून अजून न सावरलेल्या त्या तरुणानं ती अंगठी कचऱ्यात फेकण्याऐवजी २०,००० बिटकॉईन्स घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, एके काळी कवडीच्या भावानं मिळणाऱ्या बिटकॉईन्सची किंमत वाढत जाऊन कालांतरानं आकाशाला भिडली आणि नऊ वर्षांनी या तरुणाकडे असणाऱ्या बिटकॉईन्सची किंमत तब्बल ११५६ कोटी रुपये झाली!

बिटकॉईन्सविषयी सांगितली जाणारी ही गोष्ट एका प्रकारे प्रातिनिधीक आहे. बिटकॉईन्सची किंमत अशा प्रकारे वाढत जाईल, असं तेंव्हा कुणाच्या स्वप्नातही आलं नसेल. मुळात चलन म्हणून बिटकॉईनला समाज स्वीकारेल असा विश्वासही कुणाला त्या काळी वाटत नव्हता. त्याबरोबरच अलीकडे एक बातमी आली होती. त्यानुसार अमिताभ बच्चन यांनी मे २०१५ मध्ये बिटकॉईन्समध्ये व्यवहार करणाऱ्या कंपनीमध्ये १.६ कोटी रुपये गुंतवले होते. ता. २० डिसेंबर २०१७ रोजी त्या गुंतवणुकीचं मूल्य ११० कोटी रुपये झालं. नंतर हे मूल्य वाढत जाऊन ६०० कोटी रुपयांपर्यंत गेलं. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्याचं मूल्य पुन्हा घसरलं आणि अमिताभचे या व्यहारात कित्येक ‘काल्पनिक’ कोटी रुपये बुडाले!

या अशा बातम्यांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये बिटकॉईन्सविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. काय होता बिटकॉईन हा प्रकार? आपल्या कागदी नोटांना किंमत येते याचं कारण भारतात रिझर्व्ह बँक किंवा अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह त्या नोटेवर लिहिलेल्या किंमतीची आपल्याला हमी देतात. जेव्हा आपण क्रेडिट कार्ड वापरतो किंवा ऑनलाईन पेमेंट करतो, तेव्हा आपल्या खरेदीच्या किंमतीमागे व्हिसा, मास्टरकार्ड आणि बँका अशा संघटनाही उभ्या असतात. मात्र, क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत अशी कुठलीच मध्यवर्ती संघटना नसते. मुळात मध्यवर्ती संघटनेची गरज नसावी म्हणूनच तर ब्लॉकचेन आणि बिटकॉईन्स यांचा विचार सुरू झाला. पण मग अशी मध्यवर्ती संघटना नसेल, तर आपला व्यवहार योग्य आहे का ते तपासणं आणि तो तसा असेल तर त्या व्यवहाराची नोंद ठेवणं या गोष्टी कोण करणार, हा प्रश्न सोडवायचाच होता.
हाच प्रश्न ब्लॉकचेननं म्हणजेच डिस्ट्रिब्युटेड लेजरनं सोडवला.

अशी कल्पना करा, की लाखो सशक्त आणि जलद कॉम्प्युटर्सचं (नोड्जचं) एक नेटवर्क आहे आणि यातल्या प्रत्येकावर बिटकॉईन्सनं केलेले सगळे व्यवहार नोंदवले जाताहेत. जेव्हा एखादा व्यवहार होतो तेव्हा तो पूर्ण नेटवर्कमध्ये ब्रॉडकास्ट होतो. त्यानंतर बिटकॉईन्स माइन करणारे लोक (म्हणजे त्यांचे नोड्ज) एका मेगाबाईटमध्ये (१ MB) मावतील असे अनेक व्यवहार एकत्र करून ते बरोबर आणि योग्य आहेत की नाहीत ते तपासणं (व्हेरीफाय, व्हॅलिडेट) या गोष्टी करतात. एका एमबीमध्ये कित्येकदा हजारो व्यवहार असू शकतात. तरीही हे तपासून बघणं त्या मानानं सोपं काम असतं. मात्र, यात एक महत्त्वाची गोष्ट तपासावी लागते. ती म्हणजे ‘डबल स्पेंडिंग.’ आपण जेव्हा एखाद्याला नोटा देतो तेव्हा त्या नोटा आपण त्या माणसाकडून पुन्हा चोरल्याशिवाय परत आपल्याकडे येत नाहीत, आणि म्हणून आपण त्या नोटा पुन्हा खर्च करू शकत नाही. त्यामुळे इथं डबल स्पेंडिंगचा प्रश्न उद्भवतच नाही. मात्र, कुठल्याही डिजिटल जगात एखादा माणूस आपल्या डिजिटल वॉलेटमधली रक्कम दोनदा वापरत नाहीये ना हे तपासावं लागतं. ते वाटतं तितकं सोपं नसतं. शिवाय सध्या दर दिवशी बिटकॉईन्सचे ६ लाख व्यवहार होत असल्यामुळे या तपासणीकरता वेळही बराच लागू शकतो.

