टेक्नॉलॉजिकल कन्व्हर्जन (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडून त्यांचं जाळं बनवताना तारा वापरायची गरजच राहिली नाही तर किती बरं होईल- म्हणजेच कॉम्प्युटर्स एकमेकांना हवेतूनच संदेश आणि माहिती पाठवू शकले तर किती बरं होईल या विचारांमधून ‘बिनतारी लोकल एरिया नेटवर्क’ (लॅन) बनवायचे प्रयत्न सुरू झाले. या ‘वायरलेस लॅन’चंच दुसरं नाव ‘वायरलेस फायडेलिटी’ (वायफाय) हे आहे. मात्र, वायफाय आणि ब्ल्यूटूथ यांच्यात एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे ब्ल्यूटूथ दोन उपकरणं बिनतारी पद्धतीनं जोडतं, तर वायफाय कॉम्प्युटर्स बिनतारी पद्धतीनं जोडतं. वायरलेस इंटरनेटची वाढ गेल्या २० वर्षांत खूपच झपाट्यानं झाली. ही वाढ मुख्यत्वेकरून विकसनशील देशांमध्ये खूपच झाली. सन २००० मध्ये जगात ७० कोटी मोबाईल फोन्स होते आणि त्यातले ७१ टक्के विकसित देशांमध्ये होते. मात्र, २०१९ पर्यंत ही परिस्थिती उलट झाली होती. मोबाईल फोन्सची संख्या वाढून जवळजवळ ११ पट म्हणजे ८१० कोटी झाली होती, आणि त्यातले ८० टक्के विकसनशील देशांत होते!

मोबाईल फोन्समधली अजून एक अतिशय उपयुक्त सुविधा म्हणजे ‘व्हॉइस मेल.’ याचा शोध नेमका कुणी लावला याबद्दल बरेच वाद असले, तरी सन १९७० मध्ये टेक्सासमधल्या डलास इथल्या अॅक्शन कम्युनिकेशन सिस्टिम्सचा मालक गोर्डन मॅथ्यूज यानं हा शोध लावल्याचा एक दावा केला जातो. त्याला आपल्या एका ग्राहकाशी संपर्क करायचा होता; पण दोघांच्या वेगवेगळ्या टाइम झोन्समुळे हे शक्य होईना आणि या गरजेतूनच व्हॉइस मेलचा शोध लागला असं म्हटलं जातं. सन १९७९ मध्ये त्यानं व्हॉईस मेलच्या पेटंटसाठी अर्ज भरला आणि ‘व्हॉइस मेसेजिंग एक्सप्रेस (व्हीएमएक्स)’ या नावानं स्वत:ची व्हॉइस मेल सेवा देणारी कंपनी सुरू केली. मात्र, काही जण या शोधाचं श्रेय हे स्कॉटिश संशोधक स्कॉट जोन्स याला देतात. सन १९८५ मध्ये त्यानं स्वत:ची ‘बॉस्टन टेक्नॉलॉजी इनकॉर्पोरेशन’ ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर जोन्सनं दुसऱ्या वर्षीच म्हणजे सन १९८६ मध्ये व्हॉइस मेलचा शोध लावला होता. आश्चर्य म्हणजे त्यावेळी त्याचं वय होतं अवघं २६ वर्षं!

आयबीएम कंपनीनं फ्लॉरिडात १६ ऑगस्ट १९९४ रोजी झालेल्या वायरलेस वर्ल्ड कॉन्फरन्सध्ये पहिल्या स्मार्टफोनची घोषणा केली. या फोनचं अनेकदा नामकरण झालं. हा फोन तयार होत असताना त्याचं नाव ‘अँग्लर’ असं होतं; तर हा फोन बाजारात येईपर्यंत त्याचं नाव ‘सायमन पसर्नल कम्युनिकेटर’ असं झालं होतं. या स्मार्टफोनमध्ये कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, वर्ल्ड क्लॉक म्हणजेच घड्याळ, गेम्स, अॅड्रेस बुक, नोट पॅड यांसारख्या म्हणजे ‘पसर्नल डिजिटल असिस्टंट’मध्ये (पीडीए) असतात, त्या सगळ्या सोयी तर होत्याच; पण त्याहूनही विशेष म्हणजे या मोबाईलमध्ये पहिल्यांदाच ‘टचस्क्रीन’ या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता. या मोबाईलची किंमत ८९९ डॉलर्स इतकी होती; पण आयबीएमनं फक्त २००० मोबाईल्सच्या हँडसेट्सचीच निर्मिती केली होती; आणि पुढे हा किस्सा इथंच थांबला.

