ई-मेलचा रंजक इतिहास (अच्युत गोडबोले)

अच्युत गोडबोले achyut.godbole@gmail.com
Sunday, 3 November 2019

इंटरनेट हे संवाद साधन म्हणून सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झालं ते हॉटमेल आल्यावर! सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ या दोघा मित्रांच्या डोक्यात हॉटमेलची कल्पना अगदी सहज गप्पा मारता मारता आली आणि गुंतवणूकदारांच्या मदतीनं त्यांनी ४ जुलै १९९६ रोजी ‘हॉटमेल’ ही कंपनी स्थापन केली. सुरवातीला हॉटमेल कंपनीचे चौदापैकी तीनच पगारी कर्मचारी होते. अर्थात हॉटमेलच्या प्रगतीबरोबर त्यांचीही संख्या वाढून ६० झाली. सुरवातीपासून कॅलिफोर्नियामधल्या सनीवेलस्थित ‘हॉटमेल कॉर्पोरेशन’ या कंपनीनं हॉटमेल ही सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी मोफत द्यायला सुरवात केली.

इंटरनेट हे संवाद साधन म्हणून सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झालं ते हॉटमेल आल्यावर! सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ या दोघा मित्रांच्या डोक्यात हॉटमेलची कल्पना अगदी सहज गप्पा मारता मारता आली आणि गुंतवणूकदारांच्या मदतीनं त्यांनी ४ जुलै १९९६ रोजी ‘हॉटमेल’ ही कंपनी स्थापन केली. सुरवातीला हॉटमेल कंपनीचे चौदापैकी तीनच पगारी कर्मचारी होते. अर्थात हॉटमेलच्या प्रगतीबरोबर त्यांचीही संख्या वाढून ६० झाली. सुरवातीपासून कॅलिफोर्नियामधल्या सनीवेलस्थित ‘हॉटमेल कॉर्पोरेशन’ या कंपनीनं हॉटमेल ही सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी मोफत द्यायला सुरवात केली. इंटरनेटचा जन्म झाल्यावर ही सुविधा मोफत देणारी ही पहिलीच कंपनी होती. त्याबरोबर लोकांनी धडाधड हॉटमेलमध्ये आपली खाती उघडायला सुरवात केली. पहिल्याच वर्षी हॉटमेलचे एक कोटीहून जास्त सभासद झाले होते.

एकीकडे ई-मेल लोकप्रिय होत असतानाच ई-मेलचा शोध नेमका कोणी लावला यावर मतभेद होतेच. मूळचा भारतीय असलेल्या आणि अमेरिकेत स्थायिक असलेल्या व्ही. ए. शिवा अय्यादुराई यानं ई-मेलचं सॉफ्टवेअर प्रथम लिहिलं असं मानलं जातं. त्याची आई ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड डेन्टिस्ट्री ऑफ न्यूजर्सी’ या वैद्यकीय विद्यापीठात नोकरीला होती. इथं होणारी भरमसाट कागदांची देवाणघेवाण त्यानं पाहिली होती. ती लक्षात घेऊन त्यानं ई-मेल नावाचं सॉफ्टवेअर लिहिलं आणि सन १९८२ मध्ये या सॉफ्टवेअरच्या कॉपीराईटसाठी आपला दावा दाखल केला. मात्र, त्याच्या आधीच ई-मेल ही सेवा आर्पानेटवरून कार्यरत झालेली होती. त्यामुळे तो या सेवेचा दावेदार असूच शकत नाही, असं आर्पानेटला पाठिंबा देणाऱ्यांचं म्हणणं होतं; पण त्यानं तयार केलेलं हे सॉफ्टवेअर आर्पानेटच्या आधीच तयार केलं होतं; तसंच या सेवेत आर्पानेटपेक्षा वेगळ्या सुविधा होत्या आणि मुख्य म्हणजे त्याला ई-मेल हे नावही अय्यादुराईनं दिलं असा दावा अय्यादुराईला पाठिंबा देणाऱ्यांनी केला होता. हा वाद साधारण सन २०११ पासून चालू झाला- तो २०१६ मध्ये मिटवला गेला. ‘मी भारतीय वंशाचा आहे; तसंच रंगानं सावळा आहे म्हणून आपल्यावर हा अन्याय होतोय,’ असं अय्यादुराईनं ट्वीट करून या वादावर काही काळासाठी तरी पडदा टाकला. मात्र, या सगळ्यात गंमतीचा आणि कौतुकाचा भाग असा, की त्यानं जेव्हा हे सॉफ्टवेअर लिहिलं, तेव्हा तो अवघा १४ वर्षांचा होता!

