बिटकॉईन्सची वाढ आणि भवितव्य (अच्युत गोडबोले)

अच्युत गोडबोले achyut.godbole@gmail.com
Sunday, 11 August 2019

बिटकॉइनच्या भविष्याबाबत तज्ज्ञ मंडळींमध्ये टोकाचे मतभेद आहेत. वॉरेन बफेसारख्या माणसाला बिटकॉइनचं भविष्य काळंकुट्ट दिसतं, तर बिल गेट्सला बिटकॉइनचं भविष्य उज्ज्वल दिसतं. अनेक तज्ज्ञ बिटकॉईनचा वापर बचतीसाठी करतात आणि इतरांनाही तसं करण्याचा सल्ला देतात. अनेक कलाकारांनीही बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले आहेत. बिटकॉइनच्या भविष्याबद्दल लोकांमध्ये मतभेद असले, तरी एकूणच बऱ्याच देशांमधली सरकारी मंडळी क्रिप्टोकरन्सीचा विचार गांभीर्यानं करायला लागली आहेत हे मात्र खरं.

बिटकॉइनच्या भविष्याबाबत तज्ज्ञ मंडळींमध्ये टोकाचे मतभेद आहेत. वॉरेन बफेसारख्या माणसाला बिटकॉइनचं भविष्य काळंकुट्ट दिसतं, तर बिल गेट्सला बिटकॉइनचं भविष्य उज्ज्वल दिसतं. अनेक तज्ज्ञ बिटकॉईनचा वापर बचतीसाठी करतात आणि इतरांनाही तसं करण्याचा सल्ला देतात. अनेक कलाकारांनीही बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले आहेत. बिटकॉइनच्या भविष्याबद्दल लोकांमध्ये मतभेद असले, तरी एकूणच बऱ्याच देशांमधली सरकारी मंडळी क्रिप्टोकरन्सीचा विचार गांभीर्यानं करायला लागली आहेत हे मात्र खरं.

सातोशीनं सन २००८ मध्ये बिटकॉईनची संकल्पना मांडल्यानंतर हळूहळू बिटकॉईन्स वापरणाऱ्या समूहात आणखी लोक यायला लागले. त्याची सुरवात जानेवारी २००९ मध्ये झाली. दहा महिन्यांनंतर ५ ऑक्टोबर २००९ रोजी एका डॉलरची किंमत १३०९.०३ बिटकॉईन्स इतकी होती. बिटकॉईन्सच्या बदल्यात काहीतरी वस्तू विकत घेण्याचा व्यवहार २२ मे २०१० रोजी पहिल्यांदाच घडला. या दिवशी लांझियो हानेझ नावाच्या फ्लॉरिडामधल्या एका प्रोग्रॅमरनं दहा हजार बिटकॉईन्सच्या बदल्यात २ पिझ्झा विकत घेतले! आज इतक्या बिटकॉईन्सची किंमत जवळपास दहा कोटी डॉलर्स किंवा सातशे कोटी रुपये इतकी झाली असती. त्या दिवसापासून २२ मे हा दिवस ‘बिटकॉईन पिझ्झा डे’ म्हणून साजरा केला जातो. ता. ९ फेब्रुवारी २०११ ला पहिल्यांदाच बिटकॉइनच्या किंमतीमध्ये वाढ होऊन एका बिटकॉइनची किंमत एक डॉलर इतकी झाली. यानंतर बिटकॉइनची किंमत वाढतच गेली. काही चढ-उतार आले; पण बिटकॉइनची किंमत सुरवातीइतकी कमी कधीच झाली नाही.