सन १९९७ मध्ये एका अफलातून मोबाईल हँडसेटचा जन्म झाला. फिलिप काह्न या फ्रान्समधल्या संशोधकानं पहिला कॅमेरा फोन तयार केला. काह्नला याच सुमारास मुलगी झाली होती. त्यानं आपल्या सोफी नावाच्या मुलीचे मॅटर्निटी वॉर्डमध्ये जाऊन या फोनवरून जे फोटो काढले, तेच मोबाईल कॅमेरा फोनमधून काढलेले पहिले फोटो ठरले! गंमत म्हणजे काह्न यानं हे तंत्रज्ञान चक्क काही तासांत बनवलं होतं. हा किस्साही मजेशीर आहे. आपल्या मुलीचे फोटो काढावेत आणि ते मित्रांना आणि आप्तांना पाठवावेत असं त्याच्या मनात होतंच. मात्र, तोपर्यंत अशी काही सोय नव्हती. हॉस्पिटलमध्ये बायकोला डिलिव्हरीसाठी आत नेलेलं असतानाही त्याच्या डोक्यात हेच विचार चालू होते; आणि खरं तर त्याला वॉर्डबाहेर नुसती वाट पाहून पाहून कंटाळाही यायला लागला होता. मग त्यानं चक्क हॉस्पिटलमध्ये बसल्या बसल्या या तंत्रज्ञानावर काम करायला सुरुवात केली. त्यानं आपला डिजिटल कॅमेरा आपल्या मोबाईलला जोडला आणि मोबाईल आपल्या लॅपटॉपला सिंक (Sync) केला. लॅपटॉपमध्ये त्यानं एक छोटासा प्रोग्रॅम लिहिला होता आणि मोबाईल लॅपटॉपला सिंक झाल्यामुळे आता हा प्रोग्रॅम या मोबाईलमध्ये चालणार होता. गंमत म्हणजे त्यानं केलेला हा उपद्व्याप चांगलाच यशस्वी झाला. त्यानं आपल्या मुलीचे फोटो तर काढलेच; पण ते ताबडतोब आपल्या शेकडो नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला पाठवलेही!

यानंतर काह्ननं आपलं हे तंत्रज्ञान विकसित केलं आणि जपानमधल्या शार्प या मोबाईल कंपनीनं आपल्या मोबाईलमध्ये हे तंत्रज्ञान वापरून हा मोबाईल बाजारात उतरवला. अमेरिकेत कॅमेरा मोबाईल यायला मात्र काही वर्षांच काळ जावा लागला.
इंटरनेटचा शोध लागल्यावर मोबाईल तंत्रज्ञानात अजून एका भन्नाट तंत्रज्ञानाची भर पडली. ती सुविधा म्हणजे मोबाईलवरून इंटरनेटचा वापर करता येणं! जीएसएम मोबाईलवरून ई-मेल्स किंवा इंटनरनेटच्या वेबसाईट्स बघता याव्यात यासाठी ‘जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस’ (जीपीआरएस) हे तंत्रज्ञान वापरता येतं.