इंटरनेट हे संवाद साधन म्हणून सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झालं ते हॉटमेल आल्यावर! सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ या दोघा मित्रांच्या डोक्यात हॉटमेलची कल्पना अगदी सहज गप्पा मारता मारता आली आणि गुंतवणूकदारांच्या मदतीनं त्यांनी ४ जुलै १९९६ रोजी ‘हॉटमेल’ ही कंपनी स्थापन केली. सुरवातीला हॉटमेल कंपनीचे चौदापैकी तीनच पगारी कर्मचारी होते. अर्थात हॉटमेलच्या प्रगतीबरोबर त्यांचीही संख्या वाढून ६० झाली. सुरवातीपासून कॅलिफोर्नियामधल्या सनीवेलस्थित ‘हॉटमेल कॉर्पोरेशन’ या कंपनीनं हॉटमेल ही सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी मोफत द्यायला सुरवात केली. इंटरनेटचा जन्म झाल्यावर ही सुविधा मोफत देणारी ही पहिलीच कंपनी होती. त्याबरोबर लोकांनी धडाधड हॉटमेलमध्ये आपली खाती उघडायला सुरवात केली. पहिल्याच वर्षी हॉटमेलचे एक कोटीहून जास्त सभासद झाले होते. गंमत म्हणजे त्यावेळी सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन ऑनलाईन (AOL) या ई-मेल कंपनीलाही हॉटमेलनं मागं टाकलं. अमेरिका ऑनलाइनला सहा वर्षांत जेवढे ग्राहक मिळाले त्यापेक्षाही जास्त ग्राहक हॉटमेलला दोन वर्षांत मिळाले! एकंदरीत या कल्पनेचा अपाका बघून बिल गेट्सही त्यावर फिदा झाला आणि मायक्रोसॉफ्टनं हॉटमेल खरेदी केली! मायक्रोसॉफ्टशी करार झाल्यावर कंपनीचे सगळे साठच्या साठ कर्मचारी चक्क कोट्यधीश झाले!!

अर्थात काहीच वर्षांत हॉटमेलला प्रतिस्पर्धी निर्माण झालेच. याहू मेल हा त्यातलाच एक प्रतिस्पर्धी होता. जेरी यांग आणि डेव्हिड फिलो या स्टँनफर्ड विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘यट अनदर हायरार्किकल ऑफिशियस ओेरॅकल’ (YAHOO- याहू) या कंपनीनं चालू केलेल्या याहू.कॉम या सर्च इंजिनला प्रचंड प्रतिसाद मिळत होताच. एकाच वर्षात या वेबसाईटला जवळपास १० लाख हिट्स मिळाले होते. सन १९९७ मध्ये त्यांनी ई-मेलच्या व्यवसायात उतरायचा निर्णय घेतला आणि ‘फॉर इलेव्हन’ ही ऑनलाईन सेवा पुरवणारी कंपनीच विकत घेतली. या कंपनीची पूर्वीची ई-मेल सेवा ही ‘रॉकेटमेल’ या नावानं कार्यरत होती. याहूनं ही कंपनी विकत घेतल्यावर या मेलचं नामकरण ‘याहू मेल’ असं झालं.