सन २०१३ च्या दरम्यान बिटकॉइनची किंमत कमी होण्याचा फटका बसला. ‘सिल्क रोड’ नावाची एक वेबसाईट बिटकॉईन्समध्ये पेमेंट स्वीकारायची. या वेबसाईटवर ड्रग्ज, हत्यारं वगैरे सगळ्या बेकायदा वस्तू विकल्या जात. अशा प्रकारच्या वेबसाईट्स डार्क वेबचा भाग म्हणून ओळखल्या जातात. सगळे व्यवहार बेकायदा असल्यानं या ठिकाणी बिटकॉइन हे चलन उपयोगी ठरलं होतं; पण सन २०१३ मध्ये पोलिसांनी या वेबसाईटवाल्यांवर कारवाई केली आणि प्रचंड प्रमाणात बिटकॉईन्स असणारी वॉलेट्स एक प्रकारे बंद केली. या सगळ्या प्रकाराचा बिटकॉइनच्या किंमतीवर परिणाम झाला; पण तरीही २००९ च्या मानानं बिटकॉईनचे दर खूपच जास्त होते. उदाहरणार्थ, ऑक्टोबर २००९ मध्ये बिटकॉईनचा भाव १३०९ बिटकॉईनला १ डॉलर इतका होता. तो दर २०१३ च्या डिसेंबरमध्ये १ बिटकॉईन म्हणजे १२४० डॉलर्सपर्यंत गेला. या वेळी जर आपण साधारणपणे ४४४ बिटकॉईन्स विकले असते, तर टायगर वूड्सच्या संपत्तीइतकी संपत्ती मिळवता आली असती! यानंतर बिटकॉइननं बरेच चढ-उतार पाहिले. सन २०१७ मध्ये बिटकॉइनची किंमत वाढत जात वीस हजार डॉलरपर्यंत पोचली आणि वर्षाअखेरीस ती तेरा हजार डॉलर्सपर्यंत कमी झाली. त्यानंतर ती हळूहळू कमी होत जुलै २०१९ मध्ये दहा हजार डॉलरच्या आसपास आली.

कुठल्याही सरकारचं किंवा मध्यवर्ती बँकेचं पाठबळ नसतानाही बिटकॉइन इतकं लोकप्रिय का व्हावं? याची काही कारणं आहेत. सर्वांत पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कुठलेही व्यवहार करताना यामध्ये निनावी राहता येण्याची सोय. आपल्याला बिटकॉईन्सचा व्यवहार करण्यासाठी ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानाप्रमाणं फक्त वॉलेट अॅड्रेस (आपल्या पाकिटाचा पत्ता) मिळतो. या पत्त्यावरून आपण इतरांना बिटकॉईन्स पाठवू शकतो किंवा इतर लोक आपल्याला बिटकॉईन्स पाठवू शकतात. आपले सगळे व्यवहार सगळेच लोक पाहू शकतात. पण लोकांना दिसतो तो फक्त पाकिटाचा पत्ता. या पाकिटाचा मालक कोण हे मात्र कुणालाच कळू शकत नाही. नेमकं यामुळेच बिटकॉईन्स वापरणाऱ्या मंडळींना निनावी राहता येतं.
ही बिटकॉईन्स पूर्वीच्या काळात छोट्या कंपन्या आणि बेकायदा कामं करणारी मंडळी वापरायची; पण काळाबरोबर बरेच व्यापारी लोक बिटकॉईन्समध्ये पेमेंट स्वीकारायला लागले. आणि बऱ्याच व्यापाऱ्यांनी बिटकॉईन्स स्वीकारायला सुरवात केल्यामुळे आता हळूहळू बरेचसे लोकही बिटकॉईन्सकडे वळायला लागले.

बिटकॉइनच्या किंमतीत कितीही चढ-उतार आले, तरी बिटकॉइन हे चलन जगातल्या इतर चलनांच्या मानानं स्थिर मानलं जातं. एका विशिष्ट मर्यादेनंतर (२.१ कोटी बिटकॉईन्स) नवीन बिटकॉइन्स येऊ शकत नाहीत. कागदी नोटांप्रमाणं हे चलन हव्या त्या प्रमाणात छापता येत नाही. उलट ज्या लोकांची वॉलेट्स काहीही कारणानं डिलीट किंवा अनुपलब्ध होतात, त्यांची बिटकॉईन्स कायमची नष्ट होतात.