जो नोड हे तपासण्यात यशस्वी होतो, तो त्या तपासलेल्या व्यवहारांची नोंद असलेला हा ब्लॉक त्या नोडवर अगोदरच असलेल्या ब्लॉक्सच्या चेनच्या म्हणजेच ब्लॉकचेनच्या शेवटी जोडतो; आणि नंतर तो ब्लॉक या नेटवर्कवरच्या प्रत्येक नोडवर ठेवलेल्या ब्लॉकचेनच्याही शेवटी जोडला जातो. अशा तऱ्हेनं हे तपासलेले व्यवहार आता सगळ्या नोड्जवर उपलब्ध होतात. या डिस्ट्रिब्युटेड लेजरलाच ‘ब्लॉकचेन’ असं म्हणतात. थोडक्यात आता ब्लॉकचेन हाच बँकेसारख्या मध्यवर्ती संघटनेची जागा घेतो.

मात्र, यात एक मेख असते. व्यवहार योग्य आहे की नाही ते तपासून झाल्यावर त्या नोडला हा ब्लॉक ब्लॉकचेनच्या शेवटी नुसताच जोडता येत नाही. त्याअगोदर त्याला एक गणिती कोडं सोडवावं लागतं. ते जर त्यानं सोडवलं तरच त्याला तो ब्लॉक ब्लॉकचेनला जोडता येतो. हे कोडं सोडवण्याच्या या गणिती प्रक्रियेला ‘प्रूफ ऑफ वर्क’ असं म्हणतात. हे कोडं सोडवण्यासाठी कॉम्प्युटिंग पॉवर मात्र प्रचंड लागते. हे गणिती कोडं जो कोणी सोडवेल त्याला त्याबद्दल ‘बक्षिसी’ म्हणून काही बिटकॉईन्स मिळतात आणि ते त्याच्या वॉलेटमध्ये आपोआप जमा होतात. याला ‘ब्लॉक रिवॉर्ड’ असं म्हणतात. ज्याप्रमाणे सोनं मिळवण्यासाठी खाणीत खूप परिश्रम करावे लागतात, तसंच नवीन बिटकॉईन्स निर्माण करण्यासाठी कॉम्प्युटर्सना खूप अवघड गणिती कोडी सोडवावी लागतात. फरक इतकाच, की सोन्याच्या बाबतीत अस्तित्वात असलेलं सोनं खाण बाहेर काढते, तर बिटकॉईन्सच्या बाबतीत नवीन बिटकॉईन्स तयार होतात. या प्रकारालाच ‘बिटकॉईन मायनिंग’ असं म्हणतात आणि ते करणाऱ्याला ‘मायनर्स’ म्हणतात.

आता आपल्याला प्रश्न पडेल की मग या प्रक्रियेत असे अगणित बिटकॉईन्स तयार होतील. त्यांचं काय करायचं? यावर बिटकॉईन्सची कल्पना मांडणाऱ्यांनी उत्तर शोधून ठेवलं होतं. ते म्हणजे एकदा कोणीही गणिती कोडं सोडवलं आणि त्यातून बिटकॉईन्स मिळवले, की पुढच्या वेळी सोडवावं लागणारं कोडं जास्त अवघड होत जाईल आणि त्याच वेळी त्यातून निर्माण होणारे (‘माइन’ होणारे) बिटकॉईन्स मात्र कमी कमी होत जातील. उदाहरणार्थ, दर २१०००० ब्लॉक्स ब्लॉकचेनला जोडले गेले की हे रिवॉर्ड निम्मं होतं. सध्या ते साधारणपणे दर ४ वर्षांनी निम्मं होतंय. सन २००९ मध्ये हे रिवॉर्ड ५० होतं. २०१३ मध्ये ते २५ झालं, तर २०१६मध्ये ते १२.५ झालं, आणि २०२० च्या मध्यावर ते ६.२५ होईल अशी अपेक्षा आहे. आणि असं होत होत बिटकॉईन्सची संख्या एका मर्यादेपेक्षा जास्त होणारच नाही. आणि ही मर्यादा २.१ कोटी आहे.

या भन्नाट प्रकारची सुरवात
सन २००८ मध्ये जग एका आर्थिक पेचातून जात होतं. या काळात इंटरनेटवर एका विशिष्ट समूहामध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीनं एक पेपर प्रकाशित केला. या पेपरमध्ये सातोशीनं बिटकॉईन नावाच्या चलनाची क्रांतिकारक संकल्पना मांडली होती. ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करून हे इलेक्ट्रॉनिक चलन कसं वापरता येईल हे त्यानं या पेपरमध्ये लिहिलं होतं. जगातले कुठलेही दोन लोक या चलनाचा वापर करून निनावी राहत एकमेकांना पेमेंट करू शकणार होते. ब्लॉकचेनचा वापर करणारी ही पहिलीच क्रिप्टोकरन्सी होती.