मात्र, यानंतर लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या गुगल कंपनीच्या संस्थापकांनी सन २००४ मध्ये ‘जीमेल’ या नावानं आपली ई-मेल सुविधा सुरू करून ई-मेलच्या बाजारपेठेत उडी मारली आणि ई-मेलची जवळपास सगळी बाजारपेठ काबीज केली. गुगल कंपनीच्या यशात जीमेलचा खूप मोठा वाटा होता. याचं श्रेय जितकं गुगलला जातं, तितकंच त्यासाठी सॉफ्टवेअर लिहिणाऱ्या पॉल बूहाईट यालाही जातं.
हॉटमेल आणि याहू यांच्यासारख्या कंपन्या ई-मेल्सची सुविधा पुरवत असतानाही आपण त्याहीपेक्षा वेगळ्या सुविधा देणारं ई-मेल सॉफ्टवेअर बनवावं असं बूहाईटला कॉलेजमध्ये असल्यापासूनच वाटत होतं. पूर्वीचे ई-मेल्स वापरायला जरा अवघडच होते. प्रत्येक ई-मेल युजरला आपल्या ई-मेल्साठी दोन-चार मेगाबाईट्स इतकीच जागा दिली जायची. त्यामुळे नवीन मेल आपल्या मेल बॉक्समध्ये येण्यासाठी युजरला आधीचे मेल्स डिलीट करत बसावं लागायचं. दुसरं एक दिव्य होतं ते आधी आलेला मेल शोधण्याचं! हे आणि असे अनेक दोष नसलेलं ई-मेल सॉफ्टवेअर बूहाईटला लिहायचं होतं. अगदी सहज वापरता येईल अशी ई-मेल सुविधा असावी असं त्याला वाटायचं. तसं सॉफ्टवेअर त्यानं लिहायला घेतलंही; पण ते अर्धवटच राहिलं. वयाच्या तेविसाव्या वर्षी गुगलमध्ये दाखल झाल्यावर मात्र त्यानं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ते वर्ष होतं २००१!

बूहाईटच्या या संकल्पनेला गुगलमधल्या अनेकांचा विरोध होता. आपलं सर्च इंजिन इतकं चांगलं चाललेलं असताना ई-मेलच्या भानगडीत कंपनीनं पडू नये, असं विरोधकांना वाटत होतं. पेज आणि ब्रिन या गुगलच्या द्रष्ट्या संस्थापकांचा मात्र बूहाईटला जबरदस्त पाठिंबा मिळाला. आपल्या सर्च इंजिनपमाणेच ई-मेलही लोकप्रिय होईल अशी पेज आणि ब्रिन यांना खात्री वाटत होती.
गुगलचा मेल म्हणून या मेलचं नाव जीमेल असायला हवं यावर सगळ्यांचं जरी एकमत झालं असलं, तरी जसं आपण सर्च इंजिनमध्ये जाहिराती दाखवतो तशा इथंही दाखवायच्या की नाही यावर मात्र पचंड वाद झाले. मेल्स या वैयक्तिक असतात आणि आपण मेलमध्ये लिहीत असलेल्या किंवा वाचत असलेल्या विषयाला अनुसरून जर जाहिराती येत राहिल्या, तर तो वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला असेल असं काहींचं मत होतं; आणि असं झालं तर लोक जीमेल वापरणं बंद करतील अशी भीतीही काहींनी व्यक्त केली. याउलट बूहाईट, पेज, ब्रिन आणि इतर काहींची मतं वेगळी होती. ई-मेल वाचताना किंवा लिहिताना त्याला अनुसरून जाहिराती असतील तर युजर्स त्यांना विरोध करणार नाहीत; उलटपक्षी मोफत असलेल्या या सुविधेला उत्पन्नाचा आधार मिळेल असंच त्यांना वाटलं. शेवटी जाहिराती दाखवण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल मिळाला. अर्थात हे विरोधकांना आवडलं नाहीच.

अखेर इतर ई-मेल कंपन्यांपेक्षा वेगळ्या आणि जास्त सुविधा असलेला अत्याधुनिक जीमेल इंटरनेट युजर्सच्या सेवेत हजर झाला. एक हजार मेगाबाईट्सची जागा, ज्याला मेल पाठवायचा असेल, त्याचं नुसतं नाव जरी टाईप केलं तरी त्याचा/तिचा संपूर्ण ई-मेल आयडी आपोआप टाईप होणं म्हणजेच ‘ऑटोकम्प्लीट’ अशा अनेक सोयी असलेला आणि वापरायला सोपा असलेला असा जीमेल लवकरच लोकप्रिय झाला. लोकांसाठी हे सगळंच नवीन होतं.
दरम्यान जाहिराती, धमक्या, भावनिक आवाहनं, खोटा मजकूर, सनसनाटी बातम्या अशा अनेक स्वरूपाच्या ‘स्पॅम’मेल्सची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली होती. सध्याच्या एका अंदाजानुसार, आता जगभरात दररोज काही हजार कोटींच्या वर स्पॅम ई-मेल्स पाठवल्या जातात! असे ई-मेल पाठवण्याच्या बाबतीत अमेरिका, चीन आणि रशिया हे देश पुढे आहेत.