याशिवाय ब्लॉकचेनचं तंत्रज्ञान वापरलं गेलं असल्यानं बिटकॉइन हे चलन सुरक्षित मानण्यात येतं. यातल्या क्रिप्टोग्राफी आणि डिस्ट्रिब्युटेड लेजर या संकल्पनांमुळं बिटकॉइन चलनाची सुरक्षा मजबूत झाली आहे. एकदा मात्र गोंधळ झाला. हॅकर्सनी या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या यंत्रणेला त्यावेळी मोठा धक्का देऊन आपली क्षमता दाखवून दिली. सन २०१४ जपानमधल्या गुंतवणुकीदारांची बिटकॉईन्स त्यांच्या नकळत लंपास केली गेली. ती गुंतवणूकदारांच्या अकौंटमधून कुठल्या अकौंटला ट्रान्स्फर केली गेली ते मात्र गूढच राहिलं. या विचित्र प्रकारामुळं जपानचं शेअर मार्केटही धाडकन् कोसळलं होतं. इतकी मोठी चोरी होण्याची ही पहिलीच वेळ होती.
काही जण तर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून बिटकॉईन बिलिअनेअर बनले आहेत. मार्क झुकेरबर्गवर आपली फेसबुकची कल्पना चोरल्याचा आरोप ठेवणारे कॅमेरोन आणि टायलर या विंकलव्हॉस बंधूनी सन २०१३ मध्ये १.१ कोटी डॉलर्सची बिटकॉईन्स विकत घेतली होती. सन २०१७ पर्यंत या बिटकॉईन्सची किंमत वाढली आणि हे बंधू चक्क बिटकॉईन बिलिअनेअर झाले. एरिक फिनमिन हा आणखीन एक बिटकॉईन मिलिअनेअर आहे. त्याची गोष्टी तर मजेशीरच आहे. त्यानं १००० डॉलर्स बिटकॉईनमध्ये गुंतवले आणि आपल्या आजीला दिले. तेव्हा त्याचं वय होतं फक्त १२ वर्षं; पण बघताबघता बिटकॉईनच्या वाढत्या किंमतींमुळे तो १९ वर्षांचा होईपर्यंत चक्क अब्जाधीश झाला.

बिटकॉइनच्या भविष्याबाबत तज्ज्ञ मंडळींमध्ये टोकाचे मतभेद आहेत. वॉरेन बफेसारख्या माणसाला बिटकॉइनचं भविष्य काळंकुट्ट दिसतं, तर बिल गेट्सला बिटकॉइनचं भविष्य उज्ज्वल दिसतं. अनेक तज्ज्ञ बिटकॉईनचा वापर बचतीसाठी करतात आणि इतरांनाही तसं करण्याचा सल्ला देतात. अनेक कलाकारांनीही बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले आहेत. बिटकॉइनच्या भविष्याबद्दल लोकांमध्ये मतभेद असले, तरी एकूणच बऱ्याच देशांमधली सरकारी मंडळी क्रिप्टोकरन्सीचा विचार गांभीर्यानं करायला लागली आहेत हे मात्र खरं.

संयुक्त अरब आमिरातीच्या सरकारनं ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानावर आधारित एमकॅश नावाची क्रिप्टोकरन्सी सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. सरकारी आणि बिगर-सरकारी व्यवहार करण्यासाठी हे चलन स्वीकारलं जाईल. संयुक्त अरब आमिरातीचे नागरिक आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘एमवॉलेट’ नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून या चलनामध्ये सगळे व्यवहार करू शकतील. दैनंदिन वस्तू विकत घेण्यापासून ते पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी हे चलन वापरलं जाईल. स्मार्टफोनमधल्या NFC चा वापर करून कॉन्टॅक्टलेस पेमेंटही करता येईल. दुबईला जगातलं पहिलं ब्लॉकचेन शहर बनवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. भारतात बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सींवर बंदी असली, तरी एका बातमीनुसार भारत सरकार स्वत:ची अशी एक नवीनच क्रिप्टोकरन्सी बनवण्याचा विचार करत आहे!

बिटकॉईन्सच्या बाबतीत काही गमतिशीर गोष्टीही आहेत. उदाहरणार्थ, फिडेलिटी या गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या कंपनीनं सन २०१७ मध्ये बिटकॉईन्सचा वापर सुरू केला. बिटकॉईनचा वापर करून त्यांनी एका धर्मादाय प्रकल्पासाठी तब्बल २.२ कोटी बिटकॉईन्स जमवले होते! बिटकॉईन्सचा सगळ्यांत मोठा व्यवहार हा १९४९९३ बिटकॉईन्सचा होता. बिटकॉईन्सची डेबिट कार्ड्‍‍सही मिळतात. अर्थात बिटकॉईन्सवर अनेकांनी हल्ले केलेच. जुलै २०१७ मध्ये हॅकर्सनी बिथंब नावाचं बिटकॉईनचं एक्स्चेंज हॅक केलं होतं. बिटकॉईनच्या व्यवहारात रिफंड होऊ शकत नाही. डेल, मायक्रोसॉफ्ट आणि एक्स्पेडिया या कंपन्या बिटकॉईनचा स्वीकार करतात. बिटकॉईन्समध्ये व्यवहार केला, तर बेल्जियममध्ये व्हॅटवर सूट मिळते. बिटकॉईन कॅश, बिटकॉईन एक्स टी, बिटकॉईन क्लासिक, बिटकॉईन अनलिमिटेड आणि बिटकॉईन गोल्ड ही बिटकॉईनची चलनं आहेत. बिटकॉईनचं सगळ्यांत मोठं वॉलेट एफबीआयकडे आहे.
कालांतरानं अनेक अमेरिकी कंपन्या बिटकॉईन विकत घ्यायला लागल्या. त्याला एक गमतिशीर कारणही होतं. अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या हॅकर्सना खंडणी द्यायची वेळ येते. अशा वेळी जितका वेळ जाईल तितकं कंपनीचं काम थांबून राहू शकतं. बिटकॉईनच्या ट्रान्स्फरचा वेग पाहता त्याचा उपयोग खंडणी देण्यासाठी करता येऊ शकतो. म्हणूनही या कंपन्यांनी बिटकॉईन्स विकत घ्यायला सुरवात केली. ब्लॉकचेनवर ‘ब्लॉकचेन: द नेक्स्ट एव्हरीथिंग’ नावाचं पुस्तक लिहिणाऱ्या स्टीफन विल्यम्सच्या मते, ‘बिटकॉईन्सच्या यंत्रणेमधला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे या यंत्रणेला लागणारी ऊर्जा.’ ही ऊर्जा प्रचंड असते आणि त्यामुळे जर बिटकॉईन्सची प्रगती व्हायची असेल, तर या संदर्भात काय बदल केले पाहिजेत याविषयी तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.’