कॉम्प्युटर वापरताना आपल्याला कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, स्कॅनर अशी अनेक उपकरणं त्याला जोडावी लागतात. या सगळ्या उपकरणांना जोडून आपल्या कॉम्प्युटरच्या आसपास तारांचं एक जंजाळच तयार होतं. त्यामुळे अनेकदा कुठली तार कशाची आहे, ती कुठं चालू झाली आहे आणि कुठं संपते आहे अशा अनेक गोष्टी पटकन कळत नसल्यानं आपण खूपच वैतागून जातो. अशा वेळेला या तारांना बिनतारी पर्याय मिळाला तर किती बरं होईल, या संकल्पनेमधून ‘ब्ल्यूटूथ’च्या तंत्रज्ञानाची निर्मिती झाली. ब्ल्यूटूथचा वापर करून बिनतारी माध्यमातून दोन उपकरणं एकमेकांशी संवाद साधू शकतात. ब्ल्यूटूथ वापरून आपण कॉम्प्युटर-कीबोर्ड, कॉम्प्युटर-माऊस, कॉम्प्युटर-प्रिंटर, कॉम्प्युटर-स्कॅनर अशा अनेक उपकरणांच्या जोड्यांमधल्या तारा टाळू शकतो. अलीकडे अनेक जण ब्ल्यूटूथची सोय असेलला मोबाईल फोन वापरतात. त्यामुळे कानाला हेडफोन लावलेला असला, तरी त्याला तारांनी न जोडलेला मोबाईल फोन हातात किंवा खिशात दुसरीकडेच अशा अवस्थेत आपण अनेकांना बघतो. त्यामुळे बरेचदा हा माणूस एक तर वेड लागल्यामुळे काहीतरी पुटपुटत चालला आहे किंवा आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतो आहे की काय असं आपल्याला वाटतं. ब्ल्यूटूथचं तंत्रज्ञान साधारण ३३ फुटांच्या अंतरापर्यंत चालतं. म्हणजे ज्या दोन उपकरणांना तारा न वापरता त्याऐवजी ब्ल्यूटूथ वापरून एकमेकांशी संपर्क साधायचा असेल, त्यांच्यातलं अंतर जास्तीत जास्त ३३ फूट इतकं असलेलं चालतं. जेव्हा ब्ल्यूटूथची भाषा समजणारी दोन उपकरणं एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा ती आपोआप एकमेकांशी ‘बोलू’ शकतात आणि माहितीची देवाणघेवाण करून त्यांचं काम सुरू होतं. त्यासाठी या सगळ्या उपकरणांमध्ये आपल्याला दिसणारसुद्धा नाहीत इतक्या सूक्ष्म आकाराचे अँटेनाज बसवलेले असतात. त्या अँटेनांच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण होते.

ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानावर पहिल्यांदा एरिक्सन कंपनीनं सन १९९४ मध्ये काम सुरू केलं. मोबाईल फोन, पर्सनल डिजिटल असिस्टंट (पीडीए) म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डायरी आणि अशा प्रकारच्या इतर उपकरणांचा तारा न जोडता कशा प्रकारे वापर करता येईल यावर एरिक्सनचं काम सुरू होतं. या कामात एरिक्सननं नंतर आयबीएम, इंटेल, नोकिया आणि तोशिबा अशा कंपन्यांना सहभागी करून घेतलं.

ब्ल्यूटूथ ही सुविधा अतिशय उपयुक्त आहे. विशेषत: गाडी चालवताना. गाडी चालवत असताना आपल्याला आलेला फोन घ्यायचा झाला, तर प्रत्यक्ष मोबाईल हँडसेटवरचं बटन न दाबता कानाला लावलेल्या ब्ल्यूटूथ या इवल्याशा उपकरणाचं बटन दाबायचं आणि फोनवर प्रत्यक्ष मोबाईल हँडसेटवर बोलायचं असा हा प्रकार आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी झाली. फक्त कारच नाही, तर मोबाईल एका जागी ठेवून दुसरीकडे आपण काम करता करताही फोन रिसिव्ह करू शकतो!

मात्र, या तंत्रज्ञानाचं ब्ल्यूटूथ हे नाव का ठेवलं गेलं याची कथाही रंजक आहे. इसवीसन ९४० ते ९८१ या काळात हॅरल्ड ब्लेटँड या डेन्मार्कच्या राजानं युद्धात नॉर्वे देश जिंकून तो अगदी सहजपणे डेन्मार्कला जोडून टाकला. इंग्रजीत ब्लेटँडचा अर्थ आहे ‘ब्ल्यूटूथ.’ या राजानं डेन्मार्कला जसं नॉर्वे सहजपणे जोडला तसंच हे तंत्रज्ञानही अगदी सहजपणे दूरवर असलेली यंत्रणा कुठलीही मध्यस्थी न घेता जोडली जाणार होती- म्हणून या राजावरून या तंत्रज्ञानाचं नाव ‘ब्ल्यूटूथ’ ठेवलं गेलं!

कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडून त्यांचं जाळं बनवताना तारा वापरायची गरजच राहिली नाही तर किती बरं होईल- म्हणजेच कॉम्प्युटर्स एकमेकांना हवेतूनच संदेश आणि माहिती पाठवू शकले तर किती बरं होईल या विचारांमधून ‘बिनतारी लोकल एरिया नेटवर्क’ (लॅन) बनवायचे प्रयत्न सुरू झाले. या ‘वायरलेस लॅन’चंच दुसरं नाव ‘वायरलेस फायडेलिटी’ (वायफाय) हे आहे. मात्र, वायफाय आणि ब्ल्यूटूथ यांच्यात एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे ब्ल्यूटूथ दोन उपकरणं बिनतारी पद्धतीनं जोडतं, तर वायफाय कॉम्प्युटर्स बिनतारी पद्धतीनं जोडतं. वायरलेस इंटरनेटची वाढ गेल्या २० वर्षांत खूपच झपाट्यानं झाली. ही वाढ मुख्यत्वेकरून विकसनशील देशांमध्ये खूपच झाली. सन २००० मध्ये जगात ७० कोटी मोबाईल फोन्स होते आणि त्यातले ७१ टक्के विकसित देशांमध्ये होते. मात्र, २०१९ पर्यंत ही परिस्थिती उलट झाली होती. मोबाईल फोन्सची संख्या वाढून जवळजवळ ११ पट म्हणजे ८१० कोटी झाली होती, आणि त्यातले ८० टक्के विकसनशील देशांत होते!

वायफायसाठी एक वायरलेस राउटर लागतो. त्यात खूप कमी शक्तीचे रेडिओ ट्रान्स्मिटर आणि रिसिव्हर असतात. त्यांची रेंज ९० मीटर्स किंवा ३०० फूट असते. या रेंजमधल्या कुठल्याही कॉम्प्युटरला हा राउटर इंटरनेटशी जोडू शकतो; पण यासाठी प्रत्येक लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये रेडिओ ट्रान्स्मिटर आणि रिसिव्हर असावे लागतात. आता जवळपास सगळ्या नवीन लॅपटॉप्समध्ये हे आतच बसवलेले असतात. मात्र, पूर्वी त्यांच्यासाठी एक वायरलेस अॅडॅप्टर कार्ड यूएसबीमध्ये खोचून ठेवायला लागायचं. एअरटेल, जिओ वगैरे वायरलेस इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या वायरलेस राउटरबरोबर हा यूएसबीमध्ये बसवायचा अॅडॅप्टर द्यायचे. थोडक्यात या वायरलेस लॅनमधला राउटर हा एक इंटरनेटचा ‘अॅक्सेस पॉईंट’ बनतो. यामुळे त्याभोवती इंटरनेट कनेक्शनचं आसपासच्या वातावरणात एक ‘क्लाउड’ निर्माण होतं. या क्लाउडलाच ‘हॉटस्पॉट’ म्हणतात. या क्लाउडमध्ये किंवा हॉटस्पॉटमध्ये असणारा कोणताही कॉम्प्युटर इंटरनेटला जोडला जाऊ शकतो. आता असे वायफाय हॉटस्पॉट्स एअरपोर्ट्‌स, हॉटेल्स, दुकानं, कॉलेज कँपस अशा ठिकाणी निर्माण होताहेत. जर मोठा पब्लिक क्लाऊड किंवा हॉटस्पॉट निर्माण करायचा असेल, तर त्यासाठी शेकडो अॅक्सेस पॉईंट्स निर्माण करावे लागतात. ही संख्या वाढतच चालली आहे. सन २००७ पर्यंत फक्त अमेरिकेतच १ लाख ८००० पब्लिक हॉटस्पॉट्स होते, तर ऑगस्ट २०१९ पर्यंत जगात त्यांची संख्या ३६.२ कोटी एवढी झाली असं ‘स्टॅटिस्टा’ सांगतं !
आज मोबाईल फोन म्हणजे एक कॉम्प्युटरच झाला आहे. त्यावर आता टीव्हीही बघता येतो. मोबाईल, टीव्ही आणि कॉम्प्युटर यांचं एकत्र येणं यालाच ‘टेक्नॉलॉजिकल कॉन्व्हर्जन्स’ असं म्हणतात. याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. उदाहरणार्थ- मोबाईलचे आकार कमी होऊन आता मनगटावर बसेल असे घड्याळाच्या आकाराचे मोबाईल्स तर निघालेलेच आहेत. उद्याच्या जगात आपला बँक बॅलन्स हा मोबाईलमध्येच ० आणि १ या बिट्सच्या स्वरूपात साठवला जाईल. आपला पगार किंवा मिळकत इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मोबाईलकडे येऊन माझा बॅलन्स वाढेल. जेव्हा मी एखादी गोष्ट खरेदी करतो तेव्हा पेटीएमप्रमाणेच पैसे माझ्या मोबाईलमधून त्या दुकानदाराच्या खात्यात जमा होतील. थोडक्यात उद्याच्या जगात नाणी, नोटा, चेक बुक्स, क्रेडिट कार्ड्‌स, डेबिट कार्ड्‌स हे सगळं कालबाह्य ठरेल. सगळ्या बँका, एटीएम्स, इन्श्युरन्स, स्टॉक एक्स्चेंज वगैरेंच्या इमारतींची गरजच राहणार नाही. थोडक्यात सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील असं बरंच काही.