खरं तर असे ‘स्पॅम ई-मेल्स’ पाठवण्याची सुरवात सन १९७८ च्या मे महिन्यात झाली होती. ‘डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन’ (डेक) नावाच्या कंपनीत गॅरी थुर्क नावाच्या एका माणसानं आपल्या कंपनीची जाहिरात ई-मेलनं जवळपास सहाशे लोकांना पाठवली; पण गंमत म्हणजे या सहाशेपैकी फक्त तीनशे जणांनाच ही मेल मिळाली. ही मेल जगातली पहिली स्पॅम मेल समजली जाते. त्यानंतर लहानमोठ्या प्रमाणात असे मेल्स पाठवणं सुरू असलं, तरी १९९४ च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या ‘ग्रीनकार्ड लॉटरी’च्या संदर्भातली मेल फिनिक्समधल्या कँटर आणि सिगल नावाच्या दोन वकिलांनी खूप मोठ्या प्रमाणात पाठवली आणि या मेलपासूनच खऱ्या अर्थानं ‘स्पॅम’चा जन्म झाला असं म्हणतात. या मेलमधनं कँटर आणि सिगल यांना फारसं काही मिळालं नसलं, तरीही ‘स्पॅम’ मेल्सच्या मदतीनं श्रीमंत कसं व्हावं याविषयी त्यांनी चक्क एक पुस्तक लिहिलं; पण त्यातही त्यांना अपयश मिळालं; मग श्रीमंत होणं तर दूरच राहिलं. मात्र, या मेलमुळे ‘स्पॅम’ मेल्सना मात्र लोकप्रियता मिळाली. जाहिरातदारांकडून लोकांच्या ई-मेल अकौंट्समध्ये अशा ‘स्पॅम’ मेल्सचा नुसता पाऊस कोसळायला लागला. लोक अशा मेल्सना प्रचंड वैतागत. आजही एकूण मेल्सपैकी चाळीस-पन्नास टक्के मेल्स या स्पॅम असतात. सन २००७ मध्ये ई-मेल आणि अन्य माध्यमं यांच्या रूपानं लोकांना लुबाडणं आणि मुख्य म्हणजे स्पॅम ई-मेल्स पाठवून वैतागून सोडणं यासाठी अमेरिकेतल्या रॉबर्ट सॉलोवे नावाच्या एका ई-मेल स्पॅमरवर तर चक्क खटला भरला गेला होता आणि त्याला चार वर्षांची कैद आणि तेरा लाख डॉलर्सचा दंड अशी शिक्षा ठोठावली गेली होती!

ई-मेलविषयी काही गंमतशीर माहिती इंटरनेटवर मिळते. उदाहरणार्थ, दर सेकंदाला २७ लाख ई-मेल्स पाठवल्या जातात. बिल क्लिंटन यांनी आठ वर्षं राष्ट्राध्यक्ष असताना फक्त दोनच ई-मेल्स पाठवल्या होत्या! २४ तास होऊन गेल्यावर पाठवलेली ई-मेल उघडून वाचली जाईल याची शक्यता फक्त एक टक्का एवढीच आहे! सोशल मीडिया आल्यावरही लोक संपर्क साधण्यासाठी ई-मेललाच पसंती दाखवतात. ई-मेल्स वाचण्याचं प्रमाण सर्वांत जास्त मंगळवारी (२० टक्के); तसंच सोमवारी आणि बुधवारी (१८ टक्के) आहे, असं हबस्पॉटस् रिपोर्ट सांगतो.
ई-मेलमुळे जग खूप जवळ आलंय यात शंकाच नाही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang achyut godbole write email history article