बिटकॉईन्स लोकप्रिय झाली, तसं अनेक ‘अल्टकॉईन्स’ म्हणजेच पर्यायी क्रिप्टोकरन्सीज बाजारात दिसायला लागल्या. सन २०११ मध्ये आलेली ‘लिटेकॉईन’ त्यापैकीच एक क्रिप्टोकरन्सी आहे. बऱ्यापैकी बिटकॉईनसारखीच असलेल्या या करन्सीचा ब्लॉक तयार करायचा वेग बिटकॉईनपेक्षा जास्त आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. अशीच एक लोकप्रिय करन्सी म्हणजे सन २०१५ मध्ये आलेली ‘इथियरम.’ इथियरममध्ये तर युजरला ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्टस्’ या सॉफ्टवेअरच्या मदतीनं स्वत:च्या भाषेत स्वत:चा प्रोग्रॅम तयार करता येईल अशी सोय केली आहे. त्यामुळे कोण्या तिसऱ्या कंपनीच्या मदतीशिवाय युजर आपला प्रोग्रॅम तयार करून व्यवहार करू शकतो. अशाच प्रकारे झेडकॅश, डॅश, रिपल, मोनेरो, बिटकॉईन कॅश, निओ, कारडानो अशा जवळपास दोन हजार क्रिप्टोकरन्सीज आज बाजारात कार्यरत आहेत. यातल्या साधारणपणे एक हजार करन्सीज काळानुसार ‘डेड’ म्हणजेच लुप्त होतात, तर काही नव्या बाजारात येतात. आता हा लेख लिहीत असतानाही त्यातल्या किती करन्सीज लुप्त झाल्या असतील आणि नव्या करन्सीजचा जन्म झाला असेल कोण जाणे.

अलीकडेच फेसबुकनं ‘लिब्रा’ या क्रिप्टोकरन्सीची घोषणा केली. फेसबुकची आतापर्यंतची लोकप्रियता (आज फेसबुकच्या युजर्सची संख्या जवळपास अडीच अब्जांच्या घरात आहे) आणि क्रिप्टोकरन्सीविषयी वाढत जाणारी क्रेझ या गोष्टी लक्षात घेता लिब्राचं भवितव्य खूपच उज्ज्वल आहे यात शंकाच नाही; पण याचबरोबर एक मोठी भीती व्यक्त केली जातीये. आत्तापर्यंत शाळा/कॉलेजेस, हॉस्पिटल्स एवढंच कशाला कॉर्पोरेटस् यांनी चालवलेले तुरुंगही अस्तित्वात आले आणि फोफावले; पण आता जर कॉर्पोरेटसनी आपापली चलनंही काढली आणि उद्या सैन्यही ठेवायला सुरवात केली, तर सरकारची गरजच राहणार नाही. कम्युनिझमच्या अंतिम टप्प्यावर ‘द स्टेट विल विदर अवे (सरकार नाहीसंच होईल)’ असं मार्क्स म्हणाला होता. आपली वाणी कदाचित भांडवलशाहीच पूर्ण करेल हे त्याच्या स्वप्नात तरी आलं असेल का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang achyut godbole write bitcoin Growth and future article