मोबाईलमध्येच आपण आता टीव्ही बघू शकतो; पण स्मार्ट फोन असेल, तरी काही वेळा त्याचा स्क्रीन लहान पडतो आणि अनेक जणांना त्यावर टीव्ही एकत्रितपणे बघता येत नाही. मात्र, आता आधुनिक मोबाईल्समध्येच एक प्रोजेक्टर बसवलाय. मोबाईलमधला टीव्ही चालू करायचा आणि त्या प्रोजेक्टरनं तो समोरच्या भिंतीवर, टेबलावर किंवा जमिनीवर असं कुठंही आपण सगळे मिळून बघू शकतो.
थोडक्यात मोबाईल म्हणजे काय नाही? घड्याळ, कॅलेंडर, डायरी, गेम्स, एसएमएस, इंटरनेट व्हॉट्सअॅप, कॅमेरा, व्हिडिओ, प्रोजेक्टर, टीव्ही, कॉम्प्युटर, कॅल्क्युलेटर असं बरंच काही. याच गोष्टी इतक्या वाढल्या आहेत, की गंमतीत मी म्हणायचो : ‘‘अरे, मोबाईल फोन्समध्ये बोलताही येतं!’’

पण हे सगळं साधण्यासाठी आणि या सगळ्या कार्यांवर देखरेख ठेवण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टिम लागते. गुगलची ‘अँड्रॉइड’, सॅमसंगची ‘बाडा’, अॅपल आयफोनची iOS, नोकियाची सिम्बियन आणि मायक्रोसॉफ्टची ‘विंडोज मोबाईल’ ही काही मोबाईल्सच्या ऑपरेटिंग सिस्टिम्सची उदाहरणं आहेत. या सगळ्यांमध्ये तुंबळ युद्ध झालं, आणि सिंबियन आणि अँड्रॉइड यांच्यातल्या मारामारीमध्ये अँड्रॉइड जिंकलं. निदान सध्यापुरतं तरी. मात्र, या युद्धात एके काळी मोबाईलच्या जगतात साम्राज्य गाजवणारी नोकिया पूर्ण रसातळाला जाऊन मिळाली. आजही अँड्रॉइडच सगळ्यात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टिम आहे. सन २०१७ मध्ये अँड्रॉइडचा मार्केट शेअर ८५ टक्के, iOS चा १४.७ टक्के, तर बाकीच्यांचा ०.३ टक्के होता!
एकूण मोबाईलनं आत्ताच आपलं जग इतकं आमूलाग्र बदललंय, की उद्या आणखीन काय काय होईल ते कल्पनेच्या बाहेर असणार आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com