सन २००८ मध्ये सातोशीनं बिटकॉईनची संकल्पना मांडली आणि २००९ च्या जानेवारी महिन्यात त्यानं एक वेबसाईट सुरू केली. बिटकॉईन वापरण्याचं सॉफ्टवेअर त्यानं C++ चा वापर करून लिहिलं होतं आणि त्याचा सोर्सकोड त्यानं उघडपणे सर्वांशी शेअर केला होता. त्यामुळं बिटकॉईन वापरण्यात अजूनच पारदर्शकता येणार होती. बिटकॉईनचा वापर करण्यासाठी लोकांना हे सॉफ्टवेअर (बिटकॉईनचा क्लायंट) डाऊनलोड करून स्वतःच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करावं लागणार होतं. हे सॉफ्टवेअर इंटरनेटवर उपलब्ध करून दिलेल्या दिवशीच फिनले नावाच्या माणसानं ते डाऊनलोड करून स्वतःच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलं. त्याला सातोशीकडून दहा बिटकॉईन्स मिळाले. बिटकॉईन्सचा वापर झालेला हा जगातला पहिलाच व्यवहार!
मात्र, आश्चर्य म्हणजे बिटकॉईन्सचं भन्नाट जग निर्माण करणारा जनक सातोशी नाकामोटो जगासमोर मात्र कधीच आला नाही. सातोशीनं मायनर म्हणून काम करत जवळपास दहा लाख बिटकॉईन्स मिळवले असं मानण्यात येतं. त्यामुळे तो जगातल्या सर्वांत धनाढ्य माणसांमध्ये एक मानला जातो. हळूहळू त्यानं मायनिंगचं कामही बंद केलं. मग तर त्याच्याविषयीचं गूढ अजूनच वाढत गेलं.

सातोशी नाकामोटो नेमका कोण आहे? पुरुष आहे का, बाई आहे का? ती एक व्यक्ती आहे का तो अनेक जणांचा एक समूह आहे? तो अमेरिकन आहे की जपानी आहे?... या प्रश्नांची ठोस उत्तरं आजपर्यंत मिळालेली नाहीत. काहींनी तर चार कंपन्यांच्या नावातली आद्याक्षरं म्हणजेच सातोशी नाकामोटो’ असंही डोकं लढवलं होतं. सॅमसंग (Sa), तोशिबा (Toshi), नाकामिची (Naka) आणि मोटोरोला (Moto) या कंपन्यांनी मिळून बिटकॉनची निर्मिती केली आणि म्हणूनच त्यांच्या नावांमधली आद्याक्षरं घेऊन ‘सातोशी नाकामोटो’ हे नाव तयार झालं असं त्यांचं म्हणणं होतं.
सन २०११ मध्ये जोश्युआ डेव्हिस या न्यूयॉर्कमधल्या माणसानं नाकामोटोला शोधून काढायचा चंग बांधला होता. त्यानं बराच प्रयत्न करून ‘कदाचित हा नाकामोटो असू शकेल’ अशी काही जणांची यादी केली. त्यात अर्थ-समाजतज्ञ डॉ. विली लेहदोनविर्ता आणि मायकेल क्लीअर हा ट्रिनिटी कॉलेजमध्ये क्रिप्टोग्राफी शिकणारा विद्यार्थी यांचाही समावेश होता. सन २०१४ मध्ये ‘न्यूजवीक पब्लिशिंग हाउस’नं नाकामोटो कॅलिफोर्नियातल्या टेम्पल सिटीमध्ये राहत असल्याचा दावा केला होता; पण हा दावा फोल ठरला.

डेव्हिड क्लिमन (David Kleiman) हा सातोशी नाकामोटोचा प्रमुख दावेदार मानला जातो. क्लिमननं मात्र कधीही या संदर्भात दावा केलेला नाही. सत्यता उघडकीस यायच्या आधीच २०१३ मध्ये त्याचा अचानक मृत्यू झाला. सन २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन उद्योगपती आणि क्लिमनचा सहकारी मित्र क्रेग रायटर यानं ‘आपणच बिटकॉईन निर्मिती केली आणि क्लिमननं आपल्याला केवळ मदत केली’ असा दावा केला. त्याच्या या दाव्याविरुद्ध क्लिमनच्या भावानं मानहानीचा खटला दाखल केला. अजूनही हा खटला चालू आहे. या खटल्याला नुकतंच एक वळण मिळालं आहे. आपणच सातोशी नाकामोटो दावा करत अजून एक दावेदार समोर आला आहे. एकूणच हे प्रकरण अधिकाअधिक रंगतदार होणार